नवीन लेखन...

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील बेनाडी या गावात झाला. प्राथमिक शिक्षण तिथेच घेऊन पुढे दिनकर पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला ते आपल्या मामाकडे राहात.

दिनकररावांचे वडील दत्ताजीराव हे कोर्ट-कचेरीच्या कामासाठी कायम फिरस्तीवर असत. कोल्हापुरात त्या वेळी राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, सिटी हायस्कूल व विद्यापीठ हायस्कूल अशा शाळा होत्या. दिनकर द. पाटील यांचा वडीलांना विद्यापीठ हायस्कूलचे ‘भक्ती ईश्वेराची-सेवा मानवाची’ हे ब्रीदवाक्य इतके आवडले, की त्यांनी दिनकरचे नाव त्याच शाळेत घातले. या शाळेत त्या वेळी मा.विनायक व मा.गजानन जागीरदार हे शिक्षक होते. मा. विनायक विद्यार्थ्यांना देशप्रेमाच्या कविता शिकविताना एखाद्या जहाल देशभक्ताप्रमाणे विलक्षण तेजाने तळपत. त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेची गोडी लावली व त्यांच्यावर ‘साहित्याचे संस्कार’ घडविले.

त्या काळात शाळा-कॉलेजातील सर्व विद्यार्थ्यांचे आवडते लेखक होते – वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके. विद्यापीठ हायस्कूलमधील साहित्याने झपाटलेले ‘साहित्यप्रेमी’ दर रविवारी विनायकांच्या घरी जमत. मा. विनायक त्यांना ‘किलरेस्कर’ मासिकात छापून आलेल्या फडके-खांडेकरांच्या कथा वाचून दाखवत. अशा प्रकारे दिनकरमधला साहित्यिक मा. विनायकांनी घडविला. पुढे उच्च शिक्षणासाठी दिनकरने राजाराम कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे कादंबरीकार ना. सी. फडके व ‘प्रेमाचे शाहीर’ कवी माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन त्यांना शिकवायला होते. त्यांच्या प्रेरणेने दिनकर लिहायला लागला.

राजाराम कॉलेजच्या ‘राजारामियन’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. विद्यार्थीदशेतच त्यांनी सेवक, सत्यवादी अशा कोल्हापूरच्या वर्तमानपत्रातून लिहायला सुरुवात केली आणि लवकरच ‘किलरेस्कर’ मासिकाच्या कथास्पर्धेत दिनकरला ‘एरिना’ या कथेसाठी पहिला पुरस्कार मिळून तो मान्यवर लेखक झाला. याच सुमारास दिनकर ‘शारदा मंडळ’ नावाची एक साहित्य संस्था चालवित होते. त्या संस्थेने एकदा मुलींची वक्तृत्व स्पर्धा ठेवली. त्या स्पर्धेत मुलींच्या शाळेतली सुमन शिंदे नावाची विद्यार्थिनी पहिली आली. दिनकर ‘शारदा मंडळा’चे प्रमुख असल्यामुळे, त्यांचा सुमनशी परिचय झाला. पुढे तो इतका वाढला, की दिनकर चक्क सुमनच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करायचे ठरवले. दिनकरच्या वडिलांना हे प्रेमप्रकरण समजले, तेव्हा ते चिडले, पण दिनकर आपल्या निर्णयावर ठाम होता, त्यामुळे वडलांनी त्याला घराबाहेर काढले.

मास्तर विनायक यांना हे समजताच त्यांनी दिनकरला बोलावून घेतले व त्यांच्या ‘हंस पिक्चर्स’मध्ये सहायक म्हणून दाखल करून घेतले. तेव्हापासून म्हणजे, सन १९४१ पासून ते विनायकांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९४७ पर्यंत सुमारे सहा वर्षे दिनकर विनायकांकडे होते. विनायकांच्या ‘हंस पिक्चर्स’ चे रूपांतर ‘नवयुग’मध्ये झाले व पुढे नवयुग बंद पडल्यावर, विनायकांनी स्वत:ची ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ ही नवी चित्रसंस्था कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत सुरू केली. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे ‘माझे बाळ’, ‘गजाभाऊ’ व ‘चिमुकला संसार’ हे चित्रपट निघाले.

दुसर्‍या जागतिक महायुद्धामुळे त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने प्रत्येक चित्रपट संस्थेने ‘युद्ध प्रचार’ करणारा चित्रपट काढलाच पाहिजे, असा फतवा काढला. त्या वेळी विनायकांनी ‘बडी माँ’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘भारतमाता ही आपली आई आहे व तिचे रक्षण करताना प्राणार्पण करणे हा तिच्या पुत्राचा धर्म आहे’- असा ‘बडी माँ’चा विषय होता. या चित्रपटाची गाणी इतकी चांगली होती, की त्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीच एका धनिक इसमाने तो प्रचंड किमतीत विकत घेतला. त्या पैशातून मग विनायकांनी ‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे मुंबईला स्थलांतर केले. ‘प्रफुल्ल’चा सारा स्टाफ विनायकांनी मुंबईला आणला. त्या सर्वांची त्यांनी मुंबईला नाना चौकातील शंकरशेठवाड्यात राहायची सोय केली. दिनकररावही त्यांच्याबरोबर मुंबईला आले.

मुंबईत विनायक ‘प्रफुल्ल’चा ‘मंदिर’ नावाचा एक चित्रपट तयार करीत होते. याचवेळी दिनकररावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक अतिशय हृद्य प्रसंग घडला. जुन्या ‘हंस पिक्चर्स’चे व्यवस्थापक वामनराव कुलकर्णी हे विनायकरावांना भेटायला मुंबईला आले होते. तिथे त्यांना दिनकररावसुद्धा भेटले. दिनकररावांची व त्यांची जुनी ओळख होती. त्यांनी सहज दिनकररावांना विचारले, ‘तुझ्याकडे एखादी ठणठणीत स्टोरी आहे का?
‘खणखणीत म्हणजे’? दिनकररावांनी विचारले.. ‘अरे, खणखणीत म्हणजे बंद्या रुपयासारखी वाजणारी..’ वामनराव. ‘अच्छा.ऽ म्हणजे जिच्यावर चित्रपट धंदा करेल अशी!’ दिनकरराव.
‘करेक्ट! नाही तर मग हा धंदा करायचाच कशाला?’ वामनराव.

दिनकररावांची ‘वाघ्यामुरळी’ नावाची एक ग्रामीण कथा त्या वेळी ‘किलरेस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यांनी ती वामनरावांना दाखवली. त्यांना ती आवडली. त्यांना त्यांच्या ‘मंगल पिक्चर्स’ या नवीन चित्रसंस्थेसाठी पहिलाच चित्रपट काढायचा होता. या चित्रसंस्थेचे सूत्रधार होते बाबूराव पेंढारकर. त्यांनाही ही कथा खूप आवडली. इतकी की त्यांनी या चित्रपटाचे पटकथा-संवाद दिनकररावांनीच लिहावे, अशी इच्छा व्यक्त केली. दिनकरराव त्या वेळी विनायकांकडे ‘मंदिर’च्या कामात व्यस्त होते. त्यांनी विनायकांकडे पंधरा दिवस रजा मागून कोल्हापूरला जाऊन आपल्या ‘वाघ्यामुरळी’ या कथेवरून पटकथा-संवाद लिहून काढले. चित्रपटाचे नाव ठरले – ‘जय मल्हार’.

बाबूराव पेंढारकरांच्या मनात या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांनीच करावे, असे होते. बाबूरावांनी मग विनायकरावांना भेटून तशी परवानगी मागितली. कारण, दिनकरराव त्या वेळी विनायकरावांकडे काम करीत होते; पण विनायकरावांनी बाबूरावांना स्पष्ट सांगितले – ‘दिनकर माझा सहायक आहे. त्याला दिग्दर्शक मीच करणार!’ नियतीचा खेळच इतका विचित्र असतो, की विनायकरावांचे हे शब्द लवकरच निराळ्या अर्थाने खरे झाले. मंदिर पूर्ण होण्याआधीच विनायकरावांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे अपुरा राहिलेला ‘मंदिर’ पूर्ण करण्याची जबाबदारी शांतारामबापूंनी दिनकररावांवर सोपवली. आणि अशा रीतीने विनायकरावांनी आपल्या मृत्यूचे मोल देऊन आपला शब्द खरा केला. त्यांनीच दिनकररावांना दिग्दर्शक केले!

‘मंदिर’पासून दिनकरराव दिग्दर्शक झाले, तर ‘जय मल्हार’पासून ते कथा-पटकथा-संवाद लेखक झाले. ‘जय मल्हार’पासून मराठीत लावणीप्रधान ग्रामीण चित्रपटांचे युग सुरू झाले. मराठी चित्रपट समीक्षक गमतीने म्हणाले, ‘जय मल्हार’पासून मराठी चित्रपट पाटलाच्या वाड्यात घुसला!’

दिग्दर्शनाबाबतीत दिनकरराव विनायकरावांचे शिष्य होते. त्या वेळी दिग्दर्शनाच्या बाबतीत – भालजी पेंढारकर स्कूल, व्ही. शांताराम स्कूल व विनायक स्कूल ऐनभरात होते. दिनकरराव दिग्दर्शक म्हणून जरी ‘विनायक स्कूल’चे असले, तरी संवाद लिहिताना त्यांना भालजींची खटकेबाज शैली अनुकरणीय वाटली. दिनकररावांनीच एका ठिकाणी लिहून ठेवलेय – ‘अनुकृती हा बाल्याचा, अनुरक्ती हा तारुण्याचा आणि अनुभूती हा प्रौढत्वाचा आत्मा असतो. या न्यायाने आताशा माझी म्हणून एक खटकेबाज संवादाची भाषा तयार झाली आहे. बाबांना (भालजी) ती पसंत पडली असावी. कारण, एकदा ते माझ्या माघारी बोललेले मला कुणी तरी सांगितले, बाबा म्हणाले होते – ‘माझे शिष्यत्व सांगणारे कुणी असोत नसोत; पण माझा खरा शिष्य कोणी शोभत असेल, तर दिनकर पाटीलच!’

खरी गंमत पुढेच आहे. भालजींनी त्यांच्या स्वत:च्या ‘मायबहिणी’ या चित्रपटाची पटकथा-संवाद दिनकररावांना लिहायला सांगितले. (कथा भालजींची होती) इतकेच नाही, तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांवरच सोपवले होते. त्यावर दिनकररावांनी गमतीने लिहिलेय – ‘एकलव्याप्रमाणे बाबांचे शिष्यत्व मी पत्करले होते खरे, माझी तयारी पाहून गुरुदक्षिणेपोटी बाबांनी माझा अंगठाच कापून मागायला हवा होता. पण तसे काही न करता या आधुनिक द्रोणाचार्याने आपले धनुष्यच मला बहाल करून टाकले होते!’ ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून दिनकररावांनी चित्रनिर्मिती सुरू केली. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांचे लेखन व सुमारे पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन (यात दहा अनुबोधपट होते) केले.

साहित्यक्षेत्रातही त्याची कर्तबगारी उल्लेखनीयच म्हणावी लागेल. पाच नाटके, दोन एकांकिका संग्रह, चार कथासंग्रह, चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रूपेरी पडदा’, ‘तंत्रमंत्र’ हे चित्रपटविषयक पुस्तक आणि ‘पाटलाचा पोर’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ‘साहित्यसंपदा’ आहे. दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर, प्रेम आंधळं असतं व ते माझे घर या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले.

जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते.

दिनकर पाटील यांचे २१ मार्च २००५ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / मा. मधू पोतदार

मा.दिनकर पाटील यांचे चित्रपट
वरदक्षिणा
https://www.youtube.com/watch?v=E7nTbu5nm9o

उमज पडेल तर

मल्हारी मार्तंड

जय मल्हार
https://www.youtube.com/watch?v=y49H5kUndXU

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..