उर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. क्रियाशील- कारण लेखनाबरोबरच त्यांनी दलित चळवळीतही कार्य केले व करत आहेत. त्यांचे कथासंग्रह प्रसिध्द झालेले आहेत, एकांकिका प्रसिध्द झालेली आहे तसेच त्यांची वैचारिक, अभ्यासपूर्ण पुस्तकेही आहेत. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. हातचं काही राखून न ठेवता, सहज शैलीत उर्मिलाताईंनी आत्मचरित्र लिहिलेले आहे, स्वत:ची वैगुण्येही सांगितलेली आहेत. जात आणि दारिद्र्य याचे चटके त्यांना सोसावे लागले, तसेच स्त्री असल्यामुळे घरात समान हक्कासाठी संघर्ष करावा लागला. स्त्रीवादाचे भान आलेल्या स्त्रीच्या वाट्याला हा संघर्ष अटळपणे येतोच, तीव्रता कमी-जास्त असते इतकेच. ‘आयदान’चा इंग्लिश व इतर भाषेत अनुवाद झालेला आहे.
या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. रंगावृत्ती म्हणजे त्यांनी त्याचे नाटक केलेले नाही तर निवेदन आणि प्रसंगांचे सादरीकरण यातून ते पुढे जाते. नंदिता धुरी, शिल्पा साने व शुभांगी सावरकर या तीन कलाकार मिळून आपल्यासमोर ते सादर करतात. उर्मिला याचे कुटुंब कोकणातील एका दुर्गम भागातील खेड्यात राहणारे. इथल्या स्त्रिया टोपलीत माल भरुन तो दूर असलेल्या गावात विकायला नेत तेव्हा त्या डोंगराळ, खडतर रस्त्यावरुन जाताना आपल्या पुर्वजांचा उद्धार करत, म्हणतं मेल्याला गावाजवळ डेरा टाकायचा सोडून इतक्या दूर वस्ती करायला कोणी सांगितलं होतं, आम्हाला आता त्रास होतोय! नाटकाच्या सुरवातीलाच या तिन्ही कलाकार डोक्यावर टोपले धरल्याची एक्शन करुन एका मागोमाग एक एका लयीत जातात, ती लय त्यांनी शेवटपर्यंत टिकवली आहे आणि त्याचबरोबर आपल्यालाही त्यांच्यात सामील करुन घेतले आहे.
उर्मिला यांच्या घरी दारिद्र्य, परंतु वडिलांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते रत्नागिरीत येऊन राहिले. शाळेत आणि इतर ठिकाणी उर्मिलांना अस्पृश्यतेचा त्रास सहन करावा लागला. त्यांची आई त्यांना तयार झालेले सामान पोचवण्यासाठी कोणाच्या घरी पाठवायची तर त्यांना बाहेरच उभे करून ठेवले जायचे. त्यांनी दिलेले सामान पाणी टाकून शुध्द करुन मग घेतले जायचे. त्यांच्या हातावर पैसेही दुरून टाकले जायचे. शाळेत एकदा काही मुलींनी जेवणाची पंगत करण्याचा बेत केला. कोणी तांदूळ, कोणी डाळ आणायचे ठरले, पण उर्मिलांना मात्र त्यांनी सांगितले, तू आपले पैसेच घेऊन ये. स्वयंपाक करतानाही त्यांना दूरच ठेवण्यात आले, कशाला हात लावू दिला नाही आणि दुसर्या दिवशी त्यांच्या चर्चा उर्मिला कशा ओरपून ओरपून खात होत्या. उर्मिला म्हणतात, मला अगदी मेल्यासारखे झाले. त्यांनी पुढे अनुभव दिला आहे, नंतर सुमारे पंचवीस वर्षांनी, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसासाठी तिची शाळेतील मैत्रीण घरी आली, केक खाल्ला. मैत्रीणीने घरातील बुध्द, आंबेडकर यांच्या प्रतिमा बघितल्या व आपल्या घरी सांगितले. लगेच त्या मुलीची आई उर्मिलांच्या घरी आली व म्हणाली, आम्ही मराठा. आम्हाला हे असलं काही चालणार नाही आणि आता आमची मुलगी तुमच्या मुलीबरोबर खेळणारही नाही. काय फरक झाला मग इतक्या वर्षात? की बदल झाला पण फार थोडा? मनातून जात गेलीच नाही? उर्मिला लहान असताना त्यांच्या घरातील दोन खोल्या त्यांच्या आईने भाड्याने दिल्या होत्या. पण यांची जात कळली की भाडेकरू घर सोडून जात. एकदा तर मुसलमान भाडेकरूलाही त्याच्या नातेवाईकाने घर सोडायला भाग पाडले. म्हणजे धर्मव्यवस्थेच्यावर पुरुन उरणारी ही जातीव्यवस्था.
उर्मिला मॅट्रिकला असतानाच त्यांचे हरिश्चंद्रवर प्रेम जडले, त्यांनीच पुढाकार घेऊन आडवळणाने ते व्यक्त केले. त्यांचे लग्नही जमले व त्या मुंबईला आल्या. लग्नानंतर त्या बी.ए. झाल्या. तोपर्यंत पतीचा पाठिंबा होता. पण एम.ए. करायचे म्हटल्यावर आपल्या पुढे जाणार म्हणून कुरकुर. पण त्या एम.ए झाल्या. चळवळीतील कार्यकर्त्या हिरा बनसोडे यांच्याबरोबर कार्य करायला लागल्या. त्या आधीपासून सभाधीट होत्या. लेखनही सुरू झाले होते. त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रणे यायला लागली, त्यांचे नाव झाले तेव्हा पतीला अभिमान वाटायचा आणि त्याचबरोबर मत्सर आणि भीतीही. उर्मिला-हरिश्चंद्र या जोडप्याला दोन मुली व एक मुलगा. हा मुलगा मेडिकलला शिकत असताना, ऐन तारुण्यात त्याचा अपघातात मृत्यू झाला. हा या पती – पत्नीवर फार मोठा आघात होता. हरिश्चंद्र यांनी स्वत:ला नशेत बुडवून घेतले तर उर्मिला यांनी लेखनात. उदान ह्या पाली भाषेतील पुस्तकाचा अनुवाद त्यांनी याच काळात केला. इथे त्यांना त्या स्वत: व त्यांची आई यांच्या जगण्यातील साम्य दिसते. त्यांच्या आईचा मुलगाही अचानक गेला तेव्हा आईने स्वत:ला कामात बुडवून घेतले होते. बांबूच्या टोपल्या, सुपं व इतर वस्तू विणणे म्हणजे आयदान. आईचे हे विणणे व माझे लेखन यात दु:खाचा समान धागा आहे असे उर्मिला म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानंतर या समाजातील बहुसंख्य लोकांनी धर्मांतर केले तो प्रसंगही प्रयोगात आहे. घरातील देव टोपल्यात भरून, तू आमचं काय भलं केलं नाही रे देवा, असं गार्हा णं घालत त्या सगळ्यांनी ते नदीत विसर्जित केले. वस्तुत: ते विकले असते तर जे शंभर एक रुपये मिळाले असते गरीबीत त्याचा फार मोठा आधार झाला असता. मात्र पुढे देव विसर्जित करण्यात जो भाऊ आघाडिवर होता त्याचीच बायको भगतीण झाली याचा विषाद उर्मिला पवार यांनी व्यक्त केला आहे. हा अंधश्रध्देचा पगडा की त्यामागे आर्थिक कारण होते?
आपल्या दलित समाजातील उच्चभ्रूंच्या दांभिकपणाबद्दलही त्यांनी लिहिले आहे. हे उच्चभ्रू आपण दलित आहोत हे उघड होणार नाही याची दक्षता घेत. त्याकरता घरातील बुध्द, आंबेडकर यांच्या प्रतिमा सहज नजरेला पडणार नाहीत अशा जागी ठेवत.
एकदा उर्मिला व हिरा बनसोडे दलित चळवळीत सहभागी व्हा सांगायला कॉलनीतील एका उच्चभ्रू दलित महिलेकडे गेल्या तर तिचा पहिला प्रश्न, तुम्हाला कसे कळले आम्ही दलित आहोत, आम्हाला तर सगळे कोब्राच समजतात! इतकेच नाही तर तिने शहाजोगपणे या दोघींनाचा बोधामृत दिले, प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा विकास करावा, त्यातूनच समाजाचा विकास होईल व त्यातून देशाचा विकास होईल. यांनी एकच समर्पक उत्तर दिले, जर डॉ. आंबेडकरांनीही असाच विचार केला असता तर आज तुम्ही कुठे असता? तरीही काही परिणाम झाला नाही ते वेगळेच.
हा प्रयोग-सादरीकरण रंगते, मनाला भिडते. मूळ ऐवज अतिशय चांगला आहे, त्याचबरोबर दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय व त्यांचा आपापसातील ताळमेळ अतिशय उत्तम आहे. रियालिटी शोच्या भाषेत ज्याला आजकाल केमेस्ट्री म्हटले जाते ती नंदिता धुरी, शिल्पा साने व शुभांगी सावरकर या तीन कलाकारांमध्ये जबरदस्त जमलेली आहे. वस्तुत: नाटकापेक्षा हा सादरीकरणाचा फॉर्म सादर करणे कलाकारांसाठी जास्त आव्हानात्मक. नाटकात एक कलाकार सहसा एकाच पात्राची भूमिका नाटकभर निभावतो. समोरच्या क्लू मिळतील असे संवाद असतात. इथे तिघीही आलटून पालटून जशा उर्मिला होतात तसेच आई, सासू, उच्चभ्रू दलित स्त्री, उर्मिला यांच्या शाळेतील मैत्रिणी अशा अनेक व्यक्तीरेखा त्या त्या प्रसंगापुरत्या साकारतात. पुरुष व्यक्तीरेखेबाबतही वडील, नवरा, भाऊ अशा अनेक व्यक्तीरेखा त्या साकारतात. पुरुष व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अगदी सूक्ष्म बदल केले आहेत. ओढणीची घडी करून पंचासारखी एका खांद्यावर टाकणे, आवाजात थोडा करडेपणा आणणे, पोश्चर बदलणे इत्यादी ते अगदी दाद देण्यासारखे. पुढे शिकू का असे उर्मिला नवर्यांला विचारतात तेव्हा दोन्ही हातात वर्तमानपत्र धरून ते वाचत असल्याची एक्शन व घरची कामे करून पुढे शीक हे नवर्यानचे उत्तर हे खासच. निरंजन रुद्रपाल यांचे नेपथ्य मोजकेच आहे. त्यातही बांबूच्या चौकोनी स्टूलांचा दिग्दर्शकाने केलेला वापर, तसेच ओढणीचा केलेला वापर कल्पक आहे. रवी-रसिक यांची प्रकाशयोजना व नितीन कायरकर यांचे पार्श्र्वसंगीत प्रयोगाला पोषक आहे.
या प्रसंगी चेतन दातार यांची आठवण येणे अपरिहार्य आहे. मंटोच्या दस रुपय्या, तोबा टेकसिंग या कथांचे त्यांनी असे अनेक कलाकारांच्या मार्फत सादरीकरण केले होते, तेही अप्रतिम झाले होते. त्यांच्यानंतर हा फॉर्म आता अस्तंगत होणार का वाटत असतानाच हे नाटक आले व त्याने हा फॉर्म कळसावर नेला आहे. सुषमा देशपांडे यांनी अतिशय मेहनत घेऊन रंगावृत्ती तयार केलेली आहे. त्या कसलेल्या दिग्दर्शक आहेत हे त्यांनी वेळोवेळी सिध्द केलेले आहे. आता त्यांना एकच विनंती स्त्री-जाणिवांची नाटके या मर्यादेत स्वत:ला न बांधून घेता सर्वच प्रकारची नाटके द्यावीत. त्यातून रंगभूमी पुढेच जाईल.
उदय कुलकर्णी
( दै. कृषिवलमध्ये प्रकाशित हा लेख लेखकाच्या सहमतीने पुनर्प्रकाशित केला आहे. )
Leave a Reply