नवीन लेखन...

रामायणातील कांहीं स्त्रिया : थोडें विवेचन

आजचा काळात ‘स्त्री-पुरुष समानते’बद्दल बरीच चर्चा होत असते. हल्ली ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, आपण रामायणातील स्त्रियांचा थोडासा आढावा घेऊं या.

  • सीता –

सीतेचें चरित्र आपल्याला रामायणात पहायला मिळतें व उत्तररामचरित्रातही. भारतीत भाषांमध्येही  राम-सीता या विषयावर काव्यें-महाकाव्यें लिहिली गेलेली आहेत. ज्ञानपीठ पुरस्कात-प्राप्त , व ‘रामायणकल्पवृक्षम्’ या महाकाव्याचे रचयिते तेलुगु कवी विश्वनाथ सत्यनारायण म्हणतात की, ‘वाल्लीकी रामायण ही खरें तर सीतेची कहाणी आहे’.

रामायण ही आदर्शांचीच कहाणी आहे. ‘रघुकुलरीति सदा चली आई । प्रान जाई पर वचन न जाई।’ असे म्हणणारा आदर्श पुत्र राम ; ‘निरोप कसला माझा घेता । जेथे राघव तेथें सीता ।’ असे म्हणून वनात जाणारी आदर्श पत्नी सीता ; पत्नीला मागे ठेवून रामाबरोबर वनवास व दीर्घकालीन ब्रह्मचर्य स्वेच्छेने स्वीकारणारा आदर्श भाऊ लक्ष्मण ; पतीविना चौदा वर्षें त्याची आठवण जपणारी आदर्श विरहिणी उर्मिला ; मिळालेले राज्य निरपेक्षपणे रामाला परत देऊं करणारा, व रामानें वनवास-संपायच्या-आधी-परत-यायला नकार दिल्यावर, एक नव्हे दोन नव्हे तर चौदा वर्षे लालसेविणा रामाच्या नावानें , स्वत: नगराबाहेर झोपडीत राहून, राज्य चालवणारा आदर्श भाऊ व आदर्श माणूस भरत ; हनुमान हा आदर्श भक्त ; परस्त्री सीतेला तिच्या अनुमतीविणा हात न लावणारा रावण हा आदर्श शत्रू ; असे एक ना दोन, अनेक आदर्श !!  खरें तर, ‘हे खग मृग हे तरुबरश्रेनी । तुम देखी सीता मृगनैनी?’ असा आक्रोश करणारा रामही, एक व्यक्ती म्हणून, आदर्श पतीच आहे. राम हा अर्थातच, एक आदर्श राजा आहे, कारण आपण अजूनही रामराज्याचें गुणगान करतो, उदाहरण देतो. पण, रामाच्या इतर भूमिकांचा (रोल् , role) विचार केला तर, राम हा, त्या त्या अन्य  भूमिकांमध्येही ‘आदर्श’ आहे कां, याचा विचार व्हायला हवा.

(टीप : आपण येथें ‘सातवा अवतार’ मानला गेलेल्या मर्यादापुरुषोत्तम रामाचा विचार करत नसून, रामायण व अन्य ग्रंथ यांत वर्णलेल्या राम  या कथानायकाचा विचार करत आहोत. कुठल्याही रामभक्ताच्या भावना दुखावण्याचा तेथें अजिबात हेतू नाहीं ).

माणूस जीवनात विविध भूमिका (roles) प्ले करत असतो, व तो प्रत्येक वेळी प्रत्येक भूमिकेत आदर्श ठरेलच असे नाहीं. माणसाचे काहीं रोल्स् त्याच्या काहीं इतर भूमिकांशी क्लॅश् होऊं शकतात, व निर्णय घेतांना एका ‘रोल’चा विचार केला तर, कदाचित दुसर्‍या ‘रोल’वर अन्यायही होऊ शकतो. अशा वेळी माणसाला त्याच्या प्रायॉरिटीज् ठरवाव्या लागतात, अग्रक्रम ठरवावा लागतो.

राम हा आदर्श शत्रू होता काय ? तर, नाहीं ; कारण त्यानें व्यक्तिगत वैर नसतांनाही, व त्यातूनही, झाडाआडून बालीचा वध केला. पण तो आदर्श राजकारणी मात्र होता, कारण बालीवधामुळे त्याला सुग्रीवाचे व वानरसेनेचे साह्य मिळालें. बिभीषणाचा स्वीकार केल्यामुळे रामाला लंका जिंकणें सोपें झालें , यावरूनही त्याचें राजकारण ध्यानात येतें.   ‘घर का भेदी लंका ढाए’ ही म्हण बरेच काहीं सांगून जाते. (त्या दृष्टीनें, बिभीषण हा आदर्श ‘फितूर’ ठरतो.)

या पार्श्वभूमीवर, आपण  सीतेचा विचार करूं या. सर्वत्र ‘सीता-स्वयंवर’ असा शब्द वापरला जातो. पण तें ‘स्वयंवर’ होतें काय ? स्वयंवरात, विवाहेच्छु तरुणीला स्वत:चा पती निवडण्याचें स्वातंत्र्य असतें. सीतेच्या बाबतीत तसें नव्हतें. राजा जनकानें एक ‘पण’ ठेवलेला होता, व तो होता ‘शिवधनुष्याला प्रत्यंचा चढविणें’ असा . जो पुरुष तो ‘पण’ पूर्ण करेल, त्याच्याच गळ्यात सीतेला वरमाला compulsorily घालावी लागणार ! सीतेला निर्णयस्वातंत्र्य नसलेलें हें कसलें ‘स्वयंवर’ ? तिचें नशीब बलवत्तर म्हणूनच केवळ तिला रामाच्या गळ्यात वरमाला घालता आली. ‘रावणही स्वयंवराला आला होता, व धनुष्य उचलतां उचलतांच तो उताणा पडला’, ही केवळ एक, नंतर घुसडलेलली आख्यायिका आहे. ती प्रक्षिप्त आहे. पण, कल्पना करा, जर खरोखरच रावणानें येऊन ‘पण’ पूर्ण केला असता तर काय झालें असतें ? त्या परिस्थितीत, रावणाच्या गळ्यात वरमाला घातल्यावाचून सीतेला गत्यंतरच नव्हते. मग सीता झाली असती मंदोदरीची सवत ; आणि अरण्यातून रावणानें सीतेचें अपहरण करण्याचा प्रश्नच उठला नसता. बरें, रामानें तरी पण पूर्ण केला होता काय? तो प्रत्यंचा चढवत असतांनाच धनुष्य मोडलें. म्हणजे प्रत्यंचा चढलीच नाहीं. अशा परिस्थितीत, रामानें पण पूर्ण केला आहे की नाहीं, हा निर्णय घेण्याचें स्वातंत्र्यही सीतेला नव्हतें. जनकानें निर्णय घेतला की ‘रामानें पण पूर्ण केलेला आहे’ ; आणि सीतेनें त्याप्रमाणें वर्तन केलें.

या सर्वावरून ध्यानात येईल , सीता किती हतबल होती तें.

रामानें वनवासात जायला  निघाला तेव्हां सीतेनें त्याच्या बरोबर यायचा हट्ट धरला. तो रामानें तो मान्य केला म्हणूनच केवळ, सीतेला वनात कां होईना, पण पतीचा सहवास मिळाला. रामानें सीतेचा हट्ट मानला नसता, तर सीता काय करूं शकत होती ? कांहींच नाहीं. तिला रामाचा निर्णय मानवाच लागला असता. ( उर्मिलेचें काय झालें, त्याची चर्चा नंतर केलेली आहे. तीच स्थिती सीतेची झाली असती ).

अरण्यातून रावणानें सीतेला पळवलें याचें कारण निव्वळ राजकीय होतें. तसें नसतें तर, आणि तो सभ्य नसता तर,  त्यानें केंव्हांच सीतेला भ्रष्ट केलें असतें. कारण पळवलेल्या नारीशी ‘राक्षसविवाह’ करण्याची पुरातन भारतात परंपरा होती.  ( सीता मनानें खंबीर होती हें खरें, तिच्या शरीरातली शक्ती खचितच अपुरी पडली असती, विशेषत: शत्रूच्या बंदीवासात असतांना ). मात्र, नुसतें , तिच्या शीलभ्रष्ट होण्याच्या, शक्यतेचा विचार केला तरी आपल्याला, सीतेच्या , आणि पर्यायानें  स्त्रियांच्या,  असुरक्षिततेची कल्पना येऊं शकते, आणि जीव धास्तावतो.  अनेक महिने रावणाच्या कैदेत राहून सीतेला किती मानसिक क्लेश भोगावे कागले असतील, हें एखादी स्त्री किंवा कुणी मानसशास्त्रज्ञच सांगूं शकेल. सीता दृढनिश्चयी होती, म्हणूनच त्या परिस्थितीतूनही तगली.

रामानें सीतेसाठी युद्ध केलें, तर मग, त्यानें लंकेत सीतेची अग्निपरीक्षा कां घेतली ? तर, जनतेची संभाव्य टीका टाळण्यासाठी. म्हणजेच, त्यानें आपल्या, ‘पती’ या भूमिकेपेक्षा, आपल्या ‘राजा’ या भूमिकेला अग्रक्रम दिला. पण त्यामुळे, खरें तर, सीतेचा प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या अपमान  झालाच.

राम हा राजा झाल्यानंतरच्या काळातील, त्याने केलेला सीतेचा त्याग, ही कथा  वाल्मीकि-रामायणात नाहीं, तर ती ‘उत्तररामचरित’ मधे आहे . परंतु, तें कांहीही असो ;  त्या घटनेतून आपल्याला तत्कालीन सामाजिक विचारधारा नक्कीच दिसून  येते. त्या  घटनेचा विचार करायचा झाला तर , रामानें सीतेचा त्याग करून तिला वनवासात कां धाडलें ? तर, लोकांच्या टीकेमुळे   ‘राजा’ या पोझिशनला, पदाला,  (म्हणजे, स्वत:च्या राजेपणाला नव्हे, तर per se ‘राजा’ या स्थानाला, पदाला) कमीपणा येईल, म्हणून. वेदोपनिषदांप्रमाणे, राजा हा प्रजेच्या पित्याप्रमाणे असतो ; अर्थातच, राजाची पत्नी, म्हणजे राज्ञी, ही प्रजेच्या मातेप्रमाणे असते. अशा , राज्ञी व प्रजेची-माता, या स्थानावरील व्यक्तीवर डाग नको, म्हणून रामानें सीतेला लंकेत  अग्निदिव्य करायला लावलें ; आणि नंतर, कालांतरानें, एका  रजकाचे ( धोब्याचे)  बोल कळताच, ‘नृप म्हणजे प्रजेचा पिता’ या स्थानाची महती कमी होऊ नये, म्हणून सीतेला वनवासाला घाडलें. म्हणजेच, राम हा ‘आदर्श पती’ असूनही, दोन्ही वेळेला जेव्हां त्याच्या ‘राजा’ व ‘पती’ या भूमिकांमधे क्लॅश् झाला, तेव्हां रामानें आपल्या ‘आदर्श राजा’ या भूमिकेला प्राधान्य दिले , ‘पती’ या भूमिकेला दुय्यम मानलें.

पण, हें करत असतांना, सीतेवर मात्र दोनदा अन्याय झालाच, हें मान्य करणें प्राप्त आहे ; इतका की शेवटी मानी सीतेनें रामाकडे परत जाण्यापेक्षा, भूमातेच्या पोटात सामावणें पसंत केलें. ही घटना इतकी बोलकी आहे की, सीतेवरील अन्यायबद्दल अधिक भाष्य करायची जरूरच नाहीं.

  • उर्मिला –

आपण  हेंही ध्यानात घेऊ या की, लक्ष्मण जरी आदर्श भाऊ असला तरी, त्यानें ‘आदर्श भाऊ’ या आपल्या भूमिकेपुढे स्वत:च्या ‘पती’ या भूमिकेला दुय्यम स्थान दिलें, कारण त्यानें आपली पत्नी उर्मिला हिला १४ वर्षें स्वत:पासून दूरच, अयोध्येलाच, ठेवलें, स्वत:बरोबर नेलें नाहीं. ‘मी तुमच्याबरोवर येणारच’ असें सीतेनें ठामपणें सांगितलें, तसें उर्मिलाही म्हणाली नसेल काय ? कदाचित सीतेइतक्या ठामपणानें नसेल, पण म्हणाली तर नक्कीच असेल. पण तें लक्ष्मणानें मान्य केलें नाहीं. विरहिणी उर्मिलेची मन:स्थिती काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी. खरें तर, उर्मिलेवरही अन्यायच झालेला आहे. पण राम-सीता-लक्ष्मण यांची कथा वर्णतांना उर्मिलेचा विचारही बाजूलाच पडतो. तिची व्यथा कितींनी मांडली आहे ? ( मैथिलीशरण गुप्त यांनी मात्र काव्याद्वारें उर्मेलेची व्यथा मांडली).

ज्यांचे पती युद्धावर, किंवा परदेशी असतात, त्या स्त्रियांचा विचार करावा. वर्षानुवर्षें त्या पतीविणा रहातात, पतीचा सहवास, पतिसुख असें त्यांना फारच कमी मिळतें. ‘पती गेले गऽ काठेवाडी’ या नाटकात ही बाब हलक्याफुलक्या पद्धतीनें मांडली आहे, पण खरें तर त्याच्या आंत शिरून आपण विचार केला, तर ती बाब फार गंभीर आहे, हें आपल्या ध्यानात येईल.  सर्व विचार केला की उर्मिलेची कथा व व्यथा आपल्या नीट लक्षात येईल.

  • बालीपत्नी तारा

तारा ही राज्ञी होती. आणि, तिच्या संदर्भात, राज्ञी म्हणजे ‘तत्कालीन राजाची पत्नी’ असाच अर्थ इथें घ्यायचा आहे.  आधी बाली ( वाली ) राजा होता. तेव्हां ती बालीची पत्नी होती. पुढे, बाली युद्धावरून परत न आल्यामुळे, तो मेला असें समजून धाकटा भाऊ सुग्रीव राजा झाला. तारा सुग्रीवाची राणी, म्हणजे बायको झाली. कांहीं काळानें बाली परत आला, त्यानें सुग्रीवाला हाकलून दिलें, व बाली पुन्हां राजा बनला. तारा राज्ञीच, म्हणजे पुन्हां बालीची बायको बनली. पुढे रामानें बालीचा वध केला, व सुग्रीव पुन्हा राजा बनला. तारा राज्ञीच ; म्हणजे ती पुन्हां सुग्रीवाची पत्नी बनली. थोडक्या म्हणजे, ‘बॅडमिंटन’ खेळातल्या  एखाद्या ‘शट्ल कॉक्’ प्रमाणें तारा या पतीकडून त्या पतीच्या ‘कोर्ट’मध्ये ( म्हणजे, इथें शयनगृहात) जात राहिली होती. अशा  पद्धतीला कदाचित वानर-जमातीत परंपरा व मान्यता असेलही. पण तसें वागतांना तारेच्या मनाचें काय झालें असावें , हें रामायण आपल्याला सांगत नाहीं,  आपल्याला त्याची कल्पनाच करावी लागते. राजा झाल्यावर सुग्रीव हा, राज्यात आणि तारा हिच्यात रममाण झाला, इतका की रामाला दिलेल्या वचनाची पूर्ती करायला त्यानें वेळ लावला. रामानें त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी लक्ष्मणाला धाडलें. तेव्हां सुग्रीव तारेबरोबर शयनगृहात होता, व दोघेंही अपुर्‍या वस्त्रांमध्ये होते. लक्ष्मणाच्या क्रोधापासून तारेनेंच सुग्रीवाला वाचवलें.

आपला मुद्दा हा आहे की, आपला आधीचा-पती बाली याचा वध झाल्यानंतर , त्या कृत्याला खरा कारणीभूत असणारा जो सुग्रीव, त्याच्याबरोबर  संग करतांना तारेला कांहींच वाटलें नसेल काय ? पण, खरें तर, पुरातन काळापासून ते अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत, स्त्रिया या एक ‘पोलिटिकल’ किंवा अन्य कांहीं ‘बारगेनिंग’ची वस्तूच मानल्या गेल्या आहेत, व त्यांना बलात् ती परिस्थिती स्वीकारावी लागली आहे, आपल्या भावना माराव्या लागलेल्या आहेत. हें सत्य रामायण काय , किंवा कुठलाही पुरातन ग्रंथ काय, सांगत नाहीं, आपल्याला त्याची कल्पनाच करावी लागते.

  • कौसल्या –

कौसल्या ही दशरथाची पहिली व सर्वात ज्येष्ठ पत्नी. ती कोसलची राजकन्या होती. तिचें कुल दशरथच्या तोलामोलाचें असणार. आणि एक पत्नी असतांनाही दशरथानें आणखी दोन लग्नें केलीच.

आपण ‘एकपत्नी’ असलेल्या रामाचा गौरव करतो, आणि तें योग्यच आहे.  पण तें कां करतो, तर समाजात बहुपत्नीत्वाची चाल शतकानुशतकें रूढ होती ( २०व्या शतकात सरकारनें त्याविरुद्ध कायदा करेपर्यंत) . तें कृत्य कुणालाही गैर वाटलें नाहीं. एवढेंच नव्हे, तर कित्येक पुरुष‘अंगवस्त्र’ही ठेवत असत, व तेंही कुणाला  गैर वाटत नसे. पहिल्या बाजीरावानें मस्तानीशी विवाह केला, हें तत्कालीन धर्नमार्तंडांना मान्य नव्हतें ; त्यानें तिला ‘अंगवस्त्र’ (रखेल) म्हणून ठेवलें असतें, तर कोणाचीच हरकत नव्हती.

‘गंमत’ पहा, ( गंमत कसली, खरें तर, अन्यायच म्हणा ) , दशरथाला पुत्र  होत नव्हता म्हणून त्यानें दुसरें व नंतर तिसरेंही लग्न केलें. पुत्र न होण्याचा दोष कुणाच्या माथीं, तर स्त्रीच्या. पुरुषात कांहीं कमतरता असूं शकेल, हा विचारच कुणाच्याही मनास शिवत नसे.

आपण दशरथाच्या  त्या , नंतरच्या, दोन लग्नांना ‘राजकीय हेतूनें’ किंवा ‘पुत्रप्राप्तीच्या हेतूनें’ असें गोंडस नांव जरी दिलें, तरी सवती आल्यामुळे कौसल्येला किती दु:ख  झालें असेल, याची कल्पना फक्त स्त्रियांनाच येऊं शकते. बरं, सुमित्रा कांहीं कुणा राजवंशातली नव्हती. मग दशरथानें तिच्याशी लग्न कां केलें ? तो तिच्यावर ‘भाळला’ म्हणून ?  याचा उल्लेख कुठे येत नाहीं. असो.

कैकेयीशी दशरथानें विवाह केल्यानंतर, मध्यमवयाकडे झुकणारी कौसल्या,  दशरथाची  ‘नावडती’ राणी बनली ; आणि  कनिष्ठ असूनही, तरुण असलेली व दशरथाला शयनागारीं ‘सुखात’ ठेवून कैकेयी बनली त्याची  ‘आवडती’ राणी.  आजही , एकपत्नीत्वाचा कायदा असूनही, अनेक स्त्रियांना ‘पती आपल्याला सोडेल की काय’ अशा भीतीमुळे असुरक्षित वाटतें. (मुस्लिम स्त्रियांना तर कायम ‘ट्रिपल् तलाक’ ची भीती ! Thank God, की हल्लीच, २०१७ मध्ये,  सुप्रीम कोर्टानें तो घटनाबाह्य ठरवला) . तर मग, पतीनें केलेल्या अनेक विवाहांमुळे, आणि आपलें वय वाढल्यामुळे आपण ‘नावडती’ झालो, याचें कौसल्येला किती बरं दु:ख असेल ?

बरं, त्यातूनही, आपला पुत्र राम हा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे तोच पुढे युवराज होईल, व दशरथानंतर राजा होईल, या आशेवर कौसल्या जगत असेल ; तर  त्या रामालाच वनात जायची पाळी आली. अरेरे ! केवढें मोठें दु:ख ! रामही वनात  जायला सिद्ध झाला, त्यानें पित्याच्या वचनाचा विवार केला, कुलपरंपरेचा विचार केला ; मातेच्या विचार करण्यापेक्षा त्याला ते विचार श्रेष्ठ वाटले, अधिक महत्वाचे वाटले (हायर, ग्रेटर प्रायॉरिटी).  सीतेनें हट्ट धरला म्हणून रामानें तिला संगें न्यायचें ठरवलें. मात्र मातेच्या कसल्याही विनवणीला त्यानें दाद दिली नाहीं. यापेक्षा दुर्दैव तें काय ! उलट, तिला तो सांगतो की, तूं आतां कैकेयीच्या कलाप्रमाणें वाग ! यापेक्षा अधिक मानहानी काय होऊं शकेल ?

  • कैकेयी – ( मराठीत, कैकयी ) –

रामायणात कैकेयीला एक खलनायिकाच बनवलें आहे. ( ग. दि. मां.चा भरत तर ‘गीत-रामायणा’त तिला म्हणतोच – ‘माता न तू वैरिणी’ ). पण, तिच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय दिसतें?

कैकेयी ही दशरथाची तृतीय पत्नी. कैकेयी ही दशरथाच्या मध्यमवयानंतर ( म्हणजे, तत्कालीन वयोमानाप्रमाणे, खरें तर, उतारवयातच) त्याची राणी झालेली आहे. सुमित्रा ही दशरथाची द्वितीय पत्नी राजवंशातली नव्हती, ही गोष्ट विचारात घेतां , कैकेयी सुमित्रेपेक्षा कनिष्ठ मानली गेली नसेलही ; मात्र ती कौसल्येला नक्कीच कनिष्ठ आहे. ती तुलनेनें तरुण असणारच, कारण दशरथ तिच्या सहवासात अधिक वेळ घालवत असे.

आतां बघा, मध्यमवयीन किंवा वृद्धत्वाकडे झुकणारा नृप दशरथ, आणि अशा  त्याला कैकेयराजानें आपली तरुण पुत्री दिली. कारण काय असावें, तर अयोध्येचें राज्य हें एक महत्वाचें राज्य होतें, व घराणेही इक्ष्वाकूचें, सूर्यवंशी. कैकेय हें नक्कीच त्यामानानें लहान व कमी महत्वाचें राज्य होतें असणार.

ध्यानात घेण्याची गोष्ट म्हणजे, दशरथाशी विवाहसंबंध म्हणजे एक कैकेयीच्या घराण्याचा राजकीय निर्णयच होता, व त्यावर बली कोण चढलें, तर कैकेयी.

त्यांतून, दशरथाला अपत्य होण्यात कांहीतरी अडचण होती ( ‘कमी शुक्राणु’ किंवा अन्य कांहीं तत्सम कारण ? ) . कारण दोन पत्नी, व नंतर तीन पत्नी, असूनही, त्याला   पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टि’ यज्ञ करावा लागला, आणि, (राजानें नव्हे, तर, ) राण्यांनी  चरू खाल्ल्यानंतरच त्या  राण्यांना पुत्रप्राप्ती झाली.

कैकेयीनें दशरथाला युद्धात मदत केली ; रथाचा आंस (आरा)  मोडल्यावर त्यात आपला हात घालून रथ पडूं दिला नाहीं, व त्यामुळे दशरथ युद्ध जिंकला ; आणि म्हणून त्यानें कैकेयीला वचन दिलें, ही आख्यायिका, एक प्रक्षिप्त कथा, एक भाकडकथाच वाटते. रथाच्या आंसाच्या जागीं हात घालून रथाला आधार देणे, व रथाची वेगवान चाल सुरूंच रहाणें, हें केवळ अशक्य आहे. हात लगेच मोडला असता व रथ कोसळला असता. खरें तर, कैकेयीच्या आजोबानें दशरथाकडून आधीच वचन घेतलें होतें की कैकेयीचा पुत्रच राजा होईल. तेव्हां रामजन्म झालेला नव्हता, त्यामुळे दशराथाला वचन देतांना कांहीं हेजिटेशन वाटलें नसावें , ‘पुढलें पुढें पाहूं’ असा सूज्ञ विचार त्यानें त्यावेळी केला असावा. पुढे, त्यानें जेव्हां रामाला युवराज म्हणून घोषित करायचें ठरवलें, तेव्हा चतुराईनें त्यानें भरताला, त्याच्या (भरताच्या) आजोळी पाठवून  दिलें, व रामाला यौवराज्याभिषेक करायचा घाट घातला. कैकेयीलासुद्धा ती माहिती अगदी शेवटच्या क्षणीं मिळाली. या सगळ्यातून, ‘दशरथाला आपले वचन पाळायचें नव्हतें’, असा अर्थ निघतो. रामाला मात्र या बनावाची व दशरथानें आधीच दिलेल्या वचनाची कल्पना नसावी. (तुलसीदासांनी लिहिलेलें वाक्य ‘रघुकुलरीति सदा चली आई । प्रान जाहिं पर वचन न जाहिं ।’, हें रामासाठी योग्य असेल, व आहेच ; मात्र तें दशरथाला लागूं होत नाहीं ).

आतां प्रश्न असा आहे की, यात कैकेयीचा काय दोष ? एक तर, तरूण असूनही म्हातारपणाकडे झुकलेल्या दशरथाशी तिला विवाह करावा लागला. ( ध्यानात घ्या . राम वनात गेला तेव्हां पुत्रशोकानें —-  हार्ट फेल होऊन —— दशरथाला मरण आलें नसतें, तरी तो १४ वर्षांनतर राम वनवासातून परत येईतों जिवंत राहिला असता काय हा प्रश्नच आहे. कदाचित त्यामुळेच, राम परत येण्याआधीच मला म्हातारपणामुळे मृत्यू येईल व माझी त्याची पुन्हां भेट होणारच नाहीं, अशा विचारानें दशरथाला तीव्र दु:ख झाले, व तें असह्य होऊन दशरथाला मरण आलें. मात्र, राम १४ वर्षांनी परत आला तेव्हां त्याच्या तिन्ही माता जीवित होत्या, व त्या तिघी त्यावेळी जख्खड म्हातार्‍या होत्या असा उल्लेख नाहीं ; म्हणजेच त्या कदाचित त्यावेळी मध्यमवयीन असाव्यात, किमान कैकेयी तरी.  यावरून दिसून येतें की दशरथाच्या वयात व त्याच्या राण्यांच्या वयात, खास करून कैकेयीच्या वयात, बरेंच अंतर होतें असणार. त्यातून दशरथ संतती देण्यासाठी सक्षम होता काय, हा प्रश्नच आहे. बरं, त्यातूनही, ‘भरताचें युवराज बनणें व त्यानुसार दशरथानंतर भरतानें राजा होणें’ हें दशरथानें आधी दिलेल्या वचनाप्रमाणें घटित होईल, एवढी तरी आशा कैकेयीच्या मनात असणारच. तिचें रामावर प्रेम नव्हते असें नाहीं, मात्र वचनाप्रमाणें भरत युवराज व्हायला तिला हवा होता, यात तिच्या दृष्टिकोनातून कांहींही गैर नाहीं. पण एवढा सॅक्रिफाइस करूनही ( म्हातार्‍या अक्षम माणसाशी लग्न करणें) तिचा विश्वासघात करायचा घाट घातला गेला. अन्याय जिच्यावर, तीच खलनायिका ठरली ! वा रे न्याय !

  • सुमित्रा :

आपण वर उल्लेख केलाच आहे की सुमित्रा ही राजवंशातली नव्हती. तिच्या नांवासोबत (कोसल किंवा केकय असें) कुठलेंही नांव जोडलेलें नाहीं.   पुत्रप्राप्तीसाठी किंवा कुठल्याही कारणासाठी दशरथानें तिच्याशी विवाह केला खरा, पण तिला कायम दुय्यम भूमिकाच घ्यावी लागली. आधी कौसल्येला दुय्यम, नंतर कैकेयी आणि कौसल्या या दोघींनाही दुय्यम.

पुत्रकामेष्टि यज्ञातही सुमित्रा दुय्यमच होती. असें म्हटलें जातें की, चरू दिले गेले ते कौसल्या व कैकेयीला ; सुमित्रेला नव्हे ; आणि त्या दोघींनी आपापल्या चरूंमधील कांहीं भाग सुमित्रेला दिला. तें कृत्य त्यांनी दयाबुद्धीनें केलेलें असेलही; किंवा, ‘आपल्याला समजा पुत्र नाहीं झाला तर सुमित्रेलातरी होऊं दे, पण दशरथाला पुत्र मिळूं दे ( म्हणजेच, दशरथाला संतती होण्याचे ‘चान्सेस’ वाढूं देत ) , असा प्रॅक्टिकल विचार त्या दोघींनी केला असूं शकेल. कांहीं का असेना, पण सुमित्रेला अधिकार म्हणून चरू मिळाला नसून, तो सवतींच्या कृपेमुळे मिळालेला आहे.

बरं, आपला पुत्र युवराज व राजा होईल, अशी अपेक्षा करणें सुमेत्रेला शक्यच नव्हतें.

तर मग, वयानें मोठ्या कां होईना, पण एका राजाशी आपला विवाह झाला, यावरच सुमित्रेनें समाधान मानायचें काय ? पत्नीला पतीच्या प्रेमाची, सहवासाची अपेक्षा असते. तें सुख तिला कितपत मिळालें ? सुमित्रेचा उल्लेखच विशेष येत नाहीं, तिथें तिच्या भावनांचा विचार काय येणार ?

पण आपण ध्यानात घ्यायला हवें की, एक स्त्री म्हणुन सुमित्रेची उपेक्षा झालीच, पण स्वत:च्या वंशामुळेही तिची उपेक्षा झाली.

  • मांडवी :

आतां तुम्ही विचाराल की, ही मांडवी  कोण ? खरें तर, इथेंच मांडवीची उपेक्षा सुरूं होते. ही  सुद्धा जनकपुत्री होती. ही भरताची पत्नी.  दशरथानें  केकेयांना अथवा कैकेयीला दिलेल्या वचनानुसार, जर भरत राजा झाला असता, तर मांडवी महाराणी झाली असती. पण भरतानें राज्य नाकारलें, व तें रामाला त्याच्या अधिकारानुसार देऊं केलें. पण  रामानें, वनवासाचा-अवधी-पूर्ण-झाल्याशिवाय-परत-येण्यांस नकार दिला. तेव्हां भरतानें रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून व स्वत: नगराबाहेर कुटीमध्ये ( झोपडीत) राहून, राम परत येईतों म्हणजे १४ वर्षें राज्य चालवलें. ही १४ वर्षें भरत झोपडीत राहिला. पण मांडवी कुठे राहिली, याचा उल्लेख येत नाहीं. तिलाही झोपडीत रहावें लागलें कां ? की जसें लक्ष्मणानें उर्मिलेला मागे महालात ठेवलें, तसें भरतानेंही मांडवीला राजप्रासादातच ठेवलें ? त्याची आपल्याला फक्त कल्पनाच करावी लागते. तें कांहींही असो, मांडवीला भरताच्या निर्णयानुसार फरपटत जावें लागलें.

उर्मिलेचा उल्लेख तरी होतो,पण मांडवीला मिळते अनुल्लेखातून उपेक्षा.

  • अहिल्या :

अहिल्येची कहाणी सर्वांना माहीत आहे, म्हणून तिची पुनरोक्ती करण्याची आवश्यकता नाहीं. तिनें परपुरुषाशी ( इंद्राशी ) समागम केला तो अपसमजामुळे होता, जाणूनबुजून नव्हे, असें म्हटलें गेलें आहे. पण समजा, तो जाणुनबुजून ( लुब्ध होऊन ) होता-असला तरी, तिला मिळालेली सज़ा त्या अपराधाच्या मानानें फारच जास्त होती. अपसमजापुळे तसें घडलें असेल, तर, त्या शिक्षेची extent तर अगदीच unjustified होती. पत्नी ही जणूं आपली property च आहे, अशा प्रकारें अहिल्येचा पती गौतम ऋषी तिच्याशी वागला, व तिला त्यानें भयंकर शाप दिला. खूप मोठा काळ ती दगड होऊन पडली होती. (‘दगड बनणें’, हा शब्दप्रयोग वाच्यार्थानें असो वा लक्ष्यार्थानें असो, दोन्हीही वाईटच).

राम एका योगायोगानेंच तेथें आला असें म्हटलें माहिजे. त्यानें तिचा ‘उद्धार’ केला नसता, तर तिला कायम असेंच खितपत पडत रहावें लागलें असतें.

  • मंदोदरी –

मंदोदरी ही रावणाची पत्नी. तिच्यासारखी पत्नी असतांनाही रावणानें सीतेचें अपहरण केलें. शूर्पणखेनें भडकावले म्हणून त्यानें तसें केलें, ही भाकडकथा आहे. कदाचित या अपहरणामागील  कारण राजकीय असूं शकेल. कुठल्याही कारणानें हें अपहरण केलेलें असो; हें तर खरें की सीतेला लंकेत आणल्यानंतर रावण तिच्याशी विवाह करूं इच्छित होता. ती राजी होईतों तिला अशोकवनात काहीं महिने बंदी बनवून ठेवलेले होतें.

विचार करा, मंदोदरी ही रावणाची पट्टराणी. तिला सीता ही सवत होणार ! ही भीती व चिंता मंदोदरीला सीतची सुटका होईतों खाऊन टाकत असणार. सीतेला रामाकडे परत पाठवावें, असा सल्ला रावणाला जसा बिभीषण व कुंभकर्ण यांनी दिला होता, तसाच तो मंदोदरीनेंही दिला होता. रावणानें जिथें आपल्या भावांचें ऐकलें नाहीं, तिथें मंदोदरी किस झाड़ की पत्ती !

रामानें सीतेची सुटका केल्यावर त्यासंदर्भातील मंदोदरीची चिंता संपली खरी, पण त्याची किंमत तिला वैधव्यानें चुकवावी लागली, तिचा कांहींही दोष नसतांना ! याचें कंपेन्सेशन म्हणून की काय, आपली पुराणें वगैरे मंदोदरीचें नांव ‘श्रेष्ठ पतिव्रतां’मध्ये टाकतात. पण ती दिशाभूल आहे. ‘शी वॉज् राँग्ड्’, तिच्यावर अन्याय झाला, हेंच सत्य आहे; आणि तें, तिची गणना ‘श्रेष्ठ पतिव्रतां’मध्ये करून  लपणार नाहीं.

  • शूर्पणखा –

शूर्पणखा म्हणजे ‘जिची नखें सुपासारखी आहेत, ती’. शूर्पणखा ही रावणाची बहीण होती.

‘ती राक्षसी होती, व राम-लक्ष्मण यांनी तिला झिडकारलें  तेव्हां तिनें आपलें मूळ अक्राळविक्राळ  (राक्षसी ) रूप धारण केलें, आणि ‘मी तुम्हांला खाऊन टाकीन’ असें ती ओरडली’, ही निव्वळ पुराणिकांनी-रचलेली कहाणी आहे. रावण हा व्युत्पन्न दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याची बहीण ‘राक्षसी’ (राक्षशीण) कशी असेल ? तिची नखें सुपासारखी कशी असतील ? कोणीही आईबाप आपल्या पुत्रीचें ‘सुपासारखी  नखें असलेली’ असें नांव ठेवतील काय ? त्याअर्थी, हें तिचें नांव जर असलेंच, तर तें टोपण नांव असावें. (जसें गणपतीचें ‘शूर्पकर्ण’ म्हणजे ‘सूप-कान असलेला , अर्थात् सुपाएवढे कान असलेला’ असें नांव आहे, तसेंच हें ‘शूर्पणखा’).  शिवाजी महाराजांकडे जशी स्वसंरक्षणार्थ ‘व्याघ्रनखें’ ( वाघनखें ) होतीं, तशी शूर्पणखेकडे ‘शूर्प-नखें’ होती की काय, असा विचार मनात येतो. एक स्त्री मुक्तपणें अरण्यात-वनात संचार करते, तर तिच्याकडे स्वसंरक्षणार्थ कांहींतरी हवेंच हवें.  मात्र असा विचार जुन्या काळातील पुराणिकांनी केला नाहीं. अर्थात्, तिचें मूळ नांव आपल्याला ठाऊक नसल्यानें, आपल्याला तिचा उल्लेख नाईलाजानें ‘शूर्पणखा’ असाच करावा लागणार आहे. पहा, शूर्पणखेवर नांवापासूनच अन्याय होतो !

शूर्पणखा जेव्हां रामाला भेटली तेव्हां ती सुंदर स्त्रीचें ‘रूप’ धारण करून आली असें म्हटलेलें आहे. याचा खरा अर्थ असा की, तिनें केवळ या प्रसंगापुरतें सुंदर रूप धारण केलें असें नसून, ती खरोखर सुंदरच होती. तिनें आपल्याला राम आवडल्याचें सांगितलें तें कांहीं ‘लव्ह अॅट् फर्स्ट साइट’ नसणार, तर तिनें अरण्यात रामाला त्याआधी पाहिलें होतें असणार, व त्यानंतर, एकाएकी नव्हे, तर विचार करूनच, ती रामाला भेटली असणार. सीता कांहीं रामाबरोबर मृगयेसाठी जात नव्हती, त्यामुळे राम विवाहित आहे, याची माहिती शूर्पणखेला नसणें, हें साहजिक आहे. तो कांहीं तिचा दोष नव्हे. मला तूं आवडलास व मला तुझ्याशी समागम करण्याची इच्छा आहे, असें उघडपणें सांगणें, हा दोष मानला गेला, याचें एकमेव कारण म्हणजे ती स्त्री होती. महाभारतातील पराशर ऋषी (ध्यानात घ्या , एक तापसी ऋषी) मत्स्यगंधा-सत्यवतीवर मोहित झाले, व नावेतच त्यांनी तिच्याशी समागम करण्याची इच्छा व्यक्त  केली, व तसा तो केलाही. पण पराशरांच्या या कृत्याला कोणीही नांवें ठेवत नाहीं. मात्र तशीच इच्छा शूर्पणखेनें, एका स्त्रीनें व्यक्त केली, तर ती अयोग्य ठरते!

‘मी विवाहित आहे, तूं लक्ष्मणाकडे जा’ असें रामानें तिला सांगितलें. याचा सरळ अर्थ असा की लक्ष्मण अविवाहित आहे. असा शूर्पणखेचा अपसमज रामानें करून दिला. हें योग्य होतें काय ? बरं, शूर्पणखेनें कुठलीही जोरजबरदस्ती ना रामावर केली, ना लक्ष्मणावर केली. आपल्या मनातली इच्छा प्रगट करणें हा गुन्हा आहे काय ? पण लक्ष्मणानें काय केलें, तर शूर्पणखेचे नाक-कान कापून टाकले ! हा काय न्याय ! पण  ज्या काळात स्त्रिया राजप्रासादात  ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करीत ( सीता हा अपवाद), तिथें एका स्त्रीनें आपली समागमेच्छा अशी उघडपणें व्यक्त करणें, हे त्या काळात,  निंदनीय व ‘सजा देण्यायोग्य’ मानलें गेलें ! (रामानें स्वत: शूर्पणखेचे नाक-कान कापले नाहींत, एवढाच आपल्याला सोलेऽस. लक्ष्मण तिला कांहींतरी सांगून वाटेला लावेल असें रामाला वाटलें असावे. लक्ष्मण एकदम शूर्पणखेचे  नाक-कान कापूनच टाकेल, असें कदाचित रामाला वाटलें नसावें. असो).

रामायणाच्या कथेत आपल्याला, ‘शूर्पणखेचे नाक-कान कापले व तिनें जाऊन रावणाला चिथवलें’, एवढेंच कळतें. पण खरें म्हणजे, तिनें तर रामाची प्रशंसाच केली होती. पण आपली चूक नसतांना, केवळ मनातली इच्छा प्रगट केल्याचे केवढी अन्याय्य सजा शूर्पणखेला आयुष्यभर भोगावी लागली , याचा आपण विचारही करत नाहीं. हा हन्त हन्त !

  • समारोप :

सीता रामायणातली नायिका आहे. त्यामुळे तिच्याबद्दल विस्तृत वर्णन मिळते, व त्यातून, तिच्यावरील अन्यायाचें आपणाला दर्शन होतेंच. वर उल्लेखलेल्या अन्य स्त्रिया या रानायणातील दुय्यम पात्रें आहेत. म्हणुन आपण मुख्य कथेच्या प्रवाहात  वहात असातांना, त्या अन्य स्त्रियांचा विचार करत नाहीं; व त्यामुळे, त्यांच्यावर झालेले अन्याय, त्यांची झालेली उपेक्षा, त्यांच्या भावना, त्यांच्या वेदना, अशा गोष्टींकडे आपलें लक्षही नसतें. पण आपण जरासें अंतर्मुख झालो, तर तें सर्व आपल्याला स्पष्टपणें  जाणवायला लागतें.

आणि, शेवटी मनात विचार येतो की आज, एकविसाव्या शतकात, म्हणजे  रामायणाच्या कैक सहस्त्रकें नंतर, स्त्रियांच्या परिस्थितीत कितीसा बदल झालेला आहे ? विशेषकरून महानगरांबाहेरील ‘परंपरावादी’ समाजात त्यांना आजही किती सहन करावें लागत आहे !  ‘इनफर्मेशन इज् दि फर्स्ट स्टेप् टु पाँडरिंग अँड अॅक्शन’. आजचा समाज तें करेल काय ?

— सुभाष स. नाईक.           
Subhash S. Naik

भ्रमणध्वनी – ९८६९००२१२६.  
E-Mail : vistainfin@yahoo.co.in

 

Synopsis –

From Sita to Kaikeyi, from Shurpanakha to Mandodati, Ahilya to Tara, all women have some sort of ‘lower’ position in the society. This article carries a short-analysis of these aspects of their overall life.

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..