नवीन लेखन...

अमेरिकेची पहिली महिला वैमानिक एमेलिया एरहार्ट

अटलांटिकवरून विक्रमी वेळात उड्डाण करणारी पहिली महिला वैमानिक

अटलांटिकवरून विक्रमी वेळात उड्डाण करणारी पहिली महिला वैमानिक

एमेलिया एरहार्ट ही जणू आकाश-उड्डाणाचे स्वप्नच घेऊन अमेरिकेतील कन्सास राज्यात अॅटकीसन या गावी २४ जुलै १८९७ रोजी जन्मास आली होती. जगाच्या इतिहासात ती जे काही अल्पकाळ आयुष्य जगली ते अमेरिकन समाजास पडणाऱ्या विविध स्वप्नांना एकत्रच गुंफणारे होते. आशावाद, धाडसीपणा आणि चित्रपट क्षेत्रातील सुपरस्टारचे ग्लॅमर तिला लाभलेच होते; परंतु असे असूनही ती लाजाळू हास्य चेहऱ्यावर आणि हवाई उड्डाण करणारे वापरतात तो रुमाल बाळगून असणारी महिला वैमानिक म्हणून साधेपणाने वावरत असे.

वयाच्या दहाव्या वर्षी आयोवा राज्याच्या एका जत्रेत एमेलियाने सर्वप्रथम विमान पाहिले होते. ते विमान पाहून तिच्यावर खास असा कोणताही परिणाम झाला नव्हता. या प्रसंगाच्या संदर्भात पुढील आयुष्यात ती एकदा म्हणाली होती, “ते विमान म्हणजे गंजलेल्या तारांची व लाकडाची एक वस्तू होती. मला त्या वस्तूत यत्किंचितही रस वाटला नाही!”

विमानाचे आणि विमानोड्डाणाचे आकर्षण तिच्या मनात निर्माण होण्यासाठी वयाची तेवीस वर्षे गेली होती. तिच्या वडिलांबरोबर ती एकदा कॅलिफोर्नियातील विमानांचा आकाश- उड्डाणांचा प्रदर्शनीय खेळ पाहण्यास गेली होती. हा खेळ तिने पाहिला आणि आकाश-उड्डाणाचे वेड तिच्या डोक्यात शिरले. तिने विमान उड्डाणाचे प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केला. स्वतः जवळ होते नव्हते ते सर्व पैसे खर्चून ‘किन्नर एअरस्टर एअरक्राफ्ट’ हे विमानच विकत घेतले. विमान-उड्डाणाचा शौक करणे ही साधी आणि सामान्य माणसाला खिशाला परवडणारी गोष्ट नव्हती. एमेलियाने आपला विमानउड्डाणाचा छंद जोपासण्यासाठी पैसे मिळविण्याकरिता अपार कष्ट केले. वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. ही नोकरी मानाची की कमी प्रतीची, असा विचार तिने केला नाही. मिळेल ते काम पैशासाठी तिने स्वीकारले. खरे वाटणार नाही; पण दगड वाहून नेण्याचे बिगारी कामही तिने नोकरी म्हणून केले!

एमेलिया वैमानिक म्हणून जेव्हा विमानाच्या चालकाच्या केबीनमध्ये किंवा कॉकपीटमध्ये आसनस्थ झाली तेव्हा विमानप्रवास ही नवलाईचीच बाब होती. विमानप्रवास करण्यास लोक भीत असत. सहजासहजी इथून तिथे जाण्यासाठी, वेळ वाचविण्यासाठी किंवा पैसे आहेत म्हणून सहज कुणा जवळच्या नातेवाईकास दूरवर जाऊन भेटण्यास आजच्याप्रमाणे विमानप्रवास त्या काळी केला जात नव्हता.

एमेलियाने विमान उड्डाणाच्या क्षेत्रातील अनेक पारितोषिके मिळविली होती. परंतु ॲटलांटिक महासागरावरील तिने केलेले उड्डाण तिला चिरस्मरणीय करून गेले. खरेतर १९२८ मध्ये विमान प्रवासी म्हणून ॲटलांटिक महासागरावरून तिने केलेला प्रवास तिला खूप प्रसिद्धी देऊन गेला होता. हाच प्रवास आपण एकटीने करण्याचा निश्चयही तिने चार वर्षानंतर केला. असा प्रवास करणारी जगातील ती पहिलीच महिला होती. तिने हा ॲटलांटिकवरून उड्डाण करण्याचा प्रवास वेगाच्या संदर्भात जागतिक विक्रम करून ठेवला होता.

एमेलियाने दोन हजार सव्वीस मैलांचा अॅटलांटिकचा विमानोड्डाणाचा प्रवास फक्त चौदा तासांत केला होता. या चौदा तासांत झोप वा डुलकी लागू नये म्हणून तिने ‘स्मेलिंग सॉल्टचा वापर केला होता. तसेच खाद्यपदार्थांच्या तिने टोमॅटो सूप म्हणून सेवनामुळे सुस्ती येऊ नये म्हणून वा झोप येऊ नये थर्मासमधून व डब्यामधून सोबत नेले होते.

एमेलिया ॲटलांटिकावरून यशस्वी उड्डाण करून अमेरिकेत परतल्यावर तिचे भव्य स्वागत झाले होते. विशेष म्हणजे आपले असे स्वागत होईल, अशी तिला कल्पनाही नव्हती. न्यूयॉर्क शहरात ‘टिकर-टेप-परेड’द्वारे तिचे स्वागत झाले. (भारतात जशी फुले व अक्षता यशस्वी व्यक्तीच्या डोक्यावर उधळतात तसे रंगीत कागदांचे बारीक बारीक तुकडे म्हणजे टिकर-टेप) त्याखेरीज अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांनी सन्मानपत्रक देऊन हवाई उड्डाणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल एमेलियाचा गौरव केला होता.

एमेलियाच्या वैयक्तिक जीवनातील यशस्वी कालखंडात अमेरिकेत विलक्षण स्वरूपाचा मंदीचा कालखंड होता. तिच्या प्रत्येक विक्रमाने मंदीत असलेल्या तिच्या देशाला वैभवशाली भविष्याच्या दिशा दिसू लागल्या होत्या.

एमेलियाला मात्र गौरव, समारंभ, मिरवणुका यापेक्षा अज्ञाताच्या ओढीची स्वप्ने पाहण्यातच रस वाटे. याचे कारण, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा विमानोड्डाण करण्यावर तिचे अंतःकरणपूर्वक प्रेम होते. आपल्या विमानोड्डाणाचे ध्येय स्पष्ट करताना ती एकदा म्हणाली होती, “व्यावसायिक विमान-उड्डाणांच्या भवितव्यासाठी आणि उद्याची विमाने आकाशात इच्छिणाऱ्या महिलांसाठी मला लाभलेल्या मनोहारी देणगीमुळे काही व्यावहासिक फायदा लाभावा, हे माझे ध्येय आहे.”

अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांची पत्नी एलिआनॉर रूझवेल्ट हिला घेऊन एकदा एमेलियाने विमानोड्डाण केले होते. त्या प्रवासाचा परिणाम असा झाला, की अमेरिकेच्या त्या प्रथम महिलेस वैमानिक व्हावे अशी इच्छा झाली. परंतु एलिआनॉर ही अत्यंत वेगाने कारड्रायव्हिंग करणारी महिला म्हणून अगोदरच कुप्रसिद्ध असल्याने राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी आपल्या पत्नीस ‘आपणास आधीच वाटते तेवढी काळजी पुरेशी आहे,’ हे सांगून वैमानिक होण्यापासून तिला परावृत्त केले होते!

विषुववृत्तावर जाऊन शक्य तितक्या लांबच्या मार्गाने पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली वैमानिक म्हणून विक्रम करण्याची योजना एमेलियाने आखली होती. तिच्या आयुष्यातील अखेरची आणि अपूर्ण ठरलेली ती योजना होती. नुसती अखेरचीच योजना नव्हे, तर एमेलियाच्या जीवनाची अखेर करणारीच ती योजना ठरली !

फ्लोरिडा राज्यातील मियामी येथील विमानतळावरून सहवैमानिक किंवा तिचा दिशा दिग्दर्शक फ्रेड नूनन याच्यासह प्रथम चुकीच्या पद्धतीने विमानउड्डाणाच्या दिशेने तिचे विमान नेताना अपघात झाला. विमानाची दुरुस्ती झाल्यावर १ जून १९३७ रोजी विमान आकाशात उडविले होते.

पूर्व दिशेला जाणाऱ्या एमेलियाच्या विमानाने विविध अपरिचित देशांत थांबून पेट्रोल घेतले. आवश्यक तेथे दुरुस्त्याही केल्या आणि विश्रांतीही घेतली. त्यांचा नियोजित प्रवास एकूण २९ हजार मैलांचा होता. परंतु २२ हजार मैलांचा प्रवास केल्यानंतर केवळ ७ हजार मैलांचा प्रवास शिल्लक असताना २ जुलै १९३७ पासून एमेलिया, तिचा सहवैमानिक आणि त्यांचे विमान कुठे अदृश्य झाले त्याचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. काळाच्या पडद्याआडचे ते एक गूढच राहिले आहे.

एमेलियाने आपला अखेरचा लेख न्यू गिनिया येथून ‘हेराल्य ट्रिब्यून’ ला फोटोसह पाठविलेला होता. त्या फोटोत ती खूप थकलेली व आजारी असल्यासारखी दिसत होती.

एमेलियाचे विमान अदृश्य झाल्याच्या वृत्ताने अमेरिका देश दुःखाने स्तिमितच झाला. दोन आठवड्यांतून अधिक काळ एमेलियाचा आणि तिच्या विमानाचा शोध घेण्याची पराकाष्ठा करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी अमेरिकन लष्करास आपली विमाने आणि नौका यांचा एमेलियाचा शोध घेण्यासाठी वापर करण्यास मान्यता दिली. कालांतराने जगाने आपली आवडती वैमानिक एमेलिया हिचे निधन झाल्याचे वास्तव स्वीकारले. मात्र एमेलियाच्या अदृश्य होण्या संदर्भातील अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. एमेलिया दक्षिण पॅसिफिकच्या बेटावर एका मासेमाऱ्यासह काही वर्षे राहत होती, असे सांगणारी एक दंतकथा आहे. एमेलियाची प्रवासयोजना तिला हेरगिरीच्या कामासाठी पाठविले असताना तिला शत्रूराष्ट्राने पकडले होते, असेही सांगितले जाते. एमेलियाने पॅसिफिकमध्ये हेतुपूर्वक आपले विमान उतरवल्याचीही एक कहाणी आहे. एमेलिया अद्याप जिवंत आहे, असेही सांगणारे सांगतात. अदृश्य झालेल्या एमेलियाच्या संदर्भात पटण्यासारखी आणि तर्कसंगत वाटणारी कथा म्हणजे ती आणि तिचा सहवैमानिक अपघाताने कोसळलेल्या विमानातून समुद्रात बुडून मृत्यू पावले!

एमेलियाचे विमान अदृश्य व बेपत्ता होण्यापूर्वी अमेरिकेच्या बंदरावरील इटास्का सुरक्षा अधिकाऱ्यांना दिलेल्या ट्रान्समिशनमध्ये वा संदेशात म्हटले होते, “खाक्क् कॉलिंग इटास्का… आम्ही तुम्हाला दिसत असणारच. आम्ही मात्र तुम्हाला पाहू शकत नाही आहोत… पेट्रोल खूप कमी होत आहे…

एमेलियाचा मृत्यू हा तसा सर्वांनाच चटका लावणारा व दुर्दैवी स्वरूपाचा होता. तिच्या थरारक जीवनाचा शेवट तिच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या जिवाचा थरकाप करणारा ठरावा, ही गोष्ट दुर्दैवाचीच! तिचा मृत्यू कसाही असो, तिचे जीवन अनेक पिढ्यांच्या स्त्रियांना प्रेरक ठरणारेच होते. भयाला आणि निराशेला तिच्या जीवनात स्थान नव्हते. धाडसी वृत्तीची आणि आशावादाची प्रेरणा देणारे तिचे विक्रमी जीवन होते. आपल्या पतीला तिने लिहिलेल्या आणि शेवटचेच ठरलेल्या पत्रात तिने व्यक्त केलेल्या भावना योगायोगाने तिच्या विचारपद्धतीचे सारच असून फारच बोलक्याही आहेत. तिने पतीला लिहिले होते,

“पुरुषांनी ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व गोष्टी स्त्रियांनी केल्याच पाहिजेत. जेव्हा स्त्रियांना अशा गोष्टी करण्यात अपयश येईल, तेव्हा ते इतरांना आव्हानच ठरायला हवे!”

–प्रा. अशोक चिटणीस

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..