टेनिस समालोचक आणि माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हाचा जन्म १८ ऑक्टोबर १९५६ प्राग येथे झाला.
मार्टिना नवरातिलोव्हाची एक उत्तम खेळाडू ते निर्विवाद श्रेष्ठ खेळाडू अशी वाटचाल झाली त्यामध्ये तिचे श्रम, चिकाटी आणि कौशल्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे तिचे खासगी आयुष्य, तिची साथीदार आणि कोच यांचा हातभार आहेत. उत्तम टेनिस खेळणारी मार्टिना नवरातिलोव्हा झेकोस्लोव्हाकियाहून अमेरिकेत आली. ती कायमचे अमेरिकेत राहायचे हा निर्णय पक्का करून. तिच्या घरच्यांचा या निर्णयाला पाठिंबा होता. कम्युनिस्ट असलेल्या देशातून अमेरिकेत आल्यावर मार्टिनाला स्वातंत्र्य आणि संधी मिळाल्या. अनेक स्पर्धामध्ये ती सेमिफायनल ते फायनलपर्यंत जात होती.
मार्टिनाचे मार्गदर्शक तिचे वडील होते. पण ते होते दूर देशात. मार्टिनाला थोडक्यात अमेरिकेत आल्यावर सुरुवातीची सहा वर्षे मार्टिनाला अधिकृत मार्गदर्शक नव्हता! तिच्या वडिलांनी इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंचं खेळणं बघितलंही नव्हतं. त्यांच्या सूचना उपयुक्त असल्या तरी पुरेशा नव्हत्या. तरीही तिनं महत्त्वाच्या दोन स्पर्धा जिंकल्या होत्या. पण तो काळ तिच्या नवखेपणाचा, आपल्या कुटुंबीयांपासून दुरावल्याचा होता. खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात मार्टिना विविध अवघड प्रसंगातून जात होती. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या अमेरिकेचा एक वेगळा चेहरा ती अनुभवत होती. एकीकडे व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे आखून दिलेल्या चाकोरीत आनंदी आहोत असे सांगणा-या जीवनाचा उदो उदो! असे दोन चेहरे असणारी अमेरिकन संस्था तिला कोडयात पाडत होती. मार्टिनाचे ओरडणे, स्वत:शीच बोलणे, रडणे, कधी पत्रकारांशी बोलणे नाकारणे, चेहरा झाकून घेणे हे सर्व अमेरिकनांच्या चेष्टेचा विषय झाला होता. खेळताना व खासगी आयुष्यात आपल्या भावनांना स्पष्ट व्यक्त करण्याची सवय आणि स्वभाव असलेल्या मार्टिनाला ती खूपच हळवी आहे, नवखी आहे अशा शेरेबाजीला सामोरं जावं लागत होतं! ज्यांनी मार्टिनाचे खेळणे, तिचे टेनिस कोर्टावरचे जिंकण्याची जिद्द असलेले वागणे पाहिले आहे, देहबोली बघितली आहे त्यांना कधी काळी मार्टिना अशी भावुक असेल यावर विश्वास बसणार नाही. तिचं बोलणं स्पष्ट होतं आणि आजही आहेच.
मार्टिनाच्या घरचे आणि तिच्या जवळचे या सर्वाना ती समिलगी आहे हे माहिती होतं. मार्टिनानं ते नाकारलं नव्हतंच. पण अनेक व्यावसायिक कारणांमुळे तिला ते उघड सांगता येत नव्हतं. पुढारलेल्या आणि स्वतंत्र विचाराचा अशी ओळख असलेल्या अमेरिकन समाजाला, न्यायव्यवस्थेला तिचं समिलगी असणं भावणारं नव्हतं. या सत्याचा सामना मार्टिनाला करावा लागला.
तिच्याबरोबर तिच्या जिवलग मैत्रिणी होत्या. त्यावेळी तिची साथीदार होती नॅन्सी लिबरमन. नॅन्सीशिवाय रिटा मे ब्राऊन ही लेखिका तिच्याबरोबर होती. तिच्याबरोबर संबंध होते हे जाहीरपणे मान्य करण्याबद्दल मार्टिनावर पत्रकारांकडून दबाव येत होता. विविध प्रकारचे प्रायोजक आणि पैसा तिनं समिलगी असणं मान्य केलं तर हातातून जाणार होता- फक्त तिच्याच नाही तर वुमन्स टेनिस असोसिएशनच्याही. शिवाय अमेरिकन नागरिकत्व हवं असेल तर बायसेक्स्युअल असणं मान्य होतं; पण फक्त समिलगी असणं नाही! या गप्प राहण्याचा, भावना आणि हक्क जाहीरपणे मान्य न करण्याचा मार्टिनाच्या खेळावर परिणाम होत होता. अमेरिकन जनतेनं आपल्याला स्वीकारलं नाही हे मार्टिनाला बोचत होतं ते वेगळंच.
मार्टिनाला तिची मैत्रीण, सर्वात प्रमुख प्रतिस्पर्धी आणि अमेरिकेची लाडकी ख्रिस एव्हर्ट लॉईड हिला पराभूत करणं जमलं नव्हतं! ख्रिस पत्रकारांची, समाजाची, सर्वाची लाडकी होती तिचं अमेरिकन असणं आणि समाजमान्य चाकोरीतलं वागणं. मार्टिनाचं वागणं या सर्वाविरुद्ध होतं! पण मार्टिनाने ख्रिसला पराभूत केल्याशिवाय ती सर्वश्रेष्ठ खेळाडू होणार नव्हती. मार्टिनाची त्यावेळी गर्लफ्रेण्ड नॅन्सी हिनं हे नेमकं ओळ्खलं होतं. ज्याला कान भरणे, विष पेरणे म्हणता येईल अशा पातळीवर जाऊन नॅन्सीनं मार्टिनाला ख्रिस तिची मैत्रीण नाही तर प्रतिस्पर्धी आहे, तिचे यश हिरावणारी आहे असं सांगणं सुरू केलं. मार्टिनाचा हळवेपणा कमी करण्यासाठी, तिची मानसिक ताकद वाढवण्यासाठी हे आवश्यक होतं. अर्थातच ख्रिस तिची मैत्रीण असली तरी ती खेळताना मार्टिनाचा विचार एक प्रतिस्पर्धी असाच करत होती हे दुसर सत्य होतं.
आपल्या प्रिय व्यक्तीनं यशस्वी व्हावं म्हणून जे काही करायचं ते सर्व नॅन्सीनं केलं. व्यायाम, आहार आणि मानसिक संतुलन या तिन्ही आघाडय़ांवर पूर्ण नियंत्रण यावे म्हणून नॅन्सी आणि रिची या दोन मैत्रिणींनी प्रयत्न केले. अखेर मार्टिनाला अमेरिकन नागरिकत्व मिळालं. योग्य वेळ आली की मी जाहीरपणे सगळं मान्य करेन, आता काही लिहू नकोस हे मार्टिनाने पत्रकाराला सांगूनही त्याने पेपरात मार्टिना हे सर्व योग्य वेळ आली की बोलेल अशी बातमी दिली! मार्टिना आणि नॅन्सी दोघींनी सारवासारव केली.. तरी लोकांना जे हवं होतं ते मिळालं होतं. मार्टिनाचे आर्थिक आणि इतर नुकसान झाले.
मार्टिनाला ख्रिसला हरवणं आता अधिकच अवघड होणार होतं! मार्टिना विरुद्ध सगळं स्टेडियम असा सामना होता! ख्रिसशी खेळताना डोक्याचा वापर कर, शांत राहा, असा महत्त्वाचा सल्ला तिला रिचीने दिला. ख्रिसचे कुठे चुकते तिथे हल्ला कर याची सतत आठवण मार्टिनाला करून दिली. मार्टिना जिंकली, विपरीत परिस्थितीत जिंकली. मार्टिनाने त्याचे श्रेय तिच्या मैत्रिणींना दिले. खुद्द ख्रिसनेसुद्धा ही बाब मान्य केली. मार्टिनाने पत्रकार परिषदेत आपले समिलगी संबंध जाहीरपणे मान्य केले आणि त्यानंतर जगाला माहिती असणारी जिद्दी आणि अजिंक्य राहणा-या मार्टिनाचा उदय झाला. ही तीस वर्षापूर्वीची गोष्ट. विपरीत परिस्थिती, प्रेम आणि त्याचं जाहीर मान्यता घेणं याचं याहून दुसरं उदाहरण कुठलंच नाही! एक खेळाडू म्हणून मार्टिना टेनिसच्या विश्वात अमर आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply