जीवनात काही गोष्टी योगायोगाने अशा काही घडत जातात, की मागे वळून पाहताना त्या खरंच घडल्या होत्या यावर विश्वास बसत नाही. तशीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे रेल्वेने युरोपची भ्रमंती!
सन १९८० मध्ये माझा एक मित्र वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेला. त्यानं जर्मनीला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि त्यातूनच एका अविस्मरणीय रेल्वेप्रवासाची आखणी कागदावर उतरली. युरोपमधील अंदाजे १७ देश (ग्रीस ते थेट नॉर्वे, स्वीडन) एकसंध असून त्यांमधील १ लाख मैल लांबीचं रेल्वेचं जाळं प्रवाशांना या सर्व देशांच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेतं. युरोप सोडून परदेशांतील पर्यटकांना या संपूर्ण मार्गावरील रेल्वेचा पास माफक किंमतीत मिळतो. हा पास अगदी १५ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंत मिळतो. महत्त्वाचं म्हणजे सलग तेवढे दिवस वापरून संपवावा लागतो. हा प्रवास फर्स्ट क्लासनं होत असल्यामुळे कोणतीच धकाधक नसते. इंग्लंडची भूमी ही बाकी युरोपीय देशांपासून मध्यात येणाऱ्या ब्रिटिश समुद्रधुनीमुळे वेगळी होत असल्याने व त्यातही ब्रिटिशमंडळी इतरांपासूनचा आपला वेगळेपणा आवर्जून टिकवत असल्याने अर्थातच हा युरेलचा परंतु पास लंडनमध्ये वा इंग्लंडमध्ये फिरण्यासाठी उपयोगी पडणार नव्हता; (आपल्यापुढचा) इंग्लंडसाठी वेगळं तिकीट काढण्याचा पर्याय खुला असतोच.
आम्ही तीन मित्रांनी हा प्रवास करावयाचा व जर्मनी गाठायचेच असा बेत पक्का केला. युरोप रेल नकाशे, युरेल पास नियम, युरेल टाईम टेबल ‘युरोप ऑन १५ डॉलर्स अ डे’ अशी विविध पुस्तकं मिळवणं; याशिवाय प्रत्यक्षात युरेलने प्रवास केलेल्या व्यक्तींशी चर्चा करणं, अशा प्रकारे सहा महिने खपून आमची जय्यत तयारी झाली. कोणती गाडी कोणत्या स्टेशनवर घ्यायची, कोठे राहायचं अशा प्रवासासंबंधी अनेक प्रश्नांच्या उत्तरांची नोंद प्रत्येकाजवळील कागदावर तयार होत होती. आम्हाला भारत सरकारच्या नियमाप्रमाणे ५०० डॉलर्स मिळणार होते. त्यांतील ३२० डॉलर्स ही रक्कम २१ दिवसांच्या युरेल पासासाठी वापरल्यावर, खिशात उरणार फक्त १८० डॉलर्स. त्यांतूनच इतर खर्च भागवायचा, म्हणजे अगदी अटीतटीचा सामना होता. पोटाला चिमटा घ्यायचा, जास्त वेळ गाडीत घालवायचा. त्यातही काही प्रवास रात्रभराच्या गाडीने करावयाचा, पण प्रेक्षणीय स्थळं मात्र पुरेपूर पदरी पाडून घ्यायची ह्या हिशोबाने योजना कागदावर १०० टक्के यशस्वीरीत्या आखली गेली. या पासचं वैशिष्ट्य असं, की कोणतीही गाडी कुठेही पकडता येत होती. मनाला वाटेल तिथे उतरण्याची परवानगी होती. आरक्षण करणंही अजिबात आवश्यक नव्हतं. फक्त ज्या देशांमधून आमचा गाडीचा मार्ग निवडला होता त्या प्रत्येक देशाचा ‘मल्टिपल एन्ट्री व्हिसा’ मुंबईतून ३ महिन्यांच्या मुदतीसाठी घ्यावा लागला होता.
आमचा प्रवासाचा मार्ग साधारण याप्रमाणे आखला गेला
मुंबई ते अॅमस्टरडॅम (हॉलंड) विमानाने प्रवास
१. अॅमस्टरडॅम ते लंडन (इंग्लंड) – ह्या प्रवासाला युरेलचा पास चालणार नव्हता.
२. लंडन ते पॅरिस (फ्रान्स) – येथेही युरेल पास चालणार नव्हता. (पॅरिसहून पुढच्या प्रवासासाठी युरेलचा पास वापरण्यास सुरुवात.)
३. पॅरिस ते जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – ४ दिवस स्वित्झर्लंड देश रेल्वेनं पालथा घालायचा.
४. जिनिव्हा ते इन्सबुक (ऑस्ट्रिया)
५. जर्मनी
६. इटली
अशा रीतीनं ५ देश युरेलनं व दोन देश वेगळी स्वतंत्र तिकिटं काढून पाहावयाचे ठरले.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply