नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – खो खो

काही वर्षांपूर्वी केदार शिंदेंच्या कल्पनेतून लोच्या झाला रे हे नाटक रंगभूमीवर दाखल झालं. आणि विनोदी फॅन्टसी यांचा अनोखा मेळ साधत प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन झालं. आता याच नाटकाची कथा, विषय हे चित्रपट रुपाने आपल्या भेटीला आलं आहे खोखो च्या रुपाने. चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराने अभिनय तर उत्तम केलाच आहे पण वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेत चपखल असल्याचं दाखवलं आहे.

भरत जाधव अर्थात श्रीरंग देशमुख हे पेशाने शिक्षक, साधा सरळ दिनक्रम, सामान्य नागरिकासारखा जगणारा, ना कोणाच्या अद्यात-मद्यात असा माणूस. अशातच त्यांची बदली स्वत:च्या मूळ गावी असलेल्या शाळेत होते. इतके वर्षानंतर गावात आल्यानंतर जुन्या घरात (म्हणजे वाडा) ते वास्तव्याला थांबतात.

परंतू तिथे मेहता नावाचा व्यावसायिक जागा विकून टॉवर बांधण्यासाठी त्यांना धमकी देतो. प्रसंगी गुंडांमार्फत मारहाणही होते. त्यामुळे देशमुखांची प्रचंड तारांबळ उडते. आणि ते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. अशा अवस्थेत आदिमानव काळापासून ते संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेले अनेक नेते यांच्या पूर्वजांचे एकामागून एक अशा सात पिढ्यांमधील कतृत्ववान व्यक्तींचे चित्रपटातील विविध प्रसंगानुरुप आगमन होत जाते. आनि कथेचं औत्सुक्यही वाढतं. पण या सर्वच पिढ्यातील प्रतिनिधींपैकी आदीमानवाची भूमिका साकारणार्‍या सिद्धार्थ जाधव चित्रपटातील काम, वावर आणि मुख्य म्हणजे अभिनय यासाठी पैकीच्या पैकी गुण हे द्यावेच लागतील. आणि भरत जाधव यांची त्या भूमिकेशी केमिस्ट्री जुळल्यामुळे थिएटरमध्ये हास्याचा एकच कल्लोळ माजतो.

मध्यांतरानंतरही अनेक पूर्वजांचं आगमन होतं. नृत्यांगनेची व्यक्तीरेखा साकारणार्‍या क्रांती रेडकरचंही काम लक्षवेधी आहे. अर्थात चित्रपट म्हटला की नायिका ही आलीच. मग त्या मध्ये प्रेमाच्या आणाभाका, रोमॅण्टिक गाणं हे सगळं ठरलेलंच आहे. नायिकेचं काम तसं या चित्रपटात नेमकंच आहे. प्राजक्ता माळी हिने सुमन घाटपांडे ही व्यक्तीरेखा साकारली असून एकूणच तिचा वावरही ठिक आहे. पण इतर व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या थोड्याशा उदबोधन करणार्‍या वाटतात. पण भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाच्या किमयेमुळे चित्रपटातील अपवाद आणि त्रुटी पूर्णत: झाकल्या जातात.

उषा उथुप यांच्या स्वरातील गीत चित्रपटाच्या प्रसंगाप्रमाणे दाखवलं आहे. त्यामुळे हे गाणं म्हणजे चित्रपट पाहताना मनोरंजनाचा तडका आणखीन वाढतो. त्याव्यतिरिक्तही आणखीन गाणी या चित्रपटात पाहायला मिळतात पण खरंच इतक्या गीतांची गरज होती का ? असा प्रश्न नंतर पडतो. त्यापेक्षा दृश्यांप्रमाणे अधून-मधून कडवी आली असती तर तेही समर्पक वाटलं असतं.

चित्रपटाच्या पूर्वार्धाचा भाग काहीसा ओढल्यासारखा वाटतो. त्यामुळे अकारण चित्रपटाची लांबी वाढली आहे. चित्रपटाच्या शेवटी अचानकपणे श्रीरंग देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो. पण त्यातून ते कशा पद्धतीने सुखरुपपणे बरे होतात आणि सहज वावरतात, या आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या मनात प्रश्न निर्माण करतात.

चित्रपटाचा उत्तरार्ध विशेषत: शेवटच्या प्रसंगामध्ये भरत जाधव यांनी साकारलेली सात वेगवेगळ्या व्यक्तीरेखेची माणसं अर्थात आपले पूर्वज हे खरं तर आव्हानात्मकच होतं. पछाडलेला या चित्रपटात भरत जाधव यांना आपण अशा व्यक्तीरेखेत पाहिलंही होतं. पण खोखो ची कथा वेगळी असल्यानं ती भूमिका या चित्रपटात डोकावत नाही. शेवटही या चित्रपटाचा दमदार आहे.

तांत्रिक, कलादिग्दर्शनाच्या दृष्टीने चित्रपट थोडासा बारगळलेला आहे. पण कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे चित्रपट सकस ठरतो.

लोच्या झाला रे हे नाटक ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी केदार शिंदेंचा खोखो म्हणजे मनोरंजनाची आणि हास्याची पर्वणीच म्हणता येईल. कलाकारांच्या अभिनय गुणांसाठी आणि केदार शिंदेंच्या दिग्दर्शनासाठी खोखो नक्कीच उजवा ठरतो आणि पैसा वसूल झाल्याची भावना मनाला पटवून जाते.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..