चित्रपटांमध्ये कुणीतरी डॉ. नो,, सिंकारा, डाँग किंवा कोणतातरी ‘पुरी’ आपल्याजवळ वैज्ञानिकांची फौज बाळगतो आणि आपल्याला हवे असणारे रसायन, अस्त्र किंवा बॉम्ब तयार करवून घेतो. काही गोष्टी खऱ्या वाटत नाहीत, परंतु असे दृश्य खरे असावे यावर विश्वास ‘लायंसेंको’ प्रकरणावरून बसतो. या प्रकरणामुळे खोटे संशोधन, सत्ताधाऱ्यांचा स्वार्थ, शास्त्रज्ञांच्या हत्या आणि हे सर्व ज्याच्यामुळे घडून आले, त्या तथाकथित शास्त्रज्ञाची आत्महत्या इतके सर्व जगासमोर आले. लायसेंको या स्टॅलिनच्या काळामध्ये उदयाला आलेल्या संशोधकाने गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ करणारे संशोधन जाहीर केले. चांगली पैदास होण्यासाठी गव्हाचे बियाणे कडक थंडीत ठेवतात. त्याऐवजी ते अगोदर उबदार पाण्यात ठेवून त्याला मोड आल्यावर बर्फात ठेवून गार करावे असे सुचवले. बर्फ वितळल्यानंतर असे बी जमिनीत पेरता येते. रोपांना वाढायला जास्त काळ मिळतो किंवा वाढण्यास कमी काळ पुरल्यामुळे पुढच्या थंडीचा फटका बसण्याअगोदर धान्य तयार होते. एरवी परिपक्व होण्याकरिता जास्त काळ घेणारा गहू वारंवार वापरून भरघीस पीक मिळते, असा लायसेंकोचा दावा होता. या प्रक्रियेला लायसेंकोने नाव दिले व्हर्नलायझेशन. स्टॅलिनच्या पाठिंब्यामुळे लायसेंकोचा उदो उदो झाला.
लायसेंकोला विरोध करणाऱ्या व्हाव्हिलोव्ह या वरिष्ठ शास्त्रज्ञाचा मृत्यू एका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये झाला. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला ब्रिटिशांसाठी हेरगिरी केल्याचा. १९३२ ते १९४२ या काळात व्हॉव्हिलोव्हला पाठिंबा देणाऱ्या शास्त्रज्ञांना ठार करण्यात आले.अखेरीस लायसेंकोची चलाखी लक्षात आली आणि तो एका छोट्याशा शेती केंद्रात काम करू लागला.
लायसेंको ज्या जाती वापरत होता त्या शुद्ध नसून अनेक जातींचे मिश्रण होते. त्याचा मुख्य दावा म्हणजे संस्कारातून हवे तसे गुणबदल घडवून आणले, की तो गुणबदल पिढ्यान्पिढ्या कायम टिकतो. इतर तज्ज्ञ सांगत होते, की ठाकून ठोकून गळ्यात उतरवलेले गुण पुढच्या पिढीत जात नाहीत. रंगसूत्रात योग्य बदल होण्याकरिता संकरित जीव घडवावे लागतात. अमेरिकेने तसे केल्यामुळे तिथे मक्याचे उत्पादन वाढले. लायसेंकोची आकडेवारी बनावट निघाली. त्याच्या प्रक्रियांमुळे उत्पादन वाढलेच नव्हते.
-जयंत एरंडे
Leave a Reply