१२ फेब्रुवारी १९४९ रोजी कर्नाटकातिल भद्रावती नगरात गुन्डप्पा रंगनाथ विश्वनाथचा जन्म झाला. “विशी” या लाडनावाने विश्वनाथ विश्वविख्यात आहे.
१९६७ सालापासून गुन्डप्पा प्रथमश्रेणी दर्जाचे क्रिकेट खेळू लागला. १५ नोव्हेम्बर १९६९ (तुलना करा : १५ नोव्हेम्बर १९८९) रोजी कानपूरच्या ग्रीन पार्कवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वनाथचे कसोटिपदार्पण झाले. पहिल्याच घासाला माशाचा काही भाग घशाला अडकावा तसा चौथ्या क्रमांकावर फलंदाजिसाठी आलेला विश्वनाथ भोपळा न फोडताच बाद झाला. भारताचा तिसरा आणि चौथा गडी १७१ या सांघिक धावसंख्येवरच बाद झाला. भारतियांनी या डावात ३२० धावा जमविल्या आणि पहिल्या डावाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाने २८ धावांची आघाडी मिळवली.
भारताच्या दुसर्या डावातही तिसरा आणि चौथा गडी एकाच सांघिक धावसंख्येवर बाद झाला : १२५. बाद होणारा तिसरा गडी (पहिल्या डावाप्रमाणेच) होता अशोक मानकड. चौथा गडी मात्र पहिल्याप्रमाणे गुन्डप्पा विश्वनाथ नव्हता !
अशोक गन्डोत्राबरोबर पाचव्या गड्यासाठी २२ धावांची भागिदारी गुन्डप्पाने केली. मग एकनाथ सोळकरच्या साथित तब्बल ११० धावा त्याने सहाव्या गड्यासाठी जोडल्या. त्यानंतर गुन्डप्पा विश्वनाथने आपले शतक पुर्ण केले. १३७ धावा काढुन तो बाद झाला तेव्हा भारताच्या ३०६ धावा झालेल्या होत्या.
आपल्या आणखी ९० कसोट्यांच्या कारकिर्दित आणखी १३ शतके विश्वनाथने काढली आणि त्याच्या ह्या एकुण १४ शतकांपैकी एकाही कसोटित भारत पराभुत झाला नाही ! भारत पराभुत न झालेल्या सामन्यांमध्ये विशिची सरासरी (पारंपरिक) आहे ५१ एवढी तर भारत पराभुत झालेल्या सामन्यांमध्ये सरासरिचा हा आकडा २५ पायर्या उतरतो आणि थेट सव्विसवर येऊन थाम्बतो !!
खेळावयास अवघड समजल्या जाणार्या पट्ट्यांवरही विशी धावा काढायचा. त्याच्या शतकांच्या आकड्यावरून जाणवत नाही
पण अनेक धोक्याच्या डावांमधून आणि मोक्याच्या दशांमधुन त्याने संघाचे तारू किनार्याला पोहचविलेले आहे. १९७० च्या त्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या तोफखान्याचा जबर्दस्त दबदबा असताना धबधब्यासारख्या पन्नाशिहुन अधिकच्या सरासरिने त्याने या दोन्ही
संघांविरुद्ध धावा काढल्या. १९७४-७५ च्या हंगामात मद्रासमध्ये वेस्ट इन्डिजविरुद्ध त्याने नाबाद ९७ धावा काढल्या होत्या. अॅन्डी रॉबर्ट्ससारखा भन्नाट वेगवान गोलन्दाज त्या संघात होता आणि त्या डावात भारतियांनी काढलेल्या एकुण धावा होत्या १९०. भारताने हा सामना जिंकला होता. विज्डेनने निवडलेल्या १०० सर्वोत्तम कसोटी डावांमध्ये विशिच्या या डावाचा क्रमांक अडतिसावा होता आणि १०० हुन कमी धावांचे डावच तेवढे विचारात घेतल्यास त्या यादितिल हा दुसरा सर्वोत्तम डाव होता.
१९७५-७६ च्या हंगामात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारतियांनी चौथ्या डावात विश्वविक्रमी ४०३ धावा काढुन विजय नोंदवला होता. विश्वनाथने त्या डावात ११२ धावा काढल्या होत्या. १९७९-८० च्या हंगामात दोन कसोट्यांमध्ये विश्वनाथने भारताचे नेतृत्वही केले. एक अनिर्णित आणि एक पराभव.
विशिच्या नेतृत्वाखालिल ज्या कसोटित भारत पराभुत झाला ती भारतिय क्रिकेट मंडळाची सुवर्णमहोत्सवी कसोटी होती. बॉब टेलरने (इंग्लन्डचा यष्टिरक्शक) दहा झेल घेऊन हा सामना गाजविला होता. भारताच्या पहिल्या डावातिल २४२ धावांना उत्तर देताना इंग्लन्डने २९६ धावा काढल्या. ५ बाद ५८ वरून एवढी मोठी मजल मारण्यात इअन बोथम आणि बॉब टेलरच्या फलन्दाजिचा मोठा वाटा होता. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी तब्बल १७१ धावांची भागिदारी केली होती. इंग्लन्डचा भारताविरुद्धच्या सामन्यांसाठी हा विक्रम होता.
खरे तर पंच हनुमन्त राव यांच्या निर्णयानुसार ही भागिदारी ८५ धावांवरच सम्पुष्टात आलेली होती.
कपिलदेवच्या एका चेन्डुवर टेलरला त्यांनी यष्ट्यांमागे झेलबाद दिलेले होते. टेलर त्या निर्णयावर नाखुश होता. विश्वनाथ त्यावेळी स्लिपमध्ये उभा होता आणि चेन्डू टेलरच्या बॅटला स्पर्शुन गेलेला नाही याची खात्री असल्याने त्याने पंचांना आप्ला निर्णय बदलावा लागला.
या घटनेबाबत नेहमी विशिच्या खिलाडुवृत्तिमुळे भारताला सामना गमवावा लाग्ला असे म्हटले जाते.
विशी त्याच्यासाठीच तर सर्वत्र जाण्ला जातो. खिलाडिवृत्ती, मनगटाचा वापर करून ताकदिपेक्शा टाइमिंग्ला महत्त्व देणारी फलन्दाजी. स्क्वेअर-कट हा विशिचा हुक्मी फटका. त्याने मार्लेला स्क्वेअर-कट पाहण्यासाठी लांब-लांबवरून लोक मैदानात येत असे बाळ पंडितांनी त्यांच्या ‘१०१ श्रेष्ठ क्रिकेटपटू’ या पुस्तकात म्हटलेले आहे. सुनिल गावस्करच्या कविता नावाच्या भगिनिशी विश्वनाथ विवाहबद्ध झालेला आहे.
कसोटी कारकीर्द :
९१ कसोट्या, ६०८० धावा, सरासरी ४१.९३, १४ शतके, ३५ अर्धशतके, २२२ उच्चांकी, ६३ झेल, एक बळी (ऑस्ट्रेलियाचा जेम्स हिग्ज).
एदिसा कारकिर्द :
२५ सामने, ४३९ धावा, सरासरी १९.९५, २ अर्धशतके, ७५ सर्वोच्च, तीन झेल. १९७५ आणि १९७९ या दोन्ही विश्वचषकांमध्ये तो खेळलेला आहे.
स्क्वेअर-कट आणि खिलाडुवृत्तीसाठी विश्वविख्यात झालेला गुन्डप्पा विश्वनाथ
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply