स्वित्झर्लंडला जाणारी पुढील गाडी लिऑन या दुसऱ्या स्टेशनवरून सुटणारी असल्याने संध्याकाळच्या भर गर्दीत ट्यूबनं पॅरिस नॉर्ड येथून सर्व मोठ्या बॅग्ज नेण्यासाठी महा कसरत करावी लागली. मुंबईत याबाबतीत विचार करणंसुद्धा शक्य नाही, परंतु या देशात गाडीतून उतरणं फारच सोपं होतं. लिऑन स्टेशनला अनेक प्लॅटफॉर्मूस, त्यातही इन्डिकेटरवरील गाड्यांची नावं फ्रेंच भाषेत असल्याने आम्हाला ती नीटपणे वाचता येत नव्हती. प्लॅटफॉर्मवर भरपूर गर्दी, शेवटी पॅरिस-जिनिव्हा गाडीचा प्लॅटफॉर्म मिळाला. या गाडीला युरोपातील अनेक देशाच्या महत्त्वाच्या शहरांचे डबे लागलेले होते. त्यातील एका डब्यावर पाटी होती जिनोवा. हे तर इटलीतील प्रसिद्ध नाव. परंतु आमची वाट वेगळी होती. त्यामुळे पुन्हा पुन्हा खात्री करून जिनिव्हा ह्या स्वित्झर्लंडमधील महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या जिनोव्हा या डब्यात अखेरीस स्थानापन्न झालो. अशा गाड्यांत बसताना फार काळजी घ्यावी लागते, कारण मध्यरात्री तुमचा डबा अलगदपणे बाजूला केला जातो व दुसऱ्या गाडीला जोडला जातो. सकाळी उठाल आणि बघाल तर दुसऱ्याच देशात असाल. गाडीला जरी गर्दी होती, तरी आमचा रुबाब होता. आम्ही फर्स्टक्लासचे पास होल्डर, त्यामुळे डबा प्रशस्त. अगदी पाय पसरून झोपण्यासारखी मऊ मऊ सीट. गाडी सुसाट वेगाने रात्रभर पळत होती, तरी पण मध्यरात्री उठवून व्हिसा मात्र बघितला जात होता. त्या व्हिसावरील छप्पा बरोबर नसेल तर तुमची खैर नाही!
सकाळी जाग आली आणि स्वच्छ काचेच्या भव्य खिडकीतून स्वित्झर्लंडच्या स्वर्गभूमीचं दर्शन झाले. हिरव्यागार वेगळ्या वेगळ्या छटांमुळे मोहून टाकणाऱ्या पर्वतरांगा. त्यांच्यावरील हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झाल्यावर मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचू लागली. स्वित्झर्लंडमधील प्रवेशच एका निसर्गरम्य प्रदेशात आल्याची जाणीव करून देत होता. गाडीचा वेग जरी तुफान वाटला, तरी पोटातील पाणी जरासुद्धा हलत नव्हतं. जिनिव्हा स्टेशन कोणालाही प्रेमात पाडणारं आहे. स्टेशनवर उतरताच सुरेल संगीताचे मंद सूर कानांवर पडत होते. आता पुढील चार दिवस येथून सुटणाऱ्या गाड्यांमधून संपूर्ण स्वित्झर्लंडची सहल होणार होती.
युरोपमधील रेल्वे प्रवासाची एक गंमत म्हणजे वाटेत येणारं स्टेशन फार मोठं असेल, तर प्रशस्त प्लॅटफॉर्मवर गाडी शिरते आणि लगेचच पुढचं इंजिन सुटतं आणि दुसऱ्या बाजूस नवीन इंजिन लागतं. गाडीचा प्रवास आता विरुद्ध दिशेने होतो. विशेष म्हणजे हे सर्व सव्यापसव्य वॉकी टॉकीवर काही मिनिटांत पुरं होतं. प्रवाशांची एकंदर संख्या तुलनेनं फारच कमी असते व तेथील डब्यांचे दरवाजे बंद करण्यासाठी कर्मचारी असतात. ती व्यवस्था पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. रेल्वेने संपूर्ण स्वित्झर्लंड पाहण्याचं नियोजन आम्ही मुंबईतच केलं होतं. त्याबरहुकूम त्या त्या गाड्या मिळत होत्या. आमचा सखोल अभ्यास कामी आला होता. दिवसाचे १५/१५ तास आम्ही गाडीतून प्रवास करून रात्री झोपण्यापुरते ‘पेन्शॉन’ मध्ये राहत होतो. वयस्कर जोडपी आपल्या घरांतील एखादी खोली प्रवाशांना उपलब्ध करून देत असतात. त्या जागांना ‘पेन्शॉन’ म्हणतात.
आमच्या रेल्वेप्रवासनियोजनात स्वित्झर्लंडला सर्वांत जास्त महत्त्व होतं. या देशातला पहिला मोठा प्रवास जिनिव्हा-स्पिटझ-धुन सरोवर-बर्न- जिनिव्हा रेल्वे ते बोट-ते रेल्वे असा तब्बल पाच तासांचा होता. त्यातही तो युरेल पासमधील नियमात बसणारा असल्यामुळे पैशांची कटकट नव्हती. हा मार्ग म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची सतत बदलणारी उधळण होती. आकाशाला भिडणारी आल्प्स पर्वताची हिमशिखरं, संथ, नितळ-निळ्या पाण्याची विशाल सरोवरं, क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, त्यांत बांधलेली आखीव-रेखीव टुमदार घरं, मध्यातून जाणारे मातकट रंगाचे सुरेख रस्ते, घरासमोरील गॅलऱ्यांत गच्च भरलेली फुलझाडं, शेतांत चहूबाजूंनी पाणी उडविणारे पंप, कुरणांत चरणारी धष्टपुष्ट गाईगुरे आणि औषधाला सुद्धा न आढळणारी इतकी कमी माणसे, असा निसर्गसौंदर्याचा बदलता अखंड चलतपट गाडीसोबत पळत होता. डब्याच्या उत्तम काचेच्या मोठ्या आकाराच्या खिडकीतून तहानभूक विसरावयास लावणारा हा निसर्गाचा नजारा पुढे सतत ४ दिवस नेत्रांना सुखवत होता. धुन सरोवराच्या बोटीला वरती मोकळा डेक व इतर अद्ययावत सोयी होत्या. वर स्वच्छ निळं आकाश, मध्येच पांढऱ्या ढगांचे पुंजके, आसमंतात पसरलेली नीरव शांतता… तासभरात निसर्गाच्या या गूढरम्य रूपानं मन विस्मयचकित झालं. मी माझा नव्हतोच. एका नेत्रसुखद दुनियेतील हा प्रवास कधीच संपू नये असं वाटत होतं. या परिसराचं सौंदर्य पाहून हरखून गेलेल्या एका प्रसिद्ध लेखकाने असं लिहून ठेवलं आहे, की ‘हा सर्व प्रवास जर तुमचे मन मोहून टाकू शकला नाही तर यापेक्षा अप्रतिम, अद्वितीय दृश्य तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेही पाहावयास मिळणार नाही; तेव्हा धुन सरोवर पाहून तुम्हाला मनःशांती मिळाली नसेल, तर तुम्ही तुमच्या प्रवासात घेतलेल्या सामानाची वळकटी बांधा व मुकाट्याने आपल्या घरची वाट धरा. हाच एक उपाय आहे.’ खरोखरच या स्वप्ननगरीतून पाऊल निघता निघत नाही.
माऊंट पिलॅटस् हे ७८०० फूट उंचवरील बर्फाच्छादित छान पठार आहे. येथे जाणारी कॉगव्हिल सिंगल कम्पार्टमेंट रेल्वे म्हणजे रेल्वेबांधणी तंत्रज्ञानाचा एक अफलातून आविष्कार आहे. ४०० फूट उंचीवरून सुरू होणारी ही गाडी ७८०० फुटांवर २३ ते ४५ अंश ग्रेडियन्टमध्ये उभीच्या उभी वर आकाशाला भिडत आपला प्रवास ४५ मिनिटांत पुरा करते. गाडीची चाकं रुळांना घट्टपणे पकडू शकतील अशा प्रकारची रुळांची वेगळ्याच पद्धतीची रचना आहे. प्रवासात मधूनच पावसाची सर येत होती. बर्फाचे भुरभुरते कण, मध्येच दाट धुकं, दोन्ही बाजूला गर्द हिरवीगार झाडी, त्यामधून गाईंच्या गळ्यांत बांधलेल्या घंटांचा किणकिण असा मनाला आल्हाद देणारा नाद… आणि आता अगदी एक क्षणात कुशल नर्तकीसारखी आपली गाडी अर्धवर्तुळाकार फिरते, थबकते; आपण पटकन तिच्यामधून उतरतो व तीच गाडी परतीच्या प्रवासाला सज्ज होते. वर पठारावर प्रचंड गार वारे वाहत असतात. बर्फ व धुक्यात प्रवासी दिसतही नाहीत असा भोवताल असतो. थोड्याच वेळाच परतीचा प्रवास चालू होतो. हा अविस्मरणीय रेल्वे प्रवास कायमचा स्मृतीत राहणार याची निश्चिती असते.
या देशातील रेल्वेचं जाळं हे युरोपमधील सर्वांत उत्तम दर्जाचं आहे. असंख्य गाड्या धावत असतात. त्यामुळे कुठेही प्रतीक्षा करावी लागत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे या देशातील अगदी कानाकोपऱ्यापासून ते हिमशिखरांपर्यंत सर्वत्र जाण्यासाठी गाड्यांची सोय आहे. काही मार्गांवरील बोगदे ५-५ मैलांचे असून, गाड्यांचा वेग ताशी १५० मैलांपर्यंत आहे. रेल्वेप्रेमिकांनी एकदा तरी स्विस रेल्वे अनुभवायलाच हवी.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply