दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते, उरलेल्या फराळाचं करायचं तरी काय ? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल, एक दही-भाताबरोबर चकली होईल, एक दिवस नाष्ट्याला उरलेला चिवडा,शंकर पाळी. उद्या आणि परवा असंच बाकीचंही मार्गी लावायचं, ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत.
अशावेळेस फराळापासून काही नवीन पदार्थ बनवून बघा.
चिवडा मिसळ
साहित्य- मोड आलेली मटकी २ वाट्या, बटाटा १, आले लसूण पेस्ट १ चमचा, जाडे पोहे भिजवलेले १ वाटी, तेल आवश्यकतेनुसार, मोहरी अर्धा चमचा,जिरे अर्धा चमचा, १ लिंबू,३ कांदे, १ टोमाटो, फराळातील तयार चिवडा १ वाटी, फरसाण १ वाटी, सुक्या खोबऱ्याचा कीस पाव वाटी, तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, गरम मसाला पाव चमचा,कोथिंबीर अर्धी वाटी, हळद पाव चमचा, पाणी आवश्यकतेनुसार
कृती:- मटकीची उसळ बनवण्यासाठी एका भांड्यात मटकी व ६ कप पाणी घेऊन १० मिनिटे उकळावे. मटकी दाबून पहावी. शिजली असल्यास मग त्याचे पाणी काढून बाजूला ठेवावे. एका पातेल्यात ३ चमचे तेल घेऊन त्यात पाव चमचा मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग १ कांदा बारीक चिरून टाकावा. कांदा शिजल्यावर थोडीशी हळद, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट टाकून थोडेसे परतावे. टोमाटो टाकून तिखट टाकावे. २ मिनिटे परतावे. मोड आलेली मटकी, मीठ टाकून त्यात उकडलेला बटाटा अर्धवट कुस्करून टाकावा. उसळ पूर्ण कोरडी होऊ द्यावी. कट (तिखट रस्सा) बनवण्यासाठी प्रथम एक कांदा चिरून घ्यावा. तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून त्यावर खरपूस परतावा. त्याच तव्यावर खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. खोबरे व कांदा एकत्र करून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे. आता एका भांड्यात ७-८ चमचे तेल घ्यावे. त्यात वाटलेले मिश्रण, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला टाकून बारीक गॅस वर ५ मिनिटे परतत राहावे. मग त्यात मटकी शिजवलेले पाणी टाकून कट पातळ करून घ्यावा. हवे असल्यास अजून पाणी टाकून पातळ करावे. सर्व्ह करताना एका बाऊल मध्ये प्रथम चिवडा, त्यावर उसळ, मग कट, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, व कोथिंबीर असे सर्व्ह करतात. हवे असल्यास कट अजून एका बाऊल मध्ये बाजूला द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चकली टिक्की
साहित्य:- ७-८ चकल्या, २ मऊ उकडलेले बटाटे, कोथिंबीर, मीठ, अर्धी वाटी फ्रेश ब्रेडक्रम्स, तेल.
कृती : बटाटे किसून घ्या. चकल्यांचा मिक्सरवर व्यवस्थित चुरा करून घ्यावा. बटाटे, चकल्यांचा चुरा, कोथिंबीर आणि मीठ एक करून व्यवस्थित गोळा करून घ्यावा. त्याच्या आवडीच्या आकाराच्या टिक्की वळून घ्याव्या. ब्रेडक्रम्समध्ये घोळवून थोड्याशा तेलावर फ्राय करून घ्याव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
लाडवाची खमंग साटोरी
साहित्य : ५-६ रव्याचे लाडू, पाव टी स्पून वेलची पावडर, दूध, प्रत्येकी अर्धी वाटी कणीक, बारीक रवा आणि मैदा, ३ चमचे तुपाचं मोहन, किंचित मीठ, परतण्यासाठी तूप, २-३ चमचे पिठी. कृती : रव्याचे लाडू बारीक करून त्यात २ चमचे दूध आणि वेलची पावडर मिक्स करून ठेवावी. कणीक, रवा आणि मैदा एकत्र करून त्यात मीठ घालावं. ३ चमचे तूप चांगलं गरम करून पिठावर घालून व्यवस्थित चोळून घ्यावं. लागेल तसं दूध किंवा पाणी घालून मऊसर पीठ भिजवून झाकून ठेवावं. साधारण अर्ध्या तासाने पिठाचे तुकडे करून मिक्सरवर बारीक करून घ्यावं. पीठ मिक्सरबाहेर काढून व्यवस्थित मळून घ्यावं. पिठाच्या पुरीहून थोड्या मोठ्या लाट्या घेऊन थोडं लाटून घ्यावं. त्याची वाटी बनवून त्यात तयार सारण भरून वाटी व्यवस्थित बंद करून घ्यावी. साधारण पुरीएवढ्या आकाराची जाडसर साटोरी लाटून घ्यावी. जाड तव्यावर आधी कोरडी साटोरी दोन्ही बाजूंनी भाजावी. नंतर त्याला थोडं तूप लावून छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकमत.
Leave a Reply