नुकत्याच निवडणुका पार पडल्या, निकालही लागले आणि दिवाळी आधीच फटाक्यांच्या चौफेर रंगांच्या आतषबाजीने आसमंत उजळला आणि दुमदुमलाही. निवडणुकांच्या धामधुमीत दिवाळी जवळ आल्याचे लक्षात आले नाही पण फराळाचा सुगंध, इमारतीत सर्वत्र आकाश कंदीलांची दाटीवाटी, फटक्यांचा कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने दिवाळीची चाहूल लागली.
दिवाळीची गाणी गात गात आपण दिवाळी साजरी करीत आलो पण हल्ली दिवाळीत फटाके वाजविल्याशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटत नाही. दिवाळीच कश्याला कुठलाही आनंद व्यक्त करण्यासाठी उदा. कुठल्याही क्रीडा प्रकारचा सामना जिंकणे, लग्नाची वरात, उमेदवाराचे निवडणुकीत जिंकणे असो, की श्रींचे आगमन आणि पुनार्मिलापात फटाके फोडूनच आनंद व्यक्त केला जातो. तशी आपली मानसिकता झाली आहे. फटाके फोडल्यानेच आनंद व्यक्त होतो असा कदाचित समाज मानसिकतेचा समज/गैरसमज असावा.
दिवाळीत फटाके का फोडले जातात याचे आजतागायत तरी उत्तर मिळालेले नाही. कारण फटाक्यांचा शोध लागण्याआधी आपण दिवलीसहीत सर्व सण आणि उत्सवांचा आनंद घेतच होतो ना? त्यावेळेस फटाके नव्हते मग आनंद व्यक्त होत नव्हता? मग काय ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त करत होतो का? तसं असेल तर याचा अर्थ आपण फटाके हे ढोल ताश्यांचा पर्याय म्हणून उपोग करतो का?
फटक्याने पैशाचा चुराडा होतोच पण वायू आणि ध्वनिप्रदुशाणामुळे बऱ्याच समस्या निमार्ण होत आहेत. फटाक्याच्या आवाजाने पक्षी घाबरतात सैरावैरा पळत सुटतात त्यात त्यांना अपघात होण्याची शक्यता असते तसेच घाबरण्याने हृदयाची धडधड वाढून पक्षाघात होण्याची शक्यता बळावते. त्यांच्या शरीरांतर्गत बरेच बदल होऊन त्यांची जननक्षमता कमी होण्याचे प्रमाण वाढू शकते याने एखाद्या पक्षाची जात नष्ट होण्याचे प्रमाण वाढू शकते.
फटाके फोडूनच दिवाळी साजरी करता येते असे नव्हे. दुसरी बरीच समाजोपयोगी कामे करता येऊ शकतात. फटाक्यांच्या आवाजामुळे लहानमुले झोपेत दचकतात, मोठे आवाज करणाऱ्या फटक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होतेच त्यामुळे तणाव, मानसिक विकार आणि सृजनशीलता कमी होण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या प्रदूषणामुळे चेतासंस्थेवर परिणाम होतो. फटाक्यांच्या आवाजामुळे इमारती आणि पुलांसारख्या निजिर्व वस्तू हादरतात आणि त्याचं आयुष्य कमी होतं, कच्या घरांना तडे जातात. महानगरांमध्ये झाडांची संख्या वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. कारण ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी झाडं फायदेशीर ठरतात. आवाज करणारे फटाके फोडू नयेत. ‘डिपार्टमेण्ट ऑफ एक्सप्लोझिव्ह’ने प्रमाणित केलेले फटाकेच उडवावेत. आवाज न होणारे फटाके फोड्ल्यानेही वायुप्रदूषण होणारच आहे त्याचे काय?
दिवाळीसारख्या सणाने नागरिकांत एकोपा, भाईचारा वाढीस लागतो, कटुता कमी होते आणि आनंद निर्माण होतो. आपण दुसऱ्याच्या जीवनात आनंद निमार्ण केला, तर आपल्या जीवनात परमेश्वर आनंद निमार्ण करतो. परंतु अश्या ध्वनि आणि वायुप्रदूषण निमार्ण करणारे फटाके फोडल्यास आनंदवर विरजण पडते. बर यातून क्षणापुरता आनंद मिळतही असेल परंतु आपण कळत न कळत किती ध्वनी आणि वायू प्रदूषण करतो हे कळत सुद्धा नाही. आपण फटाके फोडून स्वत: आनंद व्यक्त करू शकतो पण तोच दुसऱ्या व्यक्तीचा, पक्षांचा, लहान बाळांचा, जेष्ठ नागरिकांचा, आजारी माणसांचा आनंद हिरावून घेऊन पापाचे धनी होतो हे विसरतो. तर वेळीच सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना फटाके फोडल्याने वाढणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषचे भविष्यातील धोके समजावून सांगून आनंद देणारी दिवाळी सर्वांसाठी खऱ्या अर्थाने कशी साजरी करायची याचे बाळकडू पाजणे उपयुक्त होईल.
Leave a Reply