युरो स्टार
युरो स्टार ही इंग्लिश खाडीच्या खालून जाणारी रेल्वे. युरोपला गेलं, की यातून जरूर प्रवास करायला हवा इतकी ही प्रख्यात आहे. इंग्लंड देशाची संस्कृती या इंग्लिश खाडीमुळे इतर युरोपियन देशांच्या संस्कृतीपेक्षा भिन्न राहिली. दुसऱ्या महायुद्धात याच खाडीमुळे इंग्लंड जर्मनीच्या हल्यातून वाचलं होतं. इंग्लंड व फ्रान्स या खाडीमुळेच आपलं वेगळेपण टिकवून होते. इंग्लिश खाडीखालील रेल्वेबोगद्यानं दोन्ही शहरं हाकेच्या अंतरावर आली. लंडन, पॅरीस व ब्रुसेल्समधील नागरिक इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम अशा देशांत कामाला जातात व रात्री आपापल्या देशात परत येतात. अमेरिकन सोसायटीने १९९४ मध्ये चॅनेल टनेल-ट्रेनला जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केले होते.
लंडन पॅरिस भुयारी रेलमार्ग निर्माण करण्याची पहिली योजना १८०२ मध्ये मांडली गेली होती; पण दोन्ही देशांतील राजकीय वातावरण एकमेकांबाबत सामंजस्याचे नसल्याने अशी योजना कधीच फलद्रूप होणार नाही असं दोन्ही देशांनी गृहीतच धरलं होतं.
दुसऱ्या महायुद्धात हिटलर असा बोगदा गुप्तपणे करतही असेल असं ब्रिटिश नागरिकांना वाटत होतं. किंबहुना, असा बोगदा असता तर हिटलरनं ब्रिटिश भूमीवर आपले भक्कम पाय रोवले असते. प्रत्यक्षात १९८२ सालानंतर ‘चॅनेल टनेल’चा गंभीर विचार दोन्ही देशांनी केला आणि चक्रं वेगात फिरू लागली. १९८८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत १९९४ पर्यंत काम पूर्ण झालं. इंग्लंडमधील फोक्स्टोन केंट स्टेशन या शेवटच्या स्टेशनपासून बोगद्याची सुरुवात होते. समुद्राखालून ५० कि.मी. लांबीचा हा बोगदा फ्रान्समधील कॉक्वेल्स पास-दे-केलिस येथे संपतो. बोगद्यात जाण्या-येण्याचे दोन वेगवेगळे भाग असून, बाजूने सर्व्हिस टनेललाईन आपत्कालीन वेळी वापरण्याकरता ठेवलेली आहे.
समुद्रपातळीपासून २५० फूट खोलीवर बोगद्याची बांधणी असून, ३५ कि.मी. अंतरावर भर समुद्रात तो ५०० फूट खोलीवर जातो. समुद्रातील वादळं, भूकंप यांपासून कोणताही धोका पोहचणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे. बोगदा बांधणीचं काम १० वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आलेलं होतं. बांधणी खर्चाच्या प्राथमिक अंदाजापेक्षा १४० टक्के जास्त खर्च झाला होता. हा खर्च एकूण ४,६५० मिलियन पाउंड्स म्हणजे आजच्या भावाने एकूण ११ बिलियन पाउंड्स होता. १५,००० कामगार व इंजिनीअर्स दोन्ही बाजूंनी काम पुढे नेत होते. शेवटच्या क्षणाला २ इंच व्यासाचं भोक पाडून एका इंग्लिश कामगाराने फ्रेंच कामागारांशी समारंभपूर्वक हस्तांदोलन केलं. हे काम पूर्ण होईपर्यंत १० कामगारांचा अपघाती मृत्यू झाला होता.
समुद्राखालून जाताना गाडीचा वेग ताशी १६० कि.मी. इतका असतो. सर्व सिग्नल यंत्रणा ड्रायव्हरला संगणकाच्या पडद्यावर दिसत असते. गाडीचा वेग प्रत्येक भागात ठरलेला आहे. त्या वेगात कमी-जास्त फरक झाल्यास गाडी ताबडतोब थांबविण्याची व्यवस्था आहे. या मार्गावर मालगाड्या, तसंच मोटारी आणि ट्रक्स घेऊन जाणाऱ्या जम्बो मालगाड्या धावत असतात. युरोस्टार गाडी लंडन ते पॅरीस हे ५८० कि.मी. अंतर २ तास १५ मिनिटांत, तर लंडन-ब्रुसेल्स ५१५ कि.मी. १ तास ५० मिनिटांत पूर्ण करते.
दुर्घटना टाळण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. तरी दोन वेळा अघटित घटनांशी सामना करावा लागला होता. १९९६ साली नोव्हेंबर महिन्यात मालगाडीतील एका लॉरीने अचानक पेट घेतल्याने प्रचंड गोंधळ झाला व बोगद्यातील यंत्रणेचं बरंच नुकसान झालं होतं. डिसेंबर २००९ मध्ये प्रचंड हिमवर्षावामुळे एक युरोस्टार गाडी बोगद्यात अडकून पडली होती. असे अपवाद वगळता आतापर्यंत लक्षावधी प्रवाशांनी युरोस्टारने प्रवास केलेला असून, आता ही रेल्वे युरोपची जीवनरेषा बनलेली आहे.
-– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply