नवीन लेखन...

चित्रपट पत्रकार, समीक्षक इसाक मुजावर

चित्रपट पत्रकार, समीक्षक इसाक मुजावर यांचा जन्म २२ मे १९३४ रोजी झाला.

इसाक मुजावर यांचे मामा भालजी पेंढारकर यांच्याकडे तबलावादक म्हणून काम करीत. वडिलांचे निधन झाल्यावर इसाक मुजावर यांचे शिक्षण मामांकडेच झाले. त्यांची आई शिक्षिका होती. जेमतेम १०वीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर इसाक यांनी फिल्मी दुनियेत मामासोबत वावरत असतानाच १९४६ला ‘तारका’ या चित्रपटविषयक मासिकात आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. स्वातंत्र्यापूर्वी दोन वर्षे त्यांचा त्या ‘तारका’ सिनेसाप्ताहिकात राज कपूरच्या ‘वाल्मीकी’ या चित्रपटासंदर्भात वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्रवजा लेख छापून आला. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

विषय सुचला की त्याची व्याप्ती, आखणी, मांडणी, बाज, स्वरूप, शब्दांची निवड व चपखल वापर या भानगडींना मुजावरांच्या लेखनजीवनात स्थान नाही. त्यांच्यापाशी असलेला माहितीचा डोंगर त्यांना स्टार्ट टु फिनिश घेऊन जात असे. एकदा विचार डोक्यात आला की लेख किंवा पुस्तकही लिहून झाल्यात जमा असे.

कोल्हापूर येथे त्या काळी प्रकाशित होणाऱ्या ‘लोकशक्ती’मध्ये इसाक मुजावर यांनी लिखाण केले. तसेच चित्रपटविषयक काही लिखाण त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून अनेक ठिकाणी केले. गावकरी दैनिकातर्फे १९५८ मध्ये ‘रसरंग’ या साप्ताहिकाची सुरुवात झाली. यामध्ये चित्रपट, रंगभूमी, क्रीडा असा तिहेरी मसाला होता. ९ जानेवारी १९५९ रोजी इसाक मुजावर यांची निवासी संपादक म्हणून तेथे नेमणूक झाली. ‘रसरंग’ या साप्ताहिकाने अल्पावधीत गती घेतली होती. नाशिक येथूनच ‘रसरंग’चा कारभार चालत असल्यामुळे इसाक मुजावर यांना नाशिक येथेच म्हणजे दादासाहेब फाळके यांच्या गावीच यावे लागले. मुजावर यांच्याशी बोलताना एखाद्या विषयावर त्यांना विचारल्यावर संपूर्ण इतिहास ते आपल्यासमोर ठेवत. पडद्यावर काय चित्रित झाले आहे, यावर त्यांचा भर असायचा. रुपेरी पडद्यामागे चालत असलेल्या भानगडीवर त्यांनी कधीच प्रकाश टाकला नाही किंवा चटपटीत लिखाण केले नाही. इसाक यांनी ‘गॉसिप’ पत्रकारिता कधीच केली नाही. ‘फ्लॅशबॅक’ हे त्यांचे सदर जुन्या कलावंतांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे होते. त्याच काळात त्यांनी सवाल-जवाब, यादे, हमारी याद आयेगी अशी नवी स्तंभलेखनाची मालिकाच सुरू केली.

हिंदीप्रमाणे मराठी चित्रपटांवर त्यांनी प्रकाश टाकला. हिंदीमधीलदेखील राज कपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा यांच्यासह अनेक कलावंतांसोबत त्यांनी प्रत्यक्ष सेटवर जाऊन त्या काळी लिखाण केले. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, विनोदी कलावंत, खलनायक या सर्वांसोबत त्यांची बातचीत आजही त्यांच्या ध्यानात आहे.

जुन्या पिढीसोबत नाळ जुळल्यांतर आलेल्या नव्या कलावंतासोबत देखील त्यांनी तशीच मैत्री केली. ‘रसरंग’मध्ये काम करीत असताना त्यांनी केलेल्या लिखाणाच्या मालिका रसिकांनी आवडीने वाचल्या आहेत. १९५९ ते १९७८ या आपल्या २० वर्षांच्या कालावधीत ‘रसरंग’ला त्यांनी दर्जा मिळवून दिला होता. १९७८ नंतर मात्र त्यांनी ‘रसरंग’चा निरोप घेतला व मुंबईत ‘चित्रानंद’ नावाचे नवे साप्ताहिक सुरू केले. ‘चित्रानंद’चा गाडा त्यांनी १९८७ पर्यंत पेलला. त्यानंतर हे साप्ताहिक बंद झाले. ‘चित्रानंद’चे सर्वच दिवाळी अंक वाचनीय असायचे.

त्यानंतर इसाक मुजावर यांनी ‘माधुरी’, ‘जी’ या साप्ताहिकांत लिखाण केले. अनेक वृत्तपत्रांत त्यांनी लेखन केले. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, अनंत माने यांच्यापासून सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी, राजा परांजपे अशा असंख्य माणसांशी त्यांनी मैत्री केली आणि त्या मैत्रीतून उलगडणाऱ्या आठवणी केवळ आपल्यापुरत्या न ठेवता सिनेसृष्टीवर अपार प्रेम करणाऱ्या मराठी वाचकांसाठी त्या आपल्या पुस्तकांमधून खुल्या केल्या. या लिखाणात कोठेही मराठी भाषेतील साहित्यिक अलंकार पाहायला मिळत नाहीत, तरीदेखील त्यांची लेखणी लोकप्रिय ठरली. मुजावर यांनी चित्रसृष्टीतील आपल्या प्रवासामधील अनुभवांचे यथार्थ चित्रण ‘मराठी चित्रपटांचा इतिहास’च्या लिखाणात केले आहे. सखोल माहिती असलेले हे लिखाण आहे. कलावंतांशी मैत्री करून त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेण्याचा प्रयत्न इसाक मुजावर यांनी केला.

हिंदी व मराठी चित्रपट इतिहासाचे ‘भीष्माचार्य’ असे जर त्यांना संबोधले, तर ते चुकीचे ठरणार नाही. १९३१ पासूनचा हिंदी सिनेमा व १९३२ पासून सुरू झालेला मराठी चित्रपटांचा प्रवास त्यांनी अनेक वेळेला वाचकांसमोर ठेवला आहे. या लिखाणात त्यांनी गायक, गायिका, संगीतकार, नायक, नायिका, दिग्दर्शक व चरित्र अभिनेते यांच्यावर लिखाण केले.

अशा या भीष्माचार्याची आठवण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला आली व त्यांनी त्यांचा गौरव केला. चित्रपट पत्रकारितेत चित्रभूषण पुरस्कार मिळवून त्यांनी सिनेपत्रकारितेला उंचीवर नेऊन ठेवले.

चित्रपटविषयक लिखाण हे केवळ ‘टाइमपास’ स्वरूपाचे असते, असे विधान त्यांनी खोटे ठरवले. सिनेपत्रकारितेला त्यांनी दर्जा मिळवून दिला. आपल्या पत्रकारितेला व्यावसायिकतेचा स्पर्शही त्यांनी होऊ दिला नाही.

इसाक मुजावर यांचे निधन २६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाले.

इसाक मुजावर यांची काही उल्लेखनीय पुस्तके.

अलबेला, मास्टर भगवान, आई, माँ, मदर, एका सोंगाड्याची बतावणी, गुरुदत्त – एक अशांत कलावंत, चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ, चित्रपटसृष्टीतील काही एकतर्फी प्रेमकहाण्या, चित्रमाऊली, डॉनच्या फिल्मी बायका, तीन पिढ्यांचा आवाज –लता, दादासाहेब फाळके, नूरजहाँ ते लता, पेज थ्री, फिल्मी फंडाज, प्रभात चित्रे, फ्लॅशबॅक, मराठी चित्रपटांचा इतिहास, मराठी चित्रपटांचा १०० वर्षांचा आढावा, मीनाकुमारी, मुखवटा.

— मंदार जोशी.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..