मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांचा जन्म १० एप्रिल १९०७ रोजी झाला.
वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी जवळ काही पैसे नसताना स्वतःचे साप्ताहिक काढले. त्यांची तुतारी ,मी वसुंधरा , चित्र , आशा ही त्यांची गाजलेली साप्ताहिके. त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होती. संपादक या नात्याने वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर लिहिणे, व्यवस्थापक म्हणून जाहिराती मिळवणे, साप्ताहिकाचा प्रसार करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधणे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रत्येक अंकात काहीतरी नवीन देता येईल म्ह्णून धडपड करत. बातम्या मिळविण्यासाठी नाटक कंपन्यांमधून फेरफटका मारत असल्याने रांगणेकरांनी झालेल्या ओळखींचा उपयोग करून त्यांनी ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली.
१९४० साली पहिले नाटक लिहिले त्याचे नाव ‘आशीर्वाद’. आशीर्वाद, कुलवधू, नंदनवन, अलंकार, माझे घर, वहिनी, एक होता म्हातारा, कोणे एके काळी, मोहर इ. नाटके रांगणेकरांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. याखेरीज ‘भटाला दिली ओसरी’ हे विनोदी नाटक तसेच ‘ सीमोल्लंघन ’ आणि ‘ कलंकशोभा ’ या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या . ‘औटघटकेचा राजा’ या चित्रपटाची कथा लिहिली. ‘ सुवर्णमंदिर’ हा संगीत बोलपट तयार केला. ग्रामोफोन रेकॊर्ड्सच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. ते उत्तम चित्रकारही होते. चित्रकार हळदणकरांकडे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले होते. वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी चित्ता फाइट म्हणून काढलेले चित्र पूर्वीच्या काळी काडेपेटीवर येत असे.
१९६०-६१ च्या सुमारास ‘नाट्य – निकेतन‘ची परिस्थिती अडचणीची झाली॰ १९५६ साली रांगणेकरांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘भटाला दिली ओसरी‘ या नाटकाने चांगली लोकप्रियता मिळवली॰ पण त्यानंतर आलेल्या ‘ धाकटी आई‘, ‘ भाग्योदय‘, ‘ अमृत‘, ‘ भूमिकन्या सीता ‘ , ‘ पठ्ठे बापूराव ‘, ‘ हिरकणी ‘ ही सर्वच नाटके कमी अधिक प्रमाणात अयशस्वीच झाली आणि ‘नाट्य निकेतन‘ला कर्ज झाले प्रभाकर पणशीकर, रांगणेकर आणि आ॰ अत्रे यांचे परमभक्त आणि हुकमी प्रकाशक ग॰ पां॰ परचुरे या सर्वांनी आ॰ अत्रे यांना नवीन नाटक लिहावे म्हणून गळ घातली॰ खरं तर अत्र्यांनी त्यांचं ‘कवडी चुंबक‘ हे नाटक लिहून १४ वर्षे झाली होती॰ पण रांगणेकरांनी बसवलेला ‘ भटाला… ‘चा सुविहित प्रयोग बघून आणि या तिघांचा आग्रह पाहून अत्र्यांनी नवं नाटक लिहून ते रांगणेकरांना द्यायचं कबूल केलं. आचार्य अत्रे यांनी ते नाटक लिहिले आणि त्या नाटकाचे दिग्दर्शन केले मो.ग. रांगणेकर यांनी , ते नाटक होते ‘ तो मी नव्हेच ‘ ह्या नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर केला गेला. नाटक ‘ फ्लॅशबॅक ‘ पद्धतीने सादर केले.८ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीच्या ‘आयफॅक्स‘ नाट्य गृहात झाला॰ या पहिल्या प्रयोगाला दिल्लीत असलेले सारे नामवंत मराठी लोक तर हजर होतेच; शिवाय, कित्येक अमराठी लोक ज्यांना मराठी रंगभूमीबद्दल माहिती होती, तेही आवर्जून या नाटकाला उपस्थित होते॰ त्यामुळे नाट्यगृह संपूर्ण भरलेले होते॰ या पहिल्या प्रयोगात प्रभाकर पणशीकर ( ५ भूमिका ) , दत्तोपंत आंग्रे, नंदा पातकर, चंद्रचूड वासुदेव, बिपीन तळपदे, वासुदेवराव दाते, एरन जोसेफ, पुरुषोत्तम बाळ, कुसुम कुलकर्णी, सरोज नाईक, मंदाकिनी भडभडे, भोलाराम आठवले, श्रीपाद जोशी यांनी भूमिका केल्या॰ पुढे ह्या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले. प्रभाकर पणशीकर आणि लखोबा लोखडे हे समीकरणच बनून गेले.
मो.ग.रांगणेकर यांनी अनेक नाटके लिहिली , दिग्दर्शित केली. त्यांनी संगीत अमृत , अलंकार , आले देवाजीच्या मना. संगीत आशीर्वाद , कन्यादान , संगीत कुलवधू , लिलाव , भेटला दिली ओसरी , हेही दिवस जातील हे नाटक त्यांनी सहलेखक म्ह्णून वसंत सबनीस आणि ग.दि . माडगूळकर याना घेऊन केले. अशी त्यांनी अनेक नाटके लिहिली . त्याचप्रमाणे त्यांनी अपूर्व बंगाल , आश्रित , तो मी नव्हेच , धन्य ते गायनी कला , पठ्ठे बापूराव , मीरा मधुरा , राणीचा बाग , लेकुरे उदंड झाली , हृदयस्वामीनी अशी अनेक नाटके दिग्दर्शित केली. त्यांनी १९४७ साली ‘ कुबेर ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी गीतलेखनही केले होते. त्यांची अनेक गीते आजशी अनेकांच्या स्मरणात आहेत. ठाण्यात जेव्हा गडकरी रंगायतन सुरु झाले त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात मो. ग. रांगणेकर आले होते तेव्हा मला त्यांची स्वाक्षरी मिळाली होती .
१९६८ साली गोव्यात म्हापसे येथे झालेल्या ४९ व्या नाट्यसंमेलनाचे मो. ग. रांगणेकर हे अध्यक्ष होते.
मो.ग.रांगणेकर यांना १९८२ चा संगीत अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता.
मो. ग. रांगणेकर यांचे १ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply