नवीन लेखन...

एव्हरी क्लाऊड हॅज सिल्व्हर लायनिंग

मला हा लेख लिहावासा वाटला, तो मराठवाड्यातील ‘दै. एकमत’ या वृत्तपत्राच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायामुळे. ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रविण बर्दापूरकर, श्री. सच्चिदानंद शेवडे, साक्षेपी लेखक श्री. समिर गायकवाड आदी समाजाप्रती संवेदनशील असलेल्या नामवंत लेखकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला व माझ्या माहितीप्रमाणे ‘दै. एकमत’च्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय एव्हाना दूर झाला असावा. पण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या एखाद्या समाजमान्य वर्तमानपत्राने, त्यांच्या कर्मचाऱ्यांवर असा अन्याय करावाच का, हे माझ्या समजण्या पलिकडचं आहे. अनेक मान्यवरांनी यावर आवाज उठवल्यामुळे आता त्या अन्यायाचं दूर झालेपण कदाचित तात्पुरतं असू शकतं, पुन्हा असं होणारच नाही याची शाश्वती देता येणार नाही. हे हल्ली बहुतेक सर्वच ठिकाणी घडताना दिसतंय. सर्वांचं लक्ष उडालं, की पुन्हा आपलं पहिलं चालू ठेवायचं ही आपली जुनी खोड आहे. जनतेलाही त्याच त्याच गोष्टी परत परत आल्या, की नेहेमीचं होतं व मग ती ही लक्ष देईनाशी होते. अशानं फावतं, ते अन्याय करणाराचंच.

एव्हाना मराठवाड्यातील हे कोणतं दैनिक, अशा एका दैनिकात असं काय घडलं असेल आणि मुंबईत राहाणाऱ्या माझ्यासारख्या अंतर्बाह्य शहरी माणसाचा त्याच्याशी संबंध काय, असे रास्त प्रश्न आपल्याला पडले असणं सहाजिकच आहे आणि म्हणून पुढे जाण्यापूर्वी या दैनिकाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगतो.

‘दैनिक एकमत’ हे मराठवाड्यातील एक अग्रगण्या दैनिक. या दैनिकाची स्थापना महाराष्ट्रातील एक वजनदार आणि रुबाबदारही राजकीय व्यक्तीमत्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी केली आणि या दैनिकाचं सध्याचं व्यवस्थापन श्री. विलासरावांचे पुत्र श्री. अमित देशमुख व श्री. रितेश देशमुख यांच्याकडे आहे. म्हणजे हे दैनिक सर्वच अर्थाने एका प्रतिष्ठित, श्रीमंत आणि तालेवार घराण्याचं आहे. उस्मानाबाद, सोलापूर्, औरंगाबाद, लातूर, अंबेजोगाई आदि जिल्ह्यांत या दैनिकाचा मोठा खप आहे. बऱ्यापैकी वाचकवर्ग असलेलं हे मराठवाड्यातील एक मोठं दैनिक आहे.

अशा या दै. एकमतच्या श्री. अनिरुद्ध जोशी (यांचा आणि अनिरुद्ध बापूंचा दुरदूरचाही संबंध नाही. हे सज्जन आणि बुद्धीमान लेखक आहेत.) यांचा या वर्षाच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीस मला फोन आला. तत्पुर्वी फेसबुकवरचे श्री. जोशी यांचं लिखाण मी वाचत असे व मला ते आवडतही असे व त्यामुळे त्यांचा फेसबुकच्या माध्यमातून परिचय होता. त्यांना माझाही परिचय असाच फेसबुकवरील लिखाणाच्या माध्यमातून झाला होता. श्री. अनिरुद्ध जोशी सुरेख लिहितात हे माहित होतं, परंतू ते ‘दै. एकमत’मधे कामही करतात, हे मला तो फोन येईपर्यंत माहितही नव्हते. किंबहूना असं काही दैनिक असेल हेच मला माहित नव्हतं, तिथे बाकीचं काही माहित असण्याची शक्यताच नव्हती. तर, श्री. जोशींनी, ‘दै. एकमत’मधे तुम्ही लिहाल का, अशी विनंती करण्यासाठी तो फोन मला केला होता. फोनवर चौकशी केली असता मला वरील परिच्छेदात नमूद केलेली माहिती त्यांनी मला दिली. वर असंही सांगीतलं, की तुम्ही जे काही लिहाल, त्याचं मानधनही मिळेल. माझ्या ‘मन कि बात’ या काॅलमला त्यांनी दर शनिवार नेमून देतो आणि त्या काॅलमला काणतीही शब्दमर्यादा नाही, असंही आवर्जून सांगूतलं. आता मी लिहिलेलं छापून येऊ पाहाणारं हे काही माझं पहिलंच लिखाण नव्हे. गेली चार-एक वर्ष माझं लिखाण कुठे न कुठे छापून येतंच आहे. असं असूनही मी लिहिलेलं कुणीतरी छापू पाहातंय, याचा आनंद मला आजही तेवढाच, जेवढा माझा पहिला लेख ‘साप्ता. लोकप्रभा’त छापून आला तेवढाच होतो. पहिलटकरणीचाच आनंद असतो तो. त्यात दर शनिवारी काॅलम, तो ही संपादकीयच्या ‘मधल्या पानावर’, शिवाय शब्द मर्यादा नाही, या सर्व पहिलटकरणीला बाळ झाल्यावर नोकरीत प्रमोशन आणि त्याचवेळी लाॅटरीही लागली की कसा आनंद होईल, तसाच आनंद होण्यासारख्या गोष्टी होत्या. मी श्री. अनिरुद्ध जोशींची विनंती स्विकारली आणि लिहायला सुरुवात केली.

एका मातब्बर दैनिकात सलग लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. दैनिकाचे संस्थापक मातब्बर असल्याने, जबाबदारीचीही जाणिव होती. मी दर शनिवारी काही लिहू शकेन का, याची काळजीही वाटत होती. शिवाय या पेपरमधे नियमितपणे लिहिणारे श्री. सच्चिदानंद शेवडे, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ‘चला हवा येऊ दे’मधील परिपक्व लेखक अरविंद जगताप, वैद्य परिक्षित शेवडे, श्री. समिर गायकवाड, वैद्य सुचित्रा कुलकर्णी श, री. उल्हास रामदासी व इतर बड्या लेखक-लेखिकांच्या शब्दांसोबत, माझे शब्द ठेवायचे म्हणजे माझं लेखनही त्या तोडीचं व्हायला हवं हे दडपणही होतं. पण श्री. अनिरुद्ध जोशी यांनी अगदी सहजपणे माझ्याकडून लिहून घेतलं आणि पाहाता पाहाता जवळपास चाळीस-एक लेख, कदाचित जास्तच, माझ्याकडून एकमतमधे लिहिले गेले. शब्दांचा कसला हिशोब मांडायचा? मला आज हे खरंच वाटत नाही. मला या सात-आठ महिन्यात ज्या ठिकाणी मी अद्याप कधीही गेलेलो नाही, अशा मराठवाड्यातून माझं लेखन आवडत असल्याचे सांगणारे अक्षरक्ष: शेकडो फोन आले. त्यातील कित्येकांचं तर अनेकदा असंही बोलणं होत असतं हल्ली. हा अनुभव मला नवाच होता. लेखन करणाराला त्याचं लेखन आवडत असल्याचा वाचकांचा रोकडा प्रतिसाद येणं, यापेक्षा मोठा पुरस्कार नाही आणि मला असे पुरस्कार गत साताठ महिन्यात भरपूर मिळाले. याचं संपूर्ण श्रेय श्री. अनिरुद्ध जोशी यांचं. त्यांनी मला लिहितं केलं नसतं तर, हे शक्य झालं नसतं.

याचवर्षीच्या सप्टेंबरात माझ्या बॅंकेच्या खात्याचा क्रमांक विचारण्यासाठी मला जोशींचा फोन आला. विषय मानधनाचा असावा हे माझ्या लऱ्क्षात आलं. तत्पूर्वी मी मानधन किती मिळणार वैगेरेची चवकशी केली नव्हती. मी केलेल्या कोणत्याही कामाचा मोबदला, माझ्या भिडस्त स्वभावास अनुसरून, मी यापूर्वीही कुणाकडे मागीतला नव्हता. मानधन तर लांबची गोष्ट होती. यापूर्वीही मी केलेल्या लेखनाचं मानधन देण्यासाठी म्हणून माझा खातेक्रमांक अनेकांनी घेतला होता, परंतू मानधन प्रत्यक्षात मिळाल्याचे प्रसंग दुर्मिळ होते. म्हणून जोशींचा फोन आल्यावर मी त्यांना मागीतल्याप्रमाणे खातंक्रमांक आणि इतर तपशिल दिले व त्याक्षणालाच ते विसरुनही गेलो. वाचकांकडून भरभरुन मिळणारा ‘मान’ हेच ‘धन’ समजायची माझी मानसिकता आहे.

त्यानंतर काही दिवसातच माझ्या खात्यावर अमुकएक रक्कम जमा झाल्याचा मेसेज माझ्या मोबाईलमधे झळकला. पाठोपाठ जोशींचा फोनही आला, की थोडं मानधन पाठवलंय, उर्वरीत लवकरच पाठवतो. मानासहीत धनही मिळाल्यानं मला आनंद होणं सहाजिकच होतं. परंतू माझा हा पुढे दोन-तीन दिवसांनी सत्य कळेपर्यंतच टिकला. सत्य कळलं तेंव्हा मला झालेला आनंद किती रिकामा होता ते कळलं आणि श्री. अनिरुद्ध जोशी माझ्यासाठी डोंगराएवढे झाले.

मी हे जे काही लिहिलंय, त्याचा संबंध या लेखाच्या सर्वात पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या अन्यायाशी आहे. मला श्री. जोशींनी जेंव्हा काही महिन्यांचं मानधन पाठवलं, तेंव्हा ‘दै. एकमत’च्या व्यवस्थापनाकडून जोशींना व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना तीन महिन्यांचा पगारच मिळालेला नव्हता. हे मला माझ्या खात्यात मानधन जमा होताना माहित नव्हतं. माहित असतं, तर मी मानधन स्विकारायला नकारच दिला असता. ऐन दिवाळीच्या तोंडावर कष्ट करणाराला काम करुनही पगारच मिळू नये, यापेक्षा मोठं दु:ख ते कोणतं. श्री. जोशींसोबतच्या बोलण्यातही तसं कधी आलेलं नव्हतं. त्यांच्या बोलण्यात नेहेमीच त्यांचं वर्तमानपत्र, त्यातील लेखक आणि त्यांचं लेखन हेच विषय असत. वर उल्लेख केलेले बुद्धीमान लेखक-लेखीका दै. एकमतशी जोडली गेली, ते ही श्री. जोशींमुळे हे मला अगदी आताच समजलं. याचाही ‘मी’पणाचा उल्लेख श्री. जोशींच्या बोलण्यात कधी आला नव्हता. दिवाळीच्या तोंडावर जोशीबुवांची सारी धडपड मात्र स्वत:च्या आणि सहकाऱ्यांच्या पगारापेक्षा, लेखकांचं मानधन मिळवून देण्यासाठी चालली होती, हे माझ्या मनाला स्पर्शून गेलं.

एकमतच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाची कैफियत जेंव्हा वर उल्लेख केलेल्या नामवंतांनी एकमतच्या संपादकांना आणि संस्थपक असलेल्या देशमुख कुटुंबीयांकडे पत्ररुपाने/समाजमाध्यामातून मांडली, तेंव्हा त्यांना त्यांचा थकलेला पगार मिळाला, हे आताच्या काळाशी सुसंगतच ठरलं. मुळात असा अन्याय व्हावाच का हा प्रश्न मात्र यात अनुत्तरीतच राहिला. ह्या नामवंतांना एकमतच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावासा वाटला, हे तीन महिने पगारच न मिळालेल्या श्री.अनिरुद्ध जोशींच्या ‘श्रीमंतपणा’ची कल्पना येण्यास पुरेसं आहे.

“मी, माझी बायको-मुले, झालंच तर भाऊ-बहिणी, भाचे-पुतणे, साडू-मेव्हणे खातील तुपाशी, समोरचे साले मरूदे उपाशी” ह बहुतेक सर्वांचंच ब्रिदवाक्य झालेल्या आताच्या काळात, श्री.अनिरुद्ध जोशींची, स्वत:च्या कष्टाच्या पैशांची तमा न बाळगता दुसऱ्याच्या हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठीची ही निस्वार्थ धडपड, हल्लीच्या काळात अत्यंत दुर्मिळ आणि म्हणून जपण्यासारखी आहे. किळसवाण्या स्वार्थाचे नवनविन विक्रम रचले जात असताना, श्री. जोशींसारख्या व्यक्तीही याच समाजात आहेत, ही समाजासाठी खुप मोठी आशेची बाब आहे. मी आणि माझं’ या पलिकडे जग नसलेल्या, स्वार्थाच्या काळ्याकुट्ट ढगात हरवलेल्या आजच्या समाजात, श्री. जोशींसारखी व्यक्ती मला, त्या ढगाला असलेल्या सिल्व्हर लायनिॅगप्रमाणे वाटते. आणि मग ‘एव्हरी क्लाऊड हॅज सिल्व्हर लायनिंग’ या म्हणीची सत्यता पटते आणि जगायला नव्याने हुरूप येतो..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..