MENU
नवीन लेखन...

ममींमागचे चेहरे

इजिप्तमधल्या पुरातन राजवटींतील प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक व्यक्तींचे अवशेष आज ममींच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या ममींचे मूळ चेहरे कसे दिसत असावेत, हा सामान्यांपासून ते संशोधकांपर्यंत, सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे. या ममींचं पूर्ण शरीर उपलब्ध असलं तरी, ते कुजू नयेत म्हणून ममीत रूपांतर करताना, त्यांच्या शरीरातील पाणी काढून टाकलं जायचं. परिणामी या सगळ्या ममी अत्यंत शुष्क स्वरूपात आढळतात. या शुष्क स्वरूपावरून त्यांच्या मूळ चेहऱ्याची कल्पना येणं, हे जवळपास अशक्य आहे. तरीही त्यांच्या कवटी व संबंधित अवशेषांवरून, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण शोधण्याचा प्रयत्न संशोधकांकडून केला गेला आहे. परंतु, चेहरेपट्टी शोधण्याच्या या पद्धतीवर मर्यादा आहेत. या पद्धतीवरून ममीच्या मूळ चेहऱ्याच्या ठेवणीचा अंदाज आला तरी, त्या व्यक्तीच्या त्वचेचा, केसांचा आणि डोळ्यांचा वर्ण कोणता होता, त्याच्या केसांचं वळण कसं होतं, अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. आता मात्र आधुनिक वैज्ञानिक पद्धतींद्वारे, या ममींमागच्या चेहऱ्यांची माहिती मिळवणं शक्य झालं आहे. कारण, या अवशेषांतही त्यांच्या मूळ स्वरूपाची माहिती टिकवून ठेवणारे घटक अस्तित्वात असतात. आजच्या वैज्ञानिक पद्धती या घटकांचं विश्लेषण करू शकतात. हे घटक म्हणजे या व्यक्तींचे जनुक!

माणसाची शरीरयष्टी, चेहरेपट्टी, तसंच त्याचे इतर अनेक गुणधर्म हे, त्याच्या पेशींतील डीएनएच्या रेणूंतील जनुकांच्या रचनेवरून ठरतात. व्यक्ती-व्यक्तीनुसार प्रत्येकाची जनुकीय रचना वेगवेगळी असते. जर मानवी अवशेषांतून डीएनएचे रेणू वेगळे केले आणि त्यातील जनुकीय रचनेतील विशिष्ट भाग ओळखता आला, तर त्याच्या स्वरूपावरून माणसाची शारीरिक वैशिष्ट्यं कळू शकतात. पुरातन ममींच्या बाबतीतही हे करणं शक्य असल्याचं, अमेरिकेतील ‘पॅरॅबोन नॅनोलॅब्ज’ या प्रयोगशाळेतील जॅनेट कॅडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच दाखवून दिलं आहे. या संशोधकांनी, दोन हजारांहून अधिक वर्षांपूर्वीच्या ममींच्या अवशेषांतील जनुकांचं अतिशय चिकटीनं विश्लेषण करून, त्यापासून या ममींमागचे चेहरे शोधून काढले आहेत. जॅनेट कॅडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, आपलं हे संशोधन अमेरिकेतील ओर्‌लँडो येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल सिम्पोझियम ऑन ह्यूमन आयडेंटिफिकेशन’ या परिषदेत सादर केलं आहे.

हे संशोधन ज्या ममींवर केलं गेलं, त्या ममी इजिप्तमधील कायरोच्या दक्षिणेकडील अबुसिर-एल-मेलेक या पुरातन काळच्या शहरातल्या आहेत. यातील दोन ममी सुमारे पावणेतीन हजार वर्षांपूर्वीच्या असून, एक ममी दोन हजार वर्षांपूर्वीची आहे. या तीन ममींपैकी दोन जुन्या ममी या टॉलेमी या ग्रीकांच्या राजवटीपूर्वीच्या काळातल्या आहेत, तर तिसरी ममी ही टॉलेमींच्या काळातली आहे. या ममी ज्या व्यक्तींच्या आहेत, त्या तीनही व्यक्ती तरूणपणीच मृत्यू पावल्या होत्या. मृत्यूसमयी त्या तिघांची वयं पंचवीसच्या आसपास असल्याचं, त्यांच्या हाडांच्या रचनेवरून दिसून येतं. या ममींच्या अवशेषांतील डीएनएची रचना ’मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन हिस्टरी’ या, जर्मनीतील ट्यूबिंगेन इथल्या संस्थेतील संशोधकांनी २०१७ साली शोधून काढली होती. त्या संशोधनाचा एक उद्देश, या इजिप्शिअन माणसांचं कूळ शोधणं, हा होता. याच डीएनएच्या रचनांचा जॅनेट कॅडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात उपयोग केला.

या ममींचे मूळ चेहरे रेखाटायचे तर, त्यांच्या डीएनए रेणूंच्या गुंतागुंतीच्या रचनेतून, त्यातील विशिष्ट जनुकीय घटकांचा शोध घेणं हे गरजेचं होतं. या पुरातन काळातील डीएनए रेणूंची अवस्था चांगली नसल्यानं, प्रचलित पद्धतीनुसार केल्या गेलेल्या विश्लेषणावरून, या ममींचा मूळ चेहरा ओळखण्याच्या दृष्टीनं योग्य माहिती मिळू शकत नव्हती. त्यामुळे जॅनेट कॅडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, गणिताची जोड देऊन विश्वासार्हता वाढवलेल्या, जनुकीय विश्लेषणाच्या एका विशेष पद्धतीचा वापर करून पाहिला आणि त्यात त्यांना यश आलं. या पद्धतीच्या वापराद्वारे, डीएनएच्या रेणूंतून चेहऱ्यांचं वैशिष्ट्य सांगणाऱ्या काही जनुकीय रचना या संशोधकांना मिळू शकल्या.

त्यानंतर, जनुक व शारीरिक वैशिष्ट्यं यांची सागंड घालणाऱ्या एका विशिष्ट संगणकीय प्रणालीच्या साहाय्यानं त्यांना या व्यक्तींचं कूळ, त्यांचा वर्ण, चेहऱ्यांची ठेवण, ही माहिती मिळाली. परंतु इतकं करूनही, त्यांना या वाईट अवस्थेतील रेणूंतून डोळ्यांचा व केसांचा वर्ण ओळखता येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जनुकीय रचना काही सापडू शकल्या नाहीत. मात्र, या संशोधकांना या तिघांची कुळं कळली होती. त्यामुळे त्या कुळांवरून या व्यक्तींच्या डोळ्यांचा आणि केसांचा वर्ण शोधून काढणं, या संशोधकांना शक्य झालं. या सर्व माहितीची, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्यातील माहितीशी तुलना करून या संशोधकांनी, ममींच्या मूळ चेहऱ्यांचे बारकावे नक्की केले. त्यानंतर या बारकाव्यांवरून, त्यांनी या तीनही व्यक्तींच्या मूळ चेहऱ्यांची संगणकतज्ज्ञ चित्रकाराकडून रेखाटणी करून घेतली. त्याचबरोबर या ममींच्या डोक्यांचा प्रत्यक्ष आकार व स्वरूप लक्षात घेऊन, या तीनही व्यक्तींच्या चेहऱ्याला त्रिमितीय रूपही दिल्यावर या ममींमागचे चेहरे त्यावरील तपशीलांसह स्पष्ट झाले!

दोन ते तीन हजार वर्षांदरम्यानच्या या तीनही इजिप्शिअन व्यक्तींचा वर्ण फिकट तपकिरी असल्याचं व त्यांचे डोळे गडद तपकिरी असल्याचं, या रेखाटनांवरून दिसून येतं. या तिघांच्याही चेहऱ्यावर बिलकूल सुरकुत्या नव्हत्या. या तीनही व्यक्तींच्या चेहऱ्यांची वैशिष्ट्यं, आजच्या इजिप्शिअन माणसांपेक्षाही भूमध्य सागराच्या आसपास किंवा मध्य-पूर्वेत राहणाऱ्या आजच्या माणसांशी जवळचं नातं सांगत होती. हे निष्कर्ष सन २०१७मध्ये, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन हिस्टरी या संस्थेतील संशोधकांनी केलेल्या या व्यक्तींबद्दलच्या तर्काशी जुळणारे आहेत. किंबहुना, जॅनेट कॅडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या तपशीलवार चेहरेपट्ट्यांमुळे, २०१७ सालचं संशोधन आणखी पुढं गेलं आहे. जरी बाहेरील वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी इजिप्तवर अनेकदा राज्य केलं असलं तरी, या सर्व संशोधनावरून एक गोष्ट स्पष्ट होते… आजच्या इजिप्शियन लोकांत सहाराच्या दक्षिणेकडील प्रदेशातील वंशांचं मिश्रण दिसतं. मात्र सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत तरी, इजिप्शियन लोकांत अशा प्रकारची वांशिक सरमिसळ फारशी झालेली नव्हती.

जनुकीय अवशेषांवरून चेहरेपट्टी ओळखणं, हे नवं नाही. अशा प्रकारचा प्रयत्न गुन्हे उलगडण्यासाठी केला जातो. परंतु, यासाठी ज्या अवशेषांवरून संबंधित व्यक्तीच्या चेहरेपट्टीचा वेध घेतला जातो, ते अवशेष अलीकडच्या काळातले असतात. हजारो वर्षं जुन्या अवशेषांवरून, जनुकीय विश्लेषणाद्वारे चेहरेपट्टी ओळखल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. पुरातन काळातल्या अवशेषांपासून चेहरेपट्टीचा अंदाज बांधण्यात बऱ्याच अडचणी येऊ शकतात. कारण या अवशेषांतील डीएनएच्या मूळ रेणूंत विविध कारणांमुळे बदल घडून आलेले असतात. ममीच्या थडग्यातल्या उष्ण तापमानाचा, तसंच तिथल्या आर्द्रतेचा डीएनएच्या रेणूंवर परिणाम होतो. ममी बनवण्यासाठी वापरलेली रसायनंसुद्धा या अवशेषांच्या डीएनए रेणूंत बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे इतक्या जुन्या अवशेषांवरून चेहरेपट्टी रेखाटणं, शक्य नसल्याचं या क्षेत्रांतील तज्ज्ञांचं मत होतं.

जॅनेट कॅडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र या सर्व अडचणींवर मात करून, दोन हजार वर्षांपेक्षाही पूर्वीच्या काळातील अवशेषांवरून, त्या-त्या व्यक्तीची मूळ चेहरेपट्टी तपशीलवार रेखाटली आहे. या संशोधकांनी आपल्या विश्लेषणात वापरलेले नमुने म्हणजे डीएनएचे अत्यंत जीर्ण तुकडे होते. या जीर्ण तुकड्यांवरूनसुद्धा भूतकाळात डोकावता येत असल्याचं, या संशोधनावरून दिसून आलं आहे. मात्र जॅनेट कॅडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनाचं महत्त्व फक्त इतिहासापुरतं मर्यादित राहणार नसून, हे संशोधन मानवी संस्कृतीच्या तसंच मानववंशशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीनंही महत्त्वाचं ठरणार आहे.

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य:Parabon NanoLabs.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..