नवीन लेखन...

पहिलं फूल

पहिलं फूल केव्हा फुललं?’… उत्क्रांतीच्या अभ्यासकांच्या दृष्टीनं हा अतिशय उत्सुकतेचा प्रश्न आहे. सपुष्प वनस्पतींचा जन्म हा, उत्क्रांतीच्या मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं मानलं जातं. कारण पृथ्वीवरील जैवविविधतेत सपुष्प वनस्पतींचा वाटा खूपच मोठा आहे. सपुष्प वनस्पतींची निर्मिती ही सुमारे तेरा-चौदा कोटी वर्षांपूर्वी झाली असल्याचं, आतापर्यंत समजलं जात होतं. परंतु आता चिनी संशोधकांना साडेसोळा कोटी वर्षांपूर्वीच्या एका सपुष्प वनस्पतीचा शोध लागला आहे. जीवाश्माच्या स्वरूपात सापडलेल्या या वनस्पतीला कळी असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पहिली सपुष्प वनस्पती असण्याची शक्यता असणाऱ्या कोणत्याही वनस्पतीच्या बाबतीत, इतका स्पष्ट पुरावा आतापर्यंत सापडलेला नव्हता. साऊथ चायना अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील दा-फांग कुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला हा शोध ‘जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या संस्थेच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध केला आहे.

पृथ्वीच्या इतिहासातील, सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते साडेचौदा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा काळ हा ‘जुरासिक काळ’ या नावानं ओळखला जातो. उष्ण आणि दमट हवामानाच्या या काळात विविध वनस्पतींची सर्वत्र रेलचेल होती. मात्र या वनस्पती पुष्पविरहित होत्या. त्यात मुख्यतः सूचिपर्णी वृक्ष आणि नेच्यांचा समावेश होता. प्राणिसृष्टीत डायनोसॉर या सरीसृपांचं मोठ्या प्रमाणावर अस्तित्व होतं. डायनोसॉरपासून पक्ष्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली होती. अशा या जुरासिक काळातल्या, प्रथमच सापडलेल्या सपुष्प वनस्पतीला संशोधकांकडून ‘फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका’ हे नाव दिलं गेलं आहे. पुरातन काळातील वनस्पतींचे जीवाश्म साधारणपणे एकसंध मिळत नाहीत. कळ्या आणि फूलं ही अत्यंत नाजूक असल्यानं त्यांचे जीवाश्म मिळणं मुळातच दुर्मिळ असतं. जर ते मिळालेच, तर त्याचे भाग सुटे होऊन ते विखुरलेले असतात. परंतु ही वनस्पती याला अपवाद ठरली आहे. पूर्ण स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे, या वनस्पतीचा अभ्यास करणं, हे काहीसं सुलभ झालं.

चीनमधील ‘इन्नर मंगोलिआ’ या प्रदेशातील दावहुगाऊ या खेड्याजवळील उत्खनन क्षेत्रात, जुरासिक काळातल्या सजीवांचे अवशेष सापडले आहेत. यांत अनेक वनस्पतींचा, प्राण्यांचा व कीटकांचा समावेश आहे. इथल्याच सुमारे साडेसोळा कोटी वर्षांपूर्वीच्या, कोळसायुक्त वालुकाश्मात या सपुष्प वनस्पतीचा जीवाश्म सापडला. या जीवाश्माची लांबी सुमारे सव्वाचार सेंटिमीटर असून तिची रुंदी दोन सेंटिमीटर आहे. या वनस्पतीला खोड आहे, त्यावर फांदी आहे, फांदीवर छोटीशी कळीही आहे… इतकंच काय, या वनस्पतीवर छोटसं फळही आहे! या वनस्पतीची पानं गळून गेली आहेत. मात्र त्या पानांच्या देठाच्या खुणा फांदीवर दिसून येतात.

दा-फांग कुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, क्ष-किरणांचा वापर करणाऱ्या स्कॅनरद्वारे या जीवाश्मातील विविध थरांची तपासणी केली. त्याचबरोबर, त्यांनी या जीवाश्मावर सेल्यूलोजचा थर देऊन त्याची प्रतिकृती तयार केली. त्यानंतर स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या वस्तू अतिशय मोठी करून दाखवणाऱ्या साधनाद्वारे, या प्रतिकृतीचा पृष्ठभाग तपशीलवार अभ्यासला. या सर्व निरीक्षणांवरून, या वनस्पतीच्या खोडाची, तिच्यावरील कळीची आणि फळाची माहिती मिळू शकली. या कळीत दाटीवाटीनं वसलेल्या पाकळ्यांसारखी रचना स्पष्टपणे दिसून आली. फळाची रचना हीसुद्धा सुस्पष्ट असून, हे एक पिकलेलं फळ असल्याचं लक्षात आलं. या सर्व निरीक्षणांवरून ही वनस्पती सपुष्प असल्याचं नक्की झालं.

पहिली सपुष्प वनस्पती कोणती असावी, याची चर्चा कित्येक दशकांपासून चालू आहे. त्यासाठी आतापर्यंत विविध वनस्पतींची नावं घेतली गेली आहेत. त्यापैकीच मोण्ट्सखिया व्हायडली ही जीवाश्माच्या स्वरूपात स्पेनमध्ये सापडलेली, तेरा कोटी वर्षांपूर्वीची वनस्पती, पहिली सपुष्प वनस्पती असण्याची शक्यता सहा वर्षांपूर्वी व्यक्त केली गेली होती. कारण ती आजच्या फॉक्सटेल या सपुष्प वनस्पतीच्या पूर्वजांपैकी असल्याचं आढळलं होतं. मात्र तिच्या रचनेवरून ती सपुष्प वनस्पती असल्याचा निश्चित पुरावा काही मिळाला नव्हता. त्यानंतर, सुमारे तीन वर्षांपूर्वीच्या एका संशोधनानुसार, नॅन्जिन्गँथस डेंड्रोस्टायला ही चीनमध्ये सापडलेली जुरासिक काळातली, साडेसतरा कोटी वर्षांपूर्वीची वनस्पती ही पहिली सपुष्प वनस्पती असल्याची शक्यता व्यक्त केली गेली. मात्र या वनस्पतीची रचना सपुष्प वनस्पतीची असल्याचं, अनेक तज्ज्ञांना मान्य झालं नव्हतं. तिची रचना ही सूचिपर्णी प्रकारच्या पुष्पविरहित वनस्पतीला अधिक जवळची असल्याचं दाखवून दिलं गेलं. आता सापडलेल्या फ्लॉरिजर्मिनिस जुरासिकावरची कळी मात्र, ही वनस्पती सपुष्प असल्याचं स्पष्टच दर्शवते.

फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका ही फुलाला जन्म देणारी सर्वांत पुरातन वनस्पती ठरली आहे. भविष्यात फ्लॉरिजर्मिनिस जुरासिकापेक्षा अधिक जुन्या सपुष्प वनस्पतींचे जीवाश्म कदाचित सापडतीलही. तरीही फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका या वनस्पतीचं स्थान वेगळ्या दृष्टीनं अढळ राहणार आहे. कारण आतापर्यंत जुरासिक काळात फक्त पुष्पविरहित वनस्पतीच अस्तित्वात असाव्यात, अशी शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली गेली होती. या शक्यतेनुसार, सपुष्प वनस्पती या जुरासिक काळ संपुष्टात आल्यानंतरच्या काळात निर्माण झाल्या असाव्यात. या शक्यतेला फ्लॉरिजर्मिनिस जुरासिकानं छेद दिला आहे. जुरासिक काळातही सपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या, हे या शोधावरून नक्की झालं आहे. आणि फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका या वनस्पतीला जुरासिक काळातली, ‘सर्वांत प्रथम शोधली गेलेली सपुष्प वनस्पती’ हा मान मिळाला आहे!

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: NIGPAS.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..