‘अटरली-बटरली डेलिशिअस’ हे शब्द अमूलच्या जाहिरातीतून नाहीसे झाले असले तरी त्या शब्दांचा गोडवा आजही अनेकांना आठवतो.. या शब्दांच्याच जोडीला नजरेसमोर येते ती निरागस नि अवखळ चेहऱ्याची ‘अमूल गर्ल’.. गेली ५६ वर्षे या छोटय़ा मुलीवर भारतीय ग्राहकांनी खूप प्रेम केले. या मुलीचे ‘जन्मदाते’ होते युस्टस फर्नाडिस. १९६६ साली युस्टस यांनी ही मुलगी अमूलच्या जाहिरातीसाठी तयार केली. त्यानंतर १९९७ साली अमूलचा खप १००० टोन्स वरुन २५ हजार टोन्सपर्यंत पोहोचला होता! एअर इंडियाचा महाराजा आणि आर के लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ या दोन ‘आयकॉन्स’ इतकीच लोकप्रियता या ‘अमूल गर्ल’ला लाभली व चिरंतन टिकून राहिली.
‘एएसपी’ या जाहिरात कंपनीचे कार्यकारी संचालक सिल्वेस्टर दाकुन्हा यांनी १९६६ साली अमूल बटरच्या जाहिरातीची जबाबदारी घेतली. १९४५ सालीच अमूल बटरची एक जाहिरात तयार करण्यात आली होती पण लोकांना ती आवडली नव्हती. दाकुन्हा यांनी आयकॉन बदलण्याचे ठरविले. भारतीय ग्राहकांना आपला वाटेल असा चेहरा जाहिरातीद्वारे या दोघांना लोकांसमोर आणायचा होता. हे आपलेपण एका लहान मुलीशिवाय दुसरे कोण निर्माण करु शकणार? यावर दोघांचे एकमत झाले व या मुलीचा जन्म झाला. मुलगी पोस्टरवर झळकताच या मुलीने आणि अमूलने प्रसिद्धीचे व यशाचे शिखर गाठले. आबाल वृद्धांनी या मुलीवर मनापासून प्रेम केले. या मुलीला प्रसिद्धी मिळत असल्याचे बघून युस्टस व दाकुन्हा यांनी वेळोवेळी त्यात बदलही केले. ६० सालची हरे राम हरे कृष्ण चळवळ, एन्रॉन, क्रिकेट बेटींग स्कॅंडल आणि सध्याचे आयपील या सर्व घटनांवर या मुलीने भाष्य केले आहे. अनेकदा रोषही ओढवून घेतला होता. सगळ्यात जास्त काळ चालणारी मोहीम म्हणून रेकॉर्ड करण्याच्या तयारीत सध्या ही मुलगी राहिली आहे.
युस्टस फर्नाडिस यांचे ११ मार्च २०१० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply