४ फेब्रुवारी १९२९ रोजी आर्ची जॅक्सन या नावाने ओळखल्या जाणार्या एका ऑस्ट्रेलियाई प्रतिभावान फलंदाजाचे पदार्पणातील शतक (वस्तुतः दीडशतक) पूर्ण झाले. आर्चिबाल्ड किंवा आर्चिबाल्ड अॅलेक्झांडर जॅक्सन हे त्याचे औपचारिक नाव.
५ सप्टेंबर १९०९ रोजी जन्मलेल्या आर्चीच्या क्रिकेटायुष्यातील महत्त्वाच्या घटना फेब्रुवारी महिन्यातच घडल्या. त्याच्या पदार्पणाची कसोटी १ फेब्रुवारीला सुरू झाली (१९२९). त्याची अखेरची कसोटी १४ फेब्रुवारीला सुरू झाली (१९३१) आणि फेब्रुवारी महिन्यातच (१६, १९३३) त्याचा अकाली मृत्यू झाला.
आर्ची जॅक्सनची कसोटी आणि प्रथमश्रेणी कारकीर्द ज्या काळात घडली तो काळ डॉन ब्रॅडमनच्या क्रिकेट कारकिर्दीचा प्रारंभकाळ होता. त्यामुळे अपरिहार्यतः या दोघांच्या खेळाची तुलना होणे स्वाभाविकच होते. अॅलन किपॅक्सने आर्चीला क्रिकेटचे धडे दिले होते. १९३० साली ब्रॅडमन आणि जॅक्सन दोघेही इंग्लंडच्या दौर्यावर होते. यावेळी अनेक निरीक्षकांना जॅक्सनचा खेळ ब्रॅडमनपेक्षा उजवा वाटायचा. सलामीलाही खेळू शकण्याची जॅक्सनची क्षमता निश्चितच त्याला सरस ठरवीत होती.
१९२७-२८ च्या हंगामात डॉन ब्रॅडमनचे प्रथमश्रेणी पदार्पण झाले होते. न्यू साऊथ वेल्स संघाच्या दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यासाठी नेहमीचा फलंदाज आर्ची जॅक्सन तंदुरुस्त नसल्याने ब्रॅडमनला खेळण्याची संधी मिळाली होती ! पुनरागमनाच्या सामन्यात जॅक्सनला सलामीला पाठविण्यात आले आणि त्याने दोन्ही डावांमध्ये देखणी शतके रचली.
१९२८-२९ च्या हंगामात पर्सी चॅपमनच्या नेतॄत्वाखाली इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियात आला होता. खेळाडूंच्या निवडीसाठीचा सामना म्हणून खेळल्या गेलेल्या सामन्यात जॅक्सन अपयशी ठरला. किपॅक्स आणि ब्रॅडमनने मात्र शतके काढली. साहजिकच, कसोटीसाठीच्या ंघात जॅक्सनची निवड झाली नाही.
दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. दरम्यान मालिकेतील तीन कसोट्या खेळून झाल्या होत्या आणि कांगारुंचा पराभव निश्चित झालेला होता. त्यामुळे अॅडलेड ओवलवरच्या चौथ्या कसोटीसाठी निवडकर्त्यांनी जॅक्सनला संधी देण्याचे ठरविले. आर्थर मेली हा बाल्मेन डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लबचा कर्णधार होता (जॅक्सनचा क्लब) आणि तोवर त्या क्लबकडून तो एकटाच कसोट्यांमध्ये खेळलेला होता. ही बातमी आर्चीला सांगण्यासाठी तो आपल्या कार्यालयातून किपॅक्सच्या स्टोअरपर्यंत धावत धावत गेल्याचा एक उल्लेख सापडतो !
१ फेब्रुवारी १९२९ रोजी ही कसोटी सुरू झाली. इंग्लंडच्या ३३४ धावांना उत्तर देताना आर्ची जॅक्सनने बिल वुडफूलच्या साथीत डाव सुरू केला. वयाच्या वीस वर्षेही पूर्ण न केलेल्या आर्चीला सलामीला पाठविणे योग्य ठरेल का अशी विचारणा कांगारू कर्णधार जॅक रायडरने किपॅक्सला केली होती आणि किपॅक्सने “तो सलामीचीच अपेक्षा करतो आहे” असे उत्तर कर्णधाराला दिले होते.
एकोणीस धावांवरच ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद झाले आणि रायडर उतरला. हॅरल्ड लार्वूड आणि मॉरिस टेटच्या मार्याचा यशस्वी सामना करीत जॅक्सनने अर्धशतकापार मजल मारली, दरम्यान रायडरनेही अर्धशतक गाठले आणि या दोघांनी शंभर धावांची भागीदारीही केली. खेळाच्या दुसर्या दिवस-अखेर कांगारुंच्या ३ बाद १३१ धावा झालेल्या होत्या. जॅक्सन पुरता दमून गेल्याची नोंद त्याच्या सहकार्यांनी केलेली आहे.
दुसर्या दिवशी उपाहारापर्यंतच्या खेळात आर्ची ९७ पर्यंत पोहचला. दरम्यान रायडर बाद झालेला होता आणि त्याच्या जागी ब्रॅडमन आला होता. ब्रॅडमनने जॅक्सनला शांतपणे खेळून शतक नोंदविण्याचा सल्ला दिला. जॅक्सनने काहीही उत्तर दिले नाही. सत्राचा पहिलाच चेंडू आर्ची ने पॉइन्ट सीमेबाहेर धाडला (गोलंदाज लार्वूड) ! त्यानंतरही त्याचा धडाका कायम राहिला. त्याचे कटचे फटके पाहून अनेकांना चार्ल्स मॅकार्टनीच्या खेळाची आठवण झाली.
अखेर १६४ धावांवर आर्ची बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी शतक काढणारा आर्ची हा तोवरचा सर्वात छोटा खेळाडू ठरला. (पुढे नील हार्वेने हा विक्रम मोडला.) पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियातर्फे चार्ल्स बॅनरमनने केला होता. त्याची बरोबरी करण्यात आर्चीला फक्त एक धाव कमी पडली.
आर्चीच्या शरीराने मात्र एवढ्या लहान वयातच त्याला साथ न देण्याचे ठरवले. १९२९-३० च्या हंगामात आजारपणामुळे तो केवळ पाच प्रथमश्रेणी सामनेच खेळू शकला. आर्थर गिलीगनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाविरुद्ध त्याने नाबाद १६८ धावा काढल्या. १९३० च्या इंग्लिश दौर्यासाठी त्याची आपोआपच निवड झाली.
दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिस्मस सामना आजारपणामुळे आर्चीला खेळता आला नाही. इंग्लंड दौर्यावर त्याच्या टॉन्सिल्स ऑस्ट्रेलियन मंडळाच्या पुढाकाराने काढण्यात आल्या ! बिल वुडफूलला मागच्या इंग्लंड दौर्यात टॉन्सिलाइटीस झाला होता. त्यामुळे मंडळाला सलामीवीरांबाबत आता कसलीही जोखीम घ्यायची नव्हती. आर्चीला कधीही टॉन्सिलचा त्रास झाला नव्हता ! दरम्यान आर्चीचे वजन घटले, सुमारे साडेसहा किलोने.
शरीर आणि धावपट्टी अशा दोन्ही आघाड्यांवर इंग्लंडमध्ये आर्चीला झगडावे लागले. तरीही सेसिल पार्किन या इंग्लिश खेळाडूने आर्ची ब्रॅडमनपेक्षा सरस होता असे लिहून ठेवलेले आहे. पहिल्या कसोटीत आर्ची नव्हता. तिसर्या कसोटीत तो एकच धाव काढू शकला. चौथ्या कसोटीतही तो नव्हता. पाचव्या आणि निर्णायक कसोटीसाठी तो संघात आला.
आर्ची सलामीला आला नाही पण लार्वूडच्या आपटबारांनी अंग शेकून निघत असताना त्याने ओवलवर ्या त्या सामन्यात ७३ धावा काढल्या. ब्रॅडमनसोबत त्याने २४३ धावांची भागीदारी केली. हा सामना डावाने जिंकून ऑस्ट्रेलियाचे अॅशेस पुन्हा मिळवल्या. या दौर्यात जॅक्सनला एकच शतक काढता आले होते, ते होते सॉमरसेटविरुद्ध. ब्रॅडमनने मात्र एका कसोटीत ३३४ धावा काढल्या होत्या. “खरा आर्ची जॅक्सन इंग्रजांना पाहावयास मिळालाच नाही” अशी खंत या दौर्याच्या वार्तांकनात विज्डेन क्रिकेटर्स आल्मनॅकने व्यक्त केलेली आहे.
१९३०-३१ च्या हंगामात वेस्ट इंडीजचा संघ ऑस्ट्रेलियात आला होता. अॅडलेडमध्ये पहिल्या कसोटीत आर्चीने नाबाद ७० धावा काढल्या. नंतर मात्र त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. पाचव्या सामन्यासाठीच्या संघात तो नव्हता. बारावा खेळाडू म्हणून अखेरच्या दुपारी तो रनर म्हणून मैदानावर आला आणि दुर्दैवाने प्रथमश्रेणी सामन्यात आर्ची जॅक्सन मैदानावर दिसण्याचा तो अखेरचा प्रसंग ठरला.
याच हंगामात फिलीस टॉमस नावाच्या एका बॅले नर्तकीशी आर्चीचा परिचय झाला होता. नंतर ती त्याची वाग्दत्त वधू बनली. फार नॉर्थ क्वीन्सलँडचा दौरा किपॅक्सच्या नेतृत्वाखाली जॅक्सनने केला आणि गाजविलाही. तिथल्या दमट वातावरणाचा निर्णायक प्रभाव आर्चीवर पडला.
१९३१-३२ चा हंगाम ठीकठाक सुरू झाला. ब्रिस्बेनमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यासाठी आर्चीची संघात निवड झाली. सामना सुरू होण्यापूवीच्या आर्चीला खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्याच्या थुंकीमधून रक्तही बाहेर पडू लागले. त्याला पाच दिवस दवाखान्यात राहावे लागले. आपल्याला इन्फ्ल्युएंझा झालेला आहे अशी आर्चीची समजूत होती पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते…
ब्ल्यू माऊंटन्समधील वेन्टवर्थ फॉल्सजवळच्या शुश्रूषा केंद्रात आणि मग ल्यूरा नावाच्या ठिकाणी जॅक्सन या काळात हवापालटासाठी फिरला. १९३२ मध्ये तो अॅडलेडला परत ा. नेटमध्ये सराव करण्याइतपत सुधारणा त्याला जाणवत होती. याच काळात एक गुप्त अहवाल न्यू साऊथ वेल्स क्रिकेट असोसिएशनला पाठविला गेला आणि जॅक्सनला क्षयरोगाची (टीबी) बाधा झाल्याचे त्यात म्हटले होते.
ल्यूराला आपल्या बहिणीकडे जॅक्सन परत आला आणि ब्रिस्बेनमधील उष्ण हवामान आणि फिलीसचा सहवास आपल्याला लवकर बरा करेल असे वाटल्याने तो ब्रिस्बेनला आला. डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध त्याने ब्रिस्बेनमधील नॉर्दर्न सबर्ब्ज नावाच्या क्लबसाठी खेळावयास प्रारंभ केला आणि क्लबच्या सामन्यांना तोबा गर्दी त्याने जमा केली. सात डावांमधून त्याची सरासरी १५९.६६ एवढी प्रचंड भरली – दरम्यान त्याला क्षयामुळे श्वास घेण्यासही अडथळा होऊ लागला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर येणार्या इंग्लिश संघाविरुद्ध त्याची निवड झालेली पाहण्यास लोक उत्सुक होते पण वैद्यकीय अहवालामुळे त्याची निवड झाली नाही.
एका क्रीडासाहित्याच्या दुकानात त्याने नोकरी धरली आणि एका वृत्तपत्रासाठी तो लिखाण करू लागला. त्या उन्हाळ्यात गाजलेल्या बॉडीलाइनविरोधात आर्चीने लेखन केले ना-ही. बॉडीलाईन गोलंदाजी वैध आहे, तिचा खेळाला कोणताही धोका नाही आणि तिचा सामना केला जाऊ शकतो असे आर्चीचे मत होते. किमान ऑस्ट्रेलियात तरी त्या काळी अशा मताचे लोक अल्पमतात होते.
फेब्रुवारी १९३३ मध्ये एका सामन्यानंतर आर्ची कोसळला आणि त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. त्याच्या दुखण्याच्या गंभीरपणाची जाणीव असूनही जॅक्सन आणि फिलीस या दोघांनी आपल्या वाङ्निश्चयाची (एंगेजमन्ट) घोषणा केली. ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटी सुरू झाली. त्यादरम्यानच आर्चीच्या फुप्फुसांमध्ये रक्तस्राव होऊ लागला. त्याचे आई-वडील ब्रिस्बेनला आले. अखेरच्या घटकांमध्ये अनेक खेळाडूंनी त्याची भेट घेतली.
१६ फेब्रुवारी १९३३ र जी त्याने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या तेविसाव्या वर्षीच मृत्यूने त्याला गाठले. २००७ मध्ये मंजुरल राणाच्या मृत्यूनंतर सर्वात लहान वयात ज्या कसोटीपटूंना मृत्यूने गाठले त्यांच्या यादीत आर्ची जॅक्सनचा क्रमांक दुसरा झाला.
सिडनीत होणार्या पुढच्या कसोटीसाठी रेल्वेने दोन्ही संघ रवाना झाले. त्यांच्यासोबतच आर्चीचे पार्थिव सिडनीला पाठविण्यात आले. त्याच्या दफनस्थानी असलेल्या दगडावर साधे चार शब्द आहेत : ही प्लेड द गेम.
आर्ची जॅक्सनबाबत सार्थपणे म्हटले जाते : “आणखी जगला असता तर तो ब्रॅडमनहून सरस खेळला असता.”
कारकीर्द
आठ कसोटी सामन्यांमधून ४७.४० च्या पारंपरिक सरासरीने ४७४ धावा. एक शतक (१६४ धावा, पदार्पणातच), दोन अर्धशतके, सात झेल.
सत्तर प्रथमश्रेणी सामन्यांमधून ४५.६५ च्या सरासरीने ४३८३ धावा. अकरा शतके, २३ अर्धशतके. १८२ सर्वोच्च. २६ झेल. ८६ चेंडू एवढी गोलंदाजी, बळी नाही.
आर्ची जॅक्सनबाबत सार्थपणे म्हटले जाते : “आणखी जगला असता तर तो ब्रॅडमनहून सरस खेळला असता.”
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply