१९७१गुजरातमधील जामनगरात (पूर्वीचे नवानगर) दौलतसिंहजी जडेजांना पुत्रप्राप्ती झाली – नामे अजयसिंहजी. तेव्हा कुमार श्री रणजितसिंहजी आणि कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा क्रिकेटचा वारसा त्याच्यात होताच.
हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि राजस्थान या संघांकडून जडेजा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये खेळला. १९९२ ते २००० या काळात भारताकडून अजय जडेजा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला.
पंधरा कसोट्या आणि १९६ एदिसा. त्याच्या काळातील खेळाडूंपैकी क्षेत्ररक्षणामध्ये तो सर्वोत्तम होता. १९९६ च्या विश्वचषकात वकार युनिसच्या एकाच षटकात २२ आणि त्याच्याच पुढच्या षटकात १८ धावा काढून अवघ्या २५ चेंडूंमध्ये ४५ धावांची घणाघाती खेळी केलेली होती. शारजातील इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात एका षटकात तीन धावा देत तीन बळी जडेजाने मिळविले होते. तेरा एदिसांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही त्याने केलेले आहे.
एदिसांमधील चौथ्या आणि पाचव्या जोडीसाठीच्या सर्वोच्च भागीदार्या अजय जडेजा आणि मोहम्मद अजहरुद्दीन या दोघांच्या नावे आहेत. या दोघांनी संयुक्तपणे केलेले पराक्रम केवळ मैदानावरचेच नाहीत. मॅचफिक्सिंगसारख्या काळ्या करणींमध्ये ह्या दोघांची एकमेकांना पुरेपूर साथ होती. २००० च्या उत्तरार्धात जडेजावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २००३ मध्ये ती उठवण्यात आली पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही.
१९८१
बेन्सन अॅन्ड हेजिस वर्ल्ड सिरीज कपमधील तिसरा सामना. मेलबर्न क्रिकेट ग्राऊन्ड. मालिकेत याआधी १-१ अशी बरोबरी झालेली होती. पाच सामन्यांच्या ह्या मालिकेतून अंतिम विजेता कोण हे ठरणार होते.
ऑस्ट्रेलियाई कर्णधार ग्रेग चॅपेलने नाणेकौल जिंकून फलंदाजी स्वीकारली. निर्धारित पन्नास षटकांमध्ये कांगारुंनी ४ बाद २३५ धावा केल्या. ग्रेग चॅपेल ५२ धावांवर असताना मार्टिन स्नेडनने त्याचा एक झेल घेतला होता (?). पुनर्दृष्यात तो व्यवस्थित असल्याचे दिसत होते पण पंचांनी तो नाकारला होता. स्नेडनचा शब्द मानून ग्रेगने डाव सोडावयास हवा होता असे अनेकांना वाटते. अखेर ९० धावा काढून
तशाच पद्धतीने ग्रेग बाद झाला. यावेळी तो स्वतःच मैदान सोडून निघून गेला.
अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी १५ धावा हव्या होत्या आणि त्यांचे चार गडी शिल्लक होते. डेनिस लिलीचा दहा षटकांचा कोटा संपविण्याची चूक ग्रेगने केली होती. अखेरचे षटक ग्रेगचा भाऊ ट्रेव्हरच्या वाट्याला आले. पाच चेंडूंवर आठ धावा त्याने दिल्या आणि दोन बळीही मिळविले. षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने यष्टीरक्षक इअन स्मिथला त्रिफळाबाद केले. अखेरच्या चेंडूसाठी क्रमांक दहाचा फलंदाज ब्रायन मॅकेन्झी मैदानात आला.
अखेरच्या चेंडूवर ब्रायनने षटकार मारला असता तर सामना बरोबरीत सुटला असता. हा ब्रायनचा १४ वा एदिसा होता. (हाच त्याचा अखेरचाही ठरला.) आजवर सामना केलेल्या १४४ चेंडूंवर त्याने अवघ्या ५४ धावा केलेल्या होत्या. तो षटकार मारणार नव्हताच पण….
…पण ग्रेग चॅपेलने आपल्या भावाला हात न फिरवता चेंडू टाकायला सांगितला. ट्रेवरने कप्तान भावाचा सल्ला मानला आणि खांद्याखालूनच चेंडू टाकला. टप्पाच नाही तर फटका मारणार कसा ? चेंडू टाकण्याची पद्धत बदलण्याआधी पंचांना तशी सूचना गोलंदाजाने द्यायची असते. इथे ती दिली गेलेली होती. (यूट्यूब लिंक : [youtube QFToAdeS93Q] यष्टीरक्षक रॉड मार्श ज्या पद्धतीने डोके हलवितो त्यावरूनच सर्व काही स्पष्ट होते.)
ग्रेगचा आणखी एक भाऊ – इअन चॅपेल – यावेळी समालोचन करीत होता. तो म्हणाला, “नाही ग्रेग, तू असं करू शकत नाहीस.” ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला पण प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली. ब्रायन मॅकेन्झीने वैतागाने बॅट आदळली. खेळाची बदनामी केल्याबद्दल त्याला शिक्षा झाली !
न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांनी या प्रसंगाचे वर्णन “क्रिकेटिहासातील सर्वात किळसवाणा प्रसंग” असे केले आणि “ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पिवळे कपडे घातले होते ते योग्यच झाले” असे सांगितले. ऑस्ट्रेलियाच्याही प्रधानमंत्र्यांनी ही घटना अशोभनीय असल्याचे म्हटले.तोवर अंडर-आर्म चेंडू (हात न फिरवता टाकलेला चेंडू) क्रिकेटच्या नियमांमध्ये बसत होता पण तसा चेंडू टाकणे अखिलाडू मानले जाई. नंतर नियमांमध्ये बदल घडवून आणला गेला आणि कुठल्याही प्रकारचा अंडर-आर्म चेंडू अवैध ठरविण्यात आला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply