नवीन लेखन...

सत्कार, शाल आणि श्रीफळ

कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तरी नक्की आहे. कदाचित देशात इतरत्रही असावी असं टिव्हीवरील इतर प्रांतात विविध व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या सत्कारांच्या क्लिप्स पाहून जाणवतं.

मोठी व्यक्ती म्हणजे, ज्या व्यक्तींनी समाजात समाजासाठी काही भरीव कार्य केलंय अशा व्यक्ती. मग त्या व्यक्तीचं ते कार्य समाजसेवेचं असो वा शिक्षण क्षेत्रातलं असो किंवा सांस्कृतिक क्षेत्रातलं असो वा इतर कोणत्याही क्षेत्रातलं असो, की ज्यामुळे सर्व समाजाचं काहीतरी भलं झालंय. त्या व्यक्तीने समाजासाठी दिलेल्या योगदानाची पावती, समाज अशा सत्कारातून त्यांना देत असतो. तसंच शाळा-काॅलेजात उत्तम गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला जातो, किंवा एव्हरेस्टसारखं शिखर चढून जाणाऱ्यांचाही सत्कार केला जातो. इथं तसंच कुल्याही सत्कारामागचा उद्देश कर्तुत्वाची पोचपावती देणं हा असतो, मोठेपणा वयाचा नसून कर्तुत्वाचा असतो.

आपण वर पाहिलं, की कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार केला जातो. हा सत्कार एखाद्या संस्थेकडून वा संघटनेकडून किंवा मग एखाद्या सभेत केला जातो. संस्था, संघटना अथवा सभा ही विराट समाजाचीच लघुरूपं असतात आणि म्हणून त्यांनी केलेला सत्कार समाजानेच केला असं मानलं जातं. शाळा-काॅलेजातले सत्कार वगळले, तर इतर सत्कार मात्र उभी हयात एखाद्या क्षेत्रात समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचे केले जातात;आणि ते ही बहुतकरून आयुष्याच्या उत्तरार्धात.

सत्कार कुणाचाही असो, त्यात शाल आणि श्रीफळ या वस्तू अपरिहार्यपणे असतात. बाकी सन्मान चिन्ह, बुके, मानपत्र वैगेरे त्या त्या कार्यक्रमाच्या स्वरुपावर अथवा मग त्या कार्यक्रमाच्या बजेटवर ठरवलं जात, पण शाल-श्रीफळ मात्र हवंच. मला कुतुहल आहे, ते या शाल-श्रीफळ देण्यामागच्या कारणांचं. काय कारण असावं बरं या प्रथेमागे? मी सत्कार समारंभात शाल-श्रीफळ देण्याच्या प्रथेमागचं काय कारण असावं, हे कुठं नोंदलंय का, हे शोधून पाहिलं पण मला समाधानकारक स्पष्टीकरण नाहीच मिळालं कुठं. मग मीच विचार करू लागलो आणि त्यातून जो अर्थ काढला, तो तुमच्याशी शेअर करतोय..

आपल्याकडे शालीला महावस्त्र असंही म्हटलं जातं तर श्रीफळ हे पूर्णान्न समजलं जातं. मला वाटतं, सत्कारात मोठ्या सन्मानाने त्या व्यक्तीला अर्पण केल्या जाणाऱ्या या वस्तू म्हणजे, त्या व्यक्तीने आपल्या उमेदीची वर्ष एखाद्या क्षेत्रात कार्य करण्यात घालवलेली असल्याने, त्या व्यक्तीच्या ‘अन्न-वस्त्रा’ती जबाबदारी यापुढच्या काळात समाज घेईल, याचं प्रतिक असावं हाच अर्थ मला सापडतो. ‘शाल’ वस्त्राचं प्रतिक तर ‘श्रीफळ’ अन्नाचं. आणि कदाचित तसंच असावं. एखादी व्यक्ती आपली उमेदीची वर्ष समाजासाठी खर्च करते आणि मग तिच्या उतारवयात तिच्या स्वत:च्या अन्न-वस्त्राचा प्रश्न उभा राहातो आणि अशी वेळी त्या व्यक्तीच्या पुढील आयुष्यात तिच्या अन्नवस्त्राची जबाबदारी समाजाने घेतली आहे असं जाहिर करणं, हेच त्या व्यक्तीला शाल-श्रीफळ देऊन तिचा सत्कार करण्यामागचं प्रयोजन सुरुवातीच्या काळात असावं, असंच मला वाटतं. नंतर मग पुढे पुढे त्या प्रथेतला अर्थ लुप्त होऊन तो केवळ उपचार म्हणून शिल्लक राहीला असावा..! बाकी जसा आपल्या इतर अर्थपूर्ण प्रथांतला अर्थ जावून आता फक्त उपचार राहीलाय, तसंच काहीसं शाल-श्रीफळाचंही झालं असावं..!

समाजातील समाजासाठी काम करणारे, कलावंत, ग्रंथकार, तत्ववेत्ते, कलाकार आदींची जबाबदारी पूर्वीच्या काळी समाज घेत असावा, जेणे करून त्या त्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात पूर्ण एकाग्रतेने काम करता यावं. म्हणूनच कदाचित आपल्या देशांत ज्ञानाची, कलेची एवढी समृद्धी आली असावी. पुढे अशा व्यक्तींना राजाष्रय मिळू लागला व त्यातून महान विभुती निर्माण झाल्या असाव्यात. आता मात्र एखाद्या क्षेत्रात काही करायची मनापासून इच्छा आणि आवड असुनही, लोकाश्रय आणि राजाश्रयही नसल्याने, आपल्या देशात पायाभूत संशोधन किंवा पैशांपलिकडे पाहून एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणं फारसं होताना दिसत नाही. तरीही असं केलंच कुणी, तर त्याची गणना वेड्यांमधे होते. असं गाडून घेऊन काम करण्यामधे सध्याच्या दिवसांत प्रतिष्ठा आणि पैसा नसल्याने, असं करणारची उपासमार होते ही गोष्टही खरी. आणि त्यामुळेच ‘मेड इन इंडीया’ असं अभिमानाने म्हणण्याऐवजी आपल्याला इतर देशांना ‘मेक इन इंडीया’ अशी याचना करावी लागत आहे.

आता मात्र सर्वच बदललं. सध्याच्या काळात मात्र कुणाचाही सत्कार कुणीही करतो. आपापल्यात सत्त्कार घडवून आणायचे आणि त्याचे मोठ्ठाले बॅनर नाक्या नाक्यांवर लावायचे हा अलिकडे पायंडा पडल्याचं दिसतं. स्वत:चीच लार्जर दॅन लाईफ प्रतिमा स्वत:च निर्माण करण्याचं कार्य आपल्याकडे जोरात सुरू आहे. खरं कर्तुत्व नसलं की हे असे शाॅर्टकट्स शोधले जातात आणि यात जे खरोखरंच काही पायाभूत कामं करतात ते मात्र झाकोळले जातात. राजकारणात (मला तर ‘राजकारण’ हा शब्द हल्ली ‘लाजकारण’ असाच ऐकू येऊ लागलाय. कान तपसणी करून घ्यायला हवी.) तर स्वत:चेच सत्कार घडवून आणले जातात. निवडणूक जिंकली म्हणूनही सत्कार केला जातो आणि जेल मधून सजा भोगून बाहेर आलेल्यांचाही शाल-श्रीफळाने सत्कार केला जातो. आता निवडणूक जिंकली किंवा जेलमधे कोणत्यातरी गुन्ब्याची सजा भोगली म्हणजे असं नेमकं काय कर्तुत्व गाजवलं ह्याचाही कुणी विचार करण्याच्या मनस्थितीत नाही, हा काळाचा महिमा. असे सत्कार निवडणूक जिंकणाऱ्याच्या कर्तुवाचे(?) नसून, ‘बाबा, आता जिंकून आलाच आहेस, तर आमच्यावरही कृपादृष्टी ठेव’ अशी नवस बोलीचे असतात, असं मला का कोण जाणे, पण वाटतं. सत्कार का आणि कुणाचा करायचा याचा फार विचार केला जात नाही. त्यामुळे सर्वच सत्कार समारंभामागचं गाभिर्य आणि पावित्र्यही लोप पावलंय.

सर्वच क्षेत्रात दिखावूगिरी आली, तशी ती समाजसेवेतही आली. बॅनरवर लोकसेवेचा आव आणून, प्रत्यक्षात फक्त स्वसेवा (ती ही पुढील काही पिढ्यांची. आपल्या पुढच्या पिढ्या नालायक निपजणार याची केवढी ही खातरी..!) सुरु आहे आणि तसं करणारांचा सत्कारही शाल-श्रीफळ देऊन केला जातो आहे. ‘शाल-श्रीफळा’चा ‘अन्न-वस्त्र’ हा मूळ अर्थ तोच राहीलाय फक्त तो समाजाने स्वत:हून द्यायचा सन्मान राहीला नसून समाजाकडून हिसकावून घेण्याचा हक्क राहीलाय. आयाम पार बदललाय. पूर्वीच्या काळी समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्यांच्या ‘अन्न-वस्त्रा’ची जबाबदारी समाज स्वत:हून घेत असे. आता समाजाला तशी जबाबदारी घ्यायला भाग पाडलं जातं. उदा. वर्गणी, लोकप्रतिनिधीं-अधिकारी यांचे भत्ते-पेन्शन-वैद्यकीय बिलं आणखी टेबलाखालून राजरोसपणे घेतली जाणारी गुप्त खंडणी वैगेर आणखी बरंच काही इ.इ…सत्कार, शाल आणि श्रीफळ यांचा अर्थ किती बदललाय नाही..?

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..