<१९४४
‘ग्रॅएम’ या नावाने अधिक प्रसिद्ध असणार्या रॉबर्ट ग्रॅएम पोलॉकचा जन्म २७ फेब्रुवारी १९४४ रोजी दक्षिण आफ्रिकी संघराज्यातील डर्बनमध्ये झाला. पोलॉक घराणे हे क्रिकेटसाठी सुप्रसिद्ध आहेच. अलीकडच्या काळात मुंबई इंडियन्सकडून ‘पॉलीकाका’ म्हणून विख्यात झालेला शॉन पोलॉक हा ग्रॅएमचा पुतण्या.
दक्षिण आफ्रिकेकडून २३ कसोट्यांमध्ये खेळलेल्या ग्रॅएम पोलॉकने तब्बल ६०.९७ धावांची पारंपरिक सरासरी राखलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील राजकीय अंदाधुंदीमुळे ग्रॅएमच्या वाट्याला फारशा कसोट्या आल्या नाहीत पण खेळलेल्या २३ कसोट्या फलंदाज म्हणून त्याच्या श्रेष्ठत्वाची ओळख केवळ पटविण्यासच नव्हे तर सुस्थापित करण्यास पुरेशा आहेत. हे आकडेच बघा :
<२३ कसोट्या, ४१ डाव, ४ डावांमध्ये नाबाद, २२५६ धावा, प्रत्येक डावात ५५.०२ धावा, २७४ सर्वोच्च, ७ शतके, ११ पन्नाशा ! इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरुद्धच पोलॉकला आपले कसब दाखविण्याची संधी मिळाली (न्यूझीलंडविरुद्ध एकाच कसोटीत तो खेळला) पण त्या काळी हे दोन संघ सर्वोत्तमांमधील सर्वोत्तम होते. ६०.९७ ही पोलॉकची पारंपरिक सरासरी सार्वकालिक कारकिर्दीतील सरासरीच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे ! डॉन ब्रॅडमनने सर गारफिल्ड सोबर्ससोबत ग्रॅएम पोलॉकची त्याने पाहिलेल्या डावखुर्या फलंदाजांमधील सर्वोत्तम अशी स्तुती केली होती. ६ फूट २ इंच उंचीचा ग्रॅएम पोलॉक त्याच्या देखण्या ड्राईव्जसाठी प्रसिद्ध होता. टाइमिंगची दैवी देणगी त्याला लाभलेली होती. जड बॅट तो वापरायचा आणि कव्हरड्राईव हा त्याचा आवडता फटका. लेगसाइडला खेळताना खेळात त्रुटी जाणवल्याने नंतर त्याने पुल आणि लेगड्राइववर मेहनत घेतली. “चेंडू हा मारण्यासाठीच असतो. तो मारलाच पाहिजे” हे पोलॉकच्या आक्रमक फलंदाजीचे त्याने आयुष्यभर पाळलेले सूत्र होते. ‘त्याला धावा काढण्यासाठी हाफवॉली किंवा लाँग हॉपची गरज नसे. गुडलेंथच्या किंचितसा जरी मागे चेंडू पडला तरी तो अप्पिश ड्राइव, कट किंवा पुल मारू शकत असे’ असे विख्यात लेखक क्रिस्टोफर मार्टिन-जेंकिंसने म्हटलेले आहे. माइक प्रॉक्टर, बॅरी रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांच्या वाट्यालाही आंतरराष्ट्रीय समुदायाने दक्षिण आफ्रिकेवर टाकलेल्या बहिष्कारामुळे फार कमी कसोट्या आल्या. २००३ मध्ये या बहिष्काराबद्दल पोलॉकने ज्या भावना बोलून दाखविल्या त्या त्याला व्यक्ती म्हणून आणखी उंचीवर नेऊन ठेवतात : “आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असतो हे खरेच पण दक्षिण आफ्रिकेमध्ये बदल घडवून आणण्याचा तोच एक चांगला उपाय होता आणि तसा बदल घडून आला याबद्दल मी समाधानी आहे.” <विश्वचषक १९९६, एकोणिसावा सामना वानखेडे स्टेडिअम, मुंबई. भारत वि. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया फलंदाजी स्विकारुन ५० षटकांमध्ये सर्वबाद २५८ धावा. (दोघा सलामीवीरांना फुल ‘मार्क’ वॉ १२६, टेलर ५९) भारताकडून सलामीची जोडी : अजय जडेजा व सचिन तेंडुलकर. संघाच्या ७ धावांवर जडेजा बाद. त्याच धावसंख्येवर अझरच्या विचित्र निर्णयामुळे तिसर्या क्रमांकावर आलेला विनोद कांबळी बाद. “एंटर” सचिन तेंडुलकर…डॅमिएन फ्लेमिंगला पॉइंटच्या मागून कट्, थर्ड मॅनला लोळवून चेंडू सीमापार…मॅग्रा हाफवॉलीवर मिडविकेट सीमापार…मग मॅग्रालाच एक भन्नाट पुल…मॅग्राच्या २ षटकांमध्ये तब्बल २७ धावांची लूट ! शेन ली (ब्रेट लीचा भाऊ)…शॉर्ट पिच्ड बॉल पुढे पाय टाकून सचिनकडून शेनच्या डोक्यावरुन सीमापार…नंतर (पुढे पायही न टाकता) केवळ टायमिंगवर त्याच जागी चेंडू सीमापार. शेन वॉर्न…आखूड टप्प्याचा चेंडू…सचिन बॅकफूटवर…एका टप्प्याने चेंडू सीमापार. ताकदीचा अजिबात इस्तेमाल नाही. मग वॉर्नला दणकट स्वीपचे फटके… मुंबईत सचिन हा धुमाकूळ घालत असताना सुदूर दक्षिणेत अॅडलेडमध्ये एक व्यक्ती सोफ्यात बसून हा सामना पाहत होती. मध्येच त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला (जेसी) हाक मारुन बोलावले आणि म्हटले ‘पाहिलेस ? हा छोकरा थेट माझ्यासारखा खेळतो ना ?’ तोलूनमापून बोलण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या त्या व्यक्तीच्या पत्नीनेही संमतिदर्शक मान डोलावली…ती व्यक्ती होती सर डॉन ब्रॅडमन. भारताच्या १४३ धावांमध्ये सचिनच्या ९० धावा होत्या. मार्क वॉला फटकावण्यासाठी तेंडल्या पुढे आला. त्याच्या पायांची सूक्ष्म हालचाल मार्कने झटकन टिपली आणि झपकन त्याने एक शॉर्टपिच्ड चेंडू ऑफस्टंपच्याही बाजूने टाकला. उरलेले काम यष्टीरक्षक इअन हिलीने पूर्ण केले. संजय मांजरेकर खेळत होता तोवर भारताला विजयाच्या आशा होत्या पण वैयक्तिक ६२ धावांवर तो बाद झाला आणि १६ धावांच्या अंतराने ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. सचिनच्या या अविस्मरणीय खेळीची क्षणचित्रे पाहण्यासाठी <इथे क्लिक करा.>
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply