MENU
नवीन लेखन...

फस गये ओबामा

मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी चहा पिण्याचे आमंत्रण दिले ,तेव्हा पासून ,सारं जग त्यांना ओळखायला लागलय.

या जगामध्ये अमेरिकेतले जसे तमाम नागरिक आहेत,त्याचप्रमाणे आफ्रिका खंडातले समस्त बांधव आणि भगिनी,चिनी देशातले समस्त बांधव आणि भगिनी शिवाय पृथ्वीतलावरील अभिजनांच्या घरी असणारी सर्व श्वानपथके,सिंह,वाघ,हत्ती आणि महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल,मच्छिबाजारात येणाऱ्या पापलेट पासून मरळ पर्यंत,समुद्रातील व्हेल पासून शॉर्क पर्यंत,पॉल ऑक्टोपस मृत्यूमुखी पडले नसते तर ते आणि काहीशे अब्ज कोटी जलचर,डोळयाला दिसू शकणारे पृथ्वीचर यांना सुध्दा मल्लिका शेरावत या आता ओळखीच्या झाल्या आहेत.

याला पुरावा काय,असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.वर ज्यांचा -ज्यांचा उल्लेख आहे,त्यांच्यापलिकडे खात्रीचा पुरावा कोण बरे राहू शकेल.? त्यावर विश्वास ठेवायचा नसल्यास मग सीबीआयचे पोलीस जशी चौकशी करतात तशी त्यांची प्रत्यक्ष चौकशी सुध्दा करता येऊ शकेल.ही बाब स्वत:मल्लीका शेरावत यांनीच स्वयंस्पष्ट केली आहे.शिवाय त्यांचे असे म्हणणे आहे की प्रेसिडंेट ओबामा मला ओळखतात.त्यांनी आपल्याला व्हाईट हाऊस मध्ये बोलावून चहा दिला.हे तर सत्य आहेना.या घटनेचे व्हीडीओ आहेत.प्रेस मध्ये फोटं छापून आले आहेत.यू ट्यूबवर ते व्हीडीओ आहेत.ज्या प्रमाणे टाईम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना देशाच्या पंतप्रधानांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली पद समजले जाते.तसेच युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेच्या प्रेसिडंेटला इन्सपेक्टर जनरल ऑफ वर्ल्ड असे संबोधले जाते.या न्यायाने ते या जगाचे राजे आहेत.याला प्रतिवाद अद्यापपावेतो चीनने केलेला नाही.सध्या तरी ते डेप्युटी इंस्पेक्टर जनरल ऑफ वर्ल्ड,या पदावरच समाधानी आहेत.यावरुन हे स्पष्ट होते की प्रेसिडंेट ओबामा हेज जगाचे राजे आहेत,म्हणेज त्यांना जेव्हा एखादी गोष्ट ओळखीची होते,तेव्हा ती समस्त जगालाच ठाऊक झाली,असा प्रमेय आपोआपच सिध्द होतो.

मल्लिकांच्या मते,चंद्रावर आणि मंगळावर जर 2011साली कुणी राहत असते तर त्यांनाही त्यांची ओळख झालीच असती.तिथे कुणी राहत नाही ,यात आपला काही दोष नाही.

मल्लिका शेरावतांना ओबामा यांनी खरोखरच चहा प्यायला बोलावलं होतं का?हा प्रश्न काही दुष्टबुध्दीच्या आणि मल्लिकांवर जळणाऱ्या जळकुकड्यांना पडू शकतो.कारण मुळात ओबामा चहा पितात काय?हे व्हाईट हाऊसने आणि मिशेल वहिनींनी अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.व्हाईट हाऊसमध्ये पाहुण्यांना चहा दिला जातो काय काय? हे अद्याप एकाही पत्रकाराला कळलेले नाही.

ओबामा हे फिटनेसला प्राधान्य देतात.ज्याला फिट राहायचं असतं,ते चहा पासून चार हात दूरच राहतात.आपण तसे राहिलो नाही,म्हणून आपल्याला हार्ट अटॅक आला असं,बिल क्लिंटन यांनी सांगूनच ठेवलं आहे.हिलरी वहिनींनी याला दुजोरा दिलेला नाही.खाजगीत नीता वहिनी अंबानी यांना हिलरी वहिनी,म्हणाल्या होत्या की,बील चहाच्या प्रेमात पडला असता ना, तर मला वाईट वाटले नसते,पण तो डिफरंट डिफरंट बिल्लींच्या (उदाहरणार्थ मोनिका लेवेंस्की इत्यादी) प्रेमात पडला.इतक्या बिल्लींच्या प्रेमाचं प्रेशर पडूनच त्याचं हार्ट कमकुवत झालं.एकदा असं झालं की हार्ट ब्रेक होतच की.सुदैवानं ते फेल झालं नाही.

ही गुप्त बातमी आमच्या पर्यंत कशी बरे पोहचली?अहो हिलरी वहिनींनी,नीता वहिनींना हे सत्य सांगितलं.त्या निता वहिनींच्या बंगल्यावरुन निघून गेल्यावर नीता वहिंनींना स्वस्थ बसवेना(आठवा बघू- कर्णाने कुंतीला दिलेला अजरामर शाप.)हिलरी वहिनींनी मोठया विश्वासाने त्यांच्याजवळ आपलं मन मोकळं केलं होतं.हिलरी वहिनी जशा आपल्या विश्वासातल्या तशा अंजली वहिनी तेंडूलकरही आपल्या विश्वासातल्या आणि फास्ट मैत्रिण की.त्यांना हे सिक्रेट सांगितलं तर आपलंही मन मोकळं होउुन जायचं,असं नीता वहिनींना वाटलं.त्यांनी अंजली वहिनींना फोन लावला .सारं काही सांगितलं.झालं.एकसे दोन.दो से.तीन. एका क्षणात होऊन गेलं.अंजली वहिनींनी ही बातमी आम्हाला दिली ,असं आम्हाला म्हणायचं नाही.पण त्या कुणाशीतरी बोलल्या आणि आणि त्यांनी आपलं मन मुक्त केलं.असं ते मुक्त होत होत आमच्यापर्यंत पोहचलं.कम्युनिकेशनच्या सिध्दांतानुसार जी गोष्ट दोन व्यक्तिंना माहिती असू शकते,ती पुढे अनेकांना कळू शकते.फक्त तथ्यांची मोडतोड होते. कधी कधी .समजा प्रारंभी हे तथ्य अर्जूनाशी संबधित असेल तर प्रसरण पावत पावत पुढे त्याचे बृहन्नडा होऊन जाते.काळोख असेल तर उजेड होतो.वाघ असेल तर गाढव होतो.पण हे चालायचच.त्यावर अद्यापपावतो तरी काही, जनसंवाद शात्रज्ञांनी उतारा काढलेला नाही.

तर मुद्दा हाच होता की हिलरी वहिनींनी ,नीता वहिनींना, बील भाऊंच्या सो मेनी बिल्ली प्रेमप्रकरणांविषयी सांगितलेली गुप्त वार्ता आम्हाला कळली होती. ही बाब चहाशी संबंधित होती.चहा ओबामांशी संबंधित होता.

व्हाईट हाऊसमध्ये पाहुण्यांना चहा दिला जातो की नाही हे माहीत नसल्यानं,मल्लिकाला चहा प्यायला ओबामांनी बोलावलं,यावर कितपत विश्वास ठेवायचा,हा मुद्दा आहे.मात्र हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही.कारण मल्लिकांनीच यावर समंजस भूमिका घेतली.त्यांचं यावरचं निवदेन असं आहे की,समजा ओबामा यांनी मला चहा प्यायला बोलावलं नसल्याचं कुणाला मान्य नसेल,तर त्यांनी कॉफी प्यायला बोलावलं असं समजावं,तेही कुणाला मान्य नसेल तर,त्यांनी मला बीअर प्यायला बोलावल,असं समजावं,तेही मान्य नसेल तर रम प्यायला बोलावलं असेल असं समजावं,तेही मान्य नसेल तर त्यांनी मला वाईन प्यायला बोलावलं असेल,तेही मान्य नसेल तर त्यांनी मला कोकाकोला प्यायला बोलावलं असेल हे समजावं,हेही मान्य नसेल तर त्यांनी मला रुह अफजा शरबत किंवा रसना शरबत प्यायला बोलावलं असेल,तेही मान्य नसेल तर त्यांनी मला एक ग्लास पाणी प्यायला बोलावलं असेल हे मान्य करावं ना.ओबामांना पाणीही चालत नाही ,असा आक्षेप तुम्ही घेऊ शकत नाही.फरक एवढाच राहील की हे पाणी गंगेच्या एैवजी हडसन नदीचं असेलं.मल्लिकांच्या या निवेदनात निश्चितच दम आहे.हे सांगणे न लगे.याचा निष्कर्ष असा निघतो,की ओबामांनी मल्लिकांना काहीतरी प्यायला बोलावलं होतं.ते चहापासून वाईनपर्यंत काहीही असलं तरी त्यातलं महत्वाचं इनग्रेडिएंट हे पाणीच ठरतं.नाही का?

चला,ओबामांनी मल्लिका यांना व्हाईट हाऊसमध्ये काहीतरी प्यायला निमंत्रण दिलं.हे आता आपल्याला आवडो की न आवडो हे सत्य इतिहासाच्या पृष्ठांवर अधारेखित झाले आहेच.

ओबामांनी मल्लिकांना बोलावले काय किंवा आणखी कुणाला बोलावले काय,हे तुमच्या आमच्या सारख्या महागाईच्या चक्रात मान सापडलेल्या पामरांना काय घेणं देणं.पण ज्यांना महागाई म्हणजे काय हेच माहीत नाही,तिच्याशी कसा सामना करावा लागतो हे माहीत नाही,अशांसाठी मात्र मल्लिकांना ओबामांनी निमंत्रण दिलं हे,सत्य पचनी पडलं नाही.त्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा ही मल्लिका कोण लागून गेलीय, तिस्मार खान.म्हणजे एक शेलाटी फिगर सोडलं तर काय असं आहे तिच्यापाशी,जे आपणापाशी नाही.अपरं नाक,जाडेभरडे डोळे,भदाडे ओठ,वगेैरे वगैरे.मग ओबामांनी कोणता बरे ,क्रायटेरिया लावला,मल्लिकाला चहापानासाठी निमंत्रण देण्यासाठी.

असं काहीसं वाटण्यात पहिला क्रमांक अर्थातच सौ.माधुरी श्रीराम नेने -दीक्षित यांचा आहे.पहिला क्रमांक कारण ,त्या गेल्या काही वर्षात अमेरिकत राहतात.त्यांचा नवरा अमेरिकन नागरिक आहे.असावे सुंदर अपूलं घरटं,असं त्यांचं हक्काचं घर,अमेरिकेत आहे.त्या आता स्वत:नॉन रेसिंडेंट इंडियन आहेत.त्यांना असं वाटतय की,काय हे,मी माधुरी दीक्षीत असताना ,ओबामा मला निमंत्रण देत नाहीत.माझ्यात आणि मल्लिका मधे फक्त एकच साम्य म्हणजे तिचं आणि माझं नाव म पासून सुरु होतं.माझ्या हास्यावर सारा हिंदुस्थान फिदा होता.असं म्हणतात की ,अजूनही आहे.असं म्हणतात की,समस्त हिंदुस्थान माझ्या मस्त तेजाबी डान्सवर डोलायचा.मल्लिकेचं काय,काहीच नाही.16 चुंबनं. हे काय क्वालिफिकेशन झालं.मी सुध्दा विनोद खन्नाला दयावान मध्ये चुंबन दिलं होतच की.काही जण म्हणतात,ते खरं हॉट अँड पॅशेनेट चुंबन होतं.मल्लिकेंच चुंबन फक्त घासाघासी होती .ओठांशी.नो आर्ट ओन्ली फर्राट.माझ्या डायरेक्टरनी मला सतरा चुंबन दृष्य द्यायला सांगितलं नाही ,हा काय माझा दोष.तुम्हीच सांगा.मल्लिका हरियाणा प्रातांची आहे ,हे क्वालिफिकेशन कसं बरं होऊ शकेल.ती हरियाणाची असेल तर मी मुंबईची आहे ना.पाचशे मुंबई एकत्र केल्यावरही हरीयाणाला त्याची सर येणार नाही.हे ओबामांना कळायला नको का.त्यांचे सल्लागार फारच भुक्कड दिसतात.अरे, मला निमंत्रण दिलं असतं तर त्यांच्या आख्या कुटुंबाला आयुष्यभर फुकट औषधं दिली असती माझ्या नवऱ्यानं नि फुकट शिकवलं असतं कथ्थक त्यांच्या मुलिंना.मी. आणि पुरणपोळी शिकवली असती ,मिशेल वहिनींना.जाऊ द्या.आपण कशाला मनाला लावून घ्यायचं.त्यांच्या नशिबात माधुरी नसेल तर काय करणार.किमान पत्रिका तरी महादेव शास्त्री डोंबिवलीकर यांच्याकडून बघून घ्या म्हणाव ,आता.कोणते ग्रह कुठे आहेत,ते तरी कळेल, ओबामांना.अन्यथा त्यांनी आता मल्लिका बोलावलं,पुढे एखाद्या मलायकाला बोलावण्याची घोडचूक करतील.महादेव शास्त्री डोंबिवलीकर यांचा पत्ता व्हाईटहाऊसच्या इमेलवर पाठवायचा निश्चय माधुरी यांनी केला.मल्लिकाच्या विश्वातून बाहेर पडण्याच्या त्यांना सुचलेला हा मार्ग होता.

Avatar
About सुरेश वांदिले 11 Articles
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..