५ फेब्रुवारी२००८ कॉमनवेल्थ बँक चषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊन्डवर भारताच्या गौतम गम्भीरने या दिवशी नाबाद १०२ धावा काढल्या. डावाच्या पंधराव्या षटकात सचिन तेन्डुलकर बाद झाला होता आणि तेव्हा मैदानात उतरलेला गंभीर एकोणपन्नास ‘बाजूबदल’ पूर्ण होईतो (अर्थात पन्नास षटके पूर्ण होईपर्यंत) मैदानात होता.
‘बाजूबदला’बद्दल : याआधी या सदरात म्हटल्याप्रमाणे आम्ही ओव्हर या इंग्रजी संज्ञेच्या अर्थवाही प्रतिशब्दाच्या शोधात होतो. सहा चेंडूंची षटके, आठ चेंडूंची अष्टके असे म्हटल्याने काम भागत होते पण ओव्हर या इंग्रजी संज्ञेत ४, ६ आणि ८ चेंडूंच्या ओव्हर्स जशा सूचित होतात तसा शब्द मराठीत सापडत नव्हता.
काल अभावितपणे तो शब्द चालत आला. ओव्हर हा इंग्रजी शब्द इंग्रजीमध्ये कसा आला ? प्रथमश्रेणीच्या कुठल्याही सामन्यामध्ये खेळपट्टीच्या दोन्ही टोकांकडून गोलंदाजी आणि फलंदाजी आलटूनपालटून होत असते. एक ओव्हर झाल्यानंतर यष्टीरक्षक धावत-धावत दुसर्या टोकाला जातो आणि क्षेत्ररक्षक व पंच आपापल्या जागा बदलतात. फलंदाज मात्र आपापल्या ठिकाणी उभे राहतात. (त्यामुळे जाहिरातींची सोय झाली हा भाग अलहिदा !) ओव्हरमध्ये ठरलेले चेंडू टाकून झाले की पूर्वी पंच ‘चेंज ओव्हर’ असा पुकारा करीत असत (अर्थात जागा / टोक बदला). आता ते ‘इट्स ओवर’ असेही म्हणतात.
पंचाच्या त्या पुकार्यात ‘ओव्हरचा’ जन्म दडलेला असल्याने मराठीत त्याला ‘बाजूबदल’ असे म्हणणे उचित ठरेल.
अवघ्या १०१ कंदुकांवर १० चौकार आणि एका षटकारासह या धावा गंभीरने काढल्या होत्या. भारताने ४ बाद २६७ पर्यंत मजल मारली होती. पंचांच्या निर्णयावर असंतोष व्यक्त केल्याबद्दल या सामन्यात रोहित शर्माला दंड करण्यात आला होता. पावसामुळे श्रीलंकेचा डाव सुरूच होऊ शकला नाही. हा दिवस-रात्रीचा सामना होता.
एक साल बाद…
पुन्हा ५ फेब्रुवारी२००९भारत विरुद्ध श्रीलंका, दिवस-रात्रीचा सामना. आर प्रेमदासा
स्टेडिअम, कोलम्बो.पुन्हा धोनीने नाणेकौल जिंकून फलंदाजी घेतली (एक वर्षापूर्वीही असेच झाले होते.) सेहवागसोबत गम्भीर सलामीला आला आणि त्याने बरोबर दीडशतक काढले. १४७ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि एका षटकारासह १५० धावा. अठ्ठेचाळिसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. भारताने हा सामना ६७ धावांनी जिंकला. याच सामन्यात मुथय्या मुरलीदरनने वसिम अक्रमचा सर्वाधिक एदिसा बळींचा विक्रम मागे टाकला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply