
आपण प्रत्येक व्यवहारात अगदी सहजासहजी मराठी सोडून ताठ मानेने हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून बोलतो. साधे रस्त्यातून चालत असताना आपल्याला वाट हवी असल्यास लगेच “Excuse me” असे अगदी ऐटीत म्हणतो. रेल्वेची, मेट्रोची, बसची किंवा सिनेमाची तिकीट काढताना किंवा रिक्षाचे भाडे देताना सुट्टे पैसे नसतील तर “छुट्टा नही है” किंवा ” No Change” असेच म्हणतो. एवढंच काय तर आजकाल वाढदिवस, दिवाळी, नवीन वर्षाच्या किंवा इतर सणांच्या शुभेच्छा देतानाही मराठी व्यतिरिक्त हिंदी अथवा इंग्रजी भाषेचा उपयोग करतो. आणि चुकून एखाद्याने मेसेजद्वारे मराठीत शुभेच्छा दिल्याच तर त्याला प्रतिसाद देत सरळ ‘Thanks’, लिहितो. मात्र ‘धन्यवाद’ म्हणायला कमीपणाचे समजतो. आता हेच पहा ना, मी सुद्धा बोलण्याच्या ओघात संदेशाद्वारे लिहण्याचे सोडून मेसेजद्वारे असेच लिहिले. सकाळी “Good Morning”, संध्याकाळी “Good Evening” आणि रात्री शुभेच्छा देताना अगदी सहजपणे “Good Night” असे म्हणतो. एखाद्या व्यक्ती कडून काही हवे असल्यास त्यांना ‘Please’ मला हे मिळेल का? अशी विनंती करतो, कारण ‘कृपया’ हा शब्दच हल्ली महाग झालाय. इतकेच काय तर चुकून एखादी चूक झाल्यास बिनदिक्कत ‘Sorry‘ असे बोलून मोकळे होतो. परंतु “मला माफ करा” असे म्हणायला मराठी माणसालाच लाज वाटते. आणि माझ्यासारखा एखादा बोललाच तर त्याला गावाकडून आला काय असे विचारले जाते. प्रत्येक पालकांना आजकाल Mom किंवा Dad बोलून घ्यायला आवडते, मुलेही आवडीने बोलतात आणि म्हणूनच “आई बाबा” ह्या मायेच्या शब्दांची जणू एक प्रकारे निर्घुण हत्याच झाली आहे..नव्हे आम्ही केली आहे.
आपण काही खरेदी करण्यासाठी जातो तेंव्हा किती सहजरित्या आपण विचारतो, “भैया कैसा दिया ?” किंवा “भैया इसका कितना ?” मग तो भैया बोलतो की मी मराठी आहे. एखाद्या कंपनीकडून फोन आल्यास समोरून हिंदी किंवा इंग्रजीत बोलले जाते तेंव्हा आपण त्यांना विरोध न करता त्यांनी सुरवात केलेल्या भाषेतून बोलण्यात तुम्ही धन्यता मानतो, पण “तुम्ही मराठीत बोललात तरच आपले संभाषण होऊ शकेल”, असे ठणकावून सांगण्याचे धाडस आपण करत नाही. त्यामुळेच मराठी भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळत नाही आणि इतर भाषिक मस्तवालपणे ती हक्काची नोकरी पटकवतात. काही पालक तर, माझ्या मुलांच्या ‘School’ मध्ये ‘project’ आहे असे म्हणण्यात स्वतःला क्वालिफाईड समजतात. परत इंग्रजी शब्द आलाच. आपल्यावर मराठीपेक्षा इंग्रजी शब्दांचा इतका प्रभाव पडला आहे की, मराठी सारख्या परिपूर्ण आणि अलंकारिक भाषेचा दर्जा पहिल्या क्रमांकावर असताना आपण तिचा ऱ्हास करत सुटलो आहोत.
आम्ही कुठल्याही इतर भाषेविरुद्ध किंवा शिक्षणाविरुद्ध नक्कीच नाही, कारण जागतिकीकरणामध्ये देश विदेशातील लोकांशी संपर्क साधायचा असेल तर प्रत्येक भाषा ही शिकायलाच हवी. किंवा किमान कॉमन असलेली इंग्रजी तर शिकायलाच हवी. पण मग प्रश्न आहे तो आमच्या मराठी मुलांच्या अस्तित्वाचा आणि आमच्या मराठी मायबोलीच्या अस्तित्वाचा.. कारण आमची मराठी महाराष्ट्रातूनच लुप्त होतेय, त्याची सुरवातच शाळेपासून झाली आहे. पूर्वीच्या मराठी शाळा बंद पडायला लागल्या आहेत आणि ज्या शाळा अस्तित्वात आहेत त्याही बंद पडायच्या मार्गावर आहेत. कोणी सेमी इंग्रजी तर कुणी इतर बोर्डांच्या नावाखाली मराठीचे लचके तोडून, लहान मुलांच्या संगोपानापासूनच मराठीला दूर करून इतिहासाच्या दरीत ढकलण्याच्या षडयंत्रास सुरवात झाली आहे. मराठी माध्यमांच्या शाळेत आधी जास्तीत जास्त विषय मराठी भाषेतून शिकवले जात होते आणि आता जास्तीत जास्त विषय इंग्रजी आणि हिंदी भाषेतून शिकवले जातात त्यात मराठी विषय फक्त एक विषय म्हणून शिकवला जातोय तो ही दर्जा नसलेला, हेच खरे दुर्दैव !
प्रत्येक पालक हा आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून धडपड करीत असतो. पण मुलांच्या जीवनात मराठीचे अस्तित्व टिकावे म्हणून कधीच कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. अगदी काहीच जमत नसेल तर निदान घरात तरी मुलांशी मराठीतून बोला, जेणे करून मुलांना मराठी भाषा काय आहे हे तरी कळेल. आजच्या ह्या पिढीला त्यावेळच्या कविता आणि श्लोक माहित ही नसतील, आणि जरी माहित असले तरी त्यांचे महत्त्व त्यांना नसते ह्यात चूक कोणाची? याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आपणच मुलांना कुणी एखादा नातेवाईक घरी आला की अगदी अभिमानाने म्हणतो की, बाळा एक Poem बोलून दाखव.. मग मुलं देखील लाडक्या आवाजात ‘Poem’ बोलून दाखवतात, “Twinkle Twinkle Little Star” त्यानंतर साहजिकच अरे वा! असे समोरून येते. अरे वा! अशी दाद देणाऱ्या ह्याच पालकांनी एकेकाळी, “येरे येरे पावसा ! तुला देतो पैसा !”.., क्स“शुभंकरोती कल्याणम्”.., संत ज्ञानेश्वर महाराजांचे ‘पसायदान’ अश्या मराठी कविता आणि संस्कृत श्लोक म्हणत स्वतःचे बालपण घालविले. मला अशा पालकांनाच सांगायचे आहे की, तुम्हाला तुमच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे असेल तर जरूर घाला पण जेंव्हा घरी असाल तेंव्हा वेळ काढून आपल्या मुलांना मराठी कविता, अभंग, श्लोक ही आवर्जून शिकवा त्यामुळे त्यांच्यावर मराठी संस्कार घडतील. कारण लहान वयातच मुलांनी जे वाचले, पाहिले, ऐकले, बोलले आणि जे लिहिले ते जर सर्व इतर भाषेतून, मग मराठीचे संस्कार पडतील कसे ? त्यामुळे मग मुले मोठी झाली की त्यांना आपल्या आई वडिलांसोबत फिरण्याची लाज वाटते. त्यांचे मराठमोळे विचार आणि मराठी संस्कृतीचे धडे गावठी वाटायला लागतात. किंवा आई वडिलांमुळे आपली खिल्ली उडू नये म्हणून स्वतःच्याच आई वडिलांना बरोबर घेवून जाण्यास ते टाळतात. अहो एवढेच काय तर काही जणांना आपल्या आडनावाविषयी ही प्रेम नसते, लाज वाटते त्यांना त्यांच्या आडनावाची. मग ही चूक कुणाची?
कळत नकळत मराठी भाषा, मराठी अस्मिता ही मुलांच्या शालेय जीवनातूनच संपुष्टात येत चालली आहे. त्यामुळे ह्याचा परिणाम साहजिकच मुलांवर आणि पर्यायाने त्यांच्या भविष्यावर दिसतोय. हे असे संस्कार वर्षानुवर्षे लहान मुलांवर नकळत होतात, मग उद्या सून किंवा जावई इतर भाषिक मिळाले तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. पण त्यामुळे पालकांना त्यांच्या म्हातारपणी मुलांशी तडजोड करून बऱ्याचदा जुळवून घ्यावे लागते. मराठी माणसेच मराठी बोलायला लाजतात म्हणून इतरांच्या भाषेचे महत्व वाढले आहे. इतरांच्या भाषेचे महत्व वाढले म्हणून इतर भाषिकांचे महत्व पण तितकेच वाढले. त्यामुळे मग अतिक्रमणे झाली.
महाराष्ट्र ही वीर पुत्रांची आणि योद्धयांची भूमी, महापुरुषांची- संतांची भूमी! त्याच भूमीत आज मराठी भाषेला काडीचीही किंमत उरलेली नाही. सतत इतर भाषेच्या अतिक्रमणांमुळे मराठीचा ऱ्हास होतोय… मराठीचा श्वास गुदमरतोय. मराठीवर अत्याचार होतोय हे उघड्या डोळ्यांना दिसत असतानाही आमच्या महाराष्ट्रात प्रामाणिक, निष्ठावंत असंख्य मराठी बांधव मराठीच्या रक्षणासाठी मतभेद विसरून एकत्र येत नाहीत ह्याहून मोठं दुःख ते काय?
शेवटी जाता जाता इतकंच म्हणावेसे वाटते की, “इंग्रजी बोलता येत नसेल तर लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही” कारण “लाज त्याने बाळगावी ज्याला स्वतःची मातृभाषाच येत नाही.” सतत इतरांना फुकटचे सल्ले देताना जर कुणी म्हणत असेल की, मराठी भाषा टिकवा तर त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की, मराठी भाषा टिकवा नव्हे ! तर आपण सर्वांनी मिळून टिकवूया असेच म्हणावे लागेल.
— डॉ. शांताराम कारंडे
Leave a Reply