नवीन लेखन...

माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ‘वनराई’चे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९२५ रोजी  महाड तालुक्यातील नाते या गावी झाला.

पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन तुरुंगवास भोगल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेऊन सर्जन होण्याचा निर्णय त्यांनी बदलला. पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर डॉ. धारिया यांनी लोकसेना उभारली. त्यावेळी सिद्दीच्या ताब्यात असलेले जंजिरा संस्थान त्यांनी मुक्त केले. तेथील नव्या हंगामी सरकारात त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर शेकडो तरुण व विद्यार्थ्यांना संघटित केले. पोस्ट, एसटी कामगार, बॅंक कर्मचारी, संरक्षण विभागातील कर्मचारी व अन्य कामगार संघटनांचे नेतृत्व केले.

ते पुणे महापालिकेत १९५७ ते १९६० या काळात नगरसेवक होते. राजकीय मतभेदांमुळे त्यांनी १९६० मध्ये सोशालिस्ट कॉंग्रेस पक्ष सोडला. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीसपदी असताना ते १९६० च्या सार्वत्रिक निवडणुकांचे प्रचारप्रमुख होते. १९६० ते १९७५ पर्यंत अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सभासद असताना त्यांनी व त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी सोयीच्या राजकारणाऐवजी वचनबद्धतेचे व वचनपूर्तीचे राजकारण करण्यास पक्ष नेतृत्वाला भाग पाडले. १९६४ ते १९७० पर्यंत राज्यसभेचे सदस्य आणि १९७१ ते १९७७ आणि १९७७ ते १९७९ असे दोन वेळा ते लोकसभेवर निवडून गेले होते. सर्वात प्रभावी वक्तृत्व असलेल्या तरुण संसदपटूंपैकी एक अशी त्यांची त्यावेळी ख्याती होती.

७१ ते ७५ या काळात ते केंद्र सरकारमध्ये योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास खात्याचे राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कित्येक दूरगामी निर्णय घेतले. श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीला प्रखर विरोध करणारे आणि तत्त्वासाठी श्रीमती गांधी यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडणारे ते एकमेव केंद्रीय मंत्री होते. त्यावेळी त्यांना अंतर्गत सुरक्षा (मिसा) कायद्याखाली अटक करण्यात आली. काही महिने त्यांनी कारावास भोगला. आणीबाणीनंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी ते पुन्हा लोकसभेवर निवडून गेले.

पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना वाणिज्य, ताग व कापड उद्योग, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळच्या जनता पक्षाच्या सरकारने त्यांचा अत्यावश्यक वस्तूंसाठीचा “डॉ. धारिया कमिटी’ रिपोर्ट स्वीकारला. मात्र, हे सरकार फार काळ टिकले नाही. खासदार असताना डॉ. धारियांनी अनेक शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. स्व. राजीव गांधी व चंद्रशेखर यांच्या आग्रहामुळे त्यांनी नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा स्वीकार केला. अत्यंत कमी कालावधी मिळाला असतानाही त्यांनी नियोजन प्रक्रियेला नवे वळण लावले. सहकार चळवळीसाठीही त्यांचे भरीव योगदान लाभले. सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले.

१९८६पर्यंत राजकारणात सक्रिय राहिल्यानंतर धारिया यांनी ‘वनराई’ या संस्थेची स्थापना केली. लोकसहभागातून विकास साधण्यासाठी सरकारचे धोरण बदलण्यात वनराई संस्थेचा सिंहाचा वाट आहे. वनराईने आजपर्यंत शेतकऱ्यांना वृक्षरोपणासाठी २.४ कोटीहून जास्त रोपांचे वितरण केले आहे.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे ते अध्यक्ष होते. युवाशक्ती आणि रक्तदाता प्रतिष्ठानचे या संस्थांचेही ते संस्थापक-अध्यक्ष होते. पद्मविभूषण, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व डी. वाय. पाटील विद्यापीठाची डी. लिट. पदवी, प्रियदर्शनी इंदिरा वृक्षमित्र पुरस्कार, यशवंतराव चव्हाण उत्कृष्टता पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, रामशास्त्री पुरस्कार, बापू पुरस्कार, सूर्यरत्न ऍवॉर्ड, राजीव गांधी पर्यावरणरत्न पुरस्कार, महर्षी पुरस्कार, हरितक्रांती नायक पुरस्कार, स्वामी विवेकानंद नॅशनल ऍवॉर्ड, सूर्यदत्त लाईफटाइम अचिव्हमेंट ऍवॉर्ड, पर्यावरणरक्षण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी डॉ. धारिया यांना गौरविण्यात आले होते.

डॉ. धारिया हे व्यासंगी वाचक होते. त्यांनी देशापुढील ज्वलंत समस्यांवर वृत्तपत्र, नियतकालिकांमधून लेखन केले. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्यामध्ये “संघर्षमय सफर’ हे राजकीय आत्मचरित्र, कार्यातील अनुभवावर आधारित “बोल अनुभवाचे’, “फ्यूम्स अँड फायर’, “यही जिंदगी’, भारतातील वनीकरणावर आधारित “अफॉरेस्टेशन इन इंडिया’, भारतातील लोकसंख्या विस्फोटावर “पॉप्युलेशन एक्स्प्लोजन अँड इंडिया’, “जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ’ (मराठी आणि इंग्रजी), आपल्या कारकिर्दीमध्ये भेटलेल्या राजकीय, सामाजिक व्यक्तिमत्त्वांवर आधारित “तेथे कर माझे जुळती’ अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.

मोहन धारिया यांचे १४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..