
समांतर चित्रपटांचा प्रवाह मराठीत पुन्हा नव्याने दाखल होताना दिसतोय.एका अर्थी आपल्या सिनेमासाच्या दृष्टीनेही हा खुपच महत्त्वपूर्ण पडाव आहे कारण चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी असे सिनेमे बनणं गरजेचं आहे;असो.शुक्रवारी रिलीज झालेल्या फॅंड्रीचा विषय खुपच विचार करायला लावणारा आहे. या चित्रपटातून समाजातील एका विशिष्ट वर्गाची व्यथा, त्यांचं रहाणीमान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा अगदी हळूवार पण नेमक्या शब्दात मांडण्यात आल्या आहेत.
ही कथा घडते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या एका गावातल्या एका कुटुंबाची,ज्यामध्ये त्यांचं जगणं, त्यांच्या सामाजिक व्यथा, त्यांची साधी आणि छोटी पण त्यांच्या दृष्टीने मोठी स्वप्ने, समाजात मानाने जगता यावे यासाठीची धडपड असेल हे सर्व ” फॅंड्री ” चित्रपटातून मांडलेलं दिसतं. ह्या कुटुंबातील प्रमुख व त्यांची ,पत्नी लहान-मोठी कामे करून आयुष्याचा चरितार्थ चालवण्याचे काम करते.त्यंची मुले सुध्दा त्यांना आपल्या परिने मदत करताहेत; पण मुलाचे लक्ष कामात न रहाता शिक्षणात आहे. शिकून मोठं नाव कमवावे असं स्वप्न देखील तो बाळगून आहे. त्या कोवळ्या मुलाचं भावविश्व , शालेय जीवनातील प्रसंग , पौगंडावस्थेतील नेमकी मनस्थिती बोलक्यारुपातच पेश केले गेल्यामुळे ही कथा वास्तवादी वाटत रहाते. पण नेमके असे काय घडते की ज्यामुळे या मुलाला व त्याच्या समाजाकडून नेहमीच अस्पृश्य म्हणून पाहिले जाते ? हे पाहिल्यावर अंतर्मुख होऊन प्रत्येक प्रेक्षक विचार करेल अश्या पध्दतीने या चित्रपटाच्या विषयाची बांधणी केलेली आहे. त्यामुळे आपल्या अवती-भवती काय नेमकं घडतेय याचं भान आल्यावाचून रहात नाही.

आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे चित्रपटाच्या संगीताचा; अजय-अतुल यांचं संगीत प्रसंगानुरूप येत गेल्यामुळे कथेतला आशय सुध्दा टिकून रहातो, आणि एकप्रकारे सिनेमाला नवा फील प्राप्त होतो.
असा हा फॅंड्री तुमच्या आमच्या आसपास वावरणारा; तो कदाचित वेगळ्या रुपात वेगळ्या विषयाच्या निमित्ताने आपल्या समोर पडद्यावर सकारला गेला असेल पण त्याची व्यथा आणि कथा या चित्रपटातील जांभुवंत (जांभ्या) सारखीच आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे सामाजिक, प्रेम, मानवता, भारतातल्या तळातील एका समाजाचं प्रतिनिधीत्व कराणारा तर आहेच पण एक भीषण सामाजिक वास्तव “फॅंड्री” च्या रुपाने जगासमोर आले आहे. म्हणून हा केवळ चित्रपट नसून एक ज्वलंत वास्तव आहे,चालतं बोलतं उदहारणं आहे; तेव्हा थिएटर मध्ये जाऊन अवश्य अनुभव घ्या “फॅंड्री” हा सत्यपूर्ण सिनेमा पाहून !
— सागर मालाडकर
Leave a Reply