नवीन लेखन...

नाट्य आणि संगीतातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व फय्याज शेख

फय्याज यांचा जन्म ५ जानेवारी १९४८ रोजी झाला.

सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या फय्याज यांनी गेली अनेक वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे पूर्ण नाव फय्याज इमाम शेख. फय्याज शेख या मूळच्या सोलापूरच्या. खरं तर कर्नाटकातल्या सूरपूरवरून फय्याज यांचं कुटूंब सोलापूरला आलं. एका साध्या मुस्लिम घरात त्या जन्मल्या, वाढल्या. फय्याज यांचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकिरण प्रशालेत झालं. खरं तर लहानपणी फय्याजना गायिका किंवा अभिनेत्री असं काही बनायचं नव्हतं. सर्वसामान्य मुलीप्रमाणे लग्न वगैरे करून संसार करायचा, असंच त्यांचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना बाराव्या-तेराव्या वर्षी त्यांना मेळ्यात-कलापथकात काम करावं लागलं. गाण्याची-नृत्याचीआवड तर होतीच. ती ओळखलेल्या आजीने राम जालीहाळ आणि पंचवाडकरबुवांची तालीम गाण्यासाठी लावली; तर नृत्यासाठी मास्टर हसन (कथ्थक) आणि कट्टीबंधू (भरतनाटयम) यांच्याकडे पाठवलं.

नृत्य-गायनाचे हे संस्कार होत असतानाच आकाशवाणीवरील संगीतसभासारख्या कार्यक्रमांतून बडे गुलामअली खान, बेगम अख्तर यांच्यासारख्या गायकांची गायकी त्यांच्या कानावर पडत होती. त्यांचं आकाशवाणीवरचं गाणं फय्याज अजिबात चुकवत नसत. या गायकांपैकी कुणाची सोलापुरात मैफल असली की, फय्याज यांचा जीव तुटायचा, पण तिकीटाच्या भरमसाठ दरामुळे त्यांना या मैफली ऐकता यायच्या नाहीत. एकदा शाळेच्या मदतीसाठी सोलापूरच्या पानमळ हायस्कूलमध्ये झालेली बेगम अख्तर यांची मैफल मात्र दुरून का होईना, ऐकता आली. त्यांच्या जादूई सुरांनी फय्याज भारावून गेल्या. बडे गुलामअली खाँ आणि बेगम अख्तर यांच्या गायकीमुळे त्यांनी उत्तर हिंदुस्थानी गायकीचा ध्यास घेतला. ही गायकी आपल्याला कधी शिकता येईल का, असा प्रश्न वयाच्या बारा-तेराच्या वर्षीच त्या स्वत:लाच विचारू लागल्या.

मॅट्रिकच्या वर्षी अभ्यासाला प्राधान्य देऊन त्यांनी कलाराधना थांबवली; पण त्यांचा मूळ ओढा होता तो कलेकडेच आणि याच क्षेत्रात आपण काम करणार आहोत, हे जणू त्यांनी लहानपणीच ठरवूनही टाकले होते. त्यामुळे आज ना उद्या सोलापुरातून बाहेर पडायचे आणि मुंबईला जायचे, याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. फय्याज १९६५ साली मुंबईत आल्या तेव्हा आपल्या कलेला मुंबईतच वाव मिळू शकेल, असा होरा तर होताच; पण त्याचबरोबर कुटुंबासाठी पैसे कमावण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. मात्र, काम करायचे ते मनाला पटले तरच, हा पीळ मात्र फार लहानपणापासूनच त्यांच्या अंगी होता. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम करायची त्यांची तयारी नव्हती. मुंबईत दाखल झाल्यावर लवकरच त्यांना “गीत गायिले आसवांनी’ या नाटकात पहिले काम मिळाले. त्यात फय्याज यांनी एका मुस्लिम मुलीचीच भूमिका रंगवली होती. खरं तर मुस्लिम धर्मातील एक मुलगी नाटकात काम करते, हे तेव्हा फारसं रुचणारं नव्हतं, पण फय्याज यांनी मागे एका मुलाखतीत बोलताना संगितलं होतं की, त्यांना प्रवाहाविरुद्ध जायला आवडतं. म्हणूनच अनेक मर्यादा असूनही त्या अभिनायाच्या क्षेत्रात उतरल्या. ‘गीत गायले आसवांनी’ मध्ये त्यांनी मंझरची भूमिका केली होती. आपल्यात पहिल्याच नाटकात त्यांनी आपल्या आवाजाची अशी काही जादू दाखवली की, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सगळ्यांनीच त्यांचं कौतुक केलं. फय्याज यांचे हे पहिलेच नाटक खूप गाजले. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ आवाज यामुळे पहिल्याच नाटकात त्यांची विशेष दखल घेतली गेली. नाट्यसृष्टीत फय्याज यांचा प्रवेश झाला आणि पहिल्याच नाटकात हे वेगळे पाणी आहे, हेदेखील जणू त्यांच्या क्षेत्रातील मंडळींच्या लक्षात आले. त्याच वर्षीची मोहन वाघ आणि प्रभाकर पणशीकर यांनी एकत्रितपणे “मदनाची मंजिरी’ या नाटकाची निर्मिती केली. या नाटकातील मंजिरीची भूमिका फय्याज यांनी साकारली आणि मग हा यशाचा सिलसिला सुरू झाला. “अश्रूंची झाली फुले’ मधली नीलम आणि काही वर्षांनंतर त्याच नाटकातील सुमित्रा या दोन भूमिकाही दीदींनी साकारल्या. याशिवाय “वीज म्हणाली धरतीला’मधील जुलेखा ही त्यांची भूमिका तर खूपच गाजली. “तो मी नव्हेच’, “मी मालक या देहाचा’, “अंधार माझा सोबती’, “कट्यार काळजात घुसली’ही “नाट्यसंपदे’ची आणि “पंडितराज जगन्नाथ’, “मत्स्यगंधा’, “संत गोरा कुंभार’, “बावनखणी’, “गुंतता हृदय हे’, “सूर राहू दे’ ही इतर संस्थांची नाटकेही त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने गाजवली. त्या काळात “तो मी नव्हेच’चे हजार प्रयोग झाले होते. “अश्रूंची झाली फुले’चे ७०० ते ७५० प्रयोग झाले होते, तर “कट्यार’चे भारतभरात ५३५ प्रयोग झाले. “कट्यार’ हे त्या काळातले अतिशय गाजलेले नाटक. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे या तीन दिग्गजांच्या प्रतिभेतून साकारलेल्या या नाटकात संवाद आणि संगीताची बहार होती. नाटकाची सुरवातच भैरवीने होत असे. त्यावेळी हा एक नवा प्रयोग होता. “या नाटकाने आणि त्यातील दिग्गजांनी मला खूप काही शिकवले,’ असे फय्याज सांगतात. “”गाणे किती गावे आणि कुठे संपवावे, हे अभिषेकीबुवांनी आम्हाला शिकवले. गाण्यातील भावना गळ्यात आणण्यासाठी ती भावना आठवायची आणि मग ते गळ्यातून व्यक्त करायचे, अशी बुवांची शिकवण होती. ती अंगीकारण्याचा मी कायमच जिवापाड प्रयत्न करायचे.” कोणतीही नवी गोष्ट शिकायची आणि ती स्वतःच्या शैलीत उतरवायची, अशी सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतली. आज फय्याज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वेगळेपण रसिकांना जाणवते ते बहुधा त्यामुळेच. “वेट अंटिल डार्क’ या चित्रपटावर बेतलेल्या “अंधार माझा सोबती’ या नाटकात ज्योती या अंध मुलीची भूमिका फय्याज यांनी केली होती. फय्याज यांच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी भूमिका. अभिनेत्री म्हणून या भूमिकेने त्यांना एक वेगळा आयाम दिला. या भूमिकेत फय्याज यांनी अक्षरशः जीव ओतला. भूमिका जगणे म्हणजे काय ते फय्याज यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आंधळ्या मुलीचे नेमके बेअरिंग यावे, तिचे जगणे कळावे यासाठी दिग्दर्शक कांती मडिया त्यांना रोज अंधशाळेत घेऊन जात. मग तिथून परतल्यावर डोळ्यावर पट्टी बांधून अभिनय करवून घेत. “”हा सराव करत असताना मी कितीतरी वेळा धडपडले. मार लागला, गुडघे फुटले; पण त्यामुळेच ती भूमिका मी समरसून साकारू शकले,” फय्याज सांगतात. “तो मी नव्हेच’मध्ये फय्याज यांनी साकारलेली चन्नक्का बघून पु. ल. देशपांडे यांनी त्यांना “वटवट’मध्ये भूमिका दिली. “”या नाटकात नाट्यसंगीत होते, लावणी होती आणि पुलंबरोबर एक द्वंद्वगीतही होते. पुलंमुळेही “पॉझ’ कसे घ्यायचे, “पंचेस’ कसे घ्यायचे, अशा अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या, त्यांची भर मी माझ्या पुढच्या प्रत्येक कामामध्ये घालत राहिले,” असे फय्याज नोंदवतात. अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांमध्ये वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, दारव्हेकर मास्तर या उत्तुंग माणसांनी फय्याज यांना घडवले. वसंतराव त्यांना कौतुकाने आपली लाडकी शिष्याच म्हणत असत. इतरही अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. मात्र कोणाचेही थेट अनुकरण करण्याचा मोह त्यांना कधी झाला नाही. नाटयगीतांबरोबर गझल, ठुमरी, लावणी असा प्रवास केला. “निर्गुणाचा संग धरिला जो आवडी’ किंवा “चार होत्या पक्षिणी त्या’ किंवा माडगूळकरांची “जोगिया’ ही फय्याज यांची गाणी इतर दिग्गज गायिकांइतकीच आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. अशोक रानडे यांच्याबरोबर बैठकीची लावणी साजरा करण्यात त्यांचा सहभाग होता. प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाटयकारकीर्द जोरात असल्याने त्यांना गाणं शिकता आलं नाही. परंतु त्यांनी बगम अख्तर यांना मनोमन आपला गुरू मानलं. त्यांच्याकडून गाणं शिकता न आल्याची रूखरूख त्यांना आजही वाटते. बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकता आलं नाही, तरी ब-याच जणांकडून बरंच काही शिकल्याची कबुली त्या आजही न विसरता देतात.

नृत्यकलाही जणू फय्याज यांच्या रक्तातच होती. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या “संत तुकाराम’ आणि “होनाजी बाळा’ या दोन नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्ण यांनी केले होते. त्यात फय्याज यांच्या नृत्याला अर्थातच वाव होता. त्यांच्या अदाकारीवर गोपीकृष्ण यांची प्रतिक्रिया होती, “ही मुलगी एवढे चांगले नृत्य करू शकते, तर ते सोडून ती गाण्यातच का गुंतून पडली आहे?’ प्रत्येक काम त्या इतके जीव ओतून करायच्या, की त्या क्षेत्रातील माणसाला वाटायचे की फय्याज यांनी याच क्षेत्राला वाहून घेतले पाहिजे. दादा कोंडकेंबरोबर त्यांनी ‘विच्छा माझी पूर्ण करा’चे अडीचशे प्रयोग केले, तर ‘मित्र’मध्ये डॉ. श्रीराम लागूंबरोबर भूमिका केली. फय्याज यांनी “महानंदा’, “पैंजण’, “एक उनाड दिवस’, “वजीर’ अशा काही वेगळ्या चित्रपटांमधूनही अभिनय केला. ऋषिकेश मुखर्जींच्या “सबसे बडा सुख’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय “धरतीपुत्र’, “चॉंद का टुकडा’ अशा चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. “शेष रात्री’ या बंगाली चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम केले. इंग्रजीत स्क्रिप्ट लिहून घेऊन ते पाठ करून त्यांनी ही भूमिका साकारली होती. “बावर्ची’, “प्रेमपर्बत’, “आलाप’, “रंगबिरंगी’ या हिंदी चित्रपटांसाठी फय्याज यांनी पार्श्वगायनही केले.

फय्याज यांना बोरीवली नाटय परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार, विष्णुदास भावे गौरव पदक, ‘चंद्रलेखा’तर्फे दिला जाणारा शारदाबाई वाघ पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार, माणूस पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

फय्याज यांना आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

फय्याज यांनी केलेली नाटकं आणि त्यातील त्यांच्या भूमिका.

गीत गायिले आसवांनी (मंझर), अंधार माझा सोबती (ज्योती), अश्रूंची झाली फुले (नीलम, सुमित्रा), कटयार काळजात घुसली (झरीना), किनारा (जीजी), गुंतता हृदय हे (कल्याणी), संत गोरा कुंभार (संता), तो मी नव्हेच (चनक्का, प्रमिला परांजपे, सुनंदा दातार), पंडितराज जगन्नाथ (लवंगिका), पेइंग गेस्ट (सुनंदा), प्रीत राजहंसी (मेहजबीन), बावनखणी (चंद्रा), भटाला दिली ओसरी (नटी), मत्स्यगंधा (सत्यवती), मदनाची मंजिरी, मित्र (नर्स), मी मालक या देहाचा (सिस्टर), वटवट (अनेक भूमिका), वादळवारं (अम्मी), वीज म्हणाली धरतीला (जुलेखा), वेडयाचं घर उन्हात, संत तुकाराम (रंभा), सूर राहू दे, होनाजी बाळा (गुणवती).

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..