भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि भाजपचे नेते भैरोसिंग शेखावत यांंचा जन्म २३ ऑक्टोबर १९२३ रोजी राजस्थानमधील सिकर येथे झाला.
भैरोसिंग शेखावत हे एक असे व्यक्तिमत्त्व होते की ज्यांचा फक्त पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर विरोधी पक्षनेतेही आदर करीत असत. स्व-कर्तृत्वाने मोठे झालेल्या भैरोसिंह शेखावत यांनी १९५२ मध्ये विधानसभेची निवडणूक जिंकून मुख्य राजकीय प्रवाहात प्रवेश केला. आपल्या समर्थकांमध्ये ‘राजस्थानचा एकच सिंह’ या नावाने ते प्रसिद्ध होते.
२००२ साली जेव्हा त्यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली तेव्हा त्यांना भाजपच्या नेतृत्वाखली असलेल्या राष्ट्रीय लोकतंत्रिक आघाडीची (रालोआ) मते तर मिळालीच पण काँग्रेस पक्षासोबत अन्य काही पक्षांच्या नेत्यांनीही त्यांच्यासाठी मत दिले होते.
भैरोसिंग शेखावत हे भारताचे ११ वे उपराष्ट्रपती होते. त्यांनी १९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७ या कालावधीत हे पद भूषवले होते. तब्बल तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.
भाजपमध्ये ते एक प्रभावी नेता होते. भैरोसिंग शेखावत पहिल्यांदा २२ जून १९७७ रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी १६ फेब्रुवारी १९८० पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यानंतर १९९० साली जेव्हा पुन्हा भाजपची सत्ता राजस्थानमध्ये आली त्यावेळी शेखावत यांचीच मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली आणि ४ मार्च १९९० ते १५ डिसेंबर १९९२ या कालावधीत त्यांनी राज्याचे नेतृत्व केले.
अडवाणींच्या रथ यात्रेनंतर १९९२ साली बाबरी मशिद पाडण्यात आली. नरसिंह राव सरकारने भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानसह चार राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. पण १९९३ साली पुन्हा झालेल्या निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपचाच विजय झाला आणि तिस-यांदा शेखावत यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली.
भैरोसिंग शेखावत यांचे १५ मे २०१० रोजी निधन झाले.
Leave a Reply