प्रांजळपणे सांगायचे तर मी कधी काळी मराठीत पुस्तक लिहीन असे वाटले नव्हते. शालेय शिक्षण सारे मराठी माध्यमातून झाले होते खरे पण मराठीत लिहिण्याचा संबंध दहावीनंतर (१९७७ साली) कायमचाच संपला होता. पूर्वी मराठी वाचन खूप केले होते, परंतु गेली दहा वर्षे अमेरिकेतल्या वास्तव्यामुळे ते अगदीच आटून गेले होते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर जवळ जवळ ३०-३२ वर्षांनी मराठीत पुन्हा काही लिहिता येईल का हा प्रश्नच होता.
परंतु कधी काळी शाळेत केलेले वाचन-लेखन बघून, माझ्या आईला का कोण जाणे माझ्यात एक सुप्त लेखक असल्याचे जाणवले असावे. त्यामुळे गेली तीन दशके येता जाता ती माझ्यामागे “काही तरी लिही, काही तरी लिही” अशी भूणभूण लावत असायची. कधी हसण्यावारी नेऊन तर कधी वैतागून मी तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करायचो. कामाच्या व्यापात लेखनासाठी आणि त्यातही मराठी ललित लेखनासाठी वेळ काढणं देखील अशक्यप्राय वाटायचं.
पण ते मराठीचं बीज जे आतमधे रुजलं होतं, ते काळाच्या प्रवाहामधे, विज्ञानशाखेच्या प्रभावाखाली आणि अमेरिकेतल्या वास्तव्यामधे देखील टिकून राहिलं. योग्य वेळ आणि समर्पक विषय यांची वाट बघत राहिलं. त्या बीजाच्या अस्तित्वाची जाणीव मला वरचेवर करून दिल्याबद्दल आणि त्या बीजातून कधी काळी रोपटे उगवेल असा दुर्दम्य आशावाद उराशी बाळगल्याबद्दल, या पुस्तकाचे खरे श्रेय माझ्या आईला द्यायला हवे.
माझे दिवंगत सासरे (विनायक नाडकर) स्वत: अमेरिकेत १९५१ साली उच्च शिक्षणासाठी आले होते आणि फोर्ड, जी.ई. सारख्या प्रख्यात कंपन्यांमधे काम करून १९६२ साली भारतात परतले होते. त्यांच्या उदाहरणाचा व कर्तृत्वाचा माझ्या अमेरिकेत येण्यावर मोठाच प्रभाव पडला होता. आज या पुस्तकाच्या रुपाने त्यांना एकप्रकारे मी श्रद्धांजलीच वहात आहे.
प्रत्यक्ष पुस्तकाच्या लेखनात माझ्या पत्नीची, मृणालची मदत दोन प्रकारे झाली. एक म्हणजे माझ्या कामाच्या वेळा आणि व्याप संभाळून लेखनासाठी मला सवड मिळेल याची जबाबदारी तिने उचलली. दुसरं म्हणजे या वेगळ्या वाटेवरची सहप्रवासी म्हणून, काही अनुभव व आठवणी मला तिच्याबरोबर पडताळून पहाता आल्या.
आपले बाबा पुस्तक लिहितायत ही कल्पनाच आमच्या १६ वर्षाच्या मुलाला, सिद्धार्थला भन्नाट वाटली असावी. पुस्तकातील विविध लेखांविषयी, प्रसंगांविषयी, मी काढलेल्या स्केचेसबद्दल त्याचे कुतूहल कायम जागृत असायचे. पुस्तक प्रकाशित होण्यामागची त्याची निरागस तळमळ व उत्सुकता हे या पुस्तक -प्रकल्पामागील माझे मोठेच प्रेरणास्तोत्र होते.
नवोदित लेखकांचे हस्तलिखीत मान्यवर प्रकाशकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळणे ही किती अवघड गोष्ट आहे हे ‘जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे’. सुरवातीला माझी मेव्हणी सौ. अंजली राजे हिने पुण्यात काही प्रकाशकांकडे या दृष्टीने प्रयत्न करून बघितले. तिला मिळालेल्या फिडबॅकवरून काही लेखांमधे मी थोडेफार फेरफार केले आणि दोन लेख पूर्णपणे नवीन लिहिले. पुस्तकाला पूर्णत्वाला नेण्यातल्या तिच्या प्रयत्नांचा ऋणनिर्देश करणे माझे कर्तव्य ठरते.
या पुस्तकाच्या हस्तलिखीत स्वरुपापासून ते त्याच्या अंतिम स्वरुपापर्यंतच्या प्रवासाचे शंभर टक्के श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते माझी बहिण सौ. निरंजना व माझे मेव्हणे श्री. चंद्रशेखर दामले यांनाच निर्वीवादपणे द्यायला हवे. प्रकाशक शोधण्यापासून, त्यांच्याकडे हेलपाटे मारण्यापासून, प्रुफ रिडींग, एडिटिंगमधे मदत करण्यापासून ते पुस्तकाच्या कॉपीज मुंबईहून अमेरिकेला पाठवण्यापर्यंत या पुस्तकासाठी या दोघांनी जे अपार कष्ट घेतले ते केवळ भाऊ, बहिणच घेऊ शकतील. आपापल्या करिअर्स सांभाळून रात्री बेरात्री जागून, लिहीलेला, टाईप केलेला शब्दन शब्द पुन्हा पुन्हा वाचून, त्यातील शुद्धलेखन तसेच इंग्रजी उच्चारांच्या व इतर चुका, मराठी शुद्धलेखनाची पुस्तके, डिक्शनरी, संदर्भग्रंथांचा आधार घेऊन, वेचून काढण्यासाठी त्यांनी जी धडपड केली ती खरोखरच अजोड आहे. त्या दोघांचे औपचारिक आभार मानण्यापेक्षा त्यांचा आजन्म ऋणी रहाणेच मी पसंत करीन.
नवोदित व मराठी लेखनाची काहीही पार्श्वभूमी नसलेल्या लेखकांचे हस्तलिखीत मोकळ्या मनाने स्विकारणे, त्यातला वेगळेपणा उमजून घेणे व त्याला एका पुस्तकाचे मूर्त स्वरुप देणे, यासाठी प्रकाशक देखील वेगळ्या पठडीतला लागतो.
‘मराठीसृष्टी’चे श्री निनाद प्रधान हे अशा वेगळ्या पठडीतले प्रकाशक आहेत. भारतीय भाषांना संगणकीय क्षेत्रात नाव मिळवून देण्यासाठी गेली १५-२० वर्षे अव्याहत धडपड करणारे श्री प्रधान, मराठीतील विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण लिखाणाला इंटरनेटद्वारा अधिकाधिक वाचक वर्गापर्यंत पोहोचवण्यात धन्यता मानतात. त्यामुळे आधुनिक इलेक्ट्रॉनिक रुपात तसेच पारंपारिक पुस्तक रुपात अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवून त्यांचा प्रवास चालू आहे. ‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ही ‘गावाकडची अमेरिका’ वाचकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल श्री निनाद प्रधान यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
या पुस्तकाच्या हस्तलिखीताचे मराठीत संगणकावर टायपींग करण्याचे किचकट काम श्री. श्रीकृष्ण जोशी (जोशी काका) यांनी ठरलेल्या वेळात व उत्कृष्टपणे पार पाडले याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !
पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या संकल्पनेबद्दल कु. धनश्री प्रधान व कु. पूजा प्रधान तसेच श्री उदय कानिटकर यांचे आणि या पुस्तकाच्या प्रॉजेक्टवर काम केलेल्या ‘मराठीसृष्टी’च्या सार्या टीमचे मन:पूर्वक आभार !
Leave a Reply