नवीन लेखन...

चेहरा

मे महिना म्हणजे सुट्टीचा आणि धमाल करण्याचा महिना. तुमच्या या धमाल आनंदात भर घालण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत एक विज्ञानकथा. विज्ञान, तंत्रज्ञान, गुन्हेगारी आणि भावना यांचे आगळेच रसायन असणारी ही कथा आहे. आम्हांला खात्री आहे की, ती तुम्हांला नक्की आवडेल!

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील संजय ढोले यांचा हा पूर्वप्रकाशित लेख 


आज डॉ. विकास मठेंना डिपार्टमेंटला जायला उशीरच झाला लेक्चर होतं व तद्नंतर बारा वाजता संगणक विभागात तातडीची मीटिंगही आयोजित केली होती. काही विषय मार्गी लावायचे होते. त्यांनी घड्याळात पाहिलं, सकाळचे साडे दहा वाजले होते. अकरा वाजता भौतिकशास्त्र विभागात लेक्चर असल्याने ते लागलीच तयारीला लागले. कपडे घालतानाच त्यांनी न्यूज चॅनल लावलं होतं. आणि त्या बातमीने ते क्षणभर स्तब्ध उभे राहिले.

डॉ. विकास मठेंनी स्वत:ला सावरलं. शर्टाची बटने लावत त्यांनी शर्टिंग केलं. या वेळीही लक्ष मात्र टी. व्ही. पाहण्याकडेच होतं.

क्षणभर ते तसेच सोफ्यावर बसले व बातमी काळजीपूर्वक ऐकू व पाहू लागले.

नर्सरीमध्ये जाणाऱ्या एका चार-पाच वर्षांच्या मुलाचं बाणेरच्या एका सोसायटीच्या बाहेरील रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं होतं. निवेदिका सांगत होती. सकाळी साडे सात वाजता दहा वर्षांच्या चुलत भावाबरोबर शाळेत निघालेल्या त्या लेकराचं एका अज्ञात दुचाकी स्वारानं अपहरण केलं होतं. अतिशय शांतपणे दुचाकी थांबवून, चॉकलेटचं आमिष दाखवून त्या इसमानं मुलाच्या चुलत भावासमोरच अलगदपणे त्याला उचललं होतं. आणि त्याची हीच छबी सी. सी. टी. व्ही. फूटेजमध्ये कैद झाली होती. निवेदिका ती चित्रफीत सातत्याने दाखवीत होती.

डॉ. मठेंनी दीर्घ श्वास सोडत स्वत:ला सावरलं. या वेळी मात्र त्यांना घडाळ्याचं भान नव्हतं. निवेदिका त्या मुलाबद्दल पुढे काय सांगते याविषयी ते उत्सुकपणे ऐकत होते. त्यांना हे प्रकरण जाणून घ्यायचं होतं.

दुसऱ्या न्यूज पडद्यावर प्रक्षेपित होईपर्यंत डॉ. मठे सोफ्यातच बसून राहिले.
आतून डॉ. मठेंची पत्नी सुलेखा एका हातात डबा व दुसऱ्या हातात मोबाइल घेऊन येत काळजीने म्हणाली,
“अहो, हे बघितलंत का?”
“काय?”
“एका चार वर्षांच्या मुलाचं बाणेरमधून अपहरण झालंय.
“अगं, मीही टी. व्ही. वर तेच पाहत होतो. अन् इतक्यात ही न्यूज व्हायरल पण झालीय. ” डॉ. मठे आश्चर्याने म्हणाले.”
“हो!… नाऽऽ बघा… बऱ्याच व्हॉटस्अॅप ग्रूपवर ती फिरतेय.” “बघू!” सुलेखाच्या हातून मोबाइल स्वत:च्या हातात घेत डॉ. मठे पाहू लागले.
न्यूज तर व्हायरल झाली होतीच; पण शिवाय बाणेर येथील नगरसेवकानेही भावनिक पोस्ट टाकली होती. ती वाचून डॉ. मठे अस्वस्थ झाले. त्यातच त्यांनी त्या इसमाचा मुलाला घेऊन जातानाचा सी.सी.टी.व्ही.मधील फोटोही पाहिला. त्यांनी निरखून पाहिलं. मुलगा हँडल डायलसमोर उभा होता. तर त्या इसमाने हेल्मेट परिधान करून जॅकेट घातलं होतं. शिवाय त्याच्या पाठीवर काळी सॅक रेंगाळत होती.
दुचाकी अॅक्टिवा होती व तिचा नंबर मात्र अस्पष्ट दिसत होता. हेल्मेटमुळे त्या इसमाचा चेहरा मात्र दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान उभं राहणार हे निश्चित होतं.

“सुलेखाऽऽ कुठल्या ग्रूपवर आला आहे हा मेसेज?”
“बहुतेक आपल्याच सोसायटीच्या ग्रूपवर.” सुलेखाने समोर निरखून बघत, मान हलवत पुढे म्हणाली, “होय आपल्याच सोसायटीवर आहे.
“मग मला फॉरवर्ड कर ना! आणि हो, आत्ताच कर.”
“हो, लागलीच करते आणि हो जाताना डबा घेऊन जायला विसरू
नका.” सुलेखाने आठवण करून देत लागलीच डॉ. मठेंना मेसेज फॉरवर्ड केला आणि म्हणाली.
“अहो, असे कसे आई-वडील आहेत हे? एवढ्याशा लहान मुलाला
एकटं शाळेत पाठवलं. जे झालं ते वाईट आहे. पण त्या बाळाचे आई-वडील निष्काळजी वाटले.” सुलेखाने आपलं स्पष्ट मत दिलं.
“अगं, असतील त्यांचे काही प्रश्न. ते दोघेही सुशिक्षित डॉक्टर दांपत्य आहे आणि तो त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याचंही नमूद केलं आहे.
मला नाही वाटत, ते तेवढे निष्काळजी असावेत.” डॉ. मठेंनी सांगितलं.
“हो पण आलाच ना आता जिवाला घोर. एकुलतं एक पोरगं असं
उचलून नेलं. त्यांची काय अवस्था असेल हे मीही समजू शकते.” सुलेखा समजून म्हणाली.
“ठीक आहे सुलेखा! मला निघायला हवं.”
“सांभाळून जा!” सुलेखा नेहमीप्रमाणे म्हणाली.
तेवढ्यात डॉ. मठेंनी नंबर प्रेस केला व मोबाइल कानाला लावला.
“ज्योती मॅडम, मठे बोलतोय.”
“हो!… बोला ना सर!”
“न्यूज चॅनल बघितलंत? ” डॉ. मठे अंदाज घेत म्हणाले.
“नाही सर! सकाळचीच आवराआवरी करते आहे. अकरा वाजता
लेक्चरही आहे” डॉ. ज्योती म्हणाल्या.
“शक्य असल्यास कुठलंही मराठी न्यूज चॅनल लावा व बघा किंवा मी आताच तुम्हांला मेसेज पाठवला आहे. तेवढा बघितला तरी चालेल” डॉ.
मठेंनी दिशा सांगितली.
ANUPAM COLOURS PRIVATE LIMITED
Manufacturers & Exporters of Inorganic and Organic Pigments मराठी विज्ञान परिषद पत्रिका – मे २०२२
“सर! काही सीरीअस आहे का?” डॉ. ज्योतीचा काळजीयुक्त प्रश्न.
“नाही, पण सकाळीच बाणेरमधून एका लहान मुलाचं अपहरण झालं
आहे. अपहरणकर्त्याचा हेल्मेट परिधान केलेला फोटोही मी पाठवला आहे.
तुम्ही बघून घ्यावा” डॉ. मठेंचे विचारचक्र फिरू लागले होते.
“हो सर, मी बघून घेते. पण…” डॉ. ज्योती यांचा गोंधळलेला स्वर ऐकताच डॉ. मठे म्हणाले,
“ज्योती मॅडम! मी डिपार्टमेंटला आलो की बोलतो. मी लेक्चर घेऊन बारा वाजता येतो. पल्लवीलाही निरोप देऊन ठेवा. बाय.”
“बाय सर !.. मी ही न्यूज बघून घेते. ”
डॉ. मठेंनी मोबाइल खिशात ठेवला. हातात डबा घेतला आणि
सुलेखाचा निरोप घेऊन ते विद्यापीठात निघाले.
डॉ. विकास मठे हे वर्णाने सावळे, बांधेसूद, धारदार नाकाला शोभणारे डोळे, भुरभुरणारे केस, पन्नाशीचे. मूळ प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ. प्लाझमावर आधारित संशोधनासाठी ते प्रचलित आहेत. शिवाय कम्प्युटेशनल सिम्युलेशनमध्येही त्यांना रुची आहे. पदार्थविज्ञानात त्यांचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आहे. गेली तीन वर्षं कुलगुरूंनी त्यांच्याकडे संगणक विभागाच्या प्रमुखांचा अतिरिक्त भार दिलेला आहे आणि तो त्यांनी तितकाच लीलया पेलला आहे. संगणक विभागात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचं त्यांना खास श्रेय आहे. संगणक क्षेत्रात जरी संशोधन करीत नसले, तरी विभागात कोण कुठल्या पद्धतीचं संशोधन करतात, याची जाण त्यांना आहे. म्हणूनच अपहरणाची बातमी समजताच, त्यांना डॉ. ज्योती यादव व डॉ. पल्लवी मांढरे यांचं संशोधन आठवलं होतं. डॉ. ज्योती यात निश्चितच काही तरी करू शकतात याची खात्री डॉ. मठेंना होती. भौतिकशास्त्र विभागात डॉ. मठेंनी लेक्चर घेतलं.
काही कामे पूर्ण केली आणि बरोबर बारा वाजता संगणक विभागात दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी बारा वाजताची तातडीची मीटिंग स्थगित केली होती.

विभाग प्रमुखांच्या केबिनमध्ये येताच, डॉ. मठेंनी डॉ. ज्योती यादव व डॉ. पल्लवी मांढरे यांना बोलावणे पाठवले.

क्षणातच दोघीही हसतमुखाने केबिनमध्ये हजर झाल्या. डॉ. मठे अगतिकतेने म्हणाले,

“बसा ना मॅडम, पल्लवी तुही बैस !”

दोघीही समोरच खुर्चीत बसल्या. डॉ. ज्योती यादव या मध्यमवयीन, गौरवर्णीय व कामात अतिशय तत्पर होत्या. तर डॉ. पल्लवी मांढरे या पस्तिशीतल्या, सावळ्या, किंचित स्थूल आणि आकर्षक होत्या. शिवाय पल्लवीने डॉ. ज्योती यादव यांच्याकडेच पीएच. डी. केली होती. डॉ.
ज्योती यांचं फजीलॉजिकसोबतच क्लाऊड कम्प्युटिंग, मशीन लर्निंग व डेटा सायन्समध्ये कमालीचं काम होतं. त्यांच्या नावावर पेटंटही होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन पेपरही होते. अलीकडे त्यांचं मशीन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर मोठं काम होतं. म्हणूनच डॉ. मठेंच्या डोक्यात कल्पना तरळून गेली होती आणि दोघींनाही बोलावणं पाठवलं होतं.
“सर, मी न्यूजही पाहिली आणि तुमचा व्हाटस्अॅप मेसेजही पाहिला. हॉरीबल आहे सर! एखाद्या कोवळ्या जिवाला कुणी असं आई-वडिलांपासून वेगळं कसं करू शकतो? भयानक आहे सर! त्या आई-वडिलांची काय स्थिती असेल नाही?” डॉ. ज्योती अतिशय भावनिक बोलत होत्या.

“होय सर, मलाही मॅडमनी आल्या आल्याच सांगितलं. आताचीच घटना असल्याने फार चर्चा नाहीये. पण जे काही आहे ते सर्वच असुरक्षित वातावरण आहे असंच वाटतं. निश्चितच पैशांचाच व्यवहार असेल सर !” पल्लवीनेही काळजीच्या स्वरात सांगितले.

“पल्लवी! असेलही, आपल्याला काहीच माहीत नाही. पोलीस कामाला लागलेत. कदाचित उद्या- परवा ते हुडकून काढतीलही आणि त्या इसमाला शिक्षाही होईल. पल्लवी म्हणते तेही खरंच आहे. कारण ते डॉक्टर दांपत्य आहे. स्वतंत्र हॉस्पिटल आहे. काहीतरी निश्चित असणार.
पण त्या कोवळ्या लेकराचा बळी नको!” डॉ. मठेंनी वस्तुस्थिती विशद केली. ते पुढे म्हणाले, “पोलीस आपलं काम करत आहेत. आपणही आपलं काम करून खारीचा वाटा उचलू या.”

“नेमकं काय करायचं सर? तुम्ही तातडीने बोलावलंत याचा अर्थ तुमच्या डोक्यात काहीतरी कल्पना असावी.” डॉ. ज्योतीने सरळ विचारलं. डॉ. मठे खुर्चीवरून सहजच पुढे रेलले आणि डॉ. ज्योती व पल्लवी यांच्याकडे पाहत म्हणाले,

“मॅडम, त्या इसमाची हेल्मेट घातलेली चित्रफीत पाहिल्यानंतर ती छबी सारखी माझ्या डोक्यात रेंगाळत आहे. पोलिसांना तो कोण काहीच कळत नाहीये. हेल्मेटमागचा चेहरा मात्र तुम्ही जगासमोर आणावा अशी माझी इच्छा आहे आणि ते तुम्ही निश्चित करू शकाल याची मला खात्री
आहे.” डॉ. मठेंनी स्पष्ट सांगितलं.
“सर, कसं काय? हाऊ कॅन आय हेल्प? ” डॉ. ज्योती गोंधळात उत्तरल्या. पल्लवीच्या चेहऱ्यावरही गोंधळाचे हावभाव होते.
डॉ. मठे थोडे मागे रेलून म्हणाले.

“ज्योती मॅडम… तुम्ही संगणक तज्ज्ञ आहात. डेटा सायन्स, डेटाबेस, मशिन लर्निंग, क्लाऊड कम्प्युटिंग व महत्त्वाचे म्हणजे फजीलॉजिकवर तुमचं मोलाचं संशोधन तर आहेच, पण त्यात तज्ज्ञही आहात. शिवाय इंटरनेट ऑफ थिंग्ज व आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचीही तुम्हांला चांगलीच जाण आहे. माझ्या मते, या सगळ्यांची सरमिसळ करून तुम्ही संशोधन करावं आणि तेही लवकरात लवकर. कारण, अपहरण करणारा इसम कसा वागेल ते आपल्याला ठाऊक नाही. आपल्या संशोधनाचा उपयोग निश्चितपणे पोलिसांना होऊ शकेल. सो थिंक.” डॉ. मठेंनी आत्मविश्वास दर्शविला.

डॉ. ज्योती यादव क्षणभर स्तब्ध झाल्या. डॉ. मठेंचा रोख त्यांना कळला. डोळे चमकले आणि आत्मविश्वासाने म्हणाल्या,

“सर, मला कळलं तुम्हांला काय हवं आहे. माझ्या संशोधनासाठी हे एक मोठं आव्हान आहे. मी रात्र आणि दिवस एक करीन आणि आय विल गेट सम पॉझिटिव्ह रिझल्ट. सर एक सांगू?”
“सांगा ना?”
“तुम्ही खरंच ग्रेट आहात. कुणाच्या संशोधनाचा व क्षमतेचा कसा उपयोग करून घ्यायचा हे फक्त तुम्हांलाच कळू शकतं. तुम्ही मला संशोधनाची दिशा दिल्याबद्दल धन्यवाद! मी आणि पल्लवी आतापासूनच कामाला लागतो. कल्पना माझ्या चांगलीच लक्षात आली.” डॉ. ज्योती ठामपणे म्हणाल्या.

“होय सर! मॅडमनाही मी हवी तशी मदत करेन. माझाही खारीचा वाटा.” पल्लवी उत्स्फूर्तपणे म्हणाली.
“पल्लवी, कुठल्याही कामात खारीचा वाटाच महत्त्वाचा असतो. आय विश यू ऑल दि बेस्ट. मी पोलिसांचा ट्रॅक ठेवतोच आहे. आपण तीन दिवसांनी भेटू या किंवा काही परिणाम मिळाले तर मला कधीही बोलवा. त्या इसमाची चित्रफीत तुझ्याजवळ आहेच. ” डॉ. मठे प्रोत्साहन देत म्हणाले.

“थँक्स् फॉर दी ट्रस्ट सर !.. आम्ही येतो.”
डॉ. ज्योती व पल्लवी दोघीही आत्मविश्वासाने बाहेर पडल्या. डॉ. मठेंच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटून गेल्या. डॉ. ज्योती व पल्लवी दोघीही खूप कष्टाळू, मेहनती व हुशार संशोधिका होत्या. त्या यशस्वी होतील याची त्यांना खात्री होती.

डॉ. मठे त्यांच्या इतर कामाला लागले. विद्यापीठात त्यांना तीन वाजता मीटिंग होती. त्याचीच उजळणी आता ते करीत होते.

आठ दिवस झाले तरी अपहरण झालेल्या मुलाचा कुठलाही सुगावा मिळत नव्हता. तीनशे-साडेतीनशे पोलीस व अधिकारी रात्रन्- दिवस शोध घेत होते. धाडी टाकीत होते. पण कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांचे खास खबरीही निकामी व असाह्य झाले होते. खबरींनी मुंबई-पुणे-नाशिकच्या झोपडपट्ट्यांही चाळून काढल्या होत्या. गुंड महागुंडांकडून माहिती मागवली होती. पण तेथूनही नकारच आला होता. अपहरण करणारा इसम सराईत गुन्हेगार नव्हता, हे सिद्ध झालं होतं. कारण, गुन्हेगारी जगतात त्याची कुणीही पुष्टी दिली नव्हती. शिवाय इसमाने अजूनपर्यंत कुठलाही फोन केला नव्हता की पैशांची मागणी केली नव्हती.
पोलिसांचा संभ्रम उडाला होता, कारण अपहरणकर्त्याची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. म्हणूनच कठीण होऊन बसलं होतं. पोलिसांचे थवेच्या थवे चहुबाजूला शोध घेत होते. पण हाती काहीच येत नव्हतं.

एव्हाना डॉक्टर दांपत्याचा बंगला हा पोलिसांचा नियंत्रण कक्षच झाला होता. जीप सातत्याने फिरत होत्या. थोडासा जरी सुगावा लागला तरी धाडी पडत होत्या.

डॉक्टर दांपत्य मात्र हवालदिल झाले होते. नातेवाईकांचा सारा राबता सुरू होता. काळजीनं प्रत्येक जण व्याकूळ होत होता. मुलाच्या आईने तर अन्न-पाणीच सोडलं होतं. सारखा अश्रूंच्या संततधारा सुरू होत्या. नववा दिवस उजाडला होता, पण निराशेची किरणे घेऊनच. कुठलीही बातमी नव्हती. अपहरण करणाऱ्या इसमाने मुलाचं काही बरंवाईट तर केलं नसेल ना?… या विचारानेच त्या माऊलीचा थरकाप उडत होता. मुलगा सापडेल ही आशा आता धुसर होत चालली होती.

पोलीस आता प्रत्येक शक्यतेचा विचार करू लागले होते. कुठे कुणा मुलाचा मृतदेह सापडला की शहानिशा केली जात होती. नातेवाईक, मित्र, आप्त, प्रतिस्पर्धी या सगळ्यांची चौकशी झाली होती. तरीही पोलीस अतिशय धीराने व संयमाने घेत होते. पोलिसांची कुमक वाढत होती. एका चार वर्षांच्या मुलाच्या अस्तित्वासाठी अवघं पोलीस विश्व राबत होतं. पण हाती यश मात्र येत नव्हतं.

एव्हाना ही बातमी वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरली गेली. प्रत्येक जण सतर्क झाला होता. पण ते मूल मात्र हाती लागत नव्हतं. डॉ. मठेही सातत्याने बातम्यांवर लक्ष ठेवून होते. त्यांना अतिशय वाईट वाटत होतं. ज्यांचा प्रत्यक्ष मुलगा होता, त्यांची काय स्थिती असेल याची जाणीव त्यांना होती व नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा उभा राहत होता.

या आठ दिवसांत डॉ. मठे सातत्याने डॉ. ज्योतींच्या संपर्कात होते. कामाचा व संशोधनाचा आढावा घेत होते. डॉ. ज्योती अहोरात्र झटत होत्या. किमान चेहरा समोर आला तर पोलिसांचं काम सोप होणार होतं.

दहाव्या दिवशी डॉ. मठे केबिनमध्ये बसले असतानाच, डॉ. ज्योती यादव व डॉ. पल्लवी यांनी समाधानाने प्रवेश केला. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत डॉ. मठे म्हणाले.
“डॉ. ज्योती, एनी गुड न्यूज?”
“एस सर! क्वाइट सक्सेसफुल. तुम्हांला पाहायचंय?” डॉ. ज्योती आत्मविश्वासानं म्हणाल्या.
“तुमचा चेहरा पाहूनच मी समजलो होतो मॅडम. मला पाहण्याची गरज नाही. आय एम कॉन्फिडंट. चला…” डॉ. मठे तत्काळ उठत म्हणाले.
“सर! कुठे?” डॉ. ज्योतींनी विचारले.
“तुमचा प्रयोग चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यातील सीनीअर
इन्स्पेक्टरांसमोरच करू या. आय एम शुअर, दे विल बी व्हेरी हॅपी.” डॉ.
मठे उठले होते.
“सर!.. पण आत्ता? या वेळी?” डॉ. पल्लवींनी विचारलं.
“होय, पल्लवी. आत्ताच. कारण वेळ घालवून चालणार नाही.
“पण सर, तुम्ही एकदा बघून तर घ्या.” डॉ. ज्योती म्हणाल्या.
“नको ज्योती मॅडम, माझा पूर्ण विश्वास आहे. जे काही आहे ते पोलीस ठाण्यातच दाखवा. मलाही तिथेच कळलेलं बरं.” डॉ. मठे केबिनबाहेर आले.”
“ठीक आहे सर!.. मी सर्व सामुग्री सोबत घेते.
डॉ. ज्योती व पल्लवी दोघीही प्रयोगशाळेत गेल्या आणि लॅपटॉपसोबतच काही युनिटस् घेऊन आल्या व म्हणाल्या,
“चला सर, निघू या ”
तिघंही डॉ. मठेंच्या कारमध्ये बसले. कार स्वत: डॉ. मठे ड्राइव्ह करीत होते. कार संगणक शास्त्र विभागाच्या बाहेर येऊन, मेन बिल्डिंगला वळसा घालून, हमरस्त्यावर आली. चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन विद्यापीठाच्या आवारातच होतं आणि त्याच परिघात औंध, बाणेर, बालेवाडी हद्द येत होती. कार वेगाने पळत होती. डॉ. पल्लवी
म्हणाल्या,
“सर, ज्योती मॅडम काल रात्रभर प्रयोग करीत
होत्या. त्यांनी क्षणभरही विसावा घेतलेला नाही.
परिणाम मिळाल्यानंतरच त्या क्षणभर विसावल्या
होत्या.
“मला माहीत आहे पल्लवी. शी इज
डेडिकेटेड सायंटिस्ट. म्हणूनच मी सरळ पोलीस
ठाण्यातच प्रयोगाची चाचणी घेत आहे.” डॉ.
मठेंनी प्रोत्साहन देत हात उंचावला होता.
त्याच वेळी कारने चतुःश्रुंगी पोलीस
स्टेशनच्या आवारात प्रवेश केला. कार पार्क
करताच तिघंही उतरले व सरळ सचिन लाटे,
सीनीअर इन्स्पेक्टर ही पाटी झळकत असलेल्या खोलीत शिरले.
प्रवेश करताच डॉ. मठे म्हणाले,
“सर, आत येऊ?”
सीनीअर इन्स्पेक्टर लाटेंनी पाहिलं. समोर तिघं जण उभे होते. ते सहजपणे म्हणाले,
“या ना! बसा”
इन्सपेक्टर लाटेंचं बोलणं लाघवी होतं. डॉ. मठे समोरच खुर्चीत बसून म्हणाले,
“सर, मी प्रा. विकास मठे. विभागप्रमुख, संगणकशास्त्र, पुणे-विद्यापीठ व ह्या माझ्या सहकारी डॉ. ज्योती यादव व डॉ. पल्लवी मांढरे.
दोघीही संगणक तज्ज्ञ आहेत. ”
“काही काम होतं का सर?” इन्सपेक्टर लाटे थोडेसे गोंधळले होते.
त्यांना नेमका अंदाज बांधता येत नव्हता.
“सर, तुम्ही गेली दहा दिवस बाणेरमधील एका अपहरण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहात. ”
“होय सर! आणि अजूनही करीत आहोत. पण अपहरणकर्त्याची
ओळखच पटत नाहीये. आमची सर्व पोलीस यंत्रणा त्यामागे आहे.
उपायुक्त, आयुक्त स्वतः लक्ष ठेवून आहेत. आपण काही त्या संदर्भात…
इन्सपेक्टर लाटे मध्येच बोलले.
“होय, इन्स्पेक्टर आम्ही त्या इसमाची ओळख दिली तर?”
“काय? ओळख? कशी काय सर? ” इन्सपेक्टर लाटे अविश्वासाने उत्तरले.
“होयऽ ह्या डॉ. ज्योती यादव. संगणक तज्ज्ञ आणि संशोधक. गेली ”
इन्सपेक्टर लाटे आश्चर्याने पाहत होते व चेहऱ्यावर अविश्वासही होता.
तो एका तरुणाचा चेहरा होता. डॉ. मठेही प्रथमच पाहत होते. पण इन्सपेक्टर लाटेंचा गोंधळ होत असलेला पाहून ते म्हणाले, “इन्स्पेक्टर ! तुमचा विश्वास बसत नाहीये का !”
“होय सर! मी माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेऊ का? दोनच मिनिटे” इन्सपेक्टर लाटेंनी लागलीच औंध, बाणेर व बालेवाडी इथल्या पोलीस चौकीत फोन करून, तिघाही पी. एस. आय. ना बोलावून घेतलं.
वीस मीनिटांतच ते तिघंही हजर झाले होते. आल्या आल्या इन्सपेक्टर लाटे म्हणाले, “माने, हा बघा अपहरणकर्त्याचा चेहरा…” लॅपटॉप स्क्रीनवर सर्वांनीच पाहिलं आणि आश्चर्यचकित झाले. पोलीस स्टेशनमधील इतरही स्टाफ तेथे आला होता. कारण, या प्रकरणात प्रत्येकाचाच हातभार लागत होता. काळजी वाटत होती. डॉ. मठे म्हणाले, “इन्सपेक्टर लाटे, तुमचा विश्वास बसत नसेल तर आपण क्षणात एक प्रयोग करून बघू या का?”
“चालेल सर ! सॉरी, पण कुणाला पकडण्याआधी शहानिशा केली पाहिजे.” इन्सपेक्टर लाटे ओशाळत म्हणाले.
“काहीच हरकत नाही. कुणीतरी एकाने हेल्मेट परिधान करा.” डॉ. मठेंनी आदेश देताच, स्वत: बाणेर पोलीस चौकीचे पी.एस.आय.
मानेंनी हेल्मेट परिधान केले आणि पल्लवीने फोटो घेतला. हेल्मेटमुळे मानेंचा चेहरा पूर्ण झाकला होता. तो फोटो पल्लवीने लॅपटॉपवर लोड करताच, डॉ. ज्योती कामाला लागल्या.
साधारण अर्धा तास त्या आज्ञावलीतील कोड- डिकोडिंग करीत होत्या.
त्यांची बोटं किबोर्डवर सफाईदारपणे फिरत होती आणि थोड्याच वेळात
मानेंचे फोटोतील हेल्मेट बाजूस होऊन, चेहरा स्वच्छ दिसू लागला.
सर्वच आश्चर्यचकित झाले होते. इन्सपेक्टर लाटे तत्काळ उठले.
“माने, कदम, मोरे तुम्ही लागलीच कामाला लागा. अपहरणकर्त्याचा फोटो तुमच्या सोबत आहे. पोलिसांचे जाळे आधीच विणले आहे.
त्यांच्यापर्यंत हा फोटो पोहोचवा आणि येत्या तासाभरात मला तो मुलगा सुरक्षित व अपहरणकर्ता या पोलीस स्टेशनात हवा. गोऽऽ”
माने, मोरे, कदम तत्काळ बाहेर पडले. सर्व सहकाऱ्यांना त्यांनी त्या इसमाचा फोटो पाठवून दिला. आता मात्र सूत्रं वेगाने फिरू लागली होती.
पोलीस गाड्या पळू लागल्या होत्या.
एका लेडी कॉन्स्टेबलला बोलावून घेत इन्सपेक्टर लाटे म्हणाले, “सुरेखा! त्या डॉक्टर दांपत्यालाही बोलावून घ्या.”
“जी साहेब! लागलीच बोलावते.
इन्सपेक्टर लाटे, डॉ. मठेकडे पाहत म्हणाले,
“सॉरी सर, मी प्रथम अविश्वास दाखवला. पण हे संशोधन खरंच विलक्षण आहे.”
“याचं श्रेय आमच्या ज्योती मॅडमचं आहे इन्स्पेक्टर आणि पल्लवीचंही. त्यांनीच खरं तर हा शोध घेतला.” डॉ. मठे म्हणाले.
“नाही सर, खरी दिशा तुम्हीच दिली. त्यामुळेच हे शक्य झाले.
कुणीतरी तुमच्यावर विश्वासही दाखवायला हवा. मग हुरूप येतो.” डॉ.
ज्योती ओशाळत म्हणाल्या. ”
तेवढ्यात डॉक्टर दांपत्यही हजर झाले होते. समोर चौघे पाहून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मुलाची आई अधीरतेने म्हणाली,
“सापडला का हो माझा सोनू? ” त्यांचा आवाज कातर झाला होता ”
आणि डोळ्यांत अश्रू तरळत होते. इन्सपेक्टर लाटे म्हणाले, ”
“डॉक्टर, आधी तुम्ही बसा. शांत व्हा. तुमचा सोनू काही वेळातच तुमच्या पुढ्यात असेल. काळजी करू नका. पाणी घ्या.
“काय म्हणताय इन्स्पेक्टर. थोड्या वेळात? म्हणजे तुम्हांला…” डॉक्टर शिरगेंचं वाक्य अर्धवट तोडीत इन्सपेक्टर लाटे म्हणाले, “होय डॉक्टर शिरगे, तो चेहरा आम्हांला मिळालाय आणि त्याला कारणीभूत हे तिघेही आहेत. हे डॉ. मठे, संगणक विभाग प्रमुख आणि डॉ. ज्योती यादव व डॉ. पल्लवी मांढरे, संगणक तज्ज्ञ व शास्त्रज्ञ यांनीच संशोधनातून आज्ञावली विकसित करून, तो चेहरा हुडकून काढला आणि जगासमोर आणला.
“तुम्ही ओळखता हा चेहरा…?”
“सर, मी बघू शकतो?” डॉ. शिरगे
“का नाही? मी दाखवते.” डॉ. ज्योतींनी लागलीच लॅपटॉपवर त्या अपहरणकर्त्याचा चेहरा दाखवला.
आणि डॉ. शिरगे व डॉ. मिनल शिरगेंच्या मनात कसली तरी
चलबिचल झाली. चेहरा कुठं तरी पाहिल्याचं जाणवत होतं. पण आठवत नव्हतं. डॉ. लाटे म्हणाले,
“ओळखत नाही सर, पण कुठे तरी संदर्भ लागतोय. अगदी पुसटसा असा. पण आठवत नाही. परंतु याने असं का केलं असावं?” डॉ. शिरगे स्वत:शीच बोलले.
“काहीही असो माझा सोनू सुखरूप असावा.” डॉ. मिनल शिरगे उत्तरल्या.
इन्सपेक्टर लाटे व डॉ. मठेंनी धीर दिला होता. इन्सपेक्टर लाटे थोडे चुळबुळले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि डॉ. ज्योतींकडे पाहत विचारलं,
“मॅडम, एक विचारू?”
“विचारा ना!”
“मीही शास्त्राचाच पदवीधर आहे. हे चेहरा शोधून काढण्याचं काम तुम्ही नेमकं कसं केलं?” इन्सपेक्टर लाटेंनी मनातला प्रश्न विचारला.
त्यावर डॉ. ज्योती नुसत्याच हसल्या आणि म्हणाल्या,
“यावर मी सविस्तर कधी तरी बोलेनच. पण आता थोडक्यात सांगते.


यामागे मोठं संशोधन असून, मुख्यतः गणित, संख्याशास्त्र यासोबतच, संगणकशास्त्रातील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग व डेटा माइनिंग यांचा हा अविष्कार आहे, असं मला वाटतं. यात मशीन व डीप लर्निंगचा मोठा सहभाग आहे.
“ज्योती मॅडम थोडं त्यांना स्पष्ट करून सांगा ना…” डॉ. मठेंनी सांगितलं.
“थोडं स्पष्टच सांगायचं झाल्यास, असं काही चित्र आमच्या डोळ्यांपुढे आलं की त्याच्या पलीकडे आम्हांला शोध घ्यायचाय. त्यामध्ये प्रामुख्याने फजीलॉजिकचा उपयोग करून, एक ऑल्गॉरिदम तयार केला जातो,
ज्यामध्ये अतिशय सूक्ष्म असे पिको आकाराचे पिक्सेल तयार करून, प्रतिमा पृथक्करणासाठी आज्ञावली तयार केली. मग मशीन लर्निंग व डीप लर्निंग यांच्या संयुक्त उपयोगाने दहा-पंधरा थरापर्यंत हे पिक्सेल नेत; आवरण काढून मानवी चेहऱ्याची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न केला.
याला चेहरा ओळख असंही म्हणतात किंवा फेस रेकग्निशन व पॅटर्न रेकग्निशनही म्हणतात. तुम्ही जेव्हा अपहरणकर्त्याचं चित्र दिलं, तेव्हा अंधारात चेहरा शोधण्यासारखंच होतं. पण मी व पल्लवीने ऑलगॉरिदम विकसित करून, नवीन आज्ञावली व कोडही तयार केले. त्याचाच उपयोग केला आणि तुमच्यासमोर त्याचे परिणाम आज आहेत.” डॉ. ज्योती संक्षिप्त बोलून थांबल्या होत्या.
डॉ. मठे व डॉ. पल्लवी कौतुकाने डॉ. ज्योतीकडे बघत होते. डॉ.
मठेंना दोघींचाही सार्थ अभिमान वाटत होता. इन्सपेक्टर लाटे म्हणाले, “खरंच! मॅडम, तुमच संशोधन आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
चेहऱ्यावर बुरखा घालून गुन्हे करणाऱ्यांसाठी हे संशोधन निश्चितच कर्दनकाळ ठरणार आहे. विज्ञान खरंच अपराजित आहे.”
इन्सपेक्टर लाटेंच्या बोलण्यानं तिघेही हेलावले होते. डॉक्टर दांपत्यही कृत्य झालं होतं. फक्त ते त्यांचं लेकरू सापडण्याची वाट पाहत होते.
तेवढ्यात बाहेर चारपाच जीप येऊन थांबल्या होत्या. सायंकाळचे पाच वाजून गेले होते. पटापटा माने, मोरे, कदम त्यातून उतरले. इतर पोलीसही उतरले. सोबत एक तरुण युवक व युवती होते, मलूल चेहरा केलेले. मानेंच्या कडेवर चार वर्षांचा मुलगा होता. तोच सोनू होता.
इन्सपेक्टर लाटेंच्या केबिनमध्ये प्रवेश करताच सोनूने आर्त हाक मारली, “आई ऽऽ”
आसुसलेले शब्द कानी पडताच, डॉ. मिनल सोनूकडे झेपावली व त्यास कवेत घेऊन पटापटा मुके घेऊ लागली. डॉ. शिरगेही भावनावश होऊन, सोनूच्या केसातून हात फिरवीत होते. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू होते. उपस्थित सर्वच हेलावले.
पोलिसांनी सोनूला लागलीच खायला दिलं. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. सोनू सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येकानेच निःश्वास सोडला होता. बाळ सुखरूप आहे एवढंच हवं होतं.

तो इसम व त्याची पत्नी खाली मान घालून उभे होते. त्यांचा चेहरा निर्विकार होता. त्यात कुठल्याही अपराधीपणाची भावना नव्हती. डॉ.
मिनल आवेगाने त्या इसमाकडे गेल्या व अगतिकतेने म्हणाल्या, “ का केलं तुम्ही हे कृत्य? … एका बाळाला त्याच्या आईपासून दूर नेताना तुम्हांला काहीच वाटलं नाही का? कोण आहात तुम्ही? आणि का?
का? आमचाच मुलगा?” डॉ. मिनलचा बांध सुटला होता.
डॉ. मठे, डॉ. ज्योती, डॉ. पल्लवी व इतर पाहतच होते. इन्सपेक्टर लाटे म्हणाले,
” हे बघा मिस्टर, तुम्ही कुणीही असाल. तुमच्या कृत्याची शिक्षा तुम्हांला होईलच; पण का केलं तुम्ही हे? कशासाठी?”
त्या युवकाने प्रथमच सर्वांकडे पाहिलं. त्याचा चेहरा व्याकूळ झाला होता. तो रुद्ध आवाजात म्हणाला, “मी हे कृत्य केलं मी मान्य करतो. पण ते का केलं, हे डॉ. शिरगेंच्या कदाचित लक्षातही नसेल. कारण, त्यांच्यासारख्या श्रीमंतांच्या लेखी या घटना अतिशय किरकोळ असतात. हे डॉक्टर दांपत्य… लहान मुलांचं ह्यांचं मोठं हॉस्पिटल आहे. म्हणून कदाचित भावनाही शून्य असतील.
साधारण महिन्यांपूर्वी माझं एक वर्षाचं लेकरू गंभीर आजारी होतं. डॉ.
शिरगेंकडे मी अपेक्षेने आणलं. त्याला तातडीची उपचार व शस्त्रक्रियेची गरज होती. पण डॉ. शिरगे व त्यांची पत्नी मिनल पैशाअभावी अडून बसले. पैसे भरल्याशिवाय उपचार होणार नाहीत, असं त्यांनी सांगीतलं.
मी व माझ्या पत्नीनं खूप विनवण्या केल्या. पण शेवटी त्यांनी सुरक्षारक्षकांच्या साहाय्याने आम्हांला हाकलून दिलं. मी हवालदिल झालो होतो. माणुसकी मरताना मी पाहत होतो. शेवटी व्हायचं तेच झालं.
दुसऱ्या हॉस्पिटलला नेईपर्यंत माझं बाळ गेलं होतं. माझी पत्नी सैरभैर झाली. कारण, ती स्वत: कधीही पुढे आई होणार नाही, हे आम्हांला माहीत होतं. आणि जे पदरात होतं तेही हिरावून नेलं होतं. आम्ही दोघेही भ्रमिष्ट झालो होतो. एक सांगतो, हे फक्त आम्ही डॉक्टरांना जाणीव करून देण्यासाठी केलं. सोनू बाळाला माझ्या पत्नीने जिवापलीकडे जपलं. तिला हे पटत नव्हतं. आम्ही आज सरेंडर होणारच होतो. पण तेवढ्यात माझा चेहरा झळकू लागला आणि पोलीसच दारात येऊन ठेपले….” पुढे तो युवक बोलूच शकला नव्हता. त्याचे डोळे भरून आले होते.
उपस्थित सगळेच हवालदिल झाले. समोरचं सगळंच हृदयद्रावक होतं. डॉ. मठे, डॉ. ज्योती, पल्लवी दिङ्मूढ झाले. डॉ. शिरगेंच्या व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांत आता अपराधीपणाची भावना होती. त्यांना आता आठवलं होतं. म्हणूनच त्यांना चेहरा परिचित वाटत होता. तो युवक डॉ. शिरगेंच्या पुढ्यात आला व म्हणाला,”डॉक्टर तुम्ही खूप मोठे आहात. स्वत:चं जातं तेव्हा काय होतं, हेच मला दाखवायचं होतं. कृपया, या पुढे कुणाच्या जिवाशी खेळू नका.’ आणि पुढे इन्सपेक्टर लाटेसमोर हात जोडत म्हणाले, “सर! मी काही झालं तरी गुन्हा केला आहे. मला हवी ती शिक्षा दिली तरी मला मान्य आहे.” दोघंही हात जोडून उभे होते. इन्सपेक्टर लाटे क्षणभर स्तब्ध झाले. तेथे शांतता पसरली. तो युवक, डॉ. ज्योती व डॉ. मठेंकडे आला व म्हणाला, “मॅडम, विज्ञानाच्या साहाय्याने तुम्ही माझा चेहरा तर जगासमोर आणलात, पण त्याच विज्ञानाने व माणुसकीहीन वागणुकीने माझा मुलगा हिरावून नेला. माझ्या पत्नीला पोरकं केलं. तुमचं संशोधन, विज्ञान माझं बाळ परत देऊ शकेल? माझ्या पत्नीला आई बनवू शकेल?”

डॉ. ज्योती सुन्न झाल्या होत्या. संशोधनाचा आनंद कुठल्या कुठं गेला होता. त्यांच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते. त्या काहीच बोलू शकल्या नाही. विज्ञानानेही वास्तविकता नाकारली होती. पल्लवीचेही डोळे ओलावले होते. डॉ. मठेही हा परिणाम बघतच राहिले होते. पोलिसांच्या पाठोपाठ तो युवक व युवती जाऊ लागले. तेवढ्यात सोनू बाळ डॉ. मिनलच्या कडेवरून उतरले आणि आर्त हाक मारली,

“काका ऽऽ”
आणि युवक-युवतीकडे झेपावले. ती युवती सोनूला कुशीत घेऊन पटापट मुके घेऊ लागली. या आठ दिवसांत दोघांनीही सोनूला भरभरून प्रेम दिलं होतं.

हा प्रसंग पाहून सर्वच अस्वस्थ झाले. इन्सपेक्टर लाटेंनी डोक्यावरची कॅप काढून टेबलावर ठेवली. समोर नेमकं कोण होतं? गुन्हेगार की असाह्य बाप? कुणाला काहीही सिद्ध करायची गरज आता उरली नव्हती.

सोनूचं अपहरण केलं म्हणून तो युवक गुन्हेगार होता? की ज्यांच्यामुळे त्या युवकाचं बाळ मरण पावलं ते डॉ. शिरगे गुन्हेगार होते? पण कायद्याच्या दृष्टीने त्या युवकाला शिक्षा होती, पण डॉ. शिरगेंना शिक्षाच नव्हती.

तो युवक व युवती दोघंही बाहेर पडले. त्यांच्या आजूबाजूला पोलीस होते. डॉ. मठे, डॉ. ज्योती,
डॉ. पल्लवी व इन्सपेक्टर लाटे त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अपराधीपणे बघतच
राहिले…

-संजय ढोले
भौतिकशास्त्र प्राध्यापक
sanjay@physics.unipune.ac.in

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..