प्रसिध्द बासरीवादक व ‘जीवनगाणे’ वाद्यवृंदाचे निर्माते प्रा. सचिन जगताप यांचा जन्म १९ एप्रिल १९७२ रोजी झाला.
कोल्हापूरातील प्रसिध्द बासरीवादक व ‘जीवनगाणे’ वाद्यवृंदाचे निर्माते प्रा.सचिन जगताप हे भारतातील पहिले कलाकार आहेत की ज्यांनी बासरी वादनामध्ये गांधर्व महाविद्यालयाची “संगीत अलंकार” ही पदवी थेट प्रवेश घेऊन संपूर्ण भारतात पहिला क्रमांक मिळण्याचा बहुमान त्यांना मिळाला. याचबरोबर शिवाजी विद्यापिठामध्ये हार्मोनियममध्ये एम.ए. संगीतमध्ये ते शिवाजी विद्यापिठात पहिले आले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी शिक्षण क्षेत्रातील MCA,MBA, M.Phil, DIM, CNI या पदव्या प्राप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे गेली काही वर्षे संगीत, योग आणि आरोग्य या विषयावर त्यांनी अभ्यास करून अनेक रुग्णांवर संगीत चिकित्सा मोफत देऊन त्यांनी कोम्यात गेलेले पेशंट, निद्रानाश, डिप्रेशन अशा अनेक रुग्णांना बरे केले आहे. यासाठी त्यांनी नुकताच युरोप दौराही केलेला आहे. अनेक संस्थांमध्ये त्यांची व्याख्यानेही झाली आहेत.
बासरी ही दुर्मिळ कला त्यांनी कोल्हापूर, सांगली, कराड व कोकण भागात जिवंत ठेवण्याचे मोठे योगदान सचिनने केले आहे. यासाठी दरवर्षी बासरी वादनाचे मोफत शिबीरे आयोजित केली आहेत. गेली १२ वर्षे ते आपली पदरमोड करून पं. पन्नालाल घोष संगीत संमेलनाचे आयोजन करीत आहेत. त्याचबरोबर संस्कार प्रस्तुत जीवनगाणेच्या माध्यमातून कला रसिकांसाठी विविध उपक्रम ते नेहमीच राबवतात. आजपर्यंत त्यांनी संगीतकार दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, प्यारेलाल शर्मा, पं. हृदयनाथ मंगेशकर, अजय-अतुल, श्रीधर फडके त्याचबरोबर गायक सुरेश वाडकर, आशा भोसले, पद्मजा फेणाणी, आरती अंकलीकर, उत्तरा केळकर, रविंद्र साठे, अनुराधा पौडवाल, किर्ती शिलेदार, जयमाला शिलेदार, शौनक अभिषेकी, बेला शेंडे, साधना सरगम, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत अशा अनेक दिग्गजांबरोबर साथ संगत केली आहे.
भारतातील एक उच्चविभूषित शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. बऱ्याच ध्वनिफिती, मराठी चित्रपट व विविध चॅनल्सना धारावाहिकांसाठी त्यांनी बासरीवादन केले आहे. सध्या ते छ. शाहू इन्स्टिटयूट (सायबर) येथे एम.बी.ए. विभागात ते कार्यरत आहेत. त्यांना त्यांचे गुरू पं. हरिश्चंद्र कोकरे, पं. नित्यानंद हळदीपूर व सुरमणी प्रविण गोडखिंडी यांचे मार्गदर्शन लाभले व सायबरचे सेक्रेटरी डॉ. रणजित शिंदे, त्यांचे वडील हनुमंतराव जगताप यांचे प्रोत्साहन लाभले.
आजपर्यंत त्यांना कलाश्री, कला गौरव, कै. मधुकर गाडगीळ पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच सचिन जगताप यांनी केलेल्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी व संगीत सेवा त्याचबरोबर त्यांनी संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याच्या आरोग्यासाठी संगीताचा वापर कसा करावा हे जनमानसात त्यांनी केलेला प्रसार या कार्यासाठी प्रा.सचिन जगताप यांना माणदेश फौंडेशन, पुणे यांचा ‘कलाभूषण’ पुरस्कार मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply