जर्मनीमधील ट्युबिन्गन या छोट्या गावात जाण्याकरता स्वित्झर्लंडमधील झुरीक या स्टेशनवरून छोटी, धुराच्या इंजिनाची गाडी होती. दोन तासांचा प्रवास सुखाचा होता. जर्मन सरहद्दीवरील एका स्टेशनवर पाटी लिहिलेली वाचली आणि क्षणभर धडकीच भरली. ‘तंबाखू व तत्सम पदार्थ बाळगण्यास बंदी असून तसे आढळल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.’ मुंबईहून निघताना आमच्या एका मित्राने जर्मनीतील एका मैत्रिणीस भेट म्हणून अस्सल भारतीय तंबाखूचं भलं मोठं पाकीट दिलेलं होतं. जर्मन शिस्तीबद्दल लहानपणापासून बरंच वाचलेलं होतं. ताबडतोब सामानातून पाकीट काढून गाडीतून दूर फेकलं. नशीब, कोणी पाहिलं नाही! आम्ही जिथे जाणार होतो ते ट्युबिन्गन स्टेशन अगदी तळेगावसारखं छोटेखानी होतं, पण व्यवस्था व स्वच्छता उत्तम होती, गावात जाण्यासाठी बाहेर बसेस उभ्या होत्या. भाषेची अडचण बरीच जाणवत होती. पण अखेरीस मित्राच्या घरी डेरेदाखल झालो. ९ महिने पत्रांद्वारे केलेली आखणी फलद्रूप झाली होती. आमच्या आनंदाला उधाण आलं होतं.
जर्मन रेल्वे व हिटलर यांचं अजोड नातं होतं. त्याच्या अमदानीत जर्मन रेल्वे ही जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे म्हणून प्रसिद्ध होती. दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या अतिजलद इंटरसिटी एक्सप्रेस या प्रथम जर्मनीमध्ये सुरू झाल्या होत्या.
ट्युबिन्गनहून थेट बर्लिन गाठावं म्हणून रात्री स्टेशनवर आलो. तो दिवस होता शनिवार शनिवार व रविवारी ही गाडी बर्लिनला जात नाही. पण हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. टाईमटेबलच्या अभ्यासातील मोठी चूक प्रथमच झाली, पण त्यामुळे आमचं बर्लिन पाहणं हुकलं याची हुरहूर मनाला कायम राहिली. हिटलरची कर्मभूमी बघावी असं अनेक वर्षे मनातून वाटत होतं, पण योग नव्हता व तो परत येण्याची शक्यताही नव्हती. कार्यक्रमात ताबडतोब बदल करून स्टुटगार्डमार्गे पहाटे चार वाजता म्युनिकला उतरलो. रात्री गाडीत छान झोप लागत होती, परंतु साखरझोपेतून उठावंच लागलं कारण, गाडी शेवटी तेथेच थांबणार होती. रविवार पहाट. सुनंसुनं भव्य रेल्वे स्टेशन. भयाण शांतता. आम्ही तिघे विश्रामगृहात पेंगत होतो. एक वृद्ध प्रवासी बाजूला पेंगत होता. उजेड होण्याची वाट पाहत. बाहेर रस्त्यावर तर अस्वस्थ करणारी सामसूम होती. फक्त एखादी ट्राम जाताना दिसे. अर्धातास पायपीट करून अखेर आम्ही ‘पेन्शॉन’ शोधलं.
रेल्वे टाईमटेबलमध्ये युरोपमधील काही अविस्मरणीय ठरतील असे प्रवासमार्ग मुद्दामहून नमूद केलेले होते. त्यांतील म्युनिक-साल्सब्रुग-इन्सब्रुक असा साधारण तीन तासांचा प्रवास म्हणजे स्वर्गभूमी ऑस्ट्रियाचा प्रवास होता. स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या दोन देशांच्या पदरी निसर्गानं सौंदर्याचं माप भरभरून घातलं आहे. संपूर्ण गाडीचा रंग लालचुटूक व पांढरा आणि आमचा पहिल्या वर्गाचा डबा तर एखाद्या महालासारखा वाटत होता. डब्याच्या एका बाजूला आरामात उभं राहता येईल असा कॉरिडॉर, त्या बाजूला खिडक्यांच्या उत्तम, पारदर्शक, अतिशय लांब-रुंद काचा, मध्यात कसलाच अडसर नाही. तिथे उभं राहिल्यावर आपण डोंगरदऱ्यांतच उतरलो आहोत असा आभास होत होता. बसण्यासाठी उत्तम कुशन सीट्स होत्या आणि तिथे बसून दुसऱ्या बाजूचा निसर्गसुद्धा दिसत होता. त्यातही दोन्ही बाजूंकडील निसर्गपट इतका वेगळा, की प्रत्येक बाजूकडे नजर भिरभिरत होती. काही वेळा गाडीचा डबा डोंगरकपारीच्या इतका जवळून जात असे, की कपारींमधून उसळणारे पाण्याचे ओहोळ काचेवर धडकत. वाटेत अनेक लहान-मोठे बोगदे होते. त्यांमधून बाहेर आल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार कुरणं दिसत होती. निसर्ग इथे अगदी शांतपणे पहुडलेला होता. गाडीही तितक्याच शांतपणे मार्ग आक्रमत होती. मध्येच गाडीची लय वाढे आणि एखाद्या खिंडीतून जाताना कानांवर पडणारा आवाज अंतर्मनापर्यंत भिडत राही. आम्ही तिघेही इतके मंत्रमुग्ध झालो होतो, की एकमेकांशी बोलूही शकलो नाही. निसर्गाची नानाविध रूपं मनावर लाटांसारखी स्वार होत होती. तीन तास कधी संपले हे कळलंच नव्हतं. त्याच गाडीने परतीच्या प्रवासात पुन्हा तितकाच भरभरून आनंद दिला होता. मन स्तब्ध झालं होतं. शब्दांना जागाच नव्हती.
जर्मनीतील अतिशय वेगवान इंटरसिटी एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे जर्मन रेल्वेची शान आहे. ह्या गाडीने प्रवास करणं केवळ युरेल पासमुळे शक्य झालं मध्य-जर्मनीतील मॅनहाईम व हायडेलबर्ग ही दोन अतिशय जुनी शैक्षणिक केंद्रांची शहरं म्हणून प्रसिद्ध आहेत. तिथे जाण्यासाठी थेट म्युनिकपासून ही गाडी होती. मॅनहाईम येथील हॉस्पिटलमध्ये काही दिवस मी उच्च शिक्षण घेण्याचं पत्रोपत्री पक्कं केलेलं होतं, परंतु तिथे पोहोचण्याच्या तारखा काही कारणाने बदलाव्या लागणार होत्या. तेव्हा त्या जागी प्रत्यक्ष जाऊनच आधी एकदा भेटावं असं विचाराअंती ठरविलं. निव्वळ युरेलचा पास व तेथील अति-जलद गाडीमुळे हे शक्य होणार होतं. म्युनिकहून सकाळी साडेसहा वाजता निघालो ते थेट २५० मैलांवर असलेल्या मॅनहाईम येथे साडेतीन तासांत पोहोचलो. गाडीत अनेक प्रवासी सुटाबुटांत, ऑफिसला कामासाठी निघालेले. आपल्या कामात मग्न. दहा वाजून दोन मिनिटांनी गाडी पोहोचणार असणार असेल, तर अक्षरश: त्या मिनिटाला तिथे हजर होती. वाटेत जर्मनीतील अनेक कारखाने, छोटी टुमदार गावं मागे पडत होती. आतून गाडीच्या वेगाची कल्पनाच येत नव्हती. मॅनहाईमधील सर्व कामं आटोपून, भरपेट जेवण घेऊन माझी स्वारी परतीची गाडी घेऊन थेट म्युनिकला संध्याकाळी साडेसहापर्यंत पोहोचली. चांगलं ५०० मैलांचं अंतर पार केलं होतं. थकवा तर अजिबात नव्हता. धूळ हा प्रकार विसरावयास झाला होता.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply