नवीन लेखन...

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्‍ज्ञ म्‍हणून प्रसिद्ध होत्‍या. जन्‍मतःच हृदयात दोष असणार्‍या बालकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे आयुष्‍यमान उंचावणारी शल्‍यचिकित्‍सा डॉ. ब्‍लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्‍वी केली व त्‍यानंतर त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले. ‘ब्‍लू बेबी सिंड्रोम’ यावर टाऊसिग यांनी ब्‍लॅलॉक यांच्‍याबरोबर काम केले. त्‍यांनी असे दाखवून दिले की, जन्‍मतःच असलेल्‍या या हृदयदोषामुळे बालकांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही. फ्लूरोस्‍कोपी व एक्‍स-रे तंत्रज्ञानाचा वापर करून त्‍यांनी संशोधन केले. या हृदयदोषावर शस्‍त्रक्रिया करून तो बरा करता येईल असा विचार त्‍यांनी त्‍यांचे जॉन हॉपकिन्‍स रुग्‍णालयातील सहकारी डॉ. ब्‍लॅलॉक यांच्‍याजवळ मांडला. डॉ. ब्‍लॅलॉकव त्‍यांचे सहायक व्हिविअन थॉमसयावर काम करीत होतेच. टाऊसिगच्‍या कल्‍पनेवर अधिक काम करून जन्‍मतःच अशा प्रकारचा हृदयदोष असणार्‍या बालकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करून या हृदयदोषाचे निवारण करणारी उपचारपद्धती विकसित करण्‍यात आली. २९ नोव्‍हेंबर १९४४ रोजी टाऊसिग व ब्‍लॅलॉक यांनी ‘ब्‍लू बेबी’, ‘टेट्रालॉजी ऑफ फॅलॉ’ग्रस्‍त बालकावर प्रथम या नवीन पद्धतीने हृदयशस्‍त्रक्रिया केली. त्‍यानंतर आणखी दोन बालकांवर देखील टॉऊसिग व ब्‍लॅलॉक यांनी यशस्‍वीपणे ही शस्‍त्रक्रिया केली. ‘द जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ या वैद्यकीय संशोधनाला वाहिलेल्‍या अत्‍यंत प्रतिष्‍ठेच्‍या नियतकालिकात टाऊसिग व ब्‍लॅलॉक यांनी त्‍यांच्‍या शस्‍त्रक्रियापद्धतीवर शोधनिबंध प्रसिद्ध केला.‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-शंट’(डॉ. ब्‍लॅलॉक, व्हिविअन थॉमस या दोन लेखामध्‍ये हे नाव वेगवेगळे आले आहे ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-थॉमस’ / ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-शंट’) या नावाने ही शस्‍त्रक्रियापद्धती जगात ओळखली जाते. या शस्‍त्रक्रियेमुळे हजारो बालकांना जीवदान मिळाले आहे.

डॉ ब्लॅयलॉक व डॉ टॉऊसिग

डॉ. हेलन टाऊसिग यांचा जीवनप्रवास थक्‍क करणारा आहे. अमेरिकेच्‍या मॅसॅच्‍युसेटस् प्रांतातील केंब्रीज येथे १८९८ मध्‍ये हेलन टाऊसिग यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे वडील फ्रॅंक टाउसिग प्रख्‍यात अर्थतज्‍ज्ञ व हॉर्वर्ड विद्यापीठात प्राध्‍यापक होते. हेलन ११ वर्षांची असताना आईचे क्षयरोगामुळे निधन झाले. त्‍यानंतर आजोबांनी हेलनचा सांभाळ केला. आजोबा डॉक्‍टर होते. आजोबांमुळे हेलन टाऊसिग यांना जीवशास्‍त्र व प्राणीशास्‍त्रात रुची वाटू लागली व त्‍यांनी डॉक्‍टर होण्‍याचा निर्णय घेतला.

लहानपणापासून त्‍या डिसलेक्सिया या विकाराने त्रस्‍त होत्‍या. तरीही त्‍यांनी शिक्षणात त्‍याचा अडसर येऊ दिला नाही. १९१७ मध्‍ये केंब्रीज येथून शालेय शिक्षण पूर्ण करून त्‍यांनी रॅडक्लिफ महाविद्यालयात प्रवेश घेतला. (त्‍यांची आई देखील याच महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी होती.) बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९२१ मध्‍ये टाऊसिग यांनी बी.ए. ची पदवी मिळविली. त्‍यानंतर त्‍यांनी हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालय व बोस्‍टन विद्यापीठात शिक्षण घेतले व त्‍यानंतर जॉन हॉपकिन्‍स युनिव्‍हर्सिटी स्‍कूल ऑफ मेडिसीन येथे हृदयविकारावर संशोधन करण्‍यास सुरुवात केली.

हार्वर्ड व बोस्‍टन येथे त्‍यांनी हिस्‍टॉलॉजी (सूक्ष्‍मदर्शक यंत्राचा वापर करून प्राणी व वनस्‍पती यांच्‍यातील पेशींचा अभ्‍यास), बॅक्‍टेरिऑलॉजी व अॅनाटोमी (शरीरशास्‍त्र) यांचा अभ्‍यास केला. येथे एक गोष्‍ट नमूद करावीशी वाटते ती म्‍हणजे हार्वर्ड व बोस्‍टन या दोन्‍ही विद्यापीठांनी त्‍यांना पदवी देण्‍यास नकार दिला. हिस्‍टॉलॉजीच्‍या वर्गात तर त्‍यांना मुलांशी बोलण्‍यासही मज्‍जाव करण्‍यात आला होता.

अर्थात टाऊसिग यांनी या कशाचाही अभ्‍यासावर परिणाम होऊ दिला नाही. बोस्‍टन विद्यापीठात असतांना १९२५ साली त्‍यांनी बैलांच्‍या हृदयातील स्‍नायूंवर अभ्‍यास करून एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. अलेक्‍झांडर बेग त्‍यांचे सहलेखक होते. टाऊसिग यांनी जॉन हॉपकिन्‍स येथे अर्ज केला व त्‍यांना वैद्यकीय अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश देण्‍यात आला. १९२७ मध्‍ये टाऊसिग यांनी जॉन हॉपकिन्‍स मधून एम.डी. ची पदवी मिळविली व त्‍यानंतर तेथेच एक वर्ष कार्डिओलॉजी फेलो व त्‍यानंतर दोन वर्षे बालरोगविभागात प्रशिक्षणार्थी म्‍हणून काम केले. १९२७-१९३० या कालावधीत जॉन हॉपकिन्‍स येथे असतांना टाऊसिग यांना एकदा नव्‍हे तर दोन वेळा ‘आर्चिबाल्‍ड शिष्‍यवृत्ती’ मिळाली.

जॉन हॉपकिन्‍स येथे त्‍यांनी बालरोगविभागप्रमुख म्‍हणून १९३० ते १९६३ अशी तेहतीस वर्षे काम केले. यादरम्‍यान त्‍यांनी त्‍यांची जगप्रसिद्ध ‘ब्‍लॅलॉक-टॉऊसिग-शंट’ही शस्‍त्रक्रियापद्धती विकसित केली. १९४७ साली त्‍यांनी ‘कनजेनिटल मालफॉर्मेशन्‍स ऑफ द हार्ट’ (जन्‍मतः असलेले हृदयदोष) हे पुस्‍तक लिहून प्रकाशित केले. लहान मुलांतील हृदयरोगाचा स्‍वतंत्रपणे विचार करण्‍यास या पुस्‍तकामुळे चालना मिळाली.

डॉ. हेलन टाऊसिग यांचे आणखी एक मोलाचे कार्य म्‍हणजे ‘थॅलिडोमाईड’ ह्या औषधावर बंदी आणण्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले. अखेर या औषधावर बंदी घालण्‍यात आली. जर्मनीमध्‍ये त्‍यांनी ‘फोकोमेलिया’ग्रस्‍त (हातापायांची अविकसितता/व्‍यंग) बालकांवर उपचार केले. तेथून परत आल्‍यावर त्‍यांनी अमेरिकन कॉंग्रेस समोर थॅलिडोमाईड बद्दल स्‍वानुभवांचा आधार देऊन साक्ष दिली व या औषधावर बंदी घालण्‍यात आली.

निवृत्तीनंतर त्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या वसाहतीत राहात होत्‍या. २० एप्रिल १९८६ रोजी मतदानासाठी जात असतांना त्‍यांच्‍या गाडीची दुसर्‍या एका गाडीशी टक्‍कर झाली. त्‍या अपघातात त्‍यांचा मृत्‍यू झाला.

डॉ. हेलन टाऊसिग यांनी कायम प्रतिकूलतेवर मात करीत काम चालू ठेवले. शालेय जीवनात त्‍यांना क्षयरोगाची भावना झाली. औषधोपचार चालू ठेवून त्‍यांनी अभ्‍यासात खंड पडू दिला नाही. जॉन हॉपकिन्‍स मध्‍ये शिकत असतांनाच त्‍यांच्‍यात श्रवणदोष निर्माण झाला व ऐकू येईनासे झाले. त्‍यांनी ‘लिप-रीडिंग’ शिकून घेतले. स्‍टेथास्‍कोपऐवजी त्‍या रुग्‍णाच्‍या छातीवर बोटे टेकवून हृदयाची स्‍पंदने जाणून घेत. प्रत्‍येक वेळी आलेल्‍या अडचणीवर त्‍यांनी तितक्‍याच ताकदीने मात केली. १९५९ साली जॉन हॉपकिन्‍स विद्यापीठाने त्‍यांना प्राध्‍यापकपद बहाल केले. या रुग्‍णालयाच्‍या इतिहासात या पदावरील त्‍या पहिल्‍याच महिला!

त्‍यांच्‍या जीवनकाळात त्‍यांना अनेक मानसन्‍मान मिळाले.

    • १९४७ साली फ्रेंच शासनातर्फे त्‍यांना गौरविण्‍यात आले.
    • १९५३ साली अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्‍ट फिजिशिअन्‍सतर्फे गौरवपदक प्रदान करण्‍यात आले.
    • १९५४ साली इटालियन शासनातर्फे फेल्ट्रिनेली बहुमान तसेच वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अल्‍बर्ट लास्‍कर अॅवॉर्ड.
    • १९५७ साली फेलो ऑफ द अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्टस अॅण्‍ड सायन्‍सेस
    • १९६३ साली गोल्‍डन हार्ट अॅवॉर्ड
    • १९६४ साली प्रेसिडेंटस् मेडल ऑफ फ्रीडम
    • १९६५ साली अमेरिकन हार्ट असोसिएशनच्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष म्‍हणून निवड.
    • १९६७ साली अमेरिकन हार्ट असोसिएशनचे अॅवॉर्ड ऑफ मेरिट
    • १९७६ साली जॉन हॉपकिन्‍स तर्फे विशेष उल्‍लेखनीय कार्यासाठी मिल्‍टन एस. आयसेनहॉवर गौरवपदक
    • जर्मनीतील गौटिंनगेन विद्यापीठाने त्‍यांच्‍या हृदयरोग विभागाला डॉ. हेलन टाऊसिग यांचे नाव दिले आहे.
    • जॉन हॉपकिन्‍स विद्यापीठाने २००५ मध्‍ये डॉ. हेलन टाऊसिग यांच्‍या स्‍मरणार्थ एका महाविद्यालयाला त्‍यांचे नाव दिले आहे.

— डॉ. हेमंत पाठारे व डॉ. अनुराधा मालशे

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..