गजानन जीवन वाटवे यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी बेळगाव यथे झाला. त्यांचे कुटूंब मध्यमवर्गीय होते . बेळगावमध्येच त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील भिक्षुकी करत , आपल्या मुलाने तेच करावे असे त्यांना वाटत होते परंतु गजानन वाटवे याना ते मान्य नव्हते म्ह्णून त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी आपले घर सोडले आणि पुण्याला पळून आले. पुण्यातील गोपाळ गायन समाज येथे चार वर्षे माधुकरी मागवून संगीत शिकले. गजानन वाटवे यांनी वयाच्या अठराव्या वर्षी काव्यगायनाला सुरवात केली , त्यांचा पहिला कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यलयात झाला. ते आपल्या काव्यगायनाच्या कर्यक्रमतात माधव ज्युलियन यांची ‘ आई ‘ ही कविता म्हणत त्यामुळे त्यांचे खूप नाव झाले.
त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली त्यात त्यांचे ‘ वारा फोफावला ‘ हे गाणे त्यावेळी खूपच गाजले त्यामुळे ते तरुणात खूपच प्रसिद्ध झाले. मराठी सुगम संगीताला त्यांनी खूप लोकप्रिय केले. त्यांचा आवाज हा लोकांना इतका आवडत असे की त्यांच्या कार्यक्रमाला खूप गर्दी जमत असे. त्यांनी उत्तमोत्तम कविता निवडून त्या लोकांपर्यंत पोहचवल्या. त्यांची गाणी लोक सहजपणे गुणगुणत असत. त्यांच्या अनेक गाण्यामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.
गजानन वाटवे ‘ राधे तुझा सैल आंबाडा ‘ हे गाणे अशा पद्धतीने म्हणत की रसिक त्या कवितेच्या शब्दात , गाण्यात , त्यांच्या आवाजात रंगून जात आणि मनातल्यामनात खुश होत असत हे मी लहानपणी खूप वेळा पाहिले आहे. ठाण्यात त्यांचे अनेक कार्यक्रम होत असत , गणेश उत्सवात आणि अनेक प्रसंगी होत त्या कार्यक्रमाला लोक मात्र खूप गर्दी करायचे . मला आठवतेय त्यांच्या गाण्याचा शेवट ते ‘ आई ‘ ही कविता गाऊन करत असत , त्या काव्यातील अर्थ आणि त्यांचा आर्त आवाज रसिकांच्या डोळ्यांना पाणी आणत असे. लोक मिळेल ती जागा पटकावत , अनेकजण पुढील जागा बसायला मिळावी म्ह्णून खूप आधीपासून येत असत. कार्यक्रमात गजानन वाटवे एकटेच गात , त्यांच्या साथीला फक्त तबला आणि व्हायोलिन असे आणि ते स्वतः हार्मोनियम गाणे म्हणताना वाजवत. गाणे म्हणताना ते चालीमध्ये विविधता आणत असत जेणेकरून गाणे उत्तम होई , आकर्षक होई .
त्यांच्या गाण्यात , कवितेतील अर्थ भावपूर्णरीत्या श्रोत्यांपर्यंत पोचवत. काव्याची उत्तम निवड, उत्तम चाल आणि स्पष्ट शब्दोच्चार , कवितेला पूर्ण न्याय देणारी चाल ही त्यांच्या गाण्यांची वैशिष्ट्ये होती. ते अनेक पद्धतीच्या कविता गात त्यात शृंगार , वात्सल्य, करूण , हास्य , वीररस , कारुण्य , शांत , भक्तीरस आणि विरहगीते असत. त्यांचा कार्यक्रम खूप वेळ चालत असे , कार्यक्रमात श्रोतेइतके रंगत असत की कुणालाच घड्याळाचे भान नसायचे . कार्यक्रम संपला तरी अजून काहीतरी राहिले आहे ही भावना मनात निर्माण व्हायची. त्यांनी हजारो कार्यक्रम महाराष्ट्रात केले.
अनेक नामवंत कवीच्या कविता घेऊन त्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या . त्यांची रानात सांग कानांत , आपुले नाते मी भल्या पहाटे येते , दोन ध्रुवावर दोघे आपण , यमुना काठी ताजमहाल , आभाळीचा चांद माझा , चंद्रावरती दोन गुलाब , ती पहा बापूजींची प्राणज्योती , मी निरंजनातील वात , गाऊ त्यांना आरती , तू असतीस तर झाले असते उन्हाचे गोड चांदणे , मोहुनीया तुजसंगे नयन खेळले जुगार.. अशी त्यांची असंख्य गाणी त्यावेळी रसिकांना तोंडपाठ होती.
गजानन वाटवे याना १९९३ चा दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा ‘ लता मंगेशकर ‘ पुरस्कार मिळाला . तर महाराष्ट्र सरकारने देखील त्यांना १९९४ सालचा ‘ लता मंगेशकर ‘ पुरस्कार दिला. विजय फाऊंडेशनतर्फे त्यांना २००१ मध्ये ‘ युगनिर्माता ‘ पुरस्कार मिळाला. तर गदिमा प्रतिष्ठानने २००५ साली त्यांचा सन्मान केला. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ‘ गगनी उगवला सायंतारा ‘ हे शिर्षक असलेले त्यांचे आत्मचरित्र १९७१ साली प्रकाशित झाले आणि ते २००७ साली पुर्नरप्रकाशित केले गेले.
गजानन वाटवे यांचे २ एप्रिल २००९ साली वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचे ‘ गगनी उगवला सायंतारा ‘ हे गाणे इतके गाजले होते की ‘ सायंतारा चौक ‘ हे पुण्यातील नारायणपेठेतील चौकाला त्यांच्या स्मरणार्थ देण्यात आले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply