बेल! शिवाची प्रिय गोष्ट ज्याखेरीज शिवपुजा पुर्णच होत नाही.
अगदी १००% भारतिय असलेला हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष माहित नसलेली व्यक्ती अर्थातच विरळाच. संपुर्ण भारतभर आढळणारं हे मध्यम आकाराचं झाड त्याच्या धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. “बिल्वे शाण्डिल्यशैलूषौ मलूरश्रीफ़लावपि” अशी वर्णनं अमरकोशात या झाडाची केली आहेत. Rutaceae ह्या लिंबू कुळाचा सदस्य असलेलं हे झाड, वनस्पतीशास्त्रात Aegle marmelos असं नाव धारण करतं. यातल ’एइगल’ हे नाव एका पुरातन ग्रीक निसर्गदेवतेच्या नावावरुन तर ’मारमेलॉस’ हे युरोपातल्या ’क्विन्स’ नावाच्या फ़ळाशी असलेल्या सांम्यावरुन ठेवलं गेलय. आजही, स्वातंत्र्यानंतरही आपण परकियांनी दिलेली नाव वापरण्यातच धन्यता मानत असतो. ईंग्रजीत ‘ गोल्डन अँपल ‘ किंवा ‘बेंगाल क्विन्स’ सारखी रुक्ष नावे मिळालेल्या ह्या भारतिय वृक्षाला गंधफ़ल, सदाफ़ल, शैल, महाकपित्थ, ग्रंथिल, कण्टकी, बिल्वम, बेल अशा सुंदर संस्कृत नावांनी गौरवलं गेलय.
बेलाचा वृक्ष पानझडी या सदरात गणला जातो. हा वृक्ष मध्यम आकाराचा असतो असं वरच्या ओळीतच मी लिहिलंय. साधारण १०-१२ मिटर उंची गाठणाऱ्या ह्या वृक्षाची पानं आपल्याला सुपरिचीत असतात. त्रिदल म्हणजेच तीन पर्णिकांची असलेली ही पानं हिरवीगार या सदरात मोडतात. जर नीट निरिक्षण केलं तर सहज दिसून येतं की या त्रिदलातली मधली पर्णिका कायम मोठी असते. या पानांचा देठही मोठा म्हणजे साधारण ४/५ सेमी असतो ज्यामुळे हे बेलपान त्याच्या अंगापासून लांब, एकाआड आलेली दिसतात. या बिल्वपत्रांना स्वत:चा एक खास सुगंध असतो जो त्यांना चुरडल्यावर सहज जाणवतो. या सुगंधाचे कारण म्हणजे या पानांवर सुगंधी तैलग्रंथींचे ठिपके असतात. हे ठिपके पान उजेडाकडे धरल्यास सहज दिसुन येतात. या पानांचे शिवपुजेत अनन्यसाधारण महत्व असल्याने वर्षभर यांना प्रचंड मागणी असते. मात्र धार्मिक उपयोगाखेरीज यां पानांचे आयुर्वेदिक उपयोग आहेतच. या पानांचा उपयोग सर्दीवरील काढा करण्यासाठी अजुनही केला जातो. तसेच ताज्या बेलपानांचा वापर लेप करून जखमांसाठीही करताना मी खेड्यांंमधे पाहिला आहे. साधारण हिवाळा संपत आला की या वृक्षाची पानं गळायला सुरुवात होते. अर्थात, वसंताच्या आगमनाबरोबरच येणारी नविन पालवी त्याच्या फ़ुलण्याची जणू नांदीच असते. साधारण एप्रिल मे च्या सुमारास बेलाला २ ते २.५ सेमी आकाराची हिरवट पांढरी सुवासिक फ़ुलं यायला सुरुवात होते. चार पाकळ्यांच हे फ़ुल अगदी मंद रंगाच असतं ज्यातून फ़लधारणा होवुन पुढे पावसाळ्यात बेलफ़ळं दिसायला लागतात.
पावसाळ्यात बाळसं धरणारी ही बेलफ़ळं बेलाच्या पानापेक्षा जास्त औषधी महत्व बाळगतात. शिवमंदिरांसमोर विकायला ठेवलेली लहानमोठी बेलफ़ळं आपण पाहिलेली असतातच. कठीण सालीचे हे फ़ळ पिकलेल्या स्वरुपापेक्षा कच्चं असतानाच अधीक वापरले जाते. लांबट गोल आकाराची ही फ़ळं पिकायला मात्र पुढचा उन्हाळा यावा लागतो. ही फ़ळं आतून चिक्कट गोडसर असतात. याचा गर चक्क केशरी रंगाचा असतो नी भरपूर बियाळ असतो. बेल मुरंबा खाऊन अनेकांची लहानपणं समृद्ध झाली आहे हे नक्की. याच बेलफ़ळाच्या पिकलेल्या गराचे सरबत तर अगदी अमृततुल्य लागते. याचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात लिहिलेले आहेत. पचनशक्ती सुधारण्यासाठी, पोटाचे आजार दूर व्हायला, मलावरोधावर रेचक, मधुमेहावर साखर कमी करण्यासाठी, काविळीसाठी, वात नाशनासाठी… एक न दोन. अनेकाविध उपयोग ह्या वृक्षाचे आहेत.
अनेकांनी बेलाची पानं पाहिली असतात पण झाड पाहिले नसते. याचं खोड खडबडीत असतं नी साल करडट, पिवळसर रंगाची असते. या झाडाचे लाकूड पिवळट करडट रंगाचे असते. साधारण आपल्याला माहितच नसतं की बेलाचे लाकूड मजबूत समजले जाते. या लाकडाची गम्मत म्हणजे, कापल्यावरही काही काळ ते सुगंधीत रहातं.या लाकडाचा उपयोग बैलगाड्या, , हत्यारांच्या मुठी, शेतकामाची अवजारं बनवायलाही होतो. उत्तरेकडे, या लाकडाचा वापर कोरीव कामाच्या वस्तू बनवायला होतो. खास सांगायचं म्हणजे, या लाकडाचा लगद्याचा उपयोग आवरणाच्या कागदासाठी केला जातो. या झाडाचा डिंक चांगल्या दर्ज्याचा असून अगदी बाभळीच्या डिंकाइतका दर्जा त्यात असतो. रहाता राहीली याची मुळं! यांचाही वापर औषधांमध्ये केला जातो. प्रसिद्ध दशमुलारिष्टात याची मुळे वापरली जातात…
आपल्या पुर्वजांना या औषधी वृक्षाचं महत्व कधीच कळलं होतं. म्हणुनच अथर्व वेदात याला जळणासाठी तोडू नये असे लिहिले आहे. आजही संथाल जमातीत या झाडाला देवता म्हणुन पुजण्यात येतं नी प्राणपणाने जपलं जातं. तास पाहायला गेलं तर बेलाबद्दल लिहावं तितक कमीच. मी आयुर्वेदाच्या द्रुष्टीने मला माहीत असलेल्याच गोष्टी इथे लिहिल्या असून या वृक्षाचे अनेक औषधी गुण मला माहित नाही. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे, बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत लागते नी वाढते. ताज्या बियांपासून , मुळांच्या फ़ुटव्यातून नविन रोपं सहज बनतात. ह्यामुळेच शासनाने वनशेतीसाठी हे झाड पुरस्कृत करायला हल्ली सुरुवात केली आहे.
हे लिखाण थांबवताना बेलाबद्दल सांगायचं वैशिष्ठय म्हणजे, बेल हा एकमेव वृक्ष आहे ज्यावर संस्कृत भाषेत अष्ट्क लिहिलं गेलय.
— सुषमा मोहिते
( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )
how to use bel for diabetes?