१३ जानेवारी १८८८ या दिवशी अमेरिकेच्या राजधानीत ३३ धनाढ्य लोकांची एक बैठक झाली. हे लोक केवळ धनवान नव्हते, तर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात प्रवीण होता. कुणी शास्त्रज्ञ होते, कुणी इतिहासात रस घेणारे होते. या मंडळींनी नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी नावाची एक सोसायटी स्थापन केली. हेतू साधा आणि सोपा होता. लोकांना आपण वास्तव्य करत असलेल्या ग्रहाबद्दल म्हणजे पृथ्वीबद्दल जागरूक करणे.
आता जागरूक करायचे म्हणजे काय करायचे? तर भूगोल, पुराणवस्तुशास्त्र, इतर अनेक नैसर्गिक शास्त्रे, पर्यावरणाची जपणूक, याबरोबरच जागतिक संस्कृती आणि इतिहासाचे मोल जपणे. या विषयांवर अभ्यासपूर्ण संशोधन करून ते लोकांसमोर मांडणे. सुरुवातीला शास्त्रीय माहिती देणारी पत्रके प्रसारित करणे एवढाच हेतू होता. पण तेवढे पुरेसे नाही, हे लक्षात येताच मूळ हेतू मनात ठेवून सोसायटीने पत्रकाऐवजी एक मासिक सुरू करायचे ठरवले. त्यानुसार १८८८ च्या सप्टेंबर मध्ये ‘नॅशनल जिऑग्राफिक मॅगझिन’ सुरू करण्यात आले. २२ सप्टेंबर १८८८ रोजी ‘नॅशनल जिओग्राफिक नियतकालिका’चा पहिला अंक प्रकाशित झाला. काही दिवसांत त्यातला ‘मॅगझिन’ शब्द गळला आणि नुसतेच ‘नॅशनल जिऑग्राफिक’ या नावाने मासिक ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला त्याचा आकार चौरस होता. पण १९१५ नंतर त्याचा आकार 10*7 इंच झाला, तो आजतागायत तसाच आहे. या मासिकाचे बोधचिन्ह ही एक खास गोष्ट आहे. ते म्हणजे, सर्व अंकांना अर्ध्या इंचाची पिवळी बॉर्डर असते; ती हळदीच्या रंगाची चौकटच बोधचिन्ह म्हणून वापरली जाते. आधी केले मग सांगितले, या उक्तीनुसार पर्यावरणाचे पुरस्कर्ते म्हणून या मासिकाच्या छपाईसाठी कटाक्षाने ‘रिसायकल्ड’ कागद वापरला जातो. या मासिकात जाहिराती अगदी मोजक्या असतात. या मासिकाला छायाचित्रांचे इतके महत्त्व वाटते की यातला एकही लेख छायाचित्रांशिवाय प्रसिद्ध होत नाही. तसेच मला वाटते की ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवले जाणारे हे जगातले एकमेव मासिक असावे. जगातील ३६ भाषांमध्ये ते प्रसिद्ध होत असते. जगात सर्व मिळून ८५ लाखांच्या वर सभासद संख्या आहे. ‘नॅशनल जिऑग्राफिक’च्या अंकात आपल्याला लिखाण करायचे असल्यास प्रथम आपल्याला काय लिहायचे आहे, याचा गोषवारा एका पानावर लिहून द्यायचा. पण याबरोबरच आपले लिखाण महत्त्वाचे का आहे? तत्सम इतर लिखाणापेक्षा यात वेगळेपण काय आहे आणि ‘नॅशनल जिऑग्राफिक’ने यासाठी आर्थिक पुरस्कार का द्यावा, याचा खुलासाही करायचा असतो. या तीन अटी पूर्ण झाल्यावरच पुढचा विचार होऊ शकतो. तो प्रकल्प जरी स्वीकारला गेला नाही तरी तुम्हाला कुठल्या विषयात रस आहे, याचा अंदाज संपादक मंडळाला येतो. मग केव्हातरी संपादक मंडळ एखादा विषय सुचवते, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित काडीचीही माहिती नसते. अशा वेळी त्या संबंधात काहीएक प्रकारचे संशोधन करायची तयारी ठेवावी लागते.
एकदा तुमच्यावर कामगिरी सोपवली की मग त्या लेखासाठी छायाचित्रे कशा प्रकारची काढायची, ती लेखात कुठे पेरायची, याबाबतीत छायाचित्र विभागाशी सखोल चर्चा कराव्या लागतात. त्यामुळे आपल्या संशोधनाची दिशा कशी असावी, यासंबंधी आपल्या मनात स्पष्ट कल्पना तयार होतात.
मग त्यासाठी कुठल्या शास्त्रज्ञांना, कुठल्या संशोधकांना भेटावे लागेल, तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या लोकांना भेटणे आवश्यक आहे, याचीही कच्ची यादी करावी लागते. एवढी तयारी झाली की मग संपादकाबरोबर खर्चाच्या अंदाजपत्रकाबद्दल चर्चा होते. तुम्ही स्वत: छायाचित्रण करू शकत असाल तर प्रश्न मिटला. नाहीतर तुमच्याबरोबर एका छायाचित्रकाराची नेमणूक केली जाते. एकेका लेखासाठी दहा हजारांपासून चाळीस हजारांपर्यंत छायाचित्रे काढलेली असतात. (हे अर्थातच डिजिटल कॅमेर्या चे तंत्रज्ञान अफाट सुधारलेले असल्यामुळे शक्य होते.) प्रत्यक्ष काम अर्ध्यावर आले की त्यातील सर्वोत्तम छायाचित्रे आणि लिखाणासह संपादकासमोर बसून पुन्हा विषयकेंद्रित चर्चा होते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तो प्रसिद्ध होईपर्यंत संपूर्ण गुप्तता पाळावी लागते. मला वाटते, जगातले कुठलेही मासिक हे संपादक, लेखक आणि छायाचित्रकार यांच्याशी इतका घनिष्ठ संपर्क ठेवून काम करत नाहीत. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की लेखक किंवा छायाचित्रकार कुणीही येथे पगारी नसतो. प्रत्येक प्रकल्पाप्रमाणे त्याचे मोल अदा केले जाते. या ‘नॅशनल जिऑग्राफिक’चा पसारा किती अवाढव्य असेल, याची कल्पना येईल. ३६ भाषांत निघणार्या‘ अंकांचे भाषांतरकार, त्यांचे तपासनीस, अंतराळापासून भूगर्भापर्यंतच्या यच्चयावत विषयांचे जाणकार, या सर्वांवर नियंत्रण असणारे अजस्र संपादक मंडळ. छपाई, वितरण, जाहिरात इतक्या विभागांसाठी किती जणांचा नोकरवर्ग असेल, याची नुसती कल्पना केलेली बरी. हा सगळा डोलारा ज्यांच्या खांद्यावर उभा आहे, ते कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळही तितकेच खंबीर असल्याशिवाय हे विश्व उभे राहणे अशक्य आहे. या सोसायटीचे सुरुवातीचे अध्यक्ष होते गार्डिनर ग्रीन हुबार्ड. नंतर ती सूत्रे त्यांचे जावई विख्यात शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्याकडे आली. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर 1899मध्ये त्यांचे जावई गिल्बर्ट होवे ग्रॅहॅम सव्हेनर यांनी सूत्रे हातात घेतली. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च संपादकपदही त्यांच्याकडे सोपवले गेले. ते त्यांनी 55 वर्षे सांभाळले. पुढे तर त्यांची मुलेही संपादक झाली. असा हा कौटुंबिक कारभार चालू होता. आता त्यात बदल झाले आहेत…
‘नॅशनल जिऑग्राफिक’ मासिकाबरोबर पाठवले जाणारे मोठाले नकाशे ही आजवरची खासियत. १९१८ च्या मे महिन्याच्या अंकाबरोबर पहिला नकाशा वाचकांना दिला गेला. त्याचा विषय होता पहिले महायुद्ध. त्यानंतर दरवर्षी अंकातल्या मुख्य विषयाशी सुसंगत असे चार-पाच तरी नकाशे अंकातच समाविष्ट असतात. ‘नॅशनल जिऑग्राफिक’तर्फे दोन सन्मान पदके प्रदान केली जातात. त्यापैकी एक त्यांचे पहिले अध्यक्ष हुबार्ड यांच्या नावे अपरिचित देशात जाऊन तिथे घेतलेला अनोख्या गोष्टींचा शोध, एखाद्या अज्ञात गोष्टीचा मुळाशी जाऊन घेतलेला शोध आणि माहीत असलेल्याच मूलतत्त्वांचा चिकित्सकपणे घेतलेला शोध, यातील असामान्य कामगिरीबद्दल दिले जाते. २०१० पासून एकूण ३५ जण या पदकाचे मानकरी ठरले आहेत. दुसरे पदक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या विख्यात शास्त्रज्ञांच्या आणि सोसायटीच्या दुसर्या अध्यक्षांच्या नावे दिले जाते. असामान्य भौगोलिक संशोधकाला हे दिले जाते. आजवर फक्त दोघे जण याचे मानकरी ठरले आहेत. ‘नॅशनल जिऑग्राफिक’ कोणकोणते विषय हाताळते, तर वेगवेगळी सदरे चालू करणे ही मासिकाची खासियत. वाचकांच्या लेखी प्रतिसादाबरोबरच छायाचित्रांमधून त्यांना सहभागाची संधी दिली जाते. वाचकांनी काढलेले आणि त्यांना स्वत:ला आवडलेले फोटो त्यांना इंटरनेटद्वारे पाठवायचे. त्यांचे त्या विभागाचे संपादक मंडळ त्यातील दोन फोटो प्रसिद्ध करते.
नॅशनल जिऑग्राफिकला विषयांचे कसलेही बंधन नाही. मानवी संस्कार, त्यांच्या इतिहासादी सर्वांगाचा विचार हे विषय तर असतातच; पण प्राण्यांबद्दल म्हणजे त्यात चतुष्पाद प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, अगदी नखाएवढ्या माशापासून अवाढव्य व्हेल माशांसारख्या जलचर प्राण्याबद्दलही भरपूर संशोधित माहिती मिळते. निसर्गाचा-पर्यावरणाच्या सर्व बाजूंचा सांगोपांग अभ्यास वाचायला मिळतो. याचा अर्थ, भूभागावरचे सर्व विषय हाताळले जातात. पण पृथ्वीच्या गर्भात काय काय दडले आहे, याचाही शोध चालू असतो. भूभाग, भूगर्भ यांच्यापाठोपाठ अंतराळही कसे सुटेल? चांद्र मोहिमा, मंगळ मोहिमा, तसेच धूमकेतू, सुपरनोव्हा, नव्या तार्याठचा जन्म आणि एकूणच सौरमाला यांच्याविषयी संशोधित माहिती ‘नॅशनल जिऑग्राफिक’मध्ये वाचायला मिळते; तीसुद्धा नजर खिळवून ठेवणार्याण छायाचित्रांसह!
नॅशनल जिऑग्राफिकने टेलिव्हिजन चॅनलही सुरू केला आहे. तसेच त्यांनी या नेहमीच्या लोकप्रिय मासिकासोबत नॅशनल जिऑग्राफिक किड्स, ट्रॅव्हलर, अॅेडव्हेंचर, एक्स्प्लोरर वगैरे प्रकाशनेही सुरू केली आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply