मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही. आता जिथे बोलणंच नाही, तिथे भांडणं कशाला होणार?
पण तरीही अधे-मधे भांडणाचे प्रसंग येतात. कारण असतं ते चढता-उतरताना धक्का लागण्याचं.
भांडणाची सुरूवात हमेशा ‘अकल नही है फिर भी फस्ट क्लास मे आते है ‘ या वाक्याने होऊन भांडणाचं वंदे मातरम “फस्क्लास मे आते है फीर भी अकल नही है..” या वाक्याने होतं. मी ऐकलेल्या दहा पैकी सात भांडणांत हा डायलाॅग मला ऐकायला आलेला आहे आणि त्यामुळे फर्स्ट क्वासच्या डब्यात केवळ अक्कल असलेलेच येतात, की फर्स्ट क्वासच्या डब्यात आल्याने आपोआप अक्कल येते या प्रश्नाचा गोंधळ माझ्या मनात उडाला आहे..!
मी गेली दोनेक वर्ष नाईलाजाने फर्स्ट क्लासने प्रवास करतो. तरी मला ‘अक्कल’ कसली ती नाही असं माझ्या बायकोचं आणि जवळच्या मित्रांचं प्रामाणिक मत ऐकून माझा ‘फस्ट क्लास’ गोंधळ “वरिष्ठ नागरीकों के लीए ‘तरतुद्द’ (द्द वर जोर देऊन बोलावे) केलेल्या परंतू न दिसणाऱ्या जगह” प्रमाणे आणखीनच वाढतो..!!
‘सेकंड क्लास’ची बातच और..! तिथे सगळंच रोकडं. भांडताना फस्ट क्लासवाल्यासारखा शरीराच्या ‘शिरो’भागाचा उच्चार न करता थेट ‘अधो’भागाचा उद्धार करणार. अगदी गळे धरेपर्यंत मजल जाते कधी कधी परंतू गर्दीतील इतरांना त्रास होतो याची जाणीव देखील असते त्या भांडणाराना. हळुहळू भांडणाचा टेंपो कमी झाला की मग एक-दुसरे को सम्हाल के लेनाची सेटलमेंट होते. मग ‘भारतीय रेल’ आणि तमाम संबंधीत सरकारी अधिकाऱ्यांचं सामुहीक श्राद्ध घातलं जातं आणि मग भिकारXX राजकारण्यांची आय-माय काढण्याच्या गप्पा सुरू होतात. सोबत ताही खायचं असेल तर त्याचंही वाटप होतं. काही वर्षांपूर्वी असंच एकदा बसण्याच्या जागेवरून दादरला सुरू झलेलं भांडण दहीसरच्या ‘दीपा’मधे मनोमिलनात समाप्त झालेलं पाहीलंय..
फस्टक्लासमधे ‘अक्कल’ असते की नाही माहित नाही पण ‘माणूसकी’ मात्र ‘सेकंड क्लास’ मधेच भेटते, नव्हे (गर्दीमुळे) घट्ट बिलगते.
मी नाईलाजाने फस्ट क्लासने प्रवास करत असलो तरी माझं मन मात्र ‘सेकंड क्लास’च राहील्याची जाणीव होते आणि मग माझ्या बायकोच्या अन् मित्रांच्या माझ्याबद्दलच्या ‘मता’चा थोडासा उलगडा झाल्यासारखा वाटतो..!
-गणेश साळुंखे
09321811091
Leave a Reply