अर्जेंटिनाची एव्हिटा पेरॉन ही एक अफाट लोकप्रिय ठरलेली आणि गरिबांची वाली असलेली सौंदर्यवती राजकारणी तरुणी जगातील आगळ्या स्त्रियांपैकी एक म्हणून गणली जाते. असंख्य कर्तबगार व्यक्ती ज्याप्रमाणे अल्पायुषी ठरल्या त्याप्रमाणेच एव्हिटाही कॅन्सरमुळे वयाच्या ३२व्या वर्षी ऐन तारुण्यात आणि कीर्तीच्या शिखरावर असताना मृत्यू पावली. जगाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा कायमचा ठसा तिने उमटवून ठेवला. म्हणूनच तिच्या संदर्भात अनेक पुस्तके, नाटके आणि गाणी लिहिली गेली आहेत.
१९२० मध्ये एव्हिटाचा जन्म अर्जेंटिना शहरातील एका अत्यंत गरीब घरात झाला होता. तिचे मूळचे नाव इव्हा मारिया इबारग्युरेन (Eva Maria lbarguaen) असे होते. पाच भावंडांतील ती एक मुलगी होती. तिचे वडील तिच्या आईपासून विभक्त झाल्याने एकट्या आईचेच छत्र तिला लाभले होते. बालपण अतिशय खडतर अशा स्वरूपाच्या दारिद्र्यात गेल्यामुळे एव्हिटाच्या हृदयात कारुण्याचे जिवंत झरे आयुष्यभर पाझरत राहिले. तिच्या राजकीय जीवनास तिच्या या स्वभावामुळे उजाळा मिळाला.
जगातील बहुतेक सर्व कर्तबगार माणसांप्रमाणेच एव्हिटाला जसे अल्पायुष्य लाभले तसेच बालपणातील विलक्षण दारिद्र्य आणि पित्याच्या दृष्टीने पोरकेपणही लाभले. एव्हिटा ही बुद्धीमत्तेच्या दृष्टीने प्रतिभासंपन्न नव्हती. परंतु ही उणीव तिच्या आयुष्यात अडचणीची ठरली नाही. कारण विविध भूमिका करण्यासाठी प्रयत्नांची जी पराकाष्ठा करावी लागले आणि त्यासाठी मागोवा घेण्याची जी वृत्ती लागते ती एव्हिटामध्ये होती. सातत्याने आपल्या भूमिकांचा पाठलाग करीत असतानाच तिने रत्नपारखी वृत्तीने, अतिशय कौशल्याने योग्य माणसांशी मैत्री केली. आपल्या आयुष्यात आपण कोणाशी मैत्री करतो हे फार महत्त्वाचे असते. ‘मॅन इज नोन बाय हिज कंपनी ही किप्स’ हे तत्त्व एव्हिटाच्या मनात योग्य वयातच तिने रुजवून ठेवलेले होते. तिच्या आयुष्यात तिनेच आचरणात आणलेल्या तत्त्वाचा फारच उपयोग झाला. विशेषतः रेडिओवरील तिच्या कारकिर्दीतील यश तिला या तत्त्वाचा आचरणामुळेच लाभले.
एव्हिटाने रेडिओवर लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून स्वतःचे प्रतिबिंब अत्यंत यथार्थपणे निर्माण केले. ‘दि हिरॉइन्स ऑफ हिस्टरी’ या रेडिओच्या मालिकेत भूमिका करण्याचा तिचा निर्णयही तिने विचारपूर्वक दूरदृष्टीने घेतलेला होता. पुढील आयुष्यातही आपली राजकीय कारकीर्द प्रगत होण्यासाठी आणि तिचे पती ज्युआन पेरॉन यांच्या राजकीय विचारप्रणालीचा प्रसार करून लोकसमुदायास त्या विचारप्रणालीमागे आकर्षित करण्यासाठीही तिने रेडिओचा वापर केला होता.
ज्युआन पेरॉन यांना जेव्हा एव्हिटा प्रथम भेटली तेव्हा ते अर्जेंटिनाचे उपाध्यक्ष, युद्धविषयक खात्याचे मंत्री आणि कामगार खात्याचे सेक्रेटरीही होती. विशेष म्हणजे दोघांच्यात २४ वर्षांचे अंतर होते. एव्हिटा अवघी २४ वर्षांची तर ज्युआन पेरॉन ४८ वर्षांचे होते. ते दोघे अल्पकाळातच परस्परांशी एकरूप झाले. एव्हिटा आणि पेरॉन हे दोघे परस्परांच्या करिअरला पोषकच व्यक्तिमत्त्वे होती.
ज्युऑन पेरॉन यांनी एव्हिटाची अर्जेंटिनाच्या रेडिओ असोसिएशनची प्रमुख म्हणून प्रथम आणि नंतर विविध पदांवर नेमणूक केली होती. त्या वेळी रेडिओवरून ‘जनतेतील एका स्त्रीचा आवाज’ या विषयावर भाषण करून एव्हिटाने ज्युऑन पेरॉन यांची ‘विकेट’च घेतली होती.
१९४६ मध्ये ज्युऑन पेरॉन हे अर्जेंटिनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. ज्युऑन पेरॉन निवडणुकीत जिंकून यावेत म्हणून एव्हिटाने पडद्यामागे अनेक प्रकारच्या अत्यंत चलाख करामती केलेल्या होत्या. रस्त्यांवरील अतिशय उत्साही लोकांसमोर उत्स्फूर्त भाषणे ठोकणाऱ्या लोकांची योजना एव्हिटानेच केलेली होती. पेरॉन यांच्यासंदर्भातील ती वैशिष्ट्यपूर्ण घटना ठरून अत्यंत लोकप्रिय नेता म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती.
निवडणुकीपूर्वी पाचच दिवस अगोदर एव्हिटा ज्युऑन पेरॉन यांच्याशी विवाहबद्ध झालेली होती. मात्र अर्जेंटिनाची ‘प्रथम महिला’ म्हणून एव्हिटा वादग्रस्त ठरली होती. अर्जेंटिनाच्या अत्यंत दरिद्री उघड्यावाघड्या जनतेच्या वतीने अथकपणे काम करताना अभिनेत्रीच्या झगमगत्या वेशात वावरणे तिने चालूच ठेवले होते. राजकीय क्षेत्रातील अनेक प्रथा-परंपरांना किंवा संकेतांना आणि प्रस्थापित मंडळींना एव्हिटाने आपल्या वागण्याने वादळी धक्केच दिलेले होते.
अध्यक्षीय भाषण करणाऱ्या ज्युऑन पेरॉन या आपल्या पतीच्या शेजारी ती उपस्थित राहत असे. सरकारी आणि निमसरकारी कामेही ती स्वतःहून करीत असे. त्याचप्रमाणे औपचारिक स्वरूपाच्या राजकीय वा राज्याच्या समारंभास जाताना ती खांदे उघडे ठेवणारा ‘इव्हिनिंग गाऊन’ घालून जात असे. एव्हिटा ही कितीही वादग्रस्त वागली तरी ती अत्यंत लोकप्रिय होती.
तिची भाषणे ऐकण्यास लोक तुफान गर्दी करीत. एका सभेस लोकांचा उत्साह एवढा होता, की त्या सभेत लोक गर्दीत चिरडून मृत्यू पावले होते. जेव्हा एव्हिटाने स्पेनला सरकारच्यावतीने भेट दिली तेव्हा तीन लाख लोक तिला अभिवादन करण्यास उपस्थित झाले होते. याच दौऱ्यात तिने ब्राझीललाही भेट दिली. तेथील लोकांनी तिला (La Presidenta) अर्जेंटिनाची प्रतिअध्यक्ष म्हणून संबोधले होते.
एव्हिटाची ही लोकप्रियता सतत वाढतीच राहिली. तिच्या मृत्यूपर्यंतच नव्हे, तर मृत्यूनंतरही ही लोकप्रियता कायम होती. एव्हिटाने मृत्यू येईपर्यंत लोकसेवा केली होती. तिच्या दुर्दैवाने तिच्या वयाच्या तेहतिसाव्या वर्षी ती कॅन्सरग्रस्त झाली. शरीर कॅन्सर पोखरत असतानाही ती सतत ईर्षेने कार्यरत होती. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला कष्टप्रद काम करण्यास मनाई केली होती. परंतु एव्हिटाने डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही. त्यामुळे १९५० मध्ये डॉक्टर तिला सोडून गेले. त तरीही १९५२ पर्यंत, मृत्यू येईपर्यंत ती लोकसेवा करीतच राहिली.
आजारपण अत्यंत तीव्र स्वरूपात असतानाही एव्हिटा ‘प्रथम महिला’ म्हणून थकेपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिली. एकाच दिवशी ती कधीकधी शेकडो माणसांना भेटत असे. त्यांच्या हजारो पत्रांपैकी किमान दहा पत्रांना ती व्यक्तीशः उत्तरे देत असे. अत्यंत सहृदयी आणि लोकसंपर्कात कुणालाही हार न जाणारी प्रतिभावंत मूर्तीची एव्हिटा लोकांशी संपर्क साधताना आपल्या टेबलावर पैशांच्या नोटांची पुडकी ठेवत असत. अर्जेंटिनातील अत्यंत गरजू लोकांना ती पैसे वाटत असे. ते पैसे अतिशय गोड, उबदार स्वरात किंवा संकोचच वाटावा या पद्धतीने ती देत असे. ज्या गरिबांना ती पैसे देई, त्यांना ती आपल्या मिठीत घेई तर कधी त्यांचे चुंबनही घेई.
अखेर शेवटी १९५२ मध्ये एव्हिटा कर्करोगाने मृत्यू पावली. तिला तिचे डॉक्टर सोडून गेल्यानंतर दोन वर्षांनी ती मृत्यू पावली. तिचे जगणे, तिचा मृत्यू आणि तिच्या मृत्यूनंतरच्या तिच्या संदर्भातील साऱ्या घटना या दंतकथाच बनल्यात!एव्हिटाचा मृत्यू झाल्यावर हजारो माणसांनी दुखवटा व्यक्त केला होता. तिच्या मृत्यूसमयी तिचे पती ज्युऑन पेरॉन दुसऱ्यांदा अर्जेंटिनाचे अध्यक्षपद भूषवित होते. अर्जेंटिनाच्या ज्या ज्या माणसाला एव्हिटाचे अत्यंदर्शन घ्यावयाची इच्छा होती, त्या त्या प्रत्येक माणसाला तिचे अंत्यदर्शन घडवून आणायचे असा निश्चय ज्युऑन पेरॉन यांनी केला होता. परंतु त्याचा हा निश्चय अंमलात येऊ शकला नाही, कारण अनेक दिवस काही दिशांनी लांबच लांब तीस रांगांतून लोक अंत्यदर्शनाला येत होते. ब्वेनोस आयरस (Buenos Aires) या अर्जेंटिनाच्या राजधानीच्या रस्त्यावर दुखवटा व्यक्त करण्यास आलेल्या लोकांची तुफान गर्दी जमली होती. लोक दुःखाने वेडे आणि प्रक्षुब्ध झाले होते. शेवटी गर्दीतील चेंगराचेंगरी एवढी वाढली, की गर्दीच्या त्या महासागरात एकाच दिवशी एक लाख २० हजार लोक जखमी झाले होते. जगातील कुणाही राजकीय नेत्याच्या वा लोकप्रिय महनीय व्यक्तीच्या दुखवट्याच्या प्रसंगी असे घडलेले नसावे.
एव्हिटाचे व्यक्तिमत्त्व लोकांत इतके विलक्षण प्रभावशाली होते, की तिच्या मृतदेहासंदर्भातही फार मोठे रण माजले. तिचा मृतदेह अनेक वेळा या ठिकाणाहून त्या ठिकाणी हलवला गेला. समाजातील वेगवेगळ्या गटांना आपला ताबा त्या मृतदेहावर असावा, असेही वाटले असावे.
एव्हिटाचा मृतदेह जमिनीत पुरण्यापूर्वी एक भव्य प्रमाणात तयार करण्यात आलेले थडगे कुणीतरी डायनामाईटने उडवून दिले होते. एकूण चमत्कारिक अशा वातावरणात एव्हिटाचा मृतदेह १५ वर्ष गायबच राहिला होता. कालांतराने तिचा मृतदेह वेगळ्याच नावाखाली इटलीत आढळला होता. अखेर शेवटी १९७६ मध्ये, म्हणजे एव्हिटाच्या मृत्यूनंतर २४ वर्षानंतर तिचा मृतदेह अर्जेंटिनात आणण्यात येऊन विधीवत तिच्या जन्मभूमीत त्याचे दफन करण्यात आले.
एव्हिटाचे सारे आयुष्य जगावेगळे होते. जगावेगळीच लोकप्रियता तिला लाभली होती. त्यामुळेच तिच्या मृतदेहालाही सुमारे पाव शतक जगावेगळ्या लोकप्रियतेच्या अनुभवाला सामोरे जावे लागले असावे. तशी एव्हिटा अत्यंत तारुण्यात म्हणजे २० वर्षांची असल्यापासून अत्यंत लोकप्रिय होती. ती तिच्या ‘हेअर ड्यूज’मुळे! तिच्या विविध प्रकारच्या हॅटस्मुळे! आणि तिच्या अलंकारांमुळेही! हजारो लोकांना तिच्या राहणीमानाच्या पद्धतीमुळे व सौंदर्यामुळे ती त्यांची देवताच वाटायची, तर काही लोकांना ती तिच्यातील सहृदय अंतःकरणामुळे व कारुण्यमयतेमुळे संतच वाटत होती.
एव्हिटाच्या जीवनावर दोन चित्रपटही निघाले आहेत. ‘एव्हिटा’ या नावाचाच एक चित्रपट आहे. मॅडोना नावाच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने एव्हिटाची भूमिका केलेला चित्रपट मी योगायोगाने अमेरिकेतील वास्तव्यात पाहिला आहे. एव्हिटाच्या सौंदर्याचा, झगमगीत व्यक्तिमत्त्वाचा लोकमानसावर इतका जबरदस्त आजही प्रभाव आहे, की त्यामुळे ‘एव्हिटा पेरॉन’ हे तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या झगमगीत व्यक्तिमत्त्वापलीकडचे होते, हे लोक विसरले हेत की काय, असे वाटते.
एव्हिटाच्या जीवनाचा विचार करताना, तिने महिलांसाठी केलेल्या कार्याचे मला अधिक महत्त्व वाटते. स्त्रियांना भोगावे लागणारे दुःख आणि त्यांच्यावर होणारे अन्याय याविरुद्ध एव्हिटाने लढा दिला. त्यासाठी तिने ‘असोसिएशन ऑफ वुमन सफरेज’ ही संस्थाही स्थापन केली होती. १९४७ मध्ये अर्जें टिनामधील स्त्रियांना मतदानाचा हक्क तिने आपल्या संस्थेच्या द्वारे केलेल्या संघर्षातून मिळवून दिला होता.
स्त्रीवर्गाविषयीचा एव्हिटाचा आंतरिक कळवळा हा तिच्या बालपणातील कटू आणि खडतर अनुभवातून निर्माण झाला असावा. आपल्या आईवर झालेल्या अन्याय आणि एकाकीपणे, पतीने त्याग केल्यावर आपल्या आईने दारिद्र्याशी झगडत ५ भावंडांच्या पालनपोषणासाठी केलेली चिवट धडपड एव्हिटाने बालपणीच पाहिली होती. सुस्थितीतील तिच्या बरोबरीच्या वयाच्या मुला-मुलींचे जीवनही तिने पाहिले असेल. स्वतःच्या जीवनाशी तिने त्यांच्या एकच जीवनाची तुलना केली असेल. वडील नसलेल्या किंवा आई नसलेल्या, पालक असलेल्या मुलांचे जीवन, त्यांची वाढ, त्यांची मानसिक आंदोलने, त्यांच्या भावनिक गरजा आणि व्यावहारिक अडचणी या साऱ्या साऱ्या गोष्टींचा एव्हिटाने बालपणापासून विचार केला असेल. आईवडिलांच्या मायेच्या पंखाखाली सुस्थितीत वाढणारी मुले आणि दारिद्र्यात पोरकेपणात वाढणारी मुले यांच्या मानसिक जडणघडणीत आणि अनुभवविश्वात जमीन आस्मानाचा फरक असतो. पोरकी मुले किंवा आई वा वडील यांच्यापैकी कुणी एक नसलेल्यांची मुले अकाली मोठी होतात. शारीरिक वयापेक्षा त्यांचे मानसिक वय कितीतरी मोठे व विकसित झालेले असते. अशी मुले मोठेपणी एकतर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड विविध प्रकारे घेण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्यासारखी परिस्थिती अन्य कुणावर येऊ नये म्हणून झगडतात. एकतर ती दुष्ट, खलनायकी किंवा दुसऱ्याचा हेवा-द्वेष करणारी होतात किंवा कारुण्याचा, सहृदयतेचा अखंड झरा हृदयात वाहता ठेवून परोपकारासाठी धडपडतात. आपल्या ज्ञानेश्वरांनी आपल्या आई-वडिलांवर, आपल्या भावंडांवर आणि स्वतःवर अन्याय करणाऱ्या दुष्ट समाजाचा सूड न घेता त्या समाजासाठीच पसायदान मागितले होते!
एव्हिटानेही स्त्रियांना त्यांचे न्याय, हक्क मिळावेत म्हणून आपल्या आयुष्यात लढा दिला. मतदानाचा हक्क अर्जेंटिनातील स्त्रियांना विसावे शतक उलटून ४७ वर्ष झाली होती तरी मिळाला नव्हता, एव्हिटाने तो मिळवून दिला. आपल्या मृत्यूपूर्वी पाच वर्ष अगोदर हा हक्क तिने अर्जें टिनाच्या स्त्रियांना मिळवून दिल्यामुळे आजही तेथील स्त्रिया एव्हिटाविषयी कृतज्ञताच व्यक्त करीत असतील.
एव्हिटाने स्त्रियांच्या वेदनेविषयी अत्यंत प्रगल्भतेने लिहिले होते, “आम्ही स्त्रिया सरकारी कारभारात अनुपस्थित असतो. आम्ही देशाच्या संसदेत अनुपस्थित असतो. मात्र दुःखाच्या आणि वेदनेच्या प्रसंगी आमची उपस्थिती निश्चित असते. मानवाच्या सर्व अत्यंत कडवट अनुभवाच्या प्रसंगी आम्ही स्त्रिया मात्र हजर असतो.’
माणसाची वेदना किती सुंदर बोलते, त्याचे प्रत्यंतर एव्हिटाच्या वरील उद्गारात आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वील सौंदर्याचे सारे सारच आपल्याला या ओळीतून प्रत्ययास येते.
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply