राज्यातील ग्रामीण भागात राहणारी युवती मुंबईतील गिरगावातील चाळीत राहत असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीत सून म्हणून राह्यला येते आणि तिची होणारी कुचंबणा, पती व पत्नी यांना सहवास आणि संवाद यात येणारे अडथळे आणि मग मुंबईत स्वतःचं घर घेण्याच्या स्वप्नाची पूर्ती करण्यातील आव्हाने याची नर्मविनोदी मांडणी केलेल्या पारिजात चित्र बॅनरच्या “मुंबईचा जावई ” ( सेन्सॉर संमत २५ मार्च १९७०) या चित्रपटाच्या प्रदर्शनास एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. वसंत काळे यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित होता. पटकथा व संवाद राम केळकर यांनी लिहिले होते. तुषार प्रधान निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा ठाकूर यांनी केले होते. या चित्रपटात सुरेखा, अरुण सरनाईक, शरद तळवळकर, रत्नमाला, मालती जोशी, विमल राऊत, रजिता, राजा दाणी, रामचंद्र वर्दे, नारायण भावे, पुष्पा भोसले, भालचंद्र कुलकर्णी, जयंत भट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची गीते ग. दि. माडगूळकर यांची असून त्यांना संगीत सुधीर फडके यांचे आहे. या चित्रपटात सुरुवातीला नीलम प्रभू आणि अरविंद देशपांडे यांचे निवेदन आहे.
या चित्रपटाचे कथा सूत्र काहीसे असे होते. अप्पा पोंक्षे हे आपल्या मोठ्या कुटुंबासह मुंबईतील एका चाळीत राहत असतात.तिथेच रमीचा डाव,अविनाश-मंजू यांच्या नाटकाच्या तालमी रंगत असतात. धाकटा मुलगा अरविंद याचेलग्न दुर्गाबरोबर होते.दुर्गा बेळगावच्या प्रशस्त वाड्यात वाढलेली असते.त्यामुळे मुंबईतील लहान जागेत जमवून घेणे तिला जड जाते.नंदीहळ्ळी म्हणजे दुर्गाचे काका,मुंबईची जागा पाहून दुर्गाला परत घेऊन जायला निघतात.पण अप्पा,माई,अविनाश-मंजू हे सारे अरविंद-दुर्गच्या सुखाचा मार्ग शोधून काढतात.
या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला, कशी करु स्वागता अशी या चित्रपटात गाणी आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण गिरगावातील खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉक येथे झाले होते. याच लोकप्रिय चित्रपटावरुन दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी १९७२ सालीहिंदीत ‘पिया का घर ‘ या चित्रपटाची निर्मिती केली. तर २०१७ साली समीर विध्वंस दिग्दर्शित ‘डबल सीट ‘ या चित्रपटाची थीम काहीशी याच चित्रपटासारखी आहे. त्या काळी ‘मुंबईचा जावई ‘ मुंबई शहरात गिरगावातील मॅजेस्टीक सिनेमा आणि दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
https://www.youtube.com/watch?v=r7QGX0SjH9k
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य: मराठी फिल्मडेटा.कॉम
पुणे.
Leave a Reply