सयाजी शिंदे यांचा जन्म १३ जानेवारी १९५९ रोजी सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या गावी झाला.
अतिशय ताकदीचा अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांची ओळख आहे. मराठी, तामिळ , मल्याळम , बॉलीवूड, तेलगू अशा अनेक भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. तामिळ भाषा अवगत नसतानाही तामिळ चित्रपटातील भूमिकेमुळे तामिळनाडूचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांनी मिळवला होता. बहुतांश चित्रपटांत त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांतील त्यांच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.
सातारा तालुक्यातील वेळे (कामथी) या खेड्यात सयाजी शिंदे यांचे बालपण गेले. घरात कलावंतांची कोणतीही पार्श्वभूमी नाही. साधे शेतकरी कुटुंब असलेल्या सयाजीला तेव्हा कोणी तू अभिनेता होणार आहेस असं सांगितलं असतं, तर त्यालाच काय कुणालाच पटलं नसते.
पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. सातारा येथेच आपले बीए, डीएड पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पैशाअभावी शिक्षणाबरोबरच रात्री पाटबंधारे खात्यात वॉचमनची नोकरी स्वीकारली. साताऱ्याला महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना, अभिनव कलामंदिर आणि लोकरंगमंच या दोन नाट्य संस्थांशी त्यांचा संपर्क आला आणि मग विविध एकांकिका आणि नाटकांची सुरवात झाली. काम करणं, त्याचबरोबर चांगली नाटक पाहणं आणि त्याच्यावर चर्चा करणं हे काम सुरू झालं, त्या काळात सयाजी नाटकाने इतके झपाटलेले होते की परिस्थिती नसतानाही ते आणि त्यांचे काही मित्र पुण्याला नाट्यस्पर्धा बघायला जात असत. नाटकातील जास्तीत जास्त आपल्याला समजावे यासाठी सयाजीचा अट्टहास होता.
त्यानंतर सयाजी पुण्याला आला आणि मग नवी सुरवात झाली. शिक्षणानंतर नाटकात काम करण्याची इच्छा होती त्यामुळे साहजिकच मुंबईच्या दिशेने पावले निघाली व १७ वर्षे एका को-ऑपरेटीव्ह बँकेत काम केले. बँकेत काम करताना शौक म्हणून नाटकांत काम केले. मुंबईत त्यांना झुलवा हे नाटक मिळाले. “झुलवातील तृतीयपंथीयाची भूमिका त्यांनी मनापासून केली. ही भूमिका त्यांच्या “दरमियाँ” चा पाया होती. कल्पना लाजमीने है नाटक पाहूनच या चित्रपटात त्यांना ऑफर दिली होती. “दरमियाँ हा चित्रपट समांतर चित्रपटांपैकी होता. “दरमियाँ’ चित्रपटानंतर सयाजी शिंदे यांनी तुंबारा’ हे नाटक स्वतः केले. त्याचे काही प्रयोगही झाले. या नाटकाची खूप स्तुती झाली. सयाजी यांनी त्यानंतर “आमच्या या घरात, “शोभायात्रा आणि काही मालिका केल्या. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मराठी नाटकात काम केले. त्यांचा १९९५ साली आलेला आई हा पहिला मराठी सिनेमा होता. १९९९ मध्ये आलेल्या शूल चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या सिनेमात त्यांनी बिहारी माफियाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेमुळे फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलन अवॉर्डहि मिळाला.
त्यानंतर सयाजी शिंदे यांना खऱ्या अर्थे नाव आणि ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा याच्या “शूल’ या चित्रपटातील बच्चू यादवच्या भूमिकेमुळे. बिहारमधील हे पात्र सयाजी शिंदे यांनी इतक्या चांगल्यारीतीने वठवले, की देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मग त्यांच्याकडे हिंदी चित्रपट निर्मात्यांची निमंत्रणे सुरू झाली. त्यानंतर सयाजी शिंदे यांना दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतून बोलावणी येऊ लागली. तमिळनाडूमधील प्रसिद्ध कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जीवनावरील चित्रपटात त्यांना भारती यांची भूमिका करायची संधी मिळाली. या एका भूमिकेने त्यांना पूर्ण तमिळनाडूत आदराचे स्थान प्राप्त झाले. आज त्यांच्या नावावर २५ हून अधिक तमिळ चित्रपट आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी ‘ या चित्रपटाची निर्मिती आणि ‘ डँबीस ‘ या चित्रपटाची सहनिर्मिती केली. सयाजी शिंदे यांनी कधीच शॉर्ट फिल्ममध्ये काम केले नाही. परंतु शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची त्यांना इच्छा आहे. यांचे कारण कमी वेळेत चांगले संदेश देण्याचा या फिल्म योग्य मार्ग आहेत.
सयाजी शिंदे गेल्या तीन वर्षांपासून वृक्षारोपणाची चळवळ राबवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला हिरवं बनवण्याचा संकल्पही त्यांनी हाती घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक दुष्काळी गावांमध्ये वृक्षारोपणाची कामे हाती घेतली आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply