फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ रोजी झाला.
मा. माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी देहराडून येथे असलेल्या भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली. माणेकशॉ यांनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकिर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती होते ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले होते.
७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले.
याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात. भारत सरकारने मा.माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. १ जानेवारी १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. १५ जानेवारी १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.
मा.माणेकशॉ यांचे २७ जून २००८ रोजी निधन झाले.
Leave a Reply