““तो” ….. लहानपणापासूनच एकदम “सज्जन” …. अगदी “”नाकासमोर”” टाईप बालवाडीपासून उच्चशिक्षण …. ते अगदी आत्तापर्यंत …. न कुठलं लफडं , ना लेक्चर बंक , ना कधी चोरून पिक्चर , ना पार्टी, ना व्यसन… अभ्यासाची गाडी मात्र नेहमीच वरच्या गियर मध्ये ….फुल सुसाट … त्याला सुद्धा कधीतरी वाटायचं .. “आज कुछ तुफानी करते है” … पण जमलंच नाही ….. कधी वाटायचं .. “छीछोरे” सारखं वागावं … पण “सु”स्वभाव आड यायचा …
अशा “धुतल्या तांदुळाच्या” .. “अक्षता” अर्थातच arrange marriage च्या …. त्यामुळे लग्नाआधीच्या , होकारापुर्वीच्या “दोन स्पेशल” भेटीमध्ये “कन्फेस” करण्यासारखंच काही नाही …. एकदम “ Title Clear ” गडी … आता …तो आणि ती ….दोघांचा सुखी संसार … मग “हम दो हमारे दो”…. चौकोनी कुटुंब …
बोलता बोलता…. लग्नाला २० वर्ष झाली … “यावर्षी anniversary ला पर्यटन नको… देवदर्शन करू !!!” … तिची इच्छा. मुलांना आजी आजोबांकडे ठेवून थेट कोल्हापुर…… घरच्या “लक्ष्मीला” घेऊन “अंबाबाईकडे” …. सकाळीच निवांत दर्शन घेतलं … हॉटेल मध्ये जेवण , वामकुक्षी, मग चहा-बिस्कीटं .. package वसूल ..
संध्याकाळी तो एकदम अमीरच्या रोमँटीक स्टाईल मध्ये ….. “ए … आती क्या रंकाळा???” पडत्या फळाची आज्ञा … हातात हात घेऊन युगुल रंकाळ्यावर … गुलाबी हवा … गुलाबी थंडी … गुलाबी विचार … दोघांच्या मनाचं पार “जयपूर” झालेलं .. जुन्या आठवणी ,किस्से , गमती-जमती … गप्पा सुरु …
अचानक समोर एक “बाईवजा मुलगी” … “ए …. हाsssss य ओळखलंस का ? “… अचंबित मोठे डोळे … आणि रेणुका शहाणे हास्य…. हा गडबडला …. तिला बघून एकदम “ती सध्या काय करते” वालं फिलिंग.. “ अगं …ही शाळेत , वर्गात होती माझ्या “… आणि ही माझी बायको !!! …..
दयाभाभी समोर असताना “बबिताजी” दिसल्यावर होणाऱ्या “जेठालालचा” चेहरा करत .. त्यानी एकमेकींना ओळख करून दिली …
“अगं …पण आता एकदम कोल्हापुरात कशी तू ??” “अरे … आता आई बाबा इकडे असतात माझे …. नवरा ६ महिने बोटीवर असतो … तेव्हा येते कधीतरी इकडे” … “आईच्या गावात !!!” … तो मनातल्या मनात पुटपुटला … “अगं तुला सांगते……”( लगेच एकेरी ..जसं काही त्याच बालपणीच्या मैत्रिणी)… “हा आणि मी म्हणजे ना … एकमेकांचं “पहिलं प्रेम” बरं का !!!” ….
रंग “उडाले” … “कृष्ण धवल” ची पाटी आली …Flash back चालू … शाळेत असताना काही आगाऊ मुलं , उगाच मुलामुलींच्या जोड्या लावायचे … चिडवण्यासाठी.. त्यात सगळ्या “हाय प्रोफाईल” जोड्या लावून जे उरले सुरले…… त्यात यांचा नंबर … कारण “ती” सुद्धा त्याच्यासारखीच … साधी सरळ … अभ्यासू. सज्जनपणात त्यांचे ३६ गुण जुळत असतील … थोडक्यात … “रिकाम्या जागा भरा” आणि “जोड्या लावा” या संयुक्त प्रश्नाचं … ते “दोघे एकमेव” उत्तर .. … एकमेकांना ते कधीच आवडले नाहीत …. किंबहुना तशी परवानगीच नव्हती त्यांच्या “मनाला ”… उलट ,चुकून कधी एकमेकांसमोर आलेच… तरी मुलं चिडवतात म्हणून खाली बघत, चेहरा लपवून कल्टी … प्रेम वगैरे तर दूरंच राहिलं …. साधी “नजर से नजर” पण नही मिलायी कधी …
Flash back संपला … रंग परतले …. Current “Affair” चालू .. “अगं तुला सांगते .. हा आणि मी म्हणजे ना ..एकमेकांचं “पहिलं प्रेम” बरं का !!!”…. आता बायकोचे मोठे डोळे … काहीसे प्रश्नार्थक …“जोड्या लावा” प्रश्न असूनही तो मात्र “एका वाक्यात उत्तरे द्या” सोडवू लागला …
आणि बायकोच्या मनात …..”कल्पना विस्तार” …
परिस्थिती बघून शेवटी अवघड पेपर “तिनीच” हातात घेतला … सगळ्या Flash back चं ……….”संदर्भासह स्पष्टीकरण”…. त्यावेळेस मात्र तो एकीकडे मनातल्या मनात खूष होत होता …. शाळेतल्या मुलांचं तीसेक वर्षापूर्वीचं ते “दर्दनाक” चिडवणं …. आज “आवडत” होतं .. गुदगुल्या … मोरपीस .. मन मे लड्डू … आणि बरंच काही … आणि अखेर “पहिलं प्रेम” या “सस्पेन्स थ्रिलर” नाटकाचा पडदा पडला … वातावरण हलकं फुलकं झालं …. चहाचं आमंत्रण देऊन ती देखील निघून गेली …
आपलं “कधीच नसलेलं प्रेम” … असं अनाहूतपणे “पहिलं प्रेम” बनून आपल्या समोर येईल असं कधीच वाटलं नव्हतं … पण आयुष्याच्या रंगमंचावरचा हा १५-२० मिनिटांचा “प्रवेश” .. त्याला बरंच काही देऊन गेला.. हे सगळं तेवढ्यापुरतंच होतं ….. नवीन प्रेम कहाणी उदयास वगैरे अजिबात येत नव्हती …
पण हा तात्पुरता प्रेमाचा त्रिकोण …. “कुछ कुछ होता है” moments…सगळं हवंहवंसं वाटत होतं … आता कहानी मधला “twist” उलगडून ..आयुष्य पुन्हा “सुतासारखं सरळ” …
दोघं निघाले ….सगळा प्रकार आणि संभाषण पुन्हा पुन्हा आठवून हसत … मनात कुठलंही “किल्मिष” न राहता … मिळालेलं एक “मिश्कील” surprise anniversary gift घेऊन … बरेच वर्ष जे “उगाच” काहीतरी “भन्नाट” करावसं वाटत होतं….पण त्याच्या वाईट परिणामांचा विचार करून ते करायचं धाडस होत नव्हतं … ते असं आपसूक घडून गेलं होतं …..याचा आनंद होता…. आपला “सज्जनपणाचा धब्बा” पुसला गेला …. आणि तेही त्याच्या बदल्यात कसलीही किंमत न मोजता … याचाच जास्त आनंद.. कदाचित कायम “गुणी बाळ ” बनून राहिल्याचं फळ असेल ते…
आता वातावरण अधिकच रोमँटीक . ..काही काळासाठी सुटलेले हात पुन्हा एकदा आपसूकच एकमेकात घट्ट गुंफले गेले …. पुढच्या आयुष्यासाठी आपल्या खऱ्याखुऱ्या “पहिल्या प्रेमा” बरोबर …. नव्याने सहप्रवास सुरु झाला…… एक नवीन उर्जा घेऊन … आणि त्या उर्जेचा स्त्रोत होतं हे आगंतुकपणे अनुभवलेलं …
पण “कधीच नसलेलं” “पहिलं प्रेम”
©️ क्षितिज दाते.
ठाणे.
छान कथा