कांजिण्या: प्रत्यक्ष लागण झाल्यापासून दहा ते सतरा दिवसांत होणारा हा विषाणूजन्य आजार आपल्या ओळखीचा आहे. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसणारा हा आजार मोठेपणीही होऊ शकतो; पण एकदा होऊन गेला असेल तर सहसा पुन्हा होत नाही. हवेतून, प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे किंवा हाताळलेल्या वस्तूंद्वारे विषाणू पसरतात. एखादा दिवस ताप, भूक मंदावणे, सर्दी अशी |लक्षणे दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाण्यासारखे फोड छाती-पोटावर आणि इतरही अंगावर उठू लागतात. नवीन नवीन फोड उठणे, ताप येणे हा प्रकार सात-आठ दिवस सुरू राहतो.
अंगाला खूप खाज येते. या आजारातून सहसा गंभीर समस्या उद्भवत नाहीत, त्यामुळे आंघोळ करून अंग स्वच्छ ठेवणे आणि ताप सर्दीसाठी पॅरासिटॅमॉल घेणे एवढे उपाय पुरतात. एसायक्लोव्हिरच्या औषधाने हा आजार लवकर बरा होऊ शकतो. पुरळ उठण्याआधी एक दिवसापासून ते पुरळाला पूर्ण काळ्या खपल्या येईपर्यंत, कांजिण्यांच्या पेशंटपासून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे तेवढे दिवस मुलांना शाळेत पाठवू नये. गरोदर स्त्रियांना कांजिण्या झाल्यास त्यांच्या गर्भाला व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. कांजिण्या होऊ नयेत म्हणून वयाच्या एक वर्षानंतर व पंधरा वर्षांनंतर लस घेता येते.
स्कार्लेट फीवर: स्ट्रेप्टोकॉकस नावाच्या हवेतून पसरणाऱ्या जिवाणूमुळे हा आजार होतो. अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून खूप ताप येणे, घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, क्वचित उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. घशाला सूज असते, जिभेवर पांढरट पुरळ उठते. अंगावर खरखरीत, चट्ट्यांसारखे पुरळ मुख्यतः काखेत, जांघेत व इतरही भागात उठते. पेनिसिलीन किंवा ॲमॉक्सिसिलीन अँटिबायॉटीकने या हा आजार सहज बरा होतो. इतर अनेक
आजारांमध्ये पुरळ आणि ताप एकत्र दिसू शकतात. डेंग्यूच्या तापात, टायफॉइडमध्ये पुरळ उठू शकते. रक्त गोठवणाऱ्या प्लेटलेट्सच्या पेशी कमी झाल्यास मलेरियातही पुरळ उठते. पुरळ उठणे हे आजाराच्या गंभीरपणाचे लक्षण असू शकते. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला वेळीच घ्यावा.
डॉ. योगेन्द्र जावडेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply