मानितो ईश्वरास आम्ही, जरी तयां, नाही कधी पाहिले,
मानिले वा ना मानिले आम्ही, तयाचे काहीच नाही बिघडले ।
विचार अमुचे नसतील उच्च, आहोंत आम्ही जसे तयाने घडविले,
हे ही खरे, त्याचीच मर्जी, राहून साधे, आम्ही नाही कुणा नाडले ।।१।।
सत्यात आहे परमेश्वर, मानिती सारे, सत्य हाच धर्म,
न कळे, असत्याऽचरणांतुनि, कां करिती अहर्निश कुकर्म ।
नेमेचि स्मरुनि तया, निर्लज्जतेने विसरण्यासाठी जाते मजल,
क्षण भंगूर या जीवनांत, षड् रिपूंची कमाल, हीच येथे धमाल ।।२।।
आलस्य आपुल्या अंगीचे सरेना, दोष लाविती तयाला,
टाकूनि कर्म अपुले, अपुल्याच अकलेने, ठेविती तयावरी हवाला ।
राहूनि यत्नीं, कार्यीं मग्न असतां, नसते वानवा तयाच्या कृपेची,
काय जाते अपुले, स्मरुनि तयां, मिटते चिंता मनींच्या तमाची ।।३।।
मानितो अस्तित्व तयाचे, अमुच्यात आहे तो, होऊनि श्वास,
नाकारले जरी ते त्याच्याच येतो आठव न मिळता खावया घास।
तरीही न मानूनि अस्तित्व तयाचे, सारे संग्रहाचा धरिती ध्यास,
आपदांतुनि, येतां कंठी प्राण, लागते धरावी त्याचीच कास ।।४।।
भक्ती-भाव प्रिय म्हणे, तयाला, तो असतो सदा संत सहवासांत,
नाही भाग्य अमुचे थोर तितुके, ठीक आम्ही नशील्या शायरींत ।
वास्तव तयाचे ठावूक न मज, नाही म्हणून तो, माझ्या डायरीत,
अणूत जर रेणू तो, पाहतो तयां आज मी, या ताई चरणांत ।।५।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१३ फेब्रुवारी २०१०
काटदरे मंगल कार्यालय, बदलापूर
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply