नवीन लेखन...

फेब्रुवारी ०७ : अनिल कुंबळेचे एका डावातील दहा बळी

 
१९९९फिरोजशहा कोटला मैदान, दिल्ली.१९९८-९९ च्या हंगामातील भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेतील दुसरा सामना. चेन्नईतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता.चौथा दिवस (७ फेब्रुवारी) :तिसर्‍या दिवस-अखेर नबाद असलेल्या सौरव गांगुली (५८) आणि जवागल श्रीनाथ (४४) या जोडीने ७ बाद ३२४ वरून भारताचा डाव पुढे सुरू केला. दिवसातील तिसर्‍याच षटकात श्रीनाथ बाद झाला. अर्धशतक पूर्ण करण्यास त्याला फक्त एक धाव कमी पडली. गांगुलीसोबत आठव्या गड्यासाठी त्याने बरोबर १०० धावांची भागीदारी केली. मग मात्र वेंकटेश प्रसाद आणि हरभजन सिंग लवकर बाद झाले आणि भारताचा डाव ३३९ धावांवर संपुष्टात आला. सौरव गांगुली ६२ धावा काढून नाबाद राहिला. सकलेन मुश्ताकने पाचाळी मिळवली.कसोटी जिंकण्यासाठी पाकिस्तानसमोर आता ४२० धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तानचा पहिला डाव १७२ धावांवर संपुष्टात आला होता. त्या डावात अनिल कुंबळे, हरभजन सिंग, प्रसाद आणि श्रीनाथ यांनी अनुक्रमे ४-३-२-१ गडी बाद केलेले होते. सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी अझरुद्दीनला फिरकीपटूंचा योग्य वापर करावा लागेल हे स्पष्ट होते.उपाहारापर्यंतच्या खेळात सईद अन्वर आणि शाहिद आफ्रिदी यांनी १०० धावा फलकावर लावल्या. ते असेच खेळत राहिले तर पाकिस्तान मालिका घशात घालणार हे स्पष्ट दिसू लागले. भारतीय द्रुतगती गोलंदाज पाकिस्तानी सलामीवीरांना बिल्कुल आवरू शकले नाहीत. अझरुद्दीन फिरकीपटूंना आक्रमणास का लावीत नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. फिरकीपटूच भारताला विजय मिळवून देऊ शकत होते पण त्यांचा जोम कायम टिकून ठेवण्याचे अवघड काम अझरला करावयाचे होते. दरम्यान उपाहारापुर्वी कुंबळेने सहा षटके फुटबॉल एन्डकडून टाकलेली होती.उपाहारानंतर लगेचच आफ्रिदी बाद झाला. काही वेळ खेळपट्टीवर थांबून मग आफ्रिदी चालता झाला. अनिल कुंबळ आ
णि नयन मोंगिया या दोघांनाही चेंडू त्याच्या बॅटला लागल्याची खात्री होती आणि दोघांनीही जोरदार आग्रह केला होता. आफ्रिदीच्या थांबण्यामागे अनेक कारणे असावीत

: वेगवान गोलंदाजांना नमविल्यानंतर आता फिरकीवर चकल्याचे दुःख किंवा चेंडू खाली राहतो आहे आणि वळतो आहे तेव्हा येणार्‍या फलंदाजांचे काय होणार अशी चिंता किंवा अर्धशतक नऊ धावांनी हुकल्याचे दुःख.

शाहिद आफ्रिदी झे. मोंगिया गो. कुंबळे ६९. पाक १ बाद १०१ (२४.२ षटके)

एजाज अहमद आल्यापावली परतला. पहिल्याच चेंडूवर पायचित.

एजाज अहमद पायचित गो. कुंबळे ०. पाक २ बाद १०१ (२४.३ षटके)

अनिल कुंबळेचा होऊ घातलेला त्रिक्रम इंझमाम-उल-हकने चुकवला पण चारच षटकांनंतर कुंबळेला पुन्हा यश मिळाले.

इंझमाम-उल-हक त्रिफळाचित गो. कुंबळे ६. पाक ३ बाद ११५ (२८.३ षटके)

युसूफ योहाना एजाज अहमदपेक्षा एक चेंडू लांब निघाला. दुसर्‍या चेंडूवर तो बाद झाला.

युसूफ योहाना पायचित गो. कुंबळे ०. पाक ४ बाद ११५ (२८.५ षटके)

यष्टिरक्षक मोईन खान सुमारे अर्धा तास टिकला पण त्याच्या हातून धावा निघाल्या नाहीत. त्याला बाद करीत जम्बोने डावातील पाचाळी पूर्ण केली.

मोईन खान झे. गांगुली गो. कुंबळे ३. पाक ५ बाद १२७ (३६.१ षटके)

दुसर्‍या बाजूने सईद अन्वर मात्र बिनधास्त खेळत होता. अनिल कुंबळेने राऊन्ड द विकेट येऊन खेळपट्टीवर असलेल्या काही ‘खड्ड्यांचा’ फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण अन्वर बधला नाही. भारत आणि विजय यांच्यात आता अन्वरचाच अडसर असला तर असू शकणार होता !अनिल पुन्हा ओव्हर द विकेट टाकू लागला आणि सुदैवाने त्याच्या एका मंदगती लेगब्रेकला अन्वर भुलला.

सईद अन्वर झे. लक्ष्मण गो. कुंबळे ६९. पाक ६ बाद १२८. (३८.३ षटके)

नंतर दिलेल्या एका मुलाखतीत कुंबळेने “सहावा गडी बाद केल्यानंतर आपण दहाच्या दहा बळी मिळवू शकतो असे वाटले” असे म्हटले आहे. उपाहारानंतरच्या खेळात त्याने आतापर्यंत ४४ चेंडू टाकले होते आणि १५ धावा मोजत सहा गडी बाद केले होते.सलीम मलिक आणि कर्णधार वसिम अक्रम यांनी चहापानापर्यंत तग धरली. उपाहार ते चहापान यादरम्यान एका टोकाने अनिल कुंबळेने सतत गोलंदाजी केलेली होती. तो थकलेला होता. चहापानादरम्यान त्याला जराशी उसंत मिळाली. अझरुद्दीनच्या कल्पकतेला दाद द्यायलाच हवी.चहापानानंतर अनुभवी मलिक चकला. तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता आणि पायांच्या हालचालीबाबत तो ढिसाळ होता. एक वेगवान चेंडू पुल करण्याच्या नादात तो विकेट गमावून बसला.

सलीम मलिक त्रिफळाचित गो. कुंबळे १५. पाक ७ बाद १८६. (५४.१ षटके)

सातही बळी अनिल कुंबळेला मिळाले होते. पाकिस्तानचा पराभव आता निश्चित होता. जिम लेकरने एकट्याने एका कसोटी डावात दहा बळी घेण्याचा विक्रम केलेला होता, तो आता बरोबरला जाईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली होती. कुंबळे ज्या टोकाने गोलंदाजी करीत होता (पॅव्हिलियन एन्ड) त्या टोकाला पंच ए व्ही जयप्रकाश उभे असल्याचा फायदा भारताला मिळत असल्याचा रडीचा डाव काही पाकिस्तानी पत्रकारांनी मांडला होता.

मुश्ताक अहमद आणि सकलेन मुश्ताक लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाले.

मुश्ताक अहमद झे. द्रविड गो. कुंबळे १. पाक ८ बाद १९८. (५८.५ षटके)

सकलेन मुश्ताक पायचित गो. कुंबळे ०. पाक ९ बाद १९८. (५८.६ षटके)

कुंबळेचे सव्विसावे षटक संपले. नऊ बळी आता एकट्या कुंबळेने गट्टम केले होते. “नववा गडी बाद झाल्यानंतर अझरने जवागल श्रीनाथला यष्ट्यांच्या रोखाने मारा ‘न’ करण्याचा सल्ला खा-ज-गी-त (आता मैदानावर कसला खाजगीत?-आनंद) दिला” असे विधान विज्डेनच्या या कसोटीच्या अहवालात आहे. पुढे या सामन्याबद्दल बोलताना श्रीनाथ स्पष्ट म्हणाला होता, “कुणीही माझ्याकडे येऊन तू शेवटचा गडी बाद करू नकोस असे सांगण्याची गरज नव्हती !” याच अहवालात विज्डेनने कोटलाची खेळपट्टी कमी दर्जाची (सबस्टँडर्ड) आणि

घाईघाईने बनविण्यात आलेली होती असे म्हणण्याचा खोडसाळपणा केलेला आहे.श्रीच्या त्या षटकात दोन चेंडू वाईड ठरले हे मात्र खरे. पुढच्या षटकात वसिम अक्रमने कुंबळेचा त्रिक्रम चुकवला पण आणखी एकाच चेंडूनंतर तो बाद झाला. “श्रीनाथ फार काळ तसं करू शकत नव्हता म्हणून एक बळी लवकर मिळविण्याचा प्रचंड दबाव माझ्यावर होता. कपिलदेव हॅडलीच्या विक्रमाकडे जात असताना मला गडी बाद न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या” अशी आठवण कुंबळेने सांगितलेली आहे.

वसिम अक्रम झे. लक्ष्मण गो. कुंबळे ३७. पाक सर्वबाद २०७. (६०.३ षटके)

वकार युनिस नाबाद ६.अनिल कुंबळे २६.३ षटके, ९ निर्धाव, ७४ धावा, १० बळी. उपाहारापूर्वीची सहा षटके वगळल्यास १२३ चेंडूंमध्ये ४७ धावा देत दहा बळी.कुंबळेच्या पुढच्या षटकाचा पहिला चेंडू तटवून वसिम अक्रमने त्रिक्रम हुकवला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..