ठाणे रंगयात्रा २०१६ मधील संदीप विचारे यांचा लेख.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला नाट्यप्रेमी मंडळींनी ठाण्याचे एक उद्योजक शांताराम शिंदे यांना नाट्यनिर्माता केलं आणि जन्म झाला ‘निर्मल’ नाट्यसंस्थेचा. वामन तावडे, अशोक राणे, महेंद्र तेरेदेसाई यांसारख्या मातब्बर मंडळींच्या सहयोगाने निर्मल संस्थेचं मानवी मनाचा गुंता उलगडणारं ‘रज्जू’ नावाचं नाटक मराठी रंगभूमीवर आलं. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ताचा प्रसिद्ध नट प्रसाद ओक, जाहिरात क्षेत्रात चमकणारा प्रसाद बर्वे ही त्यावेळची नवखी मंडळी व्यावसायिक रंगभूमीवर आली. या नाटकात इला भाटे, लीना भागवत, अविनाश नारकर हे कलाकारसुद्धा होते. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्याकडील काही प्रॉपर्टी या नाटकासाठी स्वेच्छेने दिली. असं हे ‘निर्मल’चं आणि शांताराम शिंदेंचं पहिलं नाट्यपुष्प बॉक्स ऑफिसवर कोसळलं. शक्यतो पहिल्याच प्रयत्नात अपयश आलेली आणि मारून मुटकून ‘निर्माता’ बनलेली व्यक्ती पुन्हा कधीही शिवाजी मंदिरच्या आजूबाजूस दिसत नाही. पण शांताराम शिंदेंनी हे खोटं ठरवलं आणि त्यांनी दुसऱ्या नाटकाची जुळवाजुळव सुरू केली. हे नाटक होतं सुरेश जयराम लिखित आणि विजय पाटकर दिग्दर्शित ‘पती सगळे उचापती!’
‘पती’ने मराठी रंगभूमीवर एक इतिहास निर्माण केला. हे नाटकसुद्धा बॉक्स ऑफिसवर हवं तसं चाललं नाही. पण विजय पाटकर, सुरेश जयराम, चेतन दळवी आणि कुलदीप पवार यांच्या केमिस्ट्रीमुळे हे नाटक कॉण्ट्रक्ट शोचं ‘दादा’ नाटक ठरलं! सुरुवातीला या नाटकाच्या कास्टिंगकरिता संजय नार्वेकर, सुधीर जोशी, सुनील बर्वे यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी काही तालमींना हजेरीही लावली. पण काही कारणास्तव ते या नाटकातून बाहेर पडले. ‘पती’ची अजून एक गंमत म्हणजे आताचा आघाडीचा गीतकार गुरू ठाकूर यांनी या नाटकाच्या सुरुवातीच्या काही जाहिराती केल्या होत्या. ‘पती’नंतर शांताराम शिंदेंनी नवोदित संतोष पवारला हाताशी धरून ‘जाणूनबुजून’ या नाटकाची निर्मिती केली. हे नाटक संतोष पवारच्या आतापर्यंतच्या नाटकांमधलं सर्वात उत्तम नाटक ठरलं! या नाटकामुळे शिंदेसाहेबांना धमकीचेही फोन आले. तरीही त्यांनी हे नाटक नेटानं चालू ठेवलं.
‘जाणूनबुजून’ नंतर शांताराम शिंदे यांनी पुरुषोत्तम बेर्डे लिखित-दिग्दर्शित ‘टूरटूर’ या नाटकाची पुनर्निर्मिती केली. या नाटकामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री समिरा गुजरचे मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘टूरटूर’नंतर विजय तेंडुलकरांचं ‘गिधाडे’ हे नाटक शांताराम शिंदेंनी रंगभूमीवर आणलं. यात प्रिया तेंडुलकर मध्यवर्ती भूमिकेमध्ये होत्या. अरुण होर्णेकरांनी या नाटकाची जुळवाजुळव केली होती. ‘साहेबजी डार्लिंग’ ही मनोरुग्ण पारसी कुटुंबावर बेतलेली ब्लॅक कॉमेडी दहा प्रयोगांत बंद झाली. मंगेश कदम दिग्दर्शित या नाटकात अमिता खोपकर, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, रसिका जोशी, आनंद इंगळे, अतुल परचुरे अशी कास्टिंग होती. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ या नाटकामुळे विशाखा सुभेदार यांचं मराठी रंगभूमीवर पदार्पण झालं. ‘पैचान कोन’ या संतोष पवार दिग्दर्शित रत्नाकर पिळणकर लिखित नाटकात विकास समुद्रे पंचरंगी भूमिकेत दिसला. माधवी निमकरने या नाटकामार्फत मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘बायकोचा खून कसा करावा’, बुवाबाजीचा पर्दाफाश करणारं ‘बुवाभोळा’ ही त्यांची शेवटची नाटकं! तरी ते सशक्त क्रीप्टच्या शोधात होतेच.
पहिल्या नाटकात अपयश येऊनही ते सतत नाट्यनिर्मिती करत राहिले. नवीन कलाकारांना संधी, जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन, मल्टिस्टार नाटक या आताच्या संकल्पना त्यांनी पाच वर्षांपूर्वीच वापरल्या होत्या. ‘निर्मल’ संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. पण शिंदेसाहेब कधीही पुरस्कार सोहळ्याला, पार्ट्यांना हजर राहिले नाहीत. त्यांनी स्वतला कधीही मिरवून घेतलं नाही. असा हा आगळावेगळा निर्माता 16 जुलै 2012 रोजी आपल्यातून निघून गेला. सतत दुसऱ्यांना मदतीचा हात देणाऱ्या शिंदेंनी त्वचादान व देहदान करून आपली परोपकारी वृत्ती मरणानंतरही जपली. त्यांच्या आवडीच्या ‘जाणूनबुजून’, ‘पती’, ‘टूरटूर’, ‘गिधाडे’ अशा मोजक्याच नाटकांचा एखादा हर्बेरियमसारखा उपक्रम राबवून ती मराठी रंगभूमीवर प्रदर्शित करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
— संदीप विचारे – 9821332411
Leave a Reply