
फायब्रोस्कोप म्हणजेच एन्डोस्कोप नावाच्या यंत्राने आपल्याला मानवी अवयवांची अत्यंत अचूक अशी तपासणी करता येते. सर्पिलाकार दिसणाऱ्या या अवयवाने केल्या जाणाऱ्या तपासणीला एन्डोस्कोपी म्हणतात. ही एक प्रकारची दुर्बीण असते व ती मानवी शरीरात घालून कुठे काय झाले आहे हे पाहता येते.
अगदी सुरुवातीच्या काळात यात वापरल्या जाणाऱ्या नळ्या या काहीशा कठीण होत्या. त्या नळ्यांना नेत्रिका म्हणजे आयपीस एका बाजूला लावलेला असे व बघण्यासाठी भिंग व प्रकाश स्त्रोत हा दुसऱ्या टोकाला असे. या यंत्रात अभियंत्यांनी नंतर काही बदल केले व हा एन्डोस्कोप अधिक लवचिक करण्याकडे त्यांचा कल होता.
फायबर ऑप्टिक्सचा म्हणजे प्रकाश धाग्यांचा शोध लागल्यानंतर मानवी शरीराची तपासणी करण्यासाठी एंडोस्कोपचा वापर आणखी वाढला. कारण त्यामुळे हे साधन प्रभावशाली बनले होते. फायबर ऑप्टिक्समध्ये जे काचेचे प्रकाशीय धागे वापरले जातात, ते केसासारखे बारीक असतात. त्यांच्या मदतीने आपल्याला प्रतिमा अधिक स्वच्छपणे बघता येतात. एका केबल मध्ये अशा अनेक बारीक धाग्यांचा गठ्ठा एकत्र बांधता येतो. यात अवयवांची तपासणी करायची असते त्या ठिकाणी फायब्रोस्कोपचा जो भाग जातो त्याला फोटोग्राफी किंवा व्हिडीओ कॅमेरा लावलेला असतो. जे टोक बाहेर असते तेथून दिवा किंवा लेझर यांचा किरण सोडला जातो व तो प्रकाशीय धाग्यामार्फत कॅमेरा पर्यंत जातो.
फोरसेप (एअर जेट) किंवा वॉटर जेट यांच्यासमवेत हा फायब्रोस्कोप वापरता येतो. त्यामुळे काही छोट्या शस्त्रक्रियाही करता येतात. तसेच फोरसेपच्या मदतीने उतींचे नमुने घेता येतात व नंतर त्यांची तपासणी करता येते.
फायब्रोस्कोप मध्ये कुठल्याही अवयवाच्या अंतर्गत भागातील जास्तीत जास्त प्रतिमा मिळाव्यात व त्या टिकून राहाव्यात यासाठी फायबर ऑप्टिक्स धाग्यांना एक खास संरक्षक आवरण दिलेले असते. त्याला क्लॅडींग असे म्हणतात. त्यामुळे प्रकाश हा या धाग्यांच्या गाभ्याकडे वळवला जातो. प्रकाशीय तंतूंमध्ये जितका प्रकाश जास्त तितका संबंधित अवयवाच्या प्रतिमेतील बारकावे नष्ट होण्याचा धोका कमी असतो.
ग्रीक व रोमन काळात असे साधन होते याचे पुरावे मिळाले आहेत. १८०५ मध्ये एन्डोस्कोप तयार करण्याचा मान फिलीप बोझिनी यांनी पटकावला. डॉ. रुडॉल्फ शिंडलर यांनी पहिला लवचिक गॅस्ट्रोस्कोप तयार केला. त्याच्या मदतीने पोटाची तपासणी करता येते. त्यानंतर गॅस्ट्रोकॅमेऱ्यामुळे त्यात प्रगती झाली.
व्हिडिओ स्कोप यंत्रात तर एका बाजूला सीसीडी कॅमेरे लावून शरीराच्या आतील भागाचे चित्रण टीव्ही किंवा संगणकावर बघण्याची सोय झाली.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.
Leave a Reply