पहिल्या महिला भारुड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी यांचा जन्म २१ एप्रिलला झाला.
भारुडासाठी आयुष्य वेचणाऱ्या ‘भारुड सम्राज्ञी’ पद्मजा कुलकर्णी यांचे मूळ गाव बेळगाव, खानापूर. त्या माहेरच्या पद्मजा दामले. त्यांचे वडील मिल्ट्रीत होते. बरीच वर्षे आफ्रिकेत त्यांचं वास्तव्य होते. त्यांच्याकडूनच धाडसीपणा, बंडखोरपणा पद्मजाताईंच्या स्वभावात आला. गाणे, नाटक, लेखन, खेळ, अभ्यास अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांची जोरदार प्रगती होती. त्यांचे काका बाबूराव दामले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळे खानापूर, बेळगांव, कारवार, बिदर, निपाणी, चंदगड अशा प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या सभेमध्ये १३/ १४ वर्षाच्या लहानग्या पद्मजाताईंनी स्वागतगीत म्हणून, घोषणा देऊन स्वत:चा सहभाग नोंदविला. आचार्य अत्रे, पुंडलीकजी कातगडे, गंगाधरराव देशपांडे आदींनी त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. पुढे योग्य वयात लग्न झाले, दोन मुलं झाली, प्रापंचिक जवाबदा वाढत गेल्या. पण पद्मजाताईंमधला कलाकार अस्वस्थच होता. मुलं थोडी मोठी झाल्यावर म्हणजे साधारण पस्तिशीच्या पुढे त्यांनी घराबाहेर जाऊन काय करता येईल, याचा अंदाज घेतला आणि एक विलक्षण कल्पना सुचली. गाणे, संगीत, नृत्य, नाट्य,समाजसेवा या सगळ्यांची आवड पूर्ण होऊ शकेल, असा कलाप्रकार म्हणजे लोककलेतील भारूड! त्याचे कार्यक्रम आपण करावेत, असा विचार सुरू झाला. दोन वर्षे त्यावर अभ्यास केला. कुटुंबाबरोबरच आजूबाजूने होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध झुगारून १९९४ मध्ये सोळा बायकांचा ग्रुप तयार केला आणि केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या भारूड, गोंधळ, जोगवा, पंढरीची वारी अशा समाजप्रबोधनात्मक परंतु मनोरंजक कलाप्रकारांचा एकत्रित कार्यक्रम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी ‘ओम श्री माँ भगिनी भारूड मंडळ’ स्थापन केले. या सगळ्यासाठी त्यांना त्यांच्या गुरू व स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या संस्थापिका मालतीबाई जोशी यांचे मोठे मार्गदर्शन मिळाले.
पद्मजाताई स्वतः पेटी, तबला, ढोलकी चांगली वाजवतात. नाथांच्या भारुडांबरोबरच बदलत्या सामाजिक समस्यांना न्याय देण्यासाठी स्वतःच्या पद्यरचना त्यांनी केल्या. संगीत,संवाद, नृत्यदिग्दर्शन असा सबकुछ ‘पद्मजा’ टच मिळाल्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणि लोकप्रियता वाढत गेली. गल्लीतल्या देवळापासून सुरू केलेला भारुडाचा कार्यक्रम दिल्लीपर्यंत म्हणजे केवळ देशातच नाही, तर देशाच्याही बाहेर गाजला. इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका या देशांमध्येही भारुडाच्या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली.
२००७ साली ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये पहिली भारूड कार्यक्रम करणारी महिला म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली. अनेक मोठे मानसन्मान मिळाले. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मान झाला. छोटे-मोठे असे सत्तरपेक्षाही अधिक पुरस्कार मिळाले आहेत. लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पुणे महापालिकेतर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे.
याबरोबरच नाटक, चित्रपट, जाहिराती यांमधूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. पहिल्या महिला भारूड सम्राज्ञी पद्मजाताईंची एक मोठी खंत आहे, ती म्हणजे चाळीस वर्षे लोककलेची सेवा करूनही राज्य अथवा केंद्र शासनाने कोणतीही विशेष दखल घेतलेली नाही. दिवंगत पतीच्या माघारी आर्थिक उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसल्याने त्यांना प्रतीक्षा आहे कलाकार म्हणून चित्रपट महामंडळाकडून मिळणाऱ्या पेन्शनची.
— श्रुती कुलकर्णी.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply